बालकांची लैंगिक सुरक्षितता
भाग-: 1
कोरोना नामक साथीमुळे आज आपण घरात अडकलेलो आहोत. लहान मुलांच्या खेळण्या-फिरण्यावर, बागडण्यावर निश्चित मर्यादा आल्या आहेत. आपली मुलं घरी सुरक्षित आहेत अशी आपली कल्पना असते. मुलांसाठी त्यांचे घर सोडून दुसरी कोणती सुरक्षित जागा असू शकेल? पण हे खरं आहे का? मुलं घरात खरंच सुरक्षित आहेत का?
आपल्या आजुबाजूला बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर सोशल मिडियावरील पोस्टमधे लहानग्या मुलांच्या हातातील फोटो बघून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. या फोटोत “पालकांनो आम्हांला वाचवा” अशी पोस्टर्स या मुलांनी हातात धरली आहेत.
चाळीस, पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा काळ आठवा, वाडा संस्कृती अस्तित्वात होती. सगळ्यांच्या घरी येणं-जाणं होतं, मुलांना सगळीकडे मुक्त संचार होता. माझं आजोळ पुणे विद्यापीठात म्हणजेच आत्ताच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे होतं. आम्ही सगळी भावंडे दिवसभर मुक्तपणे सगळ्या विद्यापीठ परिसरात बिनधास्त फिरत असू, आणि घरची मंडळी मुलं असतील इथे कुठेतरी खेळत असं समजून निर्धास्त असत. तेव्हा तिथे फारशी वर्दळ नसे, बसदेखील सारख्या नव्हत्या, खासगी गाड्या तर अगदीच तुरळक. तरीही भिती नसायची, मुलांना मोकळेपणा मिळायचा. तुम्हाला आठवतंय का तुमचे सुरक्षित बालपण?
आत्ताच्या परिस्थितीत कुठे मिळतो मुलांना असा मोकळेपणा? पालकांना मुलांची काळजी असते. सतत मुल डोळ्यांसमोर हवं, न जाणो कधी काय घडेल हा विचार सतत मनात असतो.
सोसायटीच्या मैदानावर खेळताना मुल गेटच्या बाहेर तर जाणार नाही ना? सोसायटीचा वॉचमन, शाळेच्या कॅब / रिक्षा / बसचा ड्रायव्हर मुलांची ने-आण सुरक्षितपणे करेल की नाही? आपल्या मुलाच्या बाबतीत काही अघडीत प्रसंग तर घडणार नाही ना? याची काळजी पालकांना सतत असते.
सध्याची परिस्थिती जरी आपण बदलू शकत नसलो तरी केवळ काळजी करणं तर नक्कीच पुरेसे नाही.
आजच्या काळात छोटे आणि विभक्त कुटुंब पध्दतीमुळे घरात ईन-मिन तीन माणसं. सध्या आई-बाबा दोघेही जॉब करणारे असतात. बऱ्याच घरांमध्ये मुलांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबाही नसतात.
त्यात मुलांच्या हातात आलेल्या स्मार्ट फोनमुळे लहानग्या हातात सगळी दुनिया सामावलेली आहे. मुलं अगदी सहजतेने लिलया मोबाईल वापरत असतात. मोबाईलमधून मुलांवर चुकीच्या, विभत्स, अशास्त्रीय, अवाजवी, माहितीचा मारा होतो.
नुकतच तारुण्यात पदार्पण केलेलं मुल ब्लू फिल्म बघताना पकडलं गेलं की पालक जागे होतात. त्याच्या बॅगेत काही आक्षेपार्ह आढळलं की हतबल होतात.
दिल्लीतील निर्भया ते नुकतेच झालेले अभया प्रकरण, बाल-लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे सातत्य त्याचबरोबर त्याचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चाललंय. परिकथेतील जगात रमणाऱ्या मुलांना जीवनातील दाहक वास्तवता कशी बरं ध्यानात आणून देता येईल?
आपल्या लहानग्यांना अशा घटनांपासून वाचवायचे असेल तर आधी आपल्याला लैंगिक शिक्षण म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मुलाच्या वाढीचे टप्पे, यामध्ये नैसर्गिक काय? अनैसर्गिक काय? याची माहिती घरी पालकांना आणि शाळेत शिक्षकांना हवी.
मुलांना लैंगिक शिक्षण कोणी, कधी, केव्हापासून, कसे दयावे? या सगळ्याचा विचार आपण यापुढील काही भागातून करणार आहोत.

ॲड. भाग्यश्री चौथाई
कायदेविषयक सल्लागार, विवाह पूर्व & विवाह पश्चात समुपदेशक व
मुक्त पत्रकार.
Khup chhan madam
Thanks a lot
Sex education is the need of time.your efforts gives the insight to the patent and teacher’s about how to handle this critical topic in front of tennagers.
Thanks a lot