आपली मुलं 12-15 वर्षांच्या पुढे गेली की पालकांना त्यांची चिंता वाटू लागते. चिंतेची कारणं दोन. एक तर दहावी-बारावी जवळ दिसू लागते आणि दुसरं म्हणजे मुलं आता ऐकण्यातली राहत नाहीत. त्यांना स्वत:ची मतं असतात. ती मतं मुलं ठामपणे मांडू लागतात. त्यांना मित्रांचे सल्ले अधिक महत्त्वाचे वाटतात. आपल्या आई-वडिलांच्या चुका ती बोलून दाखवतात. विरोध करतात. पालकांना मात्र मुलांना यश मिळावे या दृष्टीकोनातून मुलांनी त्यांचं सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित करावं असं वाटत असतं. टक्केवारी समोर दिसत असते. त्यावर मुलांचं पुढचं आयुष्यभराचं यश अवलंबून असतं.
यश म्हणजे नेमके काय? शाळेतलं यश आणि जगण्यातलं यश वेगळं आहे का?
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे. मुलांनी परीक्षेत चांगले मार्क मिळवणं? त्याला योग्य तो मार्ग मिळणं? त्याला चांगली नोकरी मिळणं? भरपूर पैसे मिळवता येणं? (Learn what is success in Marathi and its meaning in Marathi)
हे सगळं म्हणजे खरं यश नसतंच. यश ही एक वृत्ती आहे. ती पास, नापास, मार्क, पैसे यांवर अवलंबून नसते. तसं असतं तर 95% मार्क मिळूनही मुलांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या नसत्या, नाही का? यशाची गुपिते सगळ्यांना कळली असती तर सगळे पैसेवाले मग स्वत:ला यशस्वी समजून सुखात असते.
यश आणि शाळेतलं यश यांचा काही संबंध नसतो. कृष्णमूर्ती एस. एस. सी. होऊ शकले नाहीत. रवींद्रनाथ टागोरांचं शाळेशी कधी जमलं नाही. गांधीजींना बराच काळ 39-40% मार्क मिळत. तरी ही माणसं जगद्गुरु झाली.
यश म्हणजे काय हे समजून घेताना माणसांच्या मानसिकतेचे दोन प्रकार समजून घेऊया. जेतेपणाची वृत्ती आणि पराभूततेची वृत्ती. कितीही अपयशं पदरी आली तरी जेता हा जेताच राहतो, तसं तो स्वत:ला मानतो आणि वृत्ती जर पराभूततेची असली तर कितीही यशं मिळाली तरी माणूस स्वतःला पराभूतच समजतो. कधी आनंदी होत नाही. समाधानी होत नाही. चांगली कामं करत नाही. इतरांवर प्रेम करू शकत नाही.
मग पालकांच्या हाती यातलं काय असतं? मुलाची स्वप्रतिमा छान बनवणं पालकांच्या हाती असतं.
मी चांगला माणूस आहे. माझ्यात अनेक क्षमता आहेत. माझ्या भोवतालचं जग छान आहे. मला काहीतरी चांगलं काम करायचं आहे, असं मुलाला वाटलं पाहिजे, याची तयारी आईवडील करू शकतात. याचा पाया घालू शकतात.
1) तू माला फार आवडतोस
2) माझा तुझ्यावर विश्वास आहे
3) हे तू छान केलंस
4) तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं
5) माझं चुकलं बरं का!
तू मला आवडतोस हे वाक्य मुलाला सतत पालकांच्या डोळ्यात वाचायला मिळालं पाहिजे. त्याऐवजी त्या डोळ्याला त्याला तिरस्कार दिसला, दुर्लक्ष दिसलं, निराशा दिसली, परीक्षकपणा दिसला, अलिप्तपणा दिसला, लबाडी दिसली तर मुलाला मी छान आहे नावाची लस द्यायला हवी. ती रोजच द्यायला लागते. पाठीवर हात फिरवून, जवळ घेऊन, हसतमुखाने त्याच्याकडे पाहून, त्याच्यासाठी न सांगता अनेक गोष्टी करून, त्याच्या त्या त्या वेळच्या गोष्टीत रस घेऊन हे करता येतं. मुलांच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण करूनही यशाची गुपिते साधता येतात.
अरविंद गुप्तांच्या आईला त्यांच्या लहानपणी जर कुणी सांगू लागलं की अरविंद काहीतरी उद्योग करतो आहे तर ती म्हणायची, जो भी करता होगा अच्छाही करता होगा. मुलांवर नितान्त विश्वास टाकला की त्यांनाही त्याचं अपूर्वाईचं बंधन वाटतं. त्याला आपण जागलं पाहिजे असं वाटतं. माझे सर मी एस. एस. सी. इा असताना मला म्हणाले होते, तुला एस. एस. सी. मध्ये भरपूर मार्क मिळतील. पहिला नंबरही मिळेल; पण मी कधीही तुझे मार्क विचारायला येणार नाही. तू दहा वर्षांनी कसं काम करत असशील ते समजून घेण्यात मला रस आहे. आमचे हे सर म्हणजे विद्यार्थ्यांना परीसस्पर्श करणारे द्रष्टे सर होते. आज ते नाहीत तरी मला वाटतं आपण कसं काम करतो ते सर पाहत असतील.
आपण नेहमी चांगलंच काम करायला हवं. लहानपणी मूल ज्यांना दैवत मानत असतं जी दोन माणसं म्हणजे मुलाचं संपूर्ण जग असतं त्यांच्या डोळ्यात त्याला विश्वास दिसला नाही तर मुलानं जगात कुठे विश्वास शोधायचा?
मूल चुकलं कुठे तर त्याला बोलायला, ओरडायला, शिक्षा करायला पालक कुठे कमी पडत नाहीत; पण ते जे छान करतं त्याचं कौतुक करायचं लक्षात राहत नाही. हे तू छान केलंस हं! हे, ऐकायला मूल उत्सुक असतं. किती मोठ्या वयापर्यंत! गेल्या वर्षी माझ्या मुलीला मुलगा झाला. त्याला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा ती मंडळी दूरदेशी होती. मी तिला पत्र लिहिलं, त्यात तिने मूल जन्मल्यापासून किती त्याची छान काळजी घेतली, बालसंगोपनाचा तिचा अभ्यास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिने किती कष्ट घेतले, त्याचे बाबाही किती प्रेमाने, जबाबदारीने वागले याचं कौतुक केलं होतं. ते पत्र वाचून ती इतकी निर्धास्त झाली. ती म्हणाली, मला वाटत होतं माझं काही चुकतंय् की काय, तो हे करत नाही, ते करत नाही; पण तुझ्या पत्राने माझा आत्मविश्वास एकदम वाढला. तरुण मुलांचं तर कौतुक करायचं कायम लक्षात ठेवायला लागतं.
अगदी लहानपणापासून आपण मुलाला जेव्हा त्यांचं मत विचारतो तेव्हा जाणवतं की त्याला त्याचं मत असतं, अगदी दुसर्या वर्षीसुद्धा. आपले पालक आपल्याला काय करुया? तुला काय वाटतं? तू सांग ना असं म्हणतात. याने मुलाला विचार करण्याची जबाबदारी वाटते. घर आपलं वाटतं. योग्य ते निर्णय घ्यायची समज वाढते. यश म्हणजे नेमके काय हे समजावून सांगताना, त्याची पायरी गाठताना मुलांचे निर्णय आपण परस्पर घ्यायचे नसतात हीच तर पालकत्वामधील खुबी आहे. त्यांचं मत समजून घ्यायचं, आपलं सांगायचं आणि निर्णय त्याच्यावर सोपवायचा असतो.
हे पण वाचुया – संस्कार म्हणजे काय? मुलांवर संस्कार करणे म्हणजे नेमकं काय?
आपण कायम पालकत्याच्या सिंहासनावर बसलेले असतो. मुलाला आपण असं भासवतो की आपण सर्वज्ञ आहोत. आपलं कधीच काहीच चुकत नाही. अशा वेळी मुलाला चुकणं म्हणजे गुन्हा वाटतो. पाप वाटतं. मग मूल चुका लपवायला शिकतं. खोटं बोलायला शिकतं. चुकांबद्दल ही मानसिकता खूप नुकसात करते. मुलावर दडपण आणते. त्याला मोकळेपणाने जगू देत नाही. पालकच जर म्हणत असतील- “इतका वेडेपणा झाला ना माझ्या हातून! लक्षातच नाही आलं! चुकलंच जरा! सॉरी हं! तर मुलाला कळतं चुका लपवून ठेवायची गरज नसते. आणि मग मुलालाही रहा देवापुढे उभा, म्हण मी पुन्हा असं वागणार नाही. कर बाबांना नमस्कार असं म्हणावं लागत नाही. घरात तमाशे होत नाहीत.

आपलं मूल अभ्यास करून आणि मार्क मिळवून कधीच हुशार होत नाही. शिक्षण संपतं आणि जगणं सुरू होतं तेव्हाच अनुभवाचं खरं शिक्षण चालू होतं. गमतीना असं म्हणतात की तुमच्या मुलाला 95 टक्के मार्क मिळत नसतील आणि 65 टक्के मिळत असतील तर मुळीच दु:ख करू नका कारण 65 टक्के मिळवणारी मुलं पुडे स्वत:चे उद्दोग उभारतात आणि 95 टक्के मिळवणारी तिथे नोकरी करतात.
मुलाच्या आयुष्याचं अनुभवाचं दार आपण कायम खुलं ठेवलं पाहिजे. त्याला मोकळेपणाने चित्रं काढू दे, हस्तकला शिकू दे, वाचन करू दे, गाणी ऐकू दे, गाणं शिकू दे, वाद्यं वाजवू दे, नृत्य करू दे, नाटक करू दे, विविध भाषा शिकू दे, प्रवास करू दे, कारखाने पाहू दे, सामाजिक संस्था बघू दे. शिक्षणाची संकल्पना बदलते आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं.
लारा पटवर्धन आणि जुई दधिच या दोन मुली आता लग्न होऊन छोट्या मुलांच्या माता आहेत; पण त्यांनी काही वर्षापूर्वी बारावी झाल्यावर असं ठरवलं की आपण वर्षभर हिंडायचं, शाळा, सामाजिक संस्था, परिवर्तनाची कामं पाहायची. त्या नारोडीला कुसुम कर्णिकांबरोबर राहिल्या, जेन साहीच्या बेंगलोरजवळच्या सीता स्कूलमध्ये राहिल्या, ऋषी व्हॅलीची कृष्णमूर्तींची शाळा त्यांनी पाहिली, नर्मदा आंदोलनात एक महिना भाग घेतला, बनारसची कृष्णमूर्तींची शाळा पाहिली, गोविंदपूरला डॉ. रागिणींचं काम पाहिलं, गडचिरोलीला डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्याबरोबर राहिल्या, वर्ध्याला गांधीवादी मंडळींची कामं पाहिली, कौसानीला राधा भटांचा आश्रम पाहिला, मध्य प्रदेशात एकलव्य चं शैक्षणिक काम पाहिलं, बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार शिबिरात भाग घेतला, वर्ध्याला ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की विज्ञान शिकायचं तर व्याख्या, आकृती, थिअरी, माहिती, पाठांतर हा एक मार्ग आहे, तसाच अनुभव, निरीक्षण, प्रयोग, शोध, शिक्षण हाही एक मार्ग आहे. दुसरा अधिक सरस आहे. पर्यावरण, शिक्षण, वैद्यकीय काम या तीन क्षेत्रांत त्यांना रस वाटत होता. ती काम त्या पाहून आल्या. कल्पना करता येते की या मुलींची दृष्टी किती विस्तारली असले या एका वर्षभराने! यापुढे त्या जे काही करतील ते किती डोळसपणाने करतील त्या डोळे मिटून पठडीतलं आयुष्य जगू शकणारच नाहीत.
गोव्याच्या एका मुलाने अलीकडे पुस्तक लिहिलं आहे. त्याने दहावीनंतर वर्षभर हिंडायचं ठरवलं आणि जे आवडतं ते शिकायचं ठरवलं. तो मासे पाळायला शिकला, मगरी पाळायला शिकला, त्याने कासवं पाळली, साप हाताळायला शिकला, आणि तो म्हणतो दहा वर्षात तो शिकला नव्हता एवढा एका वर्षात शिकला. शिवाय आता त्याला ही काम करून नक्की पोटापुरते पैसे मिळवता येतील हा आत्मविश्वास आला. लोकांशी वागायचं कसं हेही त्याला आता समजू लागलं आहे.
संयुक्ता नावाच्या मुलीचंही ‘लर्निग द हार्ट वे’ नावाचं पुस्तक अदर इंडिया प्रेस ने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक असं आहे की जे तरुणांची कॉलेज-विद्यापीठातल्या शिक्षणाबद्दलची मतं बदलून टाकेल. संयुक्ताने स्वतःचा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम स्वतःच आखला तिच्या मनाला आणि हृदयाला मानवेल असा अभ्यासक्रम. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या विणकरांबरोबर काम करून ती कापड विणायला शिकली. त्याचबरोबर टेक्स्टाईल डिझाईनिंग शिकली. सध्या ती पोचमपल्लीला विणकरांच्या संघटनेबरोबर काम करते आहे. सर्वांना समान न्याय देणारं जग पाहण्याचं ती स्वप्न बघते आहे.
अशी कितीतरी तरुण मुलं स्वतःचे मार्ग शोधून काढताहेत. अर्थपूर्ण काम करताहेत. पैसा, चंगळवादाची दिशा सोडून साध्या जीवनशैली कडे वळताआहेत. शिक्षण, विज्ञान, कला, शेती, संशोधन, शाश्वत विकास यांचा नवा विचार मांडताहेत.
यश म्हणजे नक्की काय तर ? वयात येणाऱ्या मुलांकडे वेगळ्या नजरेने बघायला पालकांनीही शिकायला हवं आहे. तरुण मुलाने आई-वडिलांचं न ऐकण याचा अर्थ ते आज्ञाधारक नाहीत, उद्धट आहेत, बिघडलेले आहे असा नेहमी नसतो. ते मुल स्वतःला मोठे समजतं आहे, असा तो अर्थ अस.तो त्याचीही जाणीव आपल्याला जबाबदारीत परावर्तित करता यायला हवी. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे, त्याला जोडून येणारी जबाबदारी त्यांना समजून द्यायला हवी.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मुलांशी त्यांच्या जीवनशैलीबद्दल लहान वयापासून बोलणं व्हायला हवं. पर्यावरणाचा विचार करून जगायला शिकलं पाहिजे. चंगळवादाच्या आहारी जाता कामा नये. काटकसर हा आता वैयक्तिक गुण नाही राहिला, ती आज पृथ्वीची गरज बनली आहे. मुलं विचारपूर्वक खर्च करतायत का, व्यसनांच्या आहारी जात नाहीत ना, साध्या राहणीकडे वळताहेत ना? त्यांच्या लैंगिक जाणीवा विकृत तर होत नाहीत ना? भारतीय जीवनपद्धती, योगांचा अभ्यास यांचं महत्त्व त्यांना कळतं आहे ना, अशा कितीतरी नव्या जबाबदाऱ्या पालकांनी समजून घेण्याची गरज भासते आहे; कारण या जीवनशैलीचा वाटेवरच शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, श्रीमंती कधीच तुमच्याकडे किती पैसा आहे त्यावर ठरवली जात नसते तर पैसा नसताना तुम्ही किती समाधानाने जगता त्यावर ती ठरते. हे भारतीय जीवनशैलीचं सारच जगाला चांगल्या मार्गावर ठेवू शकतं. ते पालकत्वापुढचंही आव्हान आहे.

Shobha Bhagwat
बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका
संचालिका, गरवारे बालभवन
अप्रतिम लेख👌👌
Hello , i m vilas jadhav, batchmate of Prachi . She send me link of this article. Very useful and eye opener article…will be helpful to nurture my 3 years old kid in a righ way
खूप छान लेख आहे,सर्व पालकांना योग्य विचार करायला लावणारा
Khup chhan lekh aahe
खूपच छान लेख, पालकत्वाच्या वाटेवर कायम मार्गदर्शी ठरणारा..
अतिशय उत्तम आणि उपयुक्त लेख.
सर्वांसाठी मार्गदर्शक ठरावा असा हा लेख…
माझ्या माहितीतल्या सर्व मित्रमंडळींना नक्कीच हा लेख वाचण्याचा आग्रह करेल…
धन्यवाद
शोभा मॅडम.
Khup marma sparshi lekh ahe. Thank you mam maza chuka tar samajalya ani mulichya swabhavache Karan pan samajale. Thank you so much.
खूप छान लेख लिहिला आहे
खूपच अनुकरणीय लेख आहे मॅडम
धन्यवाद
ATI Sundar lekh
Very good. Its eye opener for every adolescents parent.
Nice.
अतिशय सुंदर लेख .आज मला माझ्या पालकत्वातल्या उणीवा समजल्या.त्यावर यापुढे मला काम करता येईल.आभारी आहे .
Khup Sunder Lekh ahe Palkansathee !!
Sunder lekh…
खूप सुंदर लिहिलं आहे मॅम
When I was reading this article that time someone was telling you are going on right way
It’s very good and accurate
However, people who are not able to accomplish their basic needs …do they think first in this way or firstly they will think on how they can survive….is due to gap between poor and rich
Aaplyala nemak Kay hava aahe te mulana kalal pahije mag mulani aani palkani milun te milavanyasathi prayatna kele pahije.out of d box thinking develop karayala aali pahije.
अतिशय उत्तम लेख…