fbpx

बालकांची लैंगिक सुरक्षितता

भाग: २

लहान वयात प्रामुख्याने असतं ते कुतूहल. पालक-शिक्षकांचा कायमचा अनुभव असतो, की या वयात मुलं सतत प्रश्न विचारत असतात. झाडाची पाने हिरवी का? आकाशाचा रंग निळा का दिसतो? पक्षी कसे उडतात? पक्ष्यांसारखे मला उडता येईल का?
अगदी अशाच प्रश्नांप्रमाणे मी कसा जन्मलो? बाळ आईच्या पोटात कसं जातं? मुली आपल्यासारख्या उभ्याने शू का करत नाहीत? असे अनेक प्रश्न मुलं विचारतात. नैसर्गिक कुतूहलाच्या भावनेतून स्वतःच्या किंवा भिन्न लिंगाच्या लैंगिक अवयवांबद्दलसुद्धा मुलांना जाणून घ्यायचं असतं.

मुलांना पडणाऱ्या या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरं आपण द्यायला हवी. “ती मुलगी आहे त्यामुळे बसून शू करते, नाहीतर शू तिच्या पायावर सांडेल.” असं सहज बोलता-बोलता सांगता येऊ शकतं.

एकंदरीतच विचार केला तर मूल अगदी लहान असल्यापासूनच आपण त्याला एका गोष्टीपासून कायम दूर ठेवतो. ते म्हणजे त्याच्या लैंगिक अवयवांच्या कुतूहलापासून. लहानपणापासूनच त्याच्या खासगी अवयवांबद्दल त्यांच्या मनात एका प्रकारची अढी निर्माण करतो. यातून मुलाला पालकांकडून एक संदेश जातो. हे वागणं काहीतरी चुकीचंच आहे, हे समाजमान्य नाही. त्यामुळे मुलाचं जे नैसर्गिक कुतूहल असतं त्याला योग्य ती वाट मिळत नाही. त्याच्या भावना दडपल्या जातात.

या वयामध्ये जसं स्वतःच्या अवयवांबद्दल कुतूहल असतं तसचं ते भिन्न लिंगाबाबतीत आकर्षण देखील असतं, हे अगदी नैसर्गिक आहे याची पालकांनी माहिती ठेवायला हवी.
काकाचे लग्न झाले म्हणजे त्याला आता बाळ होणार का? सिनेमात दाखविलेल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे प्रसंग असो की मी कुठून आलो? या अशा निरागस कुतूहल-मिश्रीत प्रश्नांची उत्तरे देण्याचच आपण टाळतो. पंचज्ञानेद्रिंयांवर आधारीत शालेय शिक्षणात स्वतःच्या खासगी अवयवांबद्दल माहिती दिली जात नाही हे तितकच खरं.
या सगळ्या प्रश्नांमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अशा प्रश्नांना उत्तरं देताना न लाजता मुलाचं शंका निरसन करायला हवं. आपण ओरडून प्रश्न टाळला तर आई किंवा बाबा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत हे नक्कीच मुलं हेरतील. त्यामुळे मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची सवय आपल्याला  लहान असल्यापासूनच करायला हवी.
लैंगिक शिक्षण देताना वयोगटाप्रमाणे प्रामुख्याने मुलांचे तीन गट केले जातात.

१-  छोटा गट (० ते ६)

२-  मध्यम गट (६ ते ११)

३- मोठा गट (११ ते १८)

मुलाची गरज, आकलन क्षमता, या सगळ्याचा विचार लैंगिक शिक्षण देताना करावा लागतो. प्रत्येक वयोगटाची गरज वेगवेगळी असते. हे पालक म्हणून आपल्या लक्षात वेळोवेळी आले असेलच. तरी एका उदाहरणातून स्पष्ट करते. वरच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न घेऊ.

मी कसा जन्मलो? तीन ते चार वर्षाच्या मुलाला तू आईच्या पोटातून आलास. या उत्तराने समाधान होईल परंतू थोड्या मोठ्या वयोगटाला अजून जास्तीची माहिती दयावी लागेल यांवर त्यांचे काही प्रश्न असतील. मोठ्या वयोगटाच्या मुलांना आई-बाबा काहीतरी लपवत आहेत, उत्तर देण्याचे टाळत आहेत हे नक्की लक्षात येते. अशावेळी पालकांची जबाबदारी वाढते. ज्या गोष्टी आपल्या स्वतःला सांगता येणं शक्य नाही त्या गोष्टी डॉक्टर, तज्ज्ञ, समुपदेशक यांच्यामार्फत मुलांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

थोडक्यात या विषयावरील कोणत्याही प्रश्नांची उत्तरे आपण मोकळेपणाने आणि न लाजता मुलांना दिली पाहिजे. अगदी लहान वयापासून आपण ही सवय ठेवली तरच मुलं या नाजूक विषयावरील त्यांचे प्रश्न, मतं आणि समस्या आपल्याशी बोलू शकतील.

chikupiku

ॲड. भाग्यश्री चौथाई

कायदेविषयक सल्लागार, विवाह पूर्व & विवाह पश्चात समुपदेशक व
मुक्त पत्रकार.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop