
अशी झाली
चिकूपिकूची सुरुवात

यातूनच घराघरातल्या छोट्या चिकूपिकूंपर्यंत गाणी, गोष्टी, ऍक्टिव्हिटीजचं हे वातावरण पोहोचवता येईल का? हा विचार सुरु झाला… आणि चिकूपिकूचा दिवा डोक्यात पेटला !!

नोकरी सोडून चिकूपिकू सुरु करणं ही खरंतर एक मोठी उडी होती. शेवटी मी आणि गोविंदने (नवऱ्याने) यात उडी मारलीच आणि आमचा प्रवास सुरु झाला. जवळजवळ एक वर्ष आम्ही मुलांशी निगडित काम करणाऱ्या भरपूर लोकांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी चिकूपिकूचा ढाचा कसा असावा, चित्रं कशी हवीत, गोष्टी किती मोठ्या हव्यात, या सगळ्यावर काम करून चिकूपिकूचा पहिला अंक १० फेब्रुवारी २०१९ ला लाँच केला. १० फेब्रुवारीला आमच्या चिकूपिकूचा म्हणजे मुक्ताचासुद्धा वाढदिवस असतो.
या सगळ्या प्रवासात खूप छान-छान लोक चिकूपिकूमध्ये सामील होत गेले आणि अजूनही होत आहेत. आई-बाबा, आजी-आजोबा आणि मुलांचं खूप प्रेम चिकूपिकूला मिळतंय. हे प्रेम म्हणजे आमच्या ऊर्जेचा स्रोत आहे. अजून अनेक नवीन आणि हटके प्रयोग मुलांसाठी आणि आई-बाबांसाठी करायचे आहेत. पण त्यासाठी चिकूपिकू जास्तीत-जास्त मुलांपर्यंत पोहोचायला हवं. त्यात तुमची साथ नक्की मिळेल याची खात्री मनात धरून आहोत.


चिकूपिकू
कशासाठी?
रोज मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या? काय खेळ खेळायचे? कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायच्या? हे बऱ्याच आई-बाबांना माहित नसतं. इच्छा खूप असते पण आयत्या वेळी नक्की काय करायचं हे सुचत नाही. १ ते ८ या वयोगटात मेंदूचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. तेंव्हा मुलांना जास्तीत जास्त नवनवीन अनुभव देणं खूप गरजेचं असतं आणि हे अनुभवातलं शिक्षण आजूबाजूच्या वातावरणातूनच घडत असतं. आई-बाबा, आजी-आबा जितक्या गोष्टी सांगतील तितकं मूल समृद्ध होईल.

हे मुद्दे लक्षात घेऊन आम्ही छोट्या मुलांसाठी आणि त्यांच्या आई-बाबांसाठी चिकूपिकू हा प्लॅटफॉर्म सुरु केला. चिकूपिकूच्या टीममध्ये बहुतेक सगळेच आत्ताच्या जनरेशनमधले आई-बाबा आहेत. त्यामुळे आपण सगळेच एका बोटीतून जाणारे सहप्रवासी आहोत.
प्रत्येक महिन्याला मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ऍक्टिव्हिटीज, ऑडिओ गोष्टी चिकूपिकू मासिकातून मुलांपर्यंत पोहोचतात. जेवताना, झोपताना या गोष्टी मुलं आई-बाबा, आजी-आबांकडून ऐकतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र वेळ घालवतात. चित्रं रंगवतात. विकतच्या खेळण्यांपेक्षा हातांनी खेळणी करून बघतात. क्वालिटी टाईम घालवतात.
चिकूपिकू हे मुलं आणि आई-बाबा या जोडीचं मासिक आहे. मुलांच्या सभोवती छान, आनंदी वातावरण तयार करणं आणि आई-बाबांना या प्रवासात साथ देणं हा चिकूपिकूचा उद्देश आहे.

आजकाल बरीच मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. आई ज्या भाषेत बोलते ती भाषा आईच्या पोटात असल्यापासून मूल ऐकत असतं. ही भाषा त्याला जवळची असते, या मातृभाषेत त्याला गोष्टींचं आकलन नीट होतं. हेच लक्षात घेऊन चिकूपिकू मासिकातला ८०% मजकूर मराठी भाषेत आहे. विशेष म्हणजे आई-बाबांना चिकूपिकूमधील बोलीभाषेतल्या गोष्टींचा, ऍक्टिव्हिटीजचा खूप उपयोग होत आहे. या सगळ्या गोष्टी ऑडिओ स्वरूपात फ्री उपलब्ध आहेत. परदेशात राहणाऱ्या अनेक मुलांना त्या ऐकता येत आहेत.