fbpx

नवीन वर्ष म्हणजे जल्लोष,धमाल,मजा! त्यामुळे दरवर्षी ३१ डिसेंबर आपण उत्साहात साजरा करतो. पण ते झालं ग्रेगोरिअन वर्ष. आपलं सांस्कृतिक वर्ष सुरु होतं चैत्र पाडव्याला म्हणजेच गुढीपाडव्याला. त्यामुळे भारतीयांनी आपलं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला अधिक आत्मीयतेने साजरं केलं पाहिजे. मुलांनाही गुढीपाडवा सणाची माहिती सांगत राहिली पाहिजे. (Gudi Padwa Information In Marathi)

काही अभ्यासक मानतात की मध्ययुगात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होत असे. पहिलं धान्य हाती आलेलं असे. शरद ऋतूचा आल्हाद सर्वदूर पसरलेला असे. झेंडूच्या फुलांनी परिसर पिवळ्या, केशरी रंगात न्हाऊन निघालेला असे. अशावेळी नवीन वर्षाचं स्वागत होत असे.

आंध्रभृत्य म्हणजे आंध्र प्रांताचे सम्राट ‘सातवाहन’ यांनी महाराष्टावर विजय मिळविला. त्या विजयाप्रीत्यर्थ त्यांनी स्वतःचे शक म्हणजे कालगणना सुरु केली. या कालगणनेची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाली त्यामुळे आपण या दिवशी गुढ्या उभारून नवीन वर्षाचं स्वागत करतो. चला, गुढीपाडवा या सणाचे महत्त्व जाणून घेऊया.

माझ्या जीवाची आवडी!
पंढरपुरा नेईन गुढी!
असं संत परंपरा म्हणते. गुढी म्हणजे भगवी पताका! त्यामुळे चैत्र पाडव्याला भगव्या ध्वजाचंही महत्व मानलं जातं.

येणारा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कडुनिंबाची औषधी पानं अंघोळीच्या पाण्यात घालणे असो किंवा सकाळी आंब्याचा कोवळा मोहोर आणि कडुनिंबाची पानं वाटून खाणं असो हे तर आरोग्यासाठी उपयुक्तच!

वेळूच्या काठीला वस्त्र नेसवून त्यावर कलश पालथा घालून घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात. त्यावर लहान मुलांना हमखास प्रिय अशी साखरेची गाठी माळ घातली जाते. बत्तासा किंवा अशा साखरेच्या गाठी या सुद्धा उन्हाळ्यात तहान भागविणार्‍या आहेत बरं का!

वनवास संपवून रावणावर विजय मिळवून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परत आले. हा सुजनांनी दुष्ट प्रवृत्तींवर मिळविलेला विजयच होता. त्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या अशी गुढीपाडवा सणाबद्दल आख्यायिका आहे.

ज्योतिषशास्त्राने साठ संवत्सरांचं चक्र मानलं आहे. दरवर्षी गुढी पाडव्याला जे वर्ष सुरु होतं त्या प्रत्येक वर्षाला एक नाव दिलेलं आहे. उदा. मागील संवत्सराचं नाव “विकारी” असं होतं तर यावर्षी सुरु होणारं संवत्सर आहे “शार्वरी” नावाचं.

संपूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात आपापलं नवीन वर्ष सुरु होतं. बंगालमध्ये पहेला बैशाख असतो तर पंजाबात बैसाखी!
भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे नवीन पीक हाती आलं की आनंद साजरा करणं हे आपल्या मातीशी नाळ जोडणंच आहे!

चला तर मग!!
छान श्रीखंड पुरी करुया! सर्वांना गुढीपाडवा सणाची माहिती सांगूया, मुलांनाही मदतीला घेऊया आणि येणारं संवत्सर सर्व जगासाठीच सुदृढ आरोग्याचं ठरावं अशी इच्छा आणि प्रयत्नही करूया!

ChikuPiku Yearly Subscription

Dr. Aaryaa Joshi

संशोधक अभ्यासक (भारतीय धर्म – संस्कृती – तत्वज्ञान), मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop