मुलांना गोष्टी सांगायला, वाचून दाखवायला मला खूप आवडतं. मी आणि माझा मुलगा, शार्दूल आम्ही खूप गोष्टी वाचतो आणि ऐकतोसुद्धा. चिकूपिकूच्या ऑडीओ स्टोरीज किंवा इतरही गोष्टी, शार्दूल जेंव्हा तल्लीन होऊन ऐकतो तेंव्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला जाणवत असतं की गोष्टीतलं जग त्याच्या डोळ्यासमोर दिसतंय त्याला. मुलांना गोष्ट सांगण्यात हीच तर गंमत असते नं! त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांना वाईट वाटतंय की रडू येतंय की हसू येतंय की अजून काही हे अगदी स्पष्टपणे दर्शवतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की मुलं गोष्ट ऐकताना त्या गोष्टीशी एकरूप होतात. त्यांना गोष्ट ऐकताना मज्जा येते आणि त्यापलीकडे हा अनुभव त्यांना इतरही बरंच काही देतो. कल्पनाशक्तीला वाव, भाषेवर प्रभुत्व, सहवेदना आणि संवेदना यांचा विकास, सभोवतालच्या परिसराची ओळख, विविध परंपरांविषयी माहिती, मानवी भावभावना हाताळणं, हे सगळं आणि बरंच काही. मात्र आपला त्यांना गोष्ट सांगताना काहीतरी शिकवतोय हा हेतू असू नये. निखळ आनंद यापलीकडे दुसरा कुठलाही उद्देश न ठेवता गोष्ट सांगावी. त्यांना त्यापेक्षा वेगळं जर काही मिळालं तर तो बोनस… आणि असा बोनस नक्की मिळतो त्यांना आणि आपल्यालाही.
गोष्टी ऐकायला का आवडतं हे मी एक दिवस शार्दूलला विचारलं तर तो म्हणतो कसा, “आई मी गोष्टीत रमतो”. त्याच्या तोंडून ‘रमतो’ हा शब्द ऐकून मी चाट पडले. गोष्टी ऐकल्याचाच हा परिणाम हे लक्षात आले. असेच एका गोष्टीत राधाला बरं नाहीये तेव्हा सगळे तिचं ऐकतात असं काहीतरी ऐकलं होतं त्याने. त्याचंच अनुकरण करत शार्दूल मला म्हणाला, “माझ्या सर्दीच्या काळात तुम्ही माझं ऐकायचं असतं”.
गोष्टीत ऐकलेल्या घटना, संवाद, इतर वर्णनं पण मुलं पडताळून बघतात, त्यातून त्यांची निरिक्षणशक्ती काम करत असते. हे मला “आई चेटकीणीच्या चेहऱ्याला सुरकुत्या का असतात, ती पातळ कापडाची असते का?” या प्रश्नावरून लक्षात आले. मग सुरकुती कशाकशाला पडते आणि का अशी चर्चादेखील आम्ही केली. भाषा सुधारली हे कळले जेव्हा ‘पंचाईत’ होणे, ‘दुखापत’ होणे, असे वेगवेगळे शब्द त्याच्या बोलण्यात अगदी सहज यायला लागले.
भाषेचं, घटनांचं आणि होणाऱ्या परिणामांचं आकलन होणं हादेखील गोष्टी ऐकल्याचा उपयोग आहे असं मला वाटतं. आपल्याला काय म्हणायचंय हे नेमक्या शब्दात मांडता येणं ही कला गोष्टी ऐकून मुलं आपोआप शिकत असतात. गोष्टी ऐकण्याचं बायप्रॉडक्ट म्हणा हवं तर!! तर मुलांना गोष्टी सांगा, वाचून दाखवा, विविध ऑडीओ स्टोरीज ऐकवा. त्यांच्यासोबत आपणही ऐकू या आणि धमाल करू या. Happy listening!

This is really true. My 3 years old daughter also listens to many stories on ChikuPiku site, ChikuPiku YouTube, other YouTube stories and we also read out stories for her. She listens very carefully and uses some words, phrases..
Khup chan
छान लिहिलंयस मृदुला. खरच शार्दूलचे शब्द भांडार खूपच वाढले आहे