‘घरी येऊन बघ, कबीरने पेपरचे काय काय कटिंग करून ठेवलंय ते…’
सासूबाईंनी फोनवर सांगितले, तेव्हा कागदाचे छोटे-मोठे तुकडे हॉलमधल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले माझ्या डोळ्यासमोर आले. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर ते गोळा करता करता नाकी नऊ येणार आणि होणारी चिडचिड तर वेगळीच… तमाम आयांसारखी!
काय सारखा पसारा करतो हा मुलगा? आवरायचं नाव नाही. नुसतं हे काढ, ते काढ, हे पसर, ते पसर, कधी कागद काप, तर कधी फरशी किंवा भिंतीवर रंग, तर कधी बेडशीटच रंगवलेली… ऑफिसमधून घरी जाऊन दमलेल्या जीवानं पसारा पाहायचा आणि अजून थकायचे… वगैरे वगैरे.. असे अनेक विचार रागानं मनात आले.
पण…
‘आवरतो ना गं आई; पण आधी बघ ना मी काय केलंय ते… किती भारी झालंय ना?’ असं आनंदानं आणि उत्साहानं सांगणारा कबीरचा निरागस चेहरा डोळ्यासमोर आला आणि राग एकदमच शांत झाला.
माझ्या मुलाचं असा पसारा करणं आणि त्यातून काहीतरी ‘प्रयोग’ करणं नवीन नाही. त्याची सतत काही ना काही खुडबूड, लुडबूड सुरू असते. का कोण जाणे; पण त्यातूनच त्याला खूप आनंद मिळतो आणि आता त्याचा तो आनंद मलाही आनंद देऊ लागला आहे.
घरात पसारा पाहून चिडचीड होणं साहाजिक आहे. ऑफिसमधून परत आल्यानंतर घराचा चेहरामोहराच बदललेला म्हटल्यावर त्रागा होणारच. माझ्याही अनेक मैत्रिणी मुलांच्या पसाऱ्यानं, नीटनेटकेपणा नसल्यानं खूप वैतागतात.
पण खरे सांगू का? या पसाऱ्यातूनच मुलांना निखळ आनंद मिळत असतो. (खूप चिडचीड करून झाल्यानंतर मला सापडलेले हे शहाणपण आहे). खेळता खेळता, त्यात रमता रमता त्यांच्या हातून पसारा होत जातो आणि त्याच पसाऱ्यात ते परत रमतात. लवकर कंटाळत नाहीत, की आपल्यामागे कोणतीही भुणभुण करत नाहीत. त्यांचं त्यांचं मस्त चाललेलं असतं. त्यांना गुंतवून ठेवण्याचा आपला ‘लोड’ही कमी होतो.
मुलांची जिज्ञासू वृत्ती सतत जागृत असते आणि ती पडताळण्यासाठी ते त्यांच्या त्यांच्या परीने सतत काहीतरी नवं करून पाहत असतात. कधी नेमकं काय करायचंय हे माहीत असतं, तर कधी फक्त काहीतरी वेगळं करायचंय हे डोक्यात असतं. कधी तो प्रयोग जमतो, तर फसतो. कधी करायचं असतं भलतंच आणि होतं भलतंच; पण ते पिच्छा लवकर सोडत नाहीत. चिकाटी, संयम, सर्जनशीलता हे गुण असेच तर विकसित होतात त्यांच्यात. (हेही मला उशीरा सुचलेलं शहाणपण!)
त्यात त्यांचा खेळ रंगू दे किंवा त्यातून नवा खेळ तयार होऊ दे.
त्यात मन रमू दे.
टाइमपास होऊ दे.
कोणता तरी प्रयोग जमू दे, फसू दे…
त्यातून त्यांना आनंद मिळतोय हे महत्त्वाचं.
…आणि पसाऱ्याचं काय?
तर, आम्ही दोघांनी मिळून तो आवरला!
Mastch nehmi parmnae tu javlcha subject ante ani mast mandate.
खुप मस्त लेख
Very nice
kharach khupach sundar mandlay ani pratyek parents ne aaplyna mulana kashaprakar Anubhavayla pahije he disatay.. He mudde kharokhar patanyasarkhe ahet…Let it be mhanun karu de kay pasara kartay te mhanun pudhe jayache mhanje tyatun nakkich te shiktil, creative hotil ani anand pan ghetil. Superb and keep it up karuna…Will be waiting for your next blog.
अगदी असंच होतं. पसारा पाहून राग तर येतो. पण तो करून दिला तर मुलांची कल्पनाशक्ती आणि आकलनशक्ती दोन्हीचा विकास होतो याचा अनुभव मी पण घेतला आहे. खूपच सुंदर लेख