शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 7 : ही पण आपलीच मुले
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
‘अरेss, लोकांच्या पोरांना खायला मिळत नाही आणि तुम्हाला मिळतंय तर गिळत नाही होय रे !’ खाण्याचे नखरे केले, हे नको, ते नको केलं की तळतळून आई म्हणायची. ही लोकांची पोरं कधी दारावर भीक मागायला यायची, कधी बूटपॉलिश करताना दिसायची, कधी हॉटेलात, उसाच्या गुऱ्हाळात कामं करताना दिसायची. प्रवासात गाडीत काय काय विकायला यायची, रस्त्यावर उकिरड्यात काहीबाही शोधताना दिसायची. आयुष्यातील फार वर्ष ही ‘लोकांची पोरंच’ राहिली. झोपडपट्टीतल्या कामाच्या निमित्तानं ही मुलं जवळ आली, कळली-बोलली तेव्हा वाटलं इतके दिवस का दूर राहिलो यांच्यापासून आपण ? मुलांना शिकवण्यासाठी झोपडपट्टीत गेलं की प्रथम दिसायचं लोकांच्या आणि मुलांच्याही डोळ्यातले अविश्वास, तिरस्कार आणि कुतूहल यांचं मिश्रण. कधी त्यात कुचेष्टेचीही छटा असायची. समाजसेवेच्या निमित्तानं, संशोधनाच्या निमित्तानं, अभ्यासाच्या निमित्तानं, कुटुंबनियोजन, आरोग्य-कार्यक्रमांच्या प्रचाराच्या निमित्तानं शिकलेल्या माणसांनी झोपडपट्टीत येणं याची या मंडळींना सवय होती. आम्ही शिकवायला आलो आहोत असं म्हटलं, की मुलांच्या आया म्हणायच्या ‘चला बाई उद्यापासून सुरु करा. पोरांचंबी शिक्षणं चालू व्हईल तुमचाबी पगार चालू व्हईल !’ आपल्याला मिळणाऱ्या पैशा-पगारापायीच झोपडपट्टीतल्या लोकांबद्दलचं प्रेम उफाळून येतं हेही त्यांना माहित होतं.
मुलांना शिकवायला लागलं की मुलांमधला हा अविश्वास त्यामानाने लवकर दूर होतो. मोठ्या माणसांच्या मते आपण पास व्हायला मात्र वर्षभर सहज लागतं. आमच्याकडे शिकायला यायची ती मुलं चार पासून चौदा-पंधरापर्यंतच्या वयांची असायची. त्यात पाच-सहा वर्षांच्या बहिणीच्या कडेवरून आलेल्या वर्ष-दोन वर्षांच्या मुलांचाही समावेश असायचा.
लहान वयाच्या मुली बहुधा आईबरोबर धुण्याभांड्याला जायच्या. कुणी कागद वेचायला जायच्या. कुणी आईबरोबर वीटभट्टीवर कामाला जायच्या. जरा मोठ्या मुली स्वतंत्रपणे धुण्याभांड्याची कामं, घरकामं करायच्या. मुलं बहुतेक हॉटेलमध्ये कामं करायची.
लहान भावंडांना सांभाळणं, स्वयंपाक करणं, घर सावरणं, दळण आणणं, दुकानातून वस्तू आणणं, गावातून हिंडून कुठे झाड पडलं असेल तर लाकडं गोळा करून आणणं ही लहान मुला-मुलींचीच काम.
सात-आठ वर्षांच्या मुलीसुद्धा कागद वेचून रोज सात-सत्तर पैसे मिळवायच्या. पैसे साठवायच्या. एकदा पंचफुला नावाची एक चुणचुणीत मुलगी आनंदानं सांगत होती- ‘बाई, म्या कागद वेचून पाच रुपये साठवले होतं. मग माजी आज्जी गावाकडनं आली. तिला दीड रुपयाच्या बांगड्या भरल्या आणि दीड रुपया आईला वशाट (मटन) आणायला दिला. आता नागपंचमीला मला बांगड्या भरायच्या म्हणून आणखी पैसं साठवणार !’ स्वतःच्या पायावर उभं राहून घरच्याही खर्चाला हातभार लावणाऱ्या त्या गुडघ्याएवढ्या मुलीकडे मी पाहतच राहिले.
रोजच्या कामांमध्ये वडलांना दारू आणून देणं हेही कुणा आठ वर्षांच्या मुलीचं काम असू शकतं याची मला कल्पना नव्हती. त्या मुलीची आई मुलीचं कौतुक करून सांगत होती, ‘तशी लई हुशार आहे बघा बाई आलकी (अलका ). एकदा बापासाठी दारू घेऊन येत होती तर पोलीस हिच्या पाठी लागले तर ओढ्यात टाकली बाटली हिनी आणि तिथंच परसाकडला बसली. पोलीस आल्यावर म्हणाली, ‘कुठं काय ? मी याच्यासाठी आले हिकडं’ मग पोलीस गेल्यावर ओढयात उतरून बाटली घेऊन आली घरला !’ आई कौतुक करते आहे बघून अलकालापण जोर आला. मग ती सांगायला लागली, ‘बाई गुत्याजवळ हाय ना आळूची वडी मिळती. नरड्यात लई खवखवती बघा खाल्ल्यावर !’
अशी ही हुशार अलका ! तिला आम्ही आमच्याकडे शिकायला आल्यावर ‘सुखी सगळ्यांना ठेव देवराया !’ ही प्रार्थना शिकवत होतो, बुद्धिमापन कसोट्यांमधील कोडी सोडवायला शिकवत होतो.
शिकलेल्या, ब्लॉकमध्ये राहणाऱ्या, चांगले कपडे घालणाऱ्या लोकांबद्दल त्या मुलामुलींना खूपच समज होती. घरकामं करणाऱ्या मुली रंगात आल्या की, आपल्या मालकिणीच्या नकला करायच्या. म्हणायच्या, ‘आपल्या घरी कुणीबी आलं तरी त्याला, भाकरी खाल्ल्याबिगर सोडणार न्हाई आपुनं आणि या बाया कुणीबी आलं तरी चहाच शिजवून घालत्याल आणि आम्ही काम करताना तर आमच्याकडे पाठ करून जेवून घेत्यात !’
झोपडपट्टी बघायला म्हणून एकदा आमच्याकडे एक लिपस्टिक वगैरे लावणाऱ्या बाई आल्या होत्या. त्यांना मुलींनी विचारलं, ‘बाई, तुम्ही पण आता रोज येणार इकड?’ त्यावर त्या म्हणाल्या ‘मला रोज कामं असतात.’ लगेच मुलीचा प्रश्न. ‘कसली कामं करता तुम्ही ? धुण्याभांड्याची ?’ त्या बाई खूप कृत्रिम मंजुळ बोलत होत्या, तर छबूनं त्यांना विचारलं, ‘बाई, तुम्ही हळू का बोलता ? जरा आरडून बोलावं !’
चार-पाच वर्षाचा सुरेश एकदा शिकायला आला नाही, तेव्हा चौकशी केली तर कळलं की, त्याची आई त्याला आज घर राखायला ठेवून गेलीय. त्याच्या घरी जाऊन पाहिलं तर सुरेश दारातच खेळत बसला होता. झोपडीला बंद करायला दार नव्हतंच म्हणून एकानं कुणी तरी कायम घरात राहावं लागायचं. बोलता बोलता सुरेश म्हणाला, ‘बाई, तुमचा पोरगा पण घर राखतो का ?’ मी म्हटलं, ‘हो. राखतो ना !’ ‘पण बाई तुमच्या घराला दार आहे का ?’ त्यावर एका मोठ्या मुलानं म्हटलं, ‘येड्या, बाईचा तर बंगला आसंल. दाराचं काम इच्चारतोस ?’
मोठी घरं, सुंदर घरं, सजवलेली घरं, म्युझियमसारखी दुर्मिळ, महाग वस्तूंनी नटवलेली घरं पहिली की, दार नसलेल्या झोपडीच्या दारात खेळणारा सुरेश हमखास आठवतो.
एकदा रंजू साडी नेसून आली होती. मी म्हटलं, ‘वा ! छान दिसतेय साडी ! ती पटकन म्हणाली, ‘आमची कसली गरीबाची साडी बाई. तुमच्या साड्या जोडाच्या नसतात.’ ह्या मुलीची आई एकदा मुलाच्या शाळेत भांडून आली होती ती सांगत होती, ‘मास्तर मला हाकलून द्यायला लागले तर मी म्हटलं, ‘दोन रंगांची साडी नेसून आले म्हणून मला कमी मानू नका मास्तर. मी पण आठवी पास आहे !’ जोडाच्या साड्या, फाटक्या साड्या यांच्याबद्दल असं अनेक संदर्भात बोलणं निघायचं. शिक्षणक्षेत्रातल्या लोकांना ‘Surprise Visits’ देण्याची फार आवड. अशी अचानक पाहुणेमंडळी वस्तीत आली की, बाया फार संकोचायच्या. मग म्हणायच्या, ‘बाई, आम्हाला आधी सांगायचं तरी म्हणजे आम्ही चांगल्या साड्या नेसून आलो असतो. तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांना आणता आणि आमच्या अंगावर फाटक्या साड्या, बरं दिसतं का ?’ मी मनात म्हणायची, ‘बायांनो, याची लाज येणाऱ्यांना वाटली पाहिजे. तुम्हाला नाही. अविश्वासावरच उभारलेल्या आपल्या पद्धतींमधें बऱ्या न दिसणाऱ्या इतक्या लाजिरवाण्या गोष्टी आहेत की, तुम्ही लाज कसली बाळगायची ?’
आठ-नऊ वर्षाची छाया आठवडाभर शिकायला आली नाही. ती एकदम साड्याच नेसायला लागली. मला वाटलं आईचाच आग्रह असणार तिच्या. म्हटलं, ‘छायाच्या आई, लहान आहे ती अजून. एवढ्यात कशाला साड्या नेसायला लावता तिला ?’ तर छायाच्या आईनं काय म्हणावं- ‘बाई, कामावर दोन साड्या मिळाल्या. मग छायाला म्हंटला आता साड्याच नेस. कपडे करायला काय लवकर जमणार नाही.’
हे सगळं अनुभवलं की, बाजारात येणाऱ्या नवीन फॅशनच्या भारी साड्या, त्याहून भारी साड्या, मॅचिंग, घराघरातले साड्यांचे संग्रह सारं अस्वस्थ करत राहत.
बाईंच्या साडीला हात लावून पाहणं, पदर धरून बसणं हा पण लहान मुलामुलींचा रोजचा उद्योग असायचा. बाई, तुमची साडी किती मऊ आहे असं एखादी मुलगी म्हणायची. एक मंगल नावाची तरतरीत चेहऱ्याची, चार-पाच वर्षाची मुलगी नेहमी चिटकून बसायची. बाकीची मुलं खेळत असली तरी ही मला सोडायची नाही. खूप दिवसांनी कळलं की, वस्तीत त्यांच्या घराला जवळ जवळ वाळीतचं टाकलंय. मंगलच्या आजोबांना महारोग होता आणि अलीकडे तिच्या आईलाही झाला होता. मंगलला कुणाच्याही घरात प्रवेश नव्हता.
अशी स्पर्शाची भूक, खूप मुलांना असायची. पोतराज म्हणून देवाला सोडलेली दोन मुलं होती, त्यांचे केस कापलेले नसायचे. ही मुलं मोठेपणी कडकलक्ष्मी होणार हे देवाच्या नावानं ठरलेलं होतं. नऊ-दहा वर्षाचा पोतराज बाळू कधी कुणात नीट मिसळायचा नाही. शाळेत जात नव्हताच. आला की मारामाऱ्या करायचा. पुस्तकं-वह्या पळवायचा. नेहमी अस्वस्थ असायचा. एकदा गंमतीत कागदाचे छोटे छोटे फ्रॉक, परकर, पोलकी करण्याचा खेळ चालू होता. बाळूला हा प्रकार फार आवडला. कधी नाही तो जवळ आला आणि गुर्मीतच म्हणाला, ‘बाई, मला एक बनियन करून द्या ! त्याला छोटा बनियन कापून दिला. तो त्याला इतका आवडला की, किती वेळ तो हातात धरून माझ्यामागेच बसून राहिला. इतर मुलांना शिकवणं चालू होतं तिकडे बाळूचं लक्षच नव्हतं. तेवढ्यात वारा आला. रस्त्यावरची बरीचशी धूळ-कचरा माझ्या अंगावर उडाला तर बाळू, प्रेमाने माझ्या साडीवरचा कचरा हलक्या हातांनी झाडत होता.
स्पर्शाची, प्रेमाची भूक ही मुलं अनेकदा वेगवेगळ्या युक्त्या करून पुरी करून घ्यायची. मुलांना घरोघर बोलवायला गेलं की, एखादी म्हणायची, ‘बाई आज माझी वेणी तुम्ही घालून द्यायला पाहिजे. मग ‘आज मी वेणी घालीन; पण उद्या तू उवांचं औषध लावलं पाहिजे !’ अशा अटीवर भोवती जमलेल्या आठ-दहा मुलींच्या साक्षीनं वेणी घालण्याचा कार्यक्रम व्हायचा. त्या दिवशी वेणी घालून दिलेली मुलगी फारच समंजसपणे वागायची.
शिकवणं संपलं की, मुलं घरी जायला तयारच नसायची. बस स्टॉपपर्यंत पोचवायला यायची. बस येईपर्यंत थांबायची. तिथे बस स्टॉपवरच्या दांड्यांवरून उड्या मारणं, लोंबकळणं चालू असायचं, गप्पा रंगायच्या. बस आल्यावर बाईंना ढकलून बसमध्ये चढवलं की खरी शाळा सुटायची !
माझी मुलंपण बऱ्याच वेळा माझ्याबरोबर यायची. मग मुलीच्यामागे त्या सगळ्या मुली असायच्या. ‘माझी हरणी गं ’ म्हणून तिला उचलून घ्यायच्या. एखादी स्वतःच्या गळ्यातली नवी मोत्याची माळ तिच्या गळ्यात घालायची आणि निघताना माळ काढून दिली तर म्हणायची, ‘बाई, घेऊन जा की, तुमच्या पोरीला ही माळ. ती माझ्या बहिणीसारखीच आहे !’
अशा या प्रेमळ मुली आपसात भांडायला लागल्या की, मात्र मला अजिबात ऐकायच्या नाहीत. एकदा सगळ्या मुलांची नखं कापली; पण आक्का तयार होईना नखं कापायला. ‘का गं कापून घेत नाहीस ?’ विचारलं तर म्हणाली, ‘आम्हाला लागतात नखं भांडणात ओरबाडायला !’ मलाही एकदा तिच्या नखांचा प्रसाद मिळाला होता.
एकदा मी येण्यापूर्वी जोरदार चालू असलेलं भांडणं थांबलं, पण धुसफूस चालू होती. त्यावर ‘बाई आहेत म्हणून नाही तर मी बोलले असते ’ असं आशा म्हणाली, ‘आमच्या लई घान शिव्या असत्यात.’ मी म्हटलं, ‘मला माहिती आहेत त्या ’ मग सगळ्यांना फारच रस वाटला.
सांगा बरं ही शिवी माहीत आहे का, ती माहीत आहे का, याचा अर्थ काय वगैरे गप्पा सुरु झाल्या. रस्त्यात कुणाचा धक्का लागला की कसा शिव्यांचा पाऊस पडायचा, त्याचं प्रात्याक्षिक झालं. सगळं झाल्यावर १४-१५ वर्षाचा सतीश म्हणाला, ‘बाईंना काहीपण शिव्या माहीत नसतील, या बायका नुसतं हलकट, नालायक म्हणतात !’
हा सतीश हॉटेलात काम करायचा. हॉटेलमालक ग्लास फुटला की, कसा रागावतो, मारतो त्याची नक्कल करून दाखवायचा. रोज एका कागदावर काही तरी लिहून घ्यायचा. म्हणायचा, ‘मी हॉटेलात घेऊन जातो कागद आणि मध्ये वेळ मिळाला की वाचतो.’
कधी शाळेत न गेलेल्या या मुलांना साक्षरतेचा सगळा प्रांत अपरिचितच होता. माझ्याकडे अक्षरांचे, शब्दांचे पत्ते असायचे, ते बघून लिहायचा प्रयत्न चालायचा. चुकून एखादा पत्ता उलट दिला तर मुलं अक्षरं उलटी काढायची. रेषेच्या खाली अक्षर असतं हे कुणाला माहीत ? एखादी मुलगी उत्सहानं चार-पाच ओळी भरून वेगवेगळे आकार काढून दाखवायची आणि म्हणायची, ‘पुस्तकात असेच किडे किडे काढलेले असतात न बाई ?’ भेंड्या खेळायला लागलं की ‘क’ पासून सुरु होणारं गाणं, ‘म’ पासून सुरु होणारा शब्द म्हणजे काय हे लक्षात यायचं नाही. कारण आजवर बोलण्याचे वाक्य, शब्द, अक्षरं असे तुकडे असतात हे माहीत नसायचं. एकदा तर गंमतच झाली. एक शिक्षक मुलांना गोष्ट सांगायला आले होते त्यांनी शाळेतल्या सवयीप्रमाणे विचारलं, ‘मी आता म्हणतो ते वाक्य कुणी म्हटलंय ते सांगा बरं? – स्वराज्य हा माझा, जन्मसिद्ध हक्क आहे’ सगळी मुलं गप्प. ‘सांगा लवकर ! कुणी म्हटलं हे वाक्य ?’
त्यात कुंताबाईंचं डोक चाललं. तिनं ते वाक्य स्वतःशी म्हणून पाहिलं आणि जोरात ओरडली, ‘म्या म्हनलं !’
त्या मुलांना स्वतंत्रपणे सारं करायची इतकी सवय होती की दोन तास बाईंनी ठरवलेला कार्यक्रम बाई घेतायत हे त्यांना खपायचं नाही. मग कधी मुलं म्हणायची, आता आम्ही रामलीला करतो. मग पार्ट वाटले जायचे. कोण राम, कोण लक्ष्मण, कोण सीता, कोण रावण. तुमने मेरे भाईको मारा. मै तुमको नही छोडुंगा असे डायलॉग असायचे. हिंदी पुरेसं वाटलं नाही की मराठीला खेचून आणलं जायचं. मधेच राम- सीते समोर ‘नाजरोंके तीर मारे कस कस कस ’ हे गाणं म्हणत त्यावर नाच व्हायचा. हिंदी चालीवरची मराठी गाणी असायची. ‘ सजणे तुझा रागही असा चावतो मला नागही जसा‘ यावर नाच व्हायचा.
एकूण सर्वांगसुंदर रामलीलेतला उत्साह अफाट असायचा. त्यापुढे आमची गोष्टीची ‘नाट्यीकरणं ’ फिकी पडायची.
गोष्टींची नाटकं करतानासुद्धा इतक्या छोटया छोटया गोष्टींनी मुलांना आनंद व्हायचा. एकदा कॉलेजला जाणारी एक मुलगी बस स्टॉपवर उभी असते असं नाटकात होतं. मग त्या मुलीच्या हातावर पेननं घड्याळ काढून दिलं तर नंतर तोच मुख्य कार्यक्रम झाला. सर्वांच्या हातावर घड्याळं काढणं.
सागरगोटे खेळताना किती डाव झाले हे लक्षात ठेवायची मुलींची मजेशीर पद्धत होती. हातात खूप बांगड्या असायच्या. एकेक डाव झाला की मनगटातील एकेक बांगडी त्या वर कोपराकडे सरकवून ठेवायच्या. भातुकलीला भांडीकुंडी खेळतोय म्हणायच्या. ही भांडी चिखलाची केलेली असायची.
एकेका हातात डझनभर बांगडी भरायच्या आणि त्या पिचू नयेत म्हणून त्यांनी शिवण घालायची आणि एकत्र बांधून ठेवायच्या हा प्रकार बघायला मिळायचा.
मुली फार मजेमजेशीर गाणी, उखाणे म्हणून दाखवायच्या. त्यातलं एक गाणं –
कोंबडा कोकssतो
पैसा मागssतो
पैसा कशाssला
बायको करायला
बायको कशाला
लेकरंबाळं व्हयाला
लेकरं कशाला
खंड वेचायला
खंड कशाला
माडी बांधायला
माडी कशाला
पाटील बसायला
पाटील कशाला
कागद लिवायला
कागद कशाला
कोंबडीचा xxxxx पुसायला
हे गाणं म्हणून सगळ्यांनी हसायचं हा ठरलेला विनोद. मग गाणं म्हणणारी म्हणायची, ‘हसलं त्याचं दात दिसंल मढं बसंल.’ ही मुलं मोकळेपणानं बोलायला लागली की काय काय बोलायची ! यात नांगरधारी शेतकऱ्याला मत दिलंत तर तुमच्या घरावरून नांगर फिरंल हा मला इशारा असायचा. ‘मी मोठेपणी सगळा स्वयंपाक करून आपणच खाणार, नवऱ्याला दगड देणार ! आपलं खाऊन आपल्यालाच मारणाऱ्या नवऱ्याला कशाला काय द्यायचं ?’ हे मनोगत असायचं.
‘तुमी ज्याला हाडफेल झाला म्हनता ना बाई, त्याला आम्ही बाधा झाली म्हणतो.’ हे समजावून सांगणं असायचं.
‘काही झालं की लगेच डॉक्टरकडे कशाला जायचं ? चार दिवस लोळून-घोळून आपोआप बरं होतं.’ हे शिक्षण पण असायचं. आठ वर्षाच्या मुलीचं लग्न होऊन तिला नवऱ्याने सोडलेलं असायचं. ती सांगायची-‘बाई, माझं नशीब चांगलं नाही म्हणून नवऱ्यानं मला सवत आणलीय, आता मी जाणती झाल्यावर मला सवतीवर नांदायला पाठवायचं.’
अशी ही मुलं ! आपल्या मुलांचं बालपण आपण जपतो, त्यांना आनंदाचे अनुभव देतो, त्यांना समजून घेतो, त्यांचं भविष्य घडवण्याबाबत जागरूक असतो.
या मुलांचं काय ?
आपण काहीच देणं लागत नाही यांचं ?
झोपडपट्टी म्हटली की आपल्याला त्यातली माणसं दिसतच नाही. दिसते फक्त घाण ! यांना स्वच्छता शिकवली पाहिजे असं कुणी म्हटलं की वाटतं आधी माणसं आहेत हे आपण शिकलं पाहिजे, मग त्यांना काही शिकवणं ! या मुलांशी-माणसांशी ओळख वाढवली पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे मग भांडी घासणारी मोलकरीण ही फक्त मोलकरीण वाटत नाही. ती कुणा बाळू, मीरा, छबू, छायाची आई असते हे लक्षात राहतं. रस्त्यावर भंगार घ्यायला येणारा गाडीवाला परका वाटत नाही. कदाचित ते आपल्या आक्काचे वडील असतील असं मनात येतं.
याबद्दल एक ठरलेला वाद असतो. किती केलं तरी ही माणसं सुधारायची नाहीत. तुम्ही त्यांचं भलं करायला जा, ती तुम्हाला फसवून जातील. मान्य आहे. असेही अनुभव येतात; पण तेही आपण मान्य करायला हवेत. एखाद्यानं फसवलं म्हणून या सगळ्या माणसांना कायमचं निकालात काढणं हा शहाणपणा नव्हे. त्यांना अनेक गोष्टी मिळत नाहीत. त्यांच्या बाबतीत आपण इतकं हिशेबी राहावं ? पैशाचा हिशेब करावा ? नीतिमूल्य त्यांच्याच माथी मारावीत ? सगळ्यांना झोपडपट्टीत जाऊन काम करणं नाही जमणार. कबूल; पण प्रत्येक कामाच्या इतरही काही सोप्या पायऱ्या असतात. सहज जमणाऱ्या. त्या हळूहळू चढता येतात. गाडगेबाबा म्हणायचे, ‘तुमच्या मुलाला चांदीची ताटवाटी करा; पण गरिबाच्या मुलाला एखादी पितळेची तर द्याल ? तुमच्या मुलाला जरीचं अंगडं शिवा, पण गरिबाच्या लेकराला एखादं सुताचं द्याल?’
एका जरीच्या अंगड्याऐवजी दहा सुताची शिवता येतात, दहा लेकरांना देता येतात, हा हिशेब कधी तरी ध्यानी येईल ?
आपल्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर वाढवणाऱ्या असंख गोष्टी घडत आहेत. अंतर कमी करणारी एखादी गोष्ट आपण करू शकू ?

Shobha Bhagwat
बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका
संचालिका, गरवारे बालभवन
खुप छान.
Mast
विचार करण्यास भाग पाडणारा लेख!
kharach vichar karayala lavnara lekh aahe.khup sunder………
You have send very nice story thank you chikupiku.
Khup chhan