fbpx

एखादं मुलं पुरेस बोलत नाही, इतरांशी मैत्री करत नाही, कधी वय वाढलं तरी मनानं अस्वस्त आहे ,घरी आई -वडिलांचं न पटण्याचा गंभीर प्रश्न आहे. शाळेत मागे पडत आहे ,अशा समस्या जाणवून बऱ्याचदा मुलांचे डॉक्टर मुलांना बालभवनात पाठवा असा सल्ला पालकांना देतात. अशा मुलांना आम्हीही बालभवनात लगेच सामावून घेतो आणि बऱ्याचदा त्याचे प्रश्न काही काळातच सुटतात. बरोबरच्या २०-२५ मुलांच्यात रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं, त्यांची भाषा कानावर पडणं, अनेक आनंददायक उपक्रमात सामील होणं, या सगळ्याने खूप मदत होते प्रश्न सुटायला.

जेव्हा असं जाणवतं की प्रश्न मुलांचा नाही, त्याच्या पालकांचा आहे, तेव्हा समुपदेशाकडे जायलाच हवं, असा आग्रह आम्ही धरतो.

चार वर्षाची मुलगी हाका मारल्या तरी जेवायला येत नाही, म्हणून रागानं तिच्या गालाला गरम उलथनं लावणारी आई होती. घरातल्या आई -वडिलांच्या भांडणात मिटून गेलेली आणि चित्र रंगवताना कायम काळाच रंग वापरणारी मुलगी होते . घरीदारी हा वाईट मुलगा आहे असा शिक्का बसलेला आणि त्यामुळे वस्तूंची तोडफोड करणारा, शिव्या देऊन थुकणारा मुलगा होता. सहलीला यायला उशीर झाला, बस निघून गेली म्हणून राग असह्य होऊन रस्त्यातच मुलाला लाथाबुक्यांनी मारणारी आई होती.

कधी मुलांच्या चित्रांमधून कधी त्याच्या वेगळ्या वागण्यामधून तर कधी पालकांच्या वागण्या बोलण्यातून प्रश्न जाणवतात. त्याच्यावर जेवढ्या लवकरउपाय होतील तेवढे ते मुलांच्या हिताचं असत. कारण मुलं फार भरभर वाढत असतं. कुठलेतरी प्रश्न, अस्वस्थता, विकृती घेऊन ते वाढलं तर त्याच्या संबंध आयुष्यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच मुलांच दुसरं नाव आज आहे असं म्हणतात. त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच मुलांशी ज्यांचा ज्यांचा संबंध येतो, त्या सर्व प्रौढांना या प्रश्नांची समज असायला हवी. आमच्याकडे मुलांचे काहीच प्रश्न नाहीत, असे शाळांनी म्हणू नये तर हे प्रश्न समजण्याची दृष्टी सर्व शिक्षकांना द्यायला हवी. त्या मुलाची त्याच्या वैचारिक वागण्याची त्याच्या पालकांची चेष्टा न करता त्यांना खूप मनापासून शक्य ती सगळी मदत करायला हवी.

कित्येकदा असं आढळतं कि पालकांशी मोकळेपणाने बोलल्यानेही त्यांना खुप मदत होते. आपण पालक म्हणून कसे आहोत, कसं असायला हवं, याबद्दल बोलायला लागतं, आपलं मुलं कसं आहे, ते त्यांना समजून सांगावं लागतं, आपलं घर आज मुलांना काय देत आहे, याबाबत पालकांची जागरूकता संवादतून वाढवावी लागते. मुलांशी चांगला संवाद कसा करावा याची पथ्ये शिकवावी लागतात. मुलाकडे दुर्लक्ष न करणे. त्यांना धमक्या न देणं त्यांची इतरांशी तुलना न करणे, त्यांचे निर्णय परस्पर न घेणं. त्यांच्यावर शिक्के न मारणं त्यांना न रागावणं, मारणं टाळणं अशी कितीतरी पालकत्वाची कौशले अंगवळणी पाडावी लागतात. पालकांनी स्वतःच आणि मुलांचं जग मोठं करणयाची गरज असते. त्याची जाण आली तर प्रश्न सुटायला मदत होते आपण कुठे चुकतो हे पालकांच्या लक्षात येत. मुलं लहान असताना लहान असताना पालकांना हे पालकत्वाचं शिक्षण देणं ही जाणत्या माणसांची मोठी जबाबदारीच आहे. त्यातून खूप मुलांचा समस्यांपासून बचाव होईल. पालक शिक्षणाच हे काम नुसती विविध विषयांवर भाषणं देऊन होत नाही हे शाळांनी लक्षात घायला हवं. हे कौशल्याचं शिक्षण आहे. त्यामुळे त्यासाठी बालवाडीच्या वयापासून पालकांसाठी अभ्यासक्रम असायला हवेत. तरच मुलांना त्याचा उपयोग होईल.

आजचे तरुण पालक असे आहेत की त्यांचा स्वतःचा जन्म स्वतंत्र कुटुंबात झाला आहे. स्वतःला मूल होईपर्यंत त्यांनी लहान मूल हाताळलेलं नाही घरात मोठी माणसं नाहीत. त्यामुळे मूल ही त्यांना न पेलणारी जबाबदारी वाटते. त्यातच नवरा-बायकोचं पटत नसेल तर अधिकच ताणातून कुटुंब जात असतं. आज कित्येक घरं अशी आहेत की त्यातले बाबा कामानिमित्त दूरगावी असतात. कधी आईपण अशी लांब गेलेली असते. घरातल्या माणसांवर मुलांवर अतिरिक्त ताण असतो. सतत अस्वस्थ असलेल्या मोठया माणसाच्या सहवासात मुलांवर मग लवकर मोठं होण्याची अपेक्षा असते. बालपण जसं गरिबीत हिरावलं जातं. तसं ते आर्थिक संपन्नतेतही हिरावलं जातं. तो निवांतपणा, ती मोकळीक, चुकल तर चुकलं जाऊ दे असं प्रेमाने म्हणणारी मोठी माणसं या सगळ्या बालपणाच्या गरजाच आहेत. चार खेळणी कमी मिळाली तर काही बिघडत नाही. मूल काशातुनही खेळ शोधून काढू शकतात. पण पालकांच्या मनाचं स्वास्थ्य फार फार महत्वाच आहे.

घरं लहान, खेळायला मूलं नाहीत, मित्र नाहीत, सर्व दारं बंद अशा सोसायट्यामध्ये असंख्य मुलं आज गुदमरत आहेत. आई -वडील त्यांच्या नोकरी-व्यवसायात बांधले गेलेले. मग कुणावरतरी मुलं सोपवायची! पाळणाघर ते शाळा, पाळणाघर ते ग्राऊंड, पाळणाघर ते क्लास अशी मुलं दिवसभर फिरवली जातात. एक मुल मला बालभवनात नाही जायचं म्हणून कळवळून रडायचं. त्याची आई मला हा माझाच दोष असा ठपका मनात बाळगून भांडायला आली. त्याचा दिनक्रम पहिला तर ते मुलं सकाळी सहा वाजल्यापासून घराबाहेर असायचं. त्याला आई -वडील भेटायचेच नाहीत. पाळणाघरं-शाळा-क्लास हे चक्र संपलं की त्याला घरी जावंस वाटलं तर त्याची काय चूक? त्याला खरंच सध्या बालभवनात पाठवू नका अशी मी त्या आईला विनंती केली. त्याला आई हवी होती. ती मिळाल्यावर त्याचा प्रश्न आपोआप सुटला.

पालकांच्या बेबंद अपेक्षांपासून मुलाचा बचाव करायला हवा आहे. मला माझ्या मुलाला क्रिकेटिअरच करायचा आहे. माझी मुलगी नृत्यांगना व्हायलाच हवी, मुलाला स्केटिंगला घातलं की त्यानं सुवर्णपदकच मिळवायला हवीत. चौथ्या वर्षांपासूनच खरोखर अशा वइतक्या ` स्पेशलायझनची ` गरज आहे का? महत्त्वकांक्षी पालकांना वाटतं ‘बालभवन’मध्ये २० मुलांच्यात ‘जनरल’ शिकून काय होणार? पण मग आपली मुलं मातीत, वाळूत, पाण्यात कधी खेळणार? ती इतरांशी मैत्री कधी करणार? स्वतःच्या हातांनी नवनव्या गोष्टी करायचा आनंद ती कधी मिळवणारा? ती शेती कधी करणार? आज शहरी आयुष्यात मुलांना एका बंदिस्त कोशात आपण वाढवतो आहोत. स्पर्ध्येत धावणारी घोडी आपण तयार करतो आहोत. इतरांकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही. इतरांसाठी काही करायचं नाही. घरातली साधी साधी कामं त्यांनी करायची नाहीत. काय होईलं मोठेपणी अशा मुलांचं? त्यांच्या भविष्यात मानसिक अस्वास्थ्य तर लिहून नाही ना ठेवलं जात?

गरीब वस्त्यांमधील मुलं ‘बालभवन’मध्ये खेळताना आम्ही पाहतो. तेव्हा १४-१५ व्या वर्षी एखाद्या मुलीचा लग्न झालं की खूप वाईट वाटतं. तिच्या आईची असहायता दिसतं असतं. वर्षभरात या खेळणाऱ्या-बागडणाऱ्या मुलीला मूल होतं नंतर येऊन जेव्हा ती सांगते की बालभवनातला काळ तिच्या आयुष्यातला सर्वात चांगला काळ होता. छान खेळता आलं, वाचता आलं. अजूनही ती कधी सुट्टीच्या दिवशी येऊन बालभवनात खेळू शकते. आई म्हणून ती मुलांचा वेगळा विचार करते. मुलांच्या गाण्याकडे, गोष्टी कडे, खेळांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहते. तेव्हा लक्षात येत की बालपणातला आनंद सुजाण पालकत्वालाही जन्म देत असतो.

घरात आणि शाळेत बसून बसून आणि बसूनच राहून मुलांना धावता येत नाही, उडया मारता येत नाहीत, कोलांटी उडी मारता येत नाही. त्यांच्या शरीराचा लवचिकपणा तिसऱ्या वर्षापासूनच कमी होतो आहे. त्यांच्या आहाराचा विचार करायला पालकाना वेळ नाही. सहलीला खाऊ म्हणून मुलं तयार वेफर्सची मोठाली पाकीट आणतायत. टीव्ही व कॅम्प्युटर हेच त्याचे मित्र. त्यांच्याशी गप्पा मारायला कुणाला वेळ नाही. अशा वातावरणात मुलं विकृत झाली नाहीत तरच नवलं!

डॉ. उल्हास लुकतुके मोठे मनोविकारतज्ञ आहेत. त्यांना बालभवन दाखवून मी एकदा विचारल होतं, काय अर्थ वाटतो तुम्हाला या उपक्रमांचा? ते म्हणाले , इथं येऊन मुलं आयुष्यभर नॉर्मल राहतील. मला हा फार मोठा आशीर्वाद वाटतो!

chikupiku

Shobha Bhagwat

बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका 

संचालिका, गरवारे बालभवन 

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop