- शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
- लेखन: शोभा भागवत
- प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
- आवृत्ती पहिली: १५ मे १९८४
प्रस्तावना:
प्रत्येक पुस्तकाची एक कथा असते. ते कसं झालं ते समजून घ्यायला वाचकांना आवडतं. या पुस्तकाबद्दल सांगायचं तर – मी लहान असल्यापासून मला लहान मुलं आवडतात. आजूबाजूच्या, ओळखीच्या लहान मुलांना खेळवणं, फिरायला नेणं, शिकवणं, त्यांचे लाड करणं, त्यांच्याशी भांडणं हे करत करतच मी मोठी झाले. तान्ही मुलं मांडीवर घेण्याची तर मला इतकी हौस होती!
एकदा सहावी-सातवीत असताना मे महिन्याच्या सुटीत गावाला जाताना आगगाडीच्या प्रवासात भर गर्दीत शेजारणीचं तान्हं मूल मी हौसेनं मांडीवर घेऊन बसले होते. ते मूल खूप तापलं होतं आणि माझ्या मांडीवरच ते गेलं. त्या मुलाच्या जाण्याचा मी इतका धसका घेतला की गावाला पोहोचल्यावर दोन दिवस मी अंथरूण धरलं होतं. थोडी मोठी झाल्यावर, मुलांबद्दलच्या या आवडीला नकळत काही फांद्या फुटल्या. मुलांचं निरीक्षण,त्यांच्या गमतीशीर बोलण्याचं आकर्षण वाढलं.
पण या आवडीला डोळे फुटले ते मला मुलं झाल्यावर, पहिल्या बाळंतपणानंतर प्रथमच जेव्हा बाहेर पडले तेव्हा एक विलक्षण अनुभव आला. शेजारच्या झोपडपटीतलं एक मूल रस्त्यावर खेळत होतं. वाहनं जवळून जात होती आणि तिथे मला माझंच मूल दिसायला लागलं. मुलांबद्दलच्या जिव्हाळ्याला वेगळीच जाग आली आहे असं वाटलं.
मुलं वाढवताना लक्षात यायला लागलं की हा फार छान पण तितकाच गोंधळवून टाकणारा, विचारात पाडणारा, खूप काही शिकवणारा अनुभव आहे. हा अनुभव आपल्याकडून जी संवेदना, जो संयम, जे शहाणपण, जो धीर मागतो आहे तेवढं सगळं आपल्याकडे आहे का? अशी शंका यायला लागली. पुस्तकं वाचून बालमानसशास्त्र समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मी ते जास्त आणि जास्त चांगलं शिकले. काही पुस्तकांनी काही नव्या दिशा मात्र दाखवल्या.
या पुस्तकातले लेख प्रत्यक्ष लिहून होईपर्यंत मला खरं तर कल्पनाच नव्हती की, या विषयावर आपण एवढा विचार केलाय. एवढं काही आपल्या मनात साठलंय.
मागे मी ‘स्त्री’ मध्ये आणि ‘सकाळ’ (दैनका) मध्ये मुलांबद्दल लेख लिहिले होते. ते मेधा राजहंस आणि दिलीप माजगावकरांना आवडले. ते दोघं माझ्या ऑफिसमध्ये आले आणि या विषयावर आणखी लिहा असं सांगून गेले. मी हो म्हंटल आणि नंतर माणूसमध्ये ही लेखमाला सुरु केली. मेधा नावाचा वाघ मागे लागल्यामुळे लेख लिहून झाले. आता हा विषय मला आणखी जवळचा वाटायला लागलाय. त्यावर खूप काही वाचावं, संशोधन करावं, मुलाचं मन समजून घ्यावं आणि पालकांना ते समजून घ्यायला शिकवावं हे आता मी माझं काम समजते आहे.
या पुस्तकामागे खूप मोठा अभ्यास नाही हे प्रामाणिकपणे सांगते पण समोर आलेल्या अनुभवाला सर्वार्थांनी भेटण्याची हौस आहे. सतत शोध घेत राहण्याची नैसर्गिक प्रेरणा आहे. कुठलंही ज्ञान, कुठलंही शिक्षण, संशोधन हा शेवटी अनुभवच असतो. खूप वेळा होतं असं की जड भाषा, क्लिष्ट रचना, विचारांच्या कोलांट्या उड्या, अवजड पारिभाषिक शब्द यांच्या कसरतीत ह्या अनुभवाचा ताजेपणा, आनंद, त्याचा स्वाद, त्यातली माधुरी, त्याचा जिवंतपणा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मुलांना समजून घ्यायचा अनुभव त्यातील सगळी गोडी कायम ठेवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
मुलांशी संबंध येणाऱ्या सर्वांसाठी हे लिहिलं आहे आणि मुलांशी संबंध कुणाचा येत नाही? अगदी बाहेरच्या नसला तरी आपल्या स्वतःमध्ये एक मूल दडलेलं असतं, त्याच्याशी तरी आपला संबंध येतोच की. ते मूल सांभाळून ठेवलं, त्याच्याशी संवाद केला की जगणं सोपं होतं. कारण त्याच्या प्रेरणा नैसर्गिक प्रेरणा असतात. हा मनातला निसर्गच आपण हरवून बसतो आहोत. तो आपल्यापासून हिरावला जातोय. तो जपायला हवा.
या लेखनाच्या निमित्तानं मी माझ्या लहानपणात पुन्हा एकदा रमले. जाणवलं की आमच्या आई-वडलांनी आम्हा भावंडांना त्यांच्या साध्या, सरळ, प्रेमळ, वागण्यातून नकळत बरंच शिकवलं. बापूंना हे लेख वाचायला फार आवडलं असतं. ते म्हणायचे, “आम्हांला कळेल असं साधं लिही.” हे लेख लिहायला अनिल आणि शोनिल, आभानी मला खूपच मदत केली. लेखनाबद्दल माझ्याशी गप्पा मारल्या. या लेखनामुळे आम्ही सगळे वेगळ्याच पातळीवर जवळ आलो.
श्री भाऊ माजगावकरांनी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हे सगळं वाचून तुम्हाला काय वाटलं ते कळवण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे.
बरंय मग. पुन्हा भेटूच
– शोभा भागवत
(आज पासून रोज ‘आपली मुलं’ या पुस्तकातील एक लेख दोन दिवसा आड पोस्ट करणार आहोत. जास्तीत जास्त पालकांपर्यंत हे लेख पोहोचवूया. या लेखाबद्दलचे प्रतिसाद कमेंट-बॉक्स मध्ये नमूद करा. शोभा ताईंपर्यंत आपल्या प्रतिक्रिया पोहोचवता येतील.)

Shobha Bhagwat
बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका
संचालिका, गरवारे बालभवन
Looking forward to Artical’s from Shobha Bhagawat book ‘Aapali Mul’
पुस्तकं मागवायला कुठला पर्याय आहे मला पुस्तक हवं आहे
Website Link For Books Purchase – https://chikupiku.com/product-category/books/
Chchan
Vachayla faar avadtil, Shobha taai!
शोभाताई… खूप बरं वाटलं वाचून.
मला उत्सुकता राहील तुमच्या लेखांची.
Atishay changala upakram aahe.
Vachayala awadel
Khupch chhan.aamhala khup margadarshan hoil
मला तुमचं हे चिकू पिकू पुस्तक फार आवडत.त्यात मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम दिले आहेत. जे मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत करतील. या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी मिळू शकते का?
छान उपक्रम स्वागत आहे
पुढच्या लेखाची वाट पाहतेय.
Eye opener starting
Thank you very much for sharing this. Since lockdown I was thinking of your book GARANCHA PAUS.i have the books but they were kept in my office cupboard therefore no access. I have read these two book around 16 years back, when I was expecting my son Aryan. It was so nice to find these books that time, so light hearted, but full of wisdom and loving experiences. These were the only books on parenting that gave me joy and relief and did not make me feel that patenting was hard. Thank you for sharing your experiences and writing such a lovely book. Lots of love.
Dhanashree
मी हे पुस्तक खूप आवडीने वाचलं, मुलं तेव्हा लहान होती. तर आम्हाला खूप मजा आली.
माझी मुलगी मधुवंती, 3 वर्षाची होती, जून महिना, आम्ही एका छोट्या समारंभात होतो, मुलं बाहेर धमाल करत होती, गारांचा पाऊस झाला, ही मुलगी मुठीत गारा घेऊन आत येऊन म्हणाली, “आई, बाहेर मज्जा आहे पावसाची, ह्या बघ पावसाचया बिया!”. मी तिच्या कल्पनेवर फिदा होऊन तिला घट्ट मिठी मारली!
खूप छान शोभा ताई….समोर आहात आणि खरंच बोलत आहत … असं वाटत होतं वाचताना… परवाची वाट पाहते.. अनघा
Nice story how to look before child
नियमितपणे आपले लेख वाचतो.खूप मार्गदर्शक लेख आहेत पालकांसाठी….आमच्यासाठी.सुजाण पालकत्व याचे खूप अनमोल असे ज्ञान व विज्ञान आपण सांगत आला आहात.तसेच,मी एक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे.त्यामुळे जास्त वाचन आपल्या लेखांचे करतो.
धन्यवाद चांगला उपक्रम