लेखक :  शोभा भागवत


खेळ हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. खेळाचं मानवी आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. खिलाडू वृत्तीची माणसं आयुष्यभर आनंदी राहतात. इतरांनाही आनंद देतात.

‘खेळू’ या शब्दाला स्वतः खेळ खेळणं अभिप्रेत आहे. खेळाचं नुसतं प्रेक्षक बनणं नाही. नाही तर क्रिकेटची मॅच टीव्हीवर बघताना घरातल्या आजीबाई पण सचिनला सल्ले देत असतात “अरे आता तरी मार जोरात.” तर तसं हे नाही. इथे स्वतः खेळू हे महत्त्वाचं आहे. आणि खेळ म्हणजे आनंद हे समीकरण तर आपण कधी ना कधी अनुभवलेलं असतंच. लहान मुलं तर दिवसभर खेळतच असतात म्हणूनच ती आनंदात असतात. आपण सगळेच कधीपासून खेळत असतो माहीत आहे? आईच्या पोटात असल्यापासून! आश्चर्य वाटलं ना? पोटातलं बाळ आपल्या नाळेशी खेळत असतं. ते त्याचं पहिलं खेळणं असतं. कधी-कधी ते नाळ इतकी घट्ट धरतं की त्याला हवा मिळत नाही मग ते सोडून देतं.

बाळाच्या पाळण्यावर टांगतात त्याला खेळनाणाच म्हणतात. पुढे मुलं भातुकली खेळतात त्याला खेळणपीठ म्हणतात. “बुवा कुक” हा खेळ तर जगभरच्या आया खेळतात. मुलांच्या आयुष्यातून पूर्वीचे अनेक खेळ जात चाललेत. ठिकऱ्या, आट्यापाट्या, डबा ऐसपैस, ताररूपी असे खेळ पूर्वी मुलं खेळायची. त्यात काहीही पैसे पडत नसत. भेंड्या, ओव्या, पत्ते, कॅरम हे बैठे खेळही घरातून गेल्यातच जमा आहेत. आता मुलं आणि पालक कॉम्प्युटर / मोबाईल गेम्स खेळण्यात रंगून जातात. त्यांना खेळ म्हटलं तरी ते खरे खेळ नव्हेत कारण खेळात शरीर हललं पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे. विश्वनाथ आनंदसारखा बुद्धिबळपटू देखील दोन-दोन तास जिममध्ये का जातो? त्याला तर बसूनच खेळायचं असतं पण तो खेळ खेळतानाही मनावर आणि शरीरावर येणारा ताण सोसता येण्यासाठी एकाग्रतेसाठी व्यायाम आवश्यक ठरतो. त्यानं रक्ताभिसरण वाढतं, मेंदू तल्लख राहतो, भूक चांगली लागते, झोप शांत लागते. तासन-तास कॉम्प्युटर गेम्स खेळणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. घरात आई-बाबा दोघंही नियमित व्यायाम करणारे, खेळणारे आहेत असं असलं की तो वारसा मुलांकडे येतोच, पण सक्ती केली नाही तर.

आपल्या देवी-देवता अनेक खेळ खेळत असल्याचे उल्लेख आहेत. श्रीकृष्ण तर लहानपणी सवंगड्यांबरोबर, तरुणपणी गोपींबरोबर आणि प्रौढपणी अर्जुनाला सल्ले देताना राजकारणाचे अनेक खेळ खेळला. शंकर पार्वतीचं तांडव आणि त्यांचा सारीपाटाचा खेळही आपल्याला माहित आहे. पांडुरंगाच्या ओढीने जाणाऱ्या दिंडीत वारकरी खेळ खेळत जातात.

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई…
नाचती वैष्णव भाई रे.

त्या दिंडीला खेळच म्हटलं आहे. ग्रामीण भागात रात्री देवळात जमून जेव्हा भजनं म्हणतात तेव्हा पुरुषही कितीतरी खेळ खेळतात. बायकांचे मंगळागौरीचे खेळ तर इतके सुंदर, कल्पक आहेत. पूर्ण शरीराला व्यायाम देणारे आहेत.

कौटुंबिक पातळीवर असं म्हणतात की “Family that plays together stays together”. अलीकडे आई-बाबांना मुलांशी खेळायला फार वेळ नसतो पण आजी-आजोबा हक्काचे असतात. माझ्या घरी आजी-आजोबा आहेत ही मला आनंदानं सांगण्यासारखी गोष्ट वाटते. माझ्या लहानपणीचे “हा घास काऊचा, हा चिऊचा …” असे खेळ मला कायम आठवतात. आता काऊ-चिऊची जागा कार्टून्सनी घेतली आहे. मोबाईलसमोर बसूनच जेवणं होतात. मुलांशी मोठं होता होता लुटुपुटुच्या लढाया, गोष्टींची नाटकं, पत्ते, कोडी या सगळ्यात आजी-आजोबा हक्काचे भिडू असतात हे चित्र आता कमी घरात दिसतं आणि दलाई लामांच्या ओळी आठवतात.

घरं नटली पण घरकुलं दुभंगली
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं
पण कोठीची खोली रिकामीच !

माझ्या कळत्या वयात ही खेळांची कोठीची खोली भरण्याचं काम बालभवनने केलं. अजूनही मला आठवण आली की मी हॉकी खेळायला आमच्या बालभवनात जाते. बालभवनातलं खेळाचं वेळापत्रक फार छान होतं, त्यात जबरदस्ती नव्हती, विविधता होती. ताई आमच्या बरोबरीनी खेळायच्या त्यामुळे आनंद वाढायचा. हे खेळ मुलांचे विविध गुण फुलवणारे होते. बैठे खेळ पण असायचे. आता कळतं की या खेळांनी आमची खिलाडू वृत्ती वाढवली, कष्टाची सवय लावली, मित्र-मत्रिणींशी स्पर्धा न करता प्रेम करायला शिकवलं, झटपट निर्णय घ्यायला शिकवलं, समूहाने काम करायला शिकवलं.

सातवी – आठवीच्या वयात नाटकाचं शिबीर करण्याच्या निमित्तानं मला थिएटर गेम्सचं दालन खुलं झालं. हे खेळ तर फार काही शिकवणारे असतात. एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांवर विश्वास टाकणं, नेहमी तत्पर राहणं, एकाग्रता वाढवणं असं सगळं शिकवताना हे खेळ तुमच्या शरीर-मनाची छान मशागत करतात, तयारी करतात.

उन्हाळ्याच्या सुटीत बालभवनात आमचे सर ‘सर्व खेळ’ शिबीर घ्यायचे. तास – दीड तास आट्यापाट्या, हुतुतू, खो-खो, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट असे अनेक खेळ मुलं खेळायची. मनाला वेगळाच आनंद व्हायचा. दमणूकही छान व्हायची. आपणही मुलांबरोबर घरी किंवा शाळांमध्ये हे खेळ खेळले पाहिजेत. खरं तर चांगल्या व्यक्तिमत्वासाठी एक खेळ आणि एक कला आयुष्यभर जोपासायला हवी. खेळामुळे स्वभावही लक्षात येतात. काहींची मानसिकता समूहाबरोबर काम करण्याची असते ते ग्रुप गेम्स चांगले खेळतात आणि जे एकट्यानी काम करणारे असतात ते व्यक्तिगत खेळ चांगले खेळतात.

खेळाची गंमत अशी असते की त्यात शरीरालाही काम असतं आणि मेंदूचंही रक्ताभिसरण वाढतं, ऊर्जा निर्माण होते, एकाग्रता वाढते आणि मुख्य म्हणजे कंटाळा जातो. मन उल्हसित होतं. त्यात डावा मेंदू आणि उजवा मेंदू दोन्ही कार्यरत होतात. शाळेतला अभ्यास, बोललेलं ऐकणं, सांगितलेलं म्हणणं, फळ्यावरचं लिहून घेणं ही सगळी डाव्या मेंदूची कामं चालतात. त्यात चित्र काढणं, गाणं म्हणणं, छोटे खेळ खेळणं, गोष्ट ऐकणं, हस्तकला करणं, अशा छोट्या गोष्टी प्रत्येक तासाच्या शेवटी ठेवल्या तर मुलांचा कंटाळा जाईल आणि ती आनंदानं शिकतील. चांगल्या व्यक्तिमत्वासाठी संपूर्ण मेंदूला खाद्य द्यावं लागतं. मी असं ऐकलं आहे की परदेशात महत्त्वाच्या संशोधनाविषयक कार्यशाळांतही रोज एखादा बॅटमिंटन, टेनिस, बोटिंग सारखा खेळ माणसं खेळतात आणि बौद्धिक कंटाळा घालवतात.

आता आपण थोडा ज्येष्ठ नागरिकांचा विचार करू. वयस्कर मंडळी घरात एकटी पडतात तेव्हा त्यांना काही करमणूक हवी असते. आपल्याकडे हास्य-क्लब चालतात त्यात व्यायाम आणि खेळ असं दोन्ही एकत्र गुंफलेलं असतं. खेळता-खेळता ही मंडळी भरपूर हसतात त्यातून व्यायाम घडतो.

सारांश काय तर जन्मण्यापूर्वीपासून वयस्कर होईपर्यंत आपण खेळायला उत्स्फूर्त असतो. आनंदाला आसुसलेले असतो. त्यामुळे खेळत राहणं जरुरीचं आहे नाहीतर खेळ-खंडोबा होऊ शकतो. आमचे एक स्पोर्ट्स मेडिसिनचा अभ्यास केलेले डॉक्टर आहेत. ते म्हणतात एकमेकांकडे माणसांनी खायला, प्यायला न जाता खेळायला, व्यायामाला जावं म्हणजे वजन वाढणार नाही.

मग तुम्ही केंव्हा सुरुवात करताय रोज खेळायला?

धन्यवाद!

Read More blogs on Parenting Here