आपल्या महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध जनजाती म्हणजे वारली. वारली चित्रांमुळे हे नाव आपल्याला माहिती असतंच! काढायला सोपी अशी ही चित्र छोट्यांना आणि मोठ्यांनाही आवडतात. ही नुसती चित्र नसतात तर यात वारली आदिवासींच्या आयुष्याचं चित्रण केलेलं असतं.
यात एखादं झाड असतं, समूहाने नाचणारे तरुण – तरुणी दिसतात आणि त्यांच्या मध्यभागी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा कलाकारही दिसतो. वारल्यांचं घर, देऊळ आणि धान्याचं कोठार दिसतं तसं त्यांच्या अवती-भवतीचे प्राणी, पक्षीही दिसतात.
वारली आदिवासींचं जीवन निसर्गावर आधारलेलं असल्याने त्यांनी निसर्गातल्या शक्तींनाच सर्वश्रेष्ठ मानलं आहे. भारतीय संस्कृतीचे प्राचीन ग्रंथ असलेल्या ऋग्वेदातही अग्नी, उषा (पहाट), मरुत् (वारा), वरूण (पावसाची देवता) यांची प्रार्थना केलेली दिसते. तीच परंपरा वारली त्यांच्या भाबड्या आणि सरळ आयुष्यात जगताना दिसतात.
चला तर मग आज थोडी सैर करुन येऊया वारली जनजातींच्या निसर्ग देवतांच्या प्रदेशात…
“हिरवा” हा वारल्यांचा देव तर आपल्याही घरी येतोच दरवर्षी! आता तुम्ही म्हणाल की “हिरवा””???..हो…हिरव्यागार भातशेतीतून भक्ताच्या डोक्यावर पाटावर बसून घरी येणारा गणपतीबाप्पा! तो येतो तेव्हा सगळा परिसर हिरवाईत रंगलेला असतो भाद्रपद महिन्यात! त्यामुळे गणपतीलाही यांनी त्या रंगाचच नाव आदराने दिलं आहे!
वारली पिकवतात नाचणी आणि तांदूळ. ते तर त्यांचं मुख्य अन्न. आणि भातशेती म्हटली की ती पावसावर अवलंबून असणारच अर्थात. मग या पावसालाच त्यांनी देव मानलं आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे ” पावशादेव“.
ज्या जमिनीवर वारली समाज राहतो ती जमीन, भोवतीचा निसर्ग ही तर त्यांची आईच आहे त्यामुळे पृथ्वीला आई मानणं हे तर ओघाने आलंच. शेतीची देवता असणारी आणि पहिल्यांदा भूमीत बीज रोवणारी युवती हिची कथा वारली लोकसंस्कृतीत आदराचे स्थान बाळगून आहे.
जंगलात निसर्ग सान्निध्यात राहताना ऊन, पाऊस, वारे यांचा तर सतत सहवास आणि संपर्क. वादळीवारे काहीवेळा त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळे मग त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनाही प्रार्थना केली जाते. या देवाला “वावदीवारन्‘ म्हटलं जातं. तर “ढगशारदेव” नावाने आकाशातले ढगही वंदनीय ठरतात. सर्व सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव वारली समाजात “ब्रह्मनदेव” म्हणून पूजला जातो. कोकणातही वाड्यावाड्यात आजही अशी ब्रह्मनदेवाची छोटी मंदिरं दिसतात.
पाणी हे जीवन असं आपण म्हणतो त्यामुळे पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यालाही “नारनदेव” असं संबोधून त्याची प्रार्थनाही वारली करतात. पावसाचं पाणी साठवून ठेवणारे तलाव, जंगलातून वाहणारे झुळझुळ झरे हेसुद्धा यांचे देवच! झर्याला “जर्यादेव” तर तलावाला “बत्तीसपोह्या“म्हटलं जातं. या सर्व नावांचा संदर्भ वारलींच्या लोककथांमधे आढळून येतो. नदी ही तर जीवनदायिनीच. “वरमादेव” म्हणून शुभकार्याच्या वेळेला नदीचं स्मरणही केलं जातं.
आकाशातले सूर्य, चंद्र हे ही मोकळ्या आभाळाखाली फिरणार्या वारल्यांचे देवच ! क्षितीजावर उठून दिसणारी शुक्राची चांदणी “सुकेशारदेव“म्हणून ओळखली जाते.
रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखा आणि पूराणातील देवताही वारल्यांना पूजनीय आहेत. जुगनाथ आणि भर्जा हे दांपत्य म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी. याजोडीने राम, लक्ष्मण, सीता, मंदोदरी, रावण आणि पांडवसुद्धा वारली समाजाच्या धार्मिक आयुष्यात महत्वाचे आहेत. इतकच नाही तर तांदूळ साठवून ठेवण्याची कणगीसुद्धा त्यांना वंदनीय आहे. जंगलात ज्याचं भय वाटतं तो वाघोबासुद्धा यांच्या प्रार्थनेचा विषय आहे.
यातून तुमच्या लक्षात आलं असेलच की खुल्या निसर्गात जगणारे वारली आणि त्यांचे देव! देव म्हटलं की आपल्यासमोर मूर्ती, देऊळ, पूजा, नैवेद्य असं सगळं येतं. पण ज्यांच्या ज्यांच्यावर वारली समूहाचं जीवन अवलंबून आहे ती सर्व निसर्गाची रूपं आणि घरातल्या कोठरातली कणगीसुद्धा त्यांना पूजनीय आहे!
त्यातून आपण कशात “देवत्व” पाहतो हे या आदिम आणि काहीशा मागास समजल्या जाणार्या निसर्ग बांधवांकडून शिकण्यासारखं आहे…. हो ना?

Dr. Aaryaa Joshi
संशोधक अभ्यासक (भारतीय धर्म – संस्कृती – तत्वज्ञान), मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत
खूप सुंदर माहित. माहितीबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर माहिती. माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान लेख. वारली समाजाविषयी छान माहिती मिळाली. धन्यवाद
छान माहिती
Khup sundar mahiti…vachtana asa vatat hota ki apan pan warali samuhasonatach firat aahot.
I love warli paintings..वारली बद्दल ची इतकी माहिती पहिल्यांदाच मिळाली..धन्यवाद 😊🙏