कॉर्पोरेशनच्या नळाला पाणी येतं सकाळी तासभर, ते पिंपात आणि माठात भरून घेतलं. पेपरमधल्या डिप्रेसिंग बातम्यांवर नजर टाकत चहा प्यायला. ब्रेकफास्टला धिरडी केली. नुकतंच कोविडमधून बरं झालेल्या घरातल्या आम्हा ५ जणांना हेल्दी ब्रेकफास्ट आवश्यक आहेच त्यामुळे वेगवेगळी पिठं एकत्र केली, त्यात थोडं किसून गाजर घातलं. ओल्या नारळाची चटणीसुद्धा केली. टेबलवर सगळं ठेवलं तोच इराची बेडरूममधून जोरदार “आ SSS ई ” अशी हाक आली. सासू, सासरे आणि नवरा ब्रेकफास्ट करतायत तोपर्यंत इराचं सकाळचं सगळं आवरून दिलं. अजून तशी छोटी आहे त्यामुळे टॉयलेट, दात घासणे, केस आवरणे या कामांना मदत लागते. मग आम्ही पण दोघी खायला बसलो. गोष्ट सांगत सांगत भरवून झालं. नवरा ऑफिसला गेला. इसेन्शियल कामात असल्यामुळे बरं झाल्यावर लगेच रुटीन चालू. इकडे घरात छोटी इरा, सिनिअर सिटीझन सासू-सासरे… शाळा नाही, डे केअर चालू नाही, कामवाल्या बायकांना सोसायटीने काही दिवस बंदी केलेली असताना माझं तर घरातलं काम नेहेमीपेक्षा जास्तच इसेन्शियल! मला पण अजून थकवा आहे वगैरे विचार बाजूलाच ठेवून मी कामाला लागले.
इराला पझल खेळायला देऊन मी पुढच्या स्वयंपाकाला लागले. भाजी करता करता कोवीड पॉझिटिव्ह असलेल्या आई-बाबांना फोन केला. ऑक्सिमीटरवर बाबांचं रिडींग कमी येतंय ऐकून पुढची फोनाफोनी चालू झाली. एकीकडे भाजी झाली, वरण – भाताचा कुकर लावून काकडीची कोशिंबीर करून ठेवली. अधून मधून इराच्या पझलमधले राहिलेले तुकडे जोडताना माझ्या डोक्यात पुढच्या कामाचं पझल तयार व्हायला लागलं. खाली राहणाऱ्या काकू अधूनमधून पोळ्या करून देऊ शकतात, त्यांना सांगितलं आज १० पोळ्या द्या करून. पुढचा तुकडा पझलमध्ये फिट बसला !
सासूबाईंचा तोपर्यंत थोडा आराम झाला होता त्यामुळे त्यांना ‘इराकडे बघा’ सांगून, मास्क घालून आणि सॅनिटायझर घेऊन, वडिलांसाठी डॉक्टरांनी फोनवर सांगितलेली औषधं आणायला बाहेर पडले. औषधं आणि इतर थोडं सामान घेऊन आईबाबांच्या दाराबाहेर ठेवून आले. बघा-भेटायची सोय नाही पण निदान गरजेला जवळ आहोत हे काय कमी? शेजारच्याच गल्लीत राहणारी मामीसुद्धा कोवीडग्रस्त. तिलाही फोन करून विचारलं आणि हव्या त्या गोष्टी दाराबाहेर पोचवल्या आणि घरी आले. आल्या आल्या इरा ‘माझ्याशी काहीतरी खेळ’ म्हणून मागे लागली. ती तरी इतकीशी पिल्लू .. एकटी किती रमवणार स्वतःला? तिच्याबरोबर ‘झू’मधल्या प्राण्यांचा तिनेच शोधलेला खेळ खेळलो.
जेवणाची तयारी करताना इरा छान ताटं-वाट्या मांडते. मी बाकीची तयारी करून सगळ्यांना जेवायला बोलावलं. पुन्हा एक चिकूपिकूमधली गोष्ट सांगत, ऐकत जेवणं झाली. मागची आवरा-आवरी झाली. दुपारी चित्र रंगवत, भेंडीचे ठसे पाडत इरा त्यात गुंतलेली असताना थोडासा वेळ ऑफिसचं काम करता आलं. एकीकडे ती पुढचे रंग भरत होती आणि मी पुढची एक्सेल शीट्स !! थोडं काम झाल्यावर एका मित्राला फोन करून ‘ऑक्सिजन बेड’ कुठे रिकामे आहेत हे कोणत्या वेबसाईटवर कळेल त्याची लिंक पाठवायला सांगितली. बाबांना तेवढी हॉस्पिटलमध्ये जायची वेळच येऊ नये, पण आली तर काय करायचं याचं प्लानिंग मनात तयार असलेलं बरं. डोक्यात सतत पझल चालू…
तेवढ्यात सासऱ्यांना थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. पोस्ट कोवीड इफेक्टमुळे कधी तरी पल्सरेट थोडा खाली जातो त्यांचा. औषधं चालूच आहेत पण सगळ्या टेस्ट्स अजून व्हायच्या आहेत. त्यांना तरतरी यावी म्हणून थोडी कॉफी करून दिली आणि त्यांच्या पुढच्या टेस्टची चौकशी करून ठेवली. आजोबांना बरं नाहीये बघून इरा अस्वस्थ झाली पण नेमकं काय होतंय हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे चिडचिड होत होती तिची. मग विषय बदलावा म्हणून आजीबरोबर इरा गच्चीत फिरायला गेली तेवढ्यात मी संध्याकाळी खायला म्हणून पोहे करून ठेवले. ऑफिसचे २-३ फोन झाले. पुन्हा एकदा बाबांना कसं वाटतंय याची चौकशी केली.
आता आपणही गच्चीत जावं असा विचार आला, पण लक्षात आलं की आज गडबडीत कपड्यांचं मशीन लावायचं राहूनच गेलं. ते लावून दिलं आणि खायचं घेऊन गच्चीत गेले. नवराही तोपर्यंत ऑफिसमधून आला. गच्चीत जरा खेळून, खाऊन खाली आलो.
रात्रीसाठी फक्त आमटी-भात करायचा असं मी डिक्लेअर करून टाकलं. डाळ, तांदूळ धुवायला इराला मजा वाटते. दोघींनी मिळून कुकर लावला. एकीकडे नवऱ्याने कपडे वाळत घालायला सुरुवात केली. आम्ही दोघी पण मदत करायला गेलो. पटकन झालं मग काम.
जेवणं झाली. आजी-आजोबांबरोबर थोडा वेळ इरा TV बघत होती तेंव्हा कुठे आम्हा दोघांना शांतपणे बोलायला वेळ मिळाला. उद्या काय महत्त्वाची कामं आहेत याविषयी बोलताना लक्षात आलं … आजचं पझल जवळजवळ पूर्ण होतंय तोच उद्याचं पझल मनात तयार व्हायला सुरुवात झाली होती. घरातली कामं, बाहेरची आणि ऑफिसची कामं, इराबरोबर वेळ घालवणं या सगळ्यासाठी माझेच वेगवेगळे तुकडे पझलमध्ये फिट बसत होते. त्याविषयी माझी तक्रार नव्हती पण रोज रोज सेम पझल लावून इरासुद्धा कंटाळते तेंव्हा मीच तिला नवीन खेळ शिकवते. आतासुद्धा रोजच्या रुटीनच्या खेळात काहीतरी नवीन बदल आणणं माझ्याच हातात होतं का?
घराघरातल्या तुम्हा आयांचा काय अनुभव आहे .. मला सांगाल?

जुई चितळे
बालकथा लेखक, चित्रकार
खूप छान जुई, घराघरात हीच स्थिती आहे. आई, मुलगी, सून शिवाय ऑफिस वर्क म्हणून कित्येक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आपल्या सगळ्या मैत्रिणी. त्यांच्या या कष्टाला फळ मिळो आणि सगळे आरोग्यसंपन्न राहोत. आणि तुम्हाला खूप छान लिहल्याबद्दल, प्रत्येकीच्या मनातलं कागदावर उतरवल्याबद्दल खूप अभिनंदन…
खूप छान. अगदी सोपी भाषा. माझाच अनुभव वाच्टिये असं वाटलं. Thank you..
Khupach chan lihila ahe Jui tai..
Mala wattay pratek gharatlya aaicha ha asa anubhav asawa pan tumcha ya lekhatun ek navin drushtikon milala ki jase mulana apan navin navin kahi tari shodhun dyacha praytna karto tasech aplya ya rojchya same puzzle madhe apanach kahi tari navin shodhun kadu sahkto or kadle pahije he lakshat ale
He khupach chaan lihilay jui tumhi. Asa wattay ekhadya superwoman chich goshta ahe. Aaplya sarwant ek superwoman ahech. Nakalat itki mahatwachi kame aapan karto n tyacha ullekh suddha karat nai. Pan kharach shewti khup mhnje khupach damayla hot.
वाचताना मीच आले डोळ्यासमोर. खूप छान लिहिले आहे. वाचताना मुले कसे रोजच्या puzzle मुळे कंटाळतात ते उमगले… जसे आपण रोजचे काम, रोजचे रूटीन मध्ये काहीतरी happy twist शोधत असतो तसेच मुलांचे भावविश्व.. धन्यवाद लिहिल्याबद्दल..