होळी हा रंगांचा सण! चला, होळी सणाची माहिती घेऊया. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिला ‘हुताशनी पौर्णिमा” असंही म्हणतात. मुळात शिशिर ऋतू हा गारवा घेऊन येतो तसाच तो पानगळही सुरु करतो. पानगळ होऊन पानांचा भला मोठा ढीग जमा व्हायला लागतो. झाडांचे अक्षरशः उभे खराटे दिसायला लागतात. अशावेळी थंडीच्या गारव्यातून शरीर मनाला थोडी ऊब देणारी होळी साजरी होते. ही होळी प्रज्वल्वित करण्यासाठी ही खराटे झालेली झाडे आणि जमा झालेला पाचोळा मुख्यतः वापरावा असा संकेत आहे.
होलिका ही एक राक्षसी होती असा संदर्भ पुराणातील कथांमधे आढळतो. (Holi Information in Marathi and Importance of Holi Festival in India)
>>हे पण वाचूया – मस्त धमाल गोष्टींसह मुलांना विचार करायला लावणारे चिकूपिकूचे अंक
होळी सणाची माहिती आणि इतिहास समजून घेताना यामागची ही गोष्ट तुम्हाला माहितीय का? हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रह्लाद हा विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपूला अमरत्वाचे वरदान मिळालेले असल्याने तो उन्मत्त झाला होता आणि त्याच्याशिवाय अन्य कोणाही देवाचे पूजन, प्रार्थना करायच्या नाहीत असा त्याचा हुकूम होता.पण त्याचाच मुलगा प्रह्लाद सतत विष्णुचे नामस्मरण करीत असल्याने त्याने आपल्या मुलालाच मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलाविले.
होलिका कधी अग्नीने जळू शकत नाही असा तिलाही वर मिळालेला होता. होलिकेने भक्त प्रह्लादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण विष्णुच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि स्वतः होलिकाच जळून गेली असे ही आख्यायिका सांगते.
अशा आख्यायिका आधुनिक काळाच्या कसोटीवर विश्वासनीय वाटत नसल्या तरी त्यातून सुरु झालेल्या परंपरा मात्र आजही पाळल्या जातात असे आपण अनुभवतो. मुलांना होळी सणाची माहिती सांगताना मात्र त्या परंपरेमागचा कार्यकारणभाव आपण नक्की सांगितला पाहिजे. होळी प्रज्वलित करण्यासाठी मुळातून जिवंत झाड तोडण्याची आवश्यकता नाही. पडलेल्या झावळ्या,पालापाचोळा यांचा उपयोग करून होळी प्रज्वलित केली जाते.
भारतातील वेळ वेगवेगळ्या भागातील होळी सणाचे महत्व (Holi Information in Marathi)
संपूर्ण भारतात होळी साजरी होतेच पण महाराष्टात कोकण भागात होळीचे महत्त्व (Importance of Holi) आहे. रबीचा हंगाम संपलेला असतो आणि पीक कापणीला येते. कोकणात तर या काळात थोडा शेतीतील निवांतपणा असतो. कोकणात शिमग्याचा हा उत्सव पंधरा दिवस चालतो.
अशावेळी गावातील शेतकरी समाज वेगवेगळी सोंगे धारण करून गावात खेळ करीत फिरतात.प्रत्येक गावातील ग्रामदेवता पालखीत बसून वाजत गाजत गावातल्या प्रत्येक घरी येते.तिचे विशेष स्वागत केले जाते.
संकासुर, गोमू, नाचा, राम, लक्ष्मण, दशावतार यांचे खेळ घराघरापुढे सादर होतात. शिमगोत्सव हा कोकणात असा विशेष आनंद देणारा असतो.
समुद्रकिनार्यावरील बंदरांवर राहणारा कोळी समाजही होळी पेटवतो आणि दुसर्या दिवशी नावा सजवून समुद्रात नेऊन नावेची पूजा करतो. होळीचा दुसरा दिवस धूळवडीचा. होळी शांत झाल्यावर तिची राख अंगाला लावण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते. पाच दिवसांनी येणार्या रंगपंचमीचा उत्सव खरंतर वसंत पंचमीलाच सुरु होतो. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वातावरणातला उष्मा सहन व्हावा म्हणून अंगावर पाणी उडवले जाते.
>>हे पण वाचूया – मुलांना सांगूया गुढीपाडवा सणाची माहिती आणि गुढी पाडवा का साजरा करायचा?
मध्ययुगात राजे रजवाडे आणि संस्थानिक पाण्यात केशर कालवून त्याने होळीचे महत्व सांगत रंगपंचमी साजरी करत असत.
उत्तर प्रदेशात कृष्ण आणि बलरामाच्या मंदिरात होळी निमित्त रास खेळली जाते. लाठमारीचा खेळ खेळला जातो. लोकगीते गायली जातात. रंग उधळले जातात. देवळात विशेष पूजा केली जाते.
होळी सणाची माहिती आपल्या छोट्या बालदोस्तांना सांगूया आणि ऋतूचक्राशी जवळचा असा हा उत्सव साजरा करूया. त्यातील पर्यावरणाला घातक गोष्टी आवर्जून टाळल्या आणि एकत्र जमून सणाचा आनंद घेतला तर पुढच्या पिढीपर्यंत हा सण आणि त्यातून मिळणारी मजा पोहोचविता येईल.

Dr. Aaryaa Joshi
संशोधक अभ्यासक (भारतीय धर्म – संस्कृती – तत्वज्ञान), मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत
लहान मुलांना समजेल अश्या भाषेत व थोडक्यात खुप छान माहिती दिली आहे. तसेच संक्राती ची माहितीपण खुप छान दिली होती.
धन्यवाद.
सुंदर लेख.
superb!!
Excellent. 👏 Thanks for this easy language knowledgeable article.
माहिती सोप्या आणि सरळ शबदात आहे. त्यामुळे लहान मुलांना पण कळली. सणा कडे scientific दृष्टी पण महत्वाची आहे.
खूपच सोप्या भाषेत आणि मुलांना समजेल अशा प्रकारचा लेख
Khup chan information ahe….he vachun Milana sanganyat khup maja yete..
Thank you