लेखक :  ॲड. भाग्यश्री चौथाई


लहान वयात प्रामुख्याने असतं ते कुतूहल. पालक-शिक्षकांचा कायमचा अनुभव असतो की या वयात मुलं सतत प्रश्न विचारत असतात. झाडाची पाने हिरवी का? आकाशाचा रंग निळा का दिसतो? पक्षी कसे उडतात? पक्ष्यांसारखे मला उडता येईल का? अगदी अशाच प्रश्नांप्रमाणे मी कसा जन्मलो? बाळ आईच्या पोटात कसं जातं? घरात एकाच वयाची भिन्न लिंगी मुले असतील तर काही प्रश्न मुलांच्या मनात येतात. मुली आपल्यासारख्या उभ्याने शू का करत नाहीत? असा प्रश्न मुलांना पडू शकतो. नैसर्गिक कुतूहलाच्या भावनेतून स्वतःच्या किंवा भिन्न लिंगाच्या लैंगिक अवयवांबद्दल मुलांना जाणून घ्यायचं असतं.

मुलांना पडणाऱ्या या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरं आपण द्यायला हवी. “ती मुलगी आहे त्यामुळे बसून शू करते, नाहीतर शू तिच्या पायावर सांडेल.” असं सहज बोलता-बोलता सांगता येऊ शकतं.

या वयामध्ये जसं स्वतःच्या अवयवांबद्दल कुतूहल असतं तसच ते भिन्न लिंगाच्या बाबतीत आकर्षण देखील असतं, हे अगदी नैसर्गिक आहे याची पालकांनी माहिती ठेवायला हवी. काकाचे लग्न झाले म्हणजे त्याला आता बाळ होणार का? सिनेमात दाखविलेल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे प्रसंग असो की मी कुठून आलो? या अशा निरागस कुतूहल-मिश्रीत प्रश्नांची उत्तरे देण्याचचं आपण टाळतो. पंचज्ञानेद्रिंयांवर आधारीत शालेय शिक्षणात स्वतःच्या खासगी अवयवांबद्दल माहिती दिली जात नाही हे तितकेच खरं.

या सगळ्या प्रश्नांमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अशा प्रश्नांना उत्तरं देताना न लाजता मुलाचं शंकानिरसन करायला हवं. आपण ओरडून प्रश्न टाळला तर आई किंवा बाबा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत हे नक्कीच मुलं हेरतील. त्यामुळे मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची सवय आपल्याला मुलं लहान असल्यापासूनच करायला हवी.

कायद्याच्या भाषेत सांगायचचं झालं तर मुलाचे वय त्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यत असं सांगितलं आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षण देताना वयोगटाप्रमाणे प्रामुख्याने मुलांचे तीन गट केले जातात.

१- छोटा गट (० ते ६)

२- मध्यम गट (६ ते ११)

३- मोठा गट (११ ते १८)

मुलाची गरज, आकलन क्षमता, या सगळ्याचा विचार लैंगिक शिक्षण देताना करावा लागतो. प्रत्येक वयोगटाची गरज वेगवेगळी असते. हे पालक म्हणून आपल्या लक्षात वेळोवेळी आले असेलच. तरी एका उदाहरणातून स्पष्ट करते. वरच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न घेऊ.

मी कसा जन्मलो? तीन ते चार वर्षाच्या मुलाला तू आईच्या पोटातून आलास. या उत्तराने समाधान होईल परंतू थोड्या मोठ्या वयोगटाला अजून जास्तीची माहिती दयावी लागेल यांवर त्यांचे काही प्रश्न असतील. मोठ्या वयोगटाच्या मुलांना आई-बाबा काहीतरी लपवत आहेत, उत्तर देण्याचे टाळत आहेत हे नक्की लक्षात येते. अशावेळी पालकांची जबाबदारी वाढते. ज्या गोष्टी आपल्याला स्वतःला सांगता येणं शक्य नाही त्या गोष्टी डॉक्टर, तज्ज्ञ, समुपदेशक यांच्यामार्फत मुलांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

यानंतर आपण एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळूया.

 

*बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय?

कायद्यामध्ये अत्याचार दोन भागांमधे विभागले गेले आहे. त्याचे काही उपप्रकार देखील आहेत.

पण मुख्य प्रकार दोन

१- स्पर्श न करता होणारा अत्याचार

२- स्पर्शाद्वारे होणारा अत्याचार

सर्वप्रथम स्पर्श न करता होणा-या अत्याचाराचे प्रकार पाहूया.

  1. मुलाशी बोलताना अश्लील भाषा वापरणे.
  2. मुलाला अश्लील चित्र, क्लिप्स्, व्हिडीओ दाखविणे.
  3. मुलाला स्वतःचे लैंगिक अवयव दाखविणे.
  4. मुलासमोर अश्लील हावभाव, खुणा, वर्तन करणे.
  5. मुलाला एखाद्याची लैंगिक कृती बघण्यास भाग पाडणे.
  6. मुलाला दुस-यांचे लैंगिक अवयव पाहण्याची जबरदस्ती, सक्ती करणे किंवा ते दाखविणे,

अशा अत्याचारामध्ये कोणीच कुठेही स्पर्श करत नाही, तरीही कायद्याच्या भाषेत तो अत्याचार ठरतो.

दुसरा अत्याचाराचा प्रकार यामध्ये स्पर्शाद्वारे होणारे अत्याचार.

  1. लैंगिक हेतूने स्पर्श
  2. लैंगिक हेतू मनात ठेऊन कुरवाळणे, मिठी, चुंबन
  3. बलात्काराचा प्रयत्न, किंवा प्रत्यक्ष बलात्कार

*मुलावर अत्याचार करणारी व्यक्ती कोण असू शकेल? याविषयी अधिक जाणून घेऊ या.

  1. स्त्री / पुरुष :- मुलांवर लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती केवळ पुरुष असते का? तर या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती स्त्रीदेखील असू शकते, प्रत्यक्ष किंवा सहभागी.
  2. ओळखीची / अनोळखी :- बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मुलांवर लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती मुलांच्या ओळखीची नसते. याबाबतीतले सत्य आपण जाणून घेऊया. ७३ टक्के व्यक्ती या मुलाच्या ओळखीच्या असतात. काही वेळेस आपण पालक म्हणून डोळेझाक करुन विश्वासाने मुलाला सोपवू अशा व्यक्तीसुद्धा.
  3. विवाहित/अविवाहित :- केवळ अविवाहित व्यक्ती नाही तर विवाहित व्यक्तीदेखील मुलावर अत्याचार करु शकते.
  4. प्रौढ/ म्हातारे/ अप्रतिष्ठीत व्यक्ती जिला समाजात फारसे स्थान नाही, समाजातील आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील व्यक्तीच केवळ मुलांवर अत्याचार करतात हा मोठा गैरसमज आहे. कोणत्याही वयोगटातील आणि समाजातील कोणत्याही स्तरावरील व्यक्ती यात सहभागी असू शकतात.

वरील सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात येते की मुलांवर अत्याचार करणारी व्यक्ती कोणीही असू शकते. आजकाल घडणा-या बाल लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधे क्रुरतेची तिव्रता इतकी वाढली आहे की अत्याचार करणारी व्यक्ती विकृत किंवा मनोरुग्ण असावी असा सर्वसामान्याचा समज होण्याची शक्यता आहे. परंतू एका अभ्यासातून हे लक्षात आले आहे की केवळ ३ टक्के व्यक्ती या विकृत किंवा मनोरूग्ण असतात.

वरील समज / गैरसमजांच्या अजूनही काही गोष्टी समाजात आढळतात. त्यापैकी एक म्हणजे एवढया लहान वयाच्या मुलांवर लैंगिक अत्याचार? कसं शक्य आहे? अशा घटना दुर्मिळातल्या दुर्मिळ असतात. आपल्या देशात हे सगळे प्रकार घडत नाहीत, किंवा अशा घटना झोपडपट्टीमधे घडतात, आम्ही चांगल्या सोसायटीमध्ये राहतो, सोसायटीची सिक्युरिटी चांगली आहे. पण हे मोठे गैरसमज आहेत. घरात किंवा आपल्या परिसरात कुठेही लैंगिक अत्याचारकरणारी व्यक्ती असू शकते.

असाच एक गैरसमज म्हणजे लैंगिक अत्याचाराला केवळ मुलीच बळी पडतात. पण मुलगेसुध्दा लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. वरील सगळ्या मुद्यांमधील महत्वाचा मुद्दा आता लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे लैंगिक शोषण हे प्रामुख्याने जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून होत असते हे सिध्द झाले आहे.

मग पालक म्हणून आपण काय करायचं? तर या सगळ्याची भीती न बाळगता पालक-शिक्षक म्हणून आपल्या मुलाला लैंगिक सुरक्षितता शिकवायची आहे. ते देखील मुलाला कसलीही भिती न दाखवता आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्वतः न घाबरता, न लाजता. या विषयावर मुलांशी काय बोलायचे? कसं बोलायचं? कोणते शब्द वापरायचे? भाषा कशी वापरायची? याबद्दल आता आपण बघू या.

*आपल्या आसपास असे काही लोक असतात जे तुमच्यापेक्षा मोठे असतात, त्यांनी तुमच्या शरीरावरच्या तीन भागांना हात लावायचा प्रयत्न केला तर त्यांना तसं करुन द्यायचे नाही. तुमची छाती, ओठ, दोन पायांच्या मधील जागा म्हणजे शू आणि शी करतो ती जागा.

They are not supposed to touch your chest, lips, bottom and place between your legs.

इतकं सहज, सोप्पं, साध्या भाषेत सांगायला हवे. आता आई-बाबा-आजी तुम्हांला अंघोळ घालताना हात लावतील तर ते चालेल हे ही न विसरता सांगायला हवं. आजारी पडलात आणि डॉक्टर काकांकडे गेलात तर ते तुम्हांला तपासताना तिथे हात लावतील तर ते चालेल, पण महत्त्वाचे म्हणजे तुमचे आई-बाबा जवळ असायला हवेत, हे ही लक्षात ठेवा. मुलाला डॉक्टर तपासताना पालक तिथे उपस्थित असणे कायद्याने बंधनकारक आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट मुलांना सांगायला हवी. आता असा कोणी तुम्हांला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर,

  1. नाही म्हणा -: न घाबरता नाही म्हणून जोरजोरात ओरडा
  2. पळा -: तिथून लवकरात लवकर पळून जाण्याचा प्रयत्न करा
  3. कुठे पळा -: लगेचच आई-बाबा किंवा शाळेत असाल तर शिक्षकांना सांगा.

अशी वेळ आली तर मुलाने कोणाकडे पळत जायचे ती व्यक्ती आणि घडलेली घटना कोणाला सांगायची हेदेखील ठरवून ठेवायला हवे.

त्यासाठी सुरक्षित मोठी व्यक्ती म्हणजे Safe Adult मुलाने निवडायला हवा. एकदा का अशी व्यक्ती ठरली की त्या व्यक्तीवर पुढची सगळी जबाबदारी येऊन पडते. त्याचबरोबरीने एकदा सांगून हा विषय संपला असे होत नाही तर याबाबतीत मुलांशी नेहमी बोलायला हवे. आणि या सगळ्याची उजळणी वारंवार व्हायला हवी.

मुलांचे असे शिक्षण होत असताना काही गंमतीदार प्रसंग नक्की घडतील, त्याच्याकडे देखील या शिक्षणाचा एक भाग म्हणून पाहायला हवे. मुले यासंदर्भात काही प्रश्न विचारतील त्यांची समाधानकारक उत्तरे द्यायला हवीत.

आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना विशिष्ट नावे आहेत, त्याची माहिती मुलांना करुन द्या. त्या-त्या अवयवांची शास्त्रीय नावं मुलाला माहित असायला हवीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुलाचा भाषाविकास झालेला नसतो. त्यामुळे मूल योग्य त्या प्रकारे पालक किंवा शिक्षकांपाशीं व्यक्त होऊ शकत नाही.

मूल जेव्हा त्याच्या बाबतीत घडलेला असा काही प्रसंग तुमच्याकडे येऊन सांगू पहातो आहे, तेव्हा तुम्ही मुलाचे ऐकले पाहिजे. आपलं मूल लहान आहे, त्याला काय कळतयं? असं कुठं असतं का? असा विचार पालकांनी करता कामा नये.. मुलाच्या सांगण्याकडे लक्ष देण्याने दोन गोष्टी साध्य होऊ शकतात.

१-: मुलाला पालकांबद्दल विश्वास वाटतो.

२-: जो कोणी आरोपी आहे त्याला धडा मिळतो. अन्यथा आरोपी मोकाट सुटतो त्यामुळे समाजाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपल्या मुलाला अशा प्रसंगातून जायची वेळ येऊ नये याची सगळी काळजी घेऊन समजा मुलाला अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले तर पालकांनी करावयाच्या गोष्टी–:

मूल आपल्याला काही सांगू पहातय, त्याचा भाषाविकास विकसीत झालेला नाही, कशाप्रकारे व्यक्त व्हायचे ते मुलाला कळत नाहीये. त्याला कदाचित भिती, असुरक्षित वाटत असेल, आरोपी माहितगार असेल तर त्याने मुलाला धमकी किंवा आमिष दिलेलं असू शकतं. अशावेळी पालकांची जबाबदारी वाढते. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलाला तुमच्याबदद्ल विश्वास वाटणं आणि मूल जे काही सांगते आहे त्याचा आदर, स्विकार करणं गरजेचे. अशावेळी पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने टाळायला हवी. मुलाला विचारणे, “सांग खरं सांग. नक्की ना? नक्की काय घडलं परत नीट सांग, खोटं तर बोलत नाही आहेस ना?” अशी त्याची उलटतपासणी घ्यायची नाही. त्याचबरोबर “चल-चल दाखव कोणते काका? त्यांनाच विचारूया” असं म्हणून मुलाला चक्क आरोपी समोर उभं करणं आणि खरं-खोटं करणं टाळायचं.

घडलेली घटना मुलाने तुम्हांला सांगायचा प्रयत्न करणं हे त्याच्या दृष्टिकोणातून त्याच्यासाठी प्रचंड ताणाचे असते. तरीही धीर करुन मूल तुमच्यापाशी व्यक्त होत असताना त्याच्यावर अविश्वास दाखवल्याने मूल अक्षरशः उध्वस्त होते. लहान वयात लैंगिक अत्याचार झाल्याचे दूरगामी परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होतात. त्यामुळे अशा अत्याचारांपासून मुलाला वाचवणं, यासाठीची सगळी काळजी घेऊन देखील असा एखादा अघडित प्रसंग घडला तर त्यावेळी मुलाला आधार देणं हे अत्यंत गरजेचे..

मुलाच्या बाबतीत अशी एखादी घटना घडली तर प्रत्येक मूल ती सांगू शकेलच असं नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. अशा वेळी काही गोष्टी पालकांच्या ध्यानात येणं गरजेच्या आहेत, त्या कोणत्या ते आपण पाहू या….

  1. मूल अचानक घाबरते आहे.
  2. रात्री झोपेतून दचकून अचानक जागं होणं.
  3. अंथरुणात शू व्हायला अचानक सुरुवात होणं किंवा त्यात वाढ होणं.
  4. काही वर्तन समस्या.
  5. अभ्यासात, शाळेत लक्ष नसणे.
  6. सतत अस्वस्थ असणं, अचानक पोटदुखी.
  7. एखाद्या व्यक्तिला घाबरणं, टाळणं.
  8. लैंगिक अवयवाच्या जागी संसर्ग.

वरील सर्व लक्षणांना इतरही कारणं असू शकतात हे ध्यानात घ्यायला हवं. पण पालक म्हणून तुमचे लक्ष हवेच. यापेक्षा अजून लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे, अत्याचारीत मूल त्याच्या वयाच्या किंवा लहान मुलांवर असाच प्रयोग करण्याची शक्यता अधिक असते. आता इथे ते वयानुसार असणारे कुतूहल आहे की दुसरे काही गंभीर कारण हेपालकांनी तपासून बघायला हवे. मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबतीत महत्वाचे निष्कर्ष काही अभ्यासाद्वारे काढण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे,

*आज जे बाल-लैंगिक अत्याचारातले गुन्हेगार आहेत त्यांच्या बालपणात त्यांच्यावर असे अत्याचार झाले असल्याची शक्यता अधिक आहे हे सिध्द झाले आहे म्हणूनच मोठेपणी ते अशी घृणास्पद कृत्ये करत असल्याचा एक निष्कर्ष आहे.

*अजून एक निष्कर्ष असा आहे की आज जे चाळीशी पन्नाशीत आहेत ते ५ ते १० टक्के व्यक्ती कबूल करत आहेत की त्यांनादेखील अशाच काहीशा अनुभवाला त्यांच्या लहानपणी सामोरे जावे लागले होते.

*मुलांच्या गटांमध्ये या विषयावर चर्चा झाली तेव्हा ३० ते ५० टक्के मुलांनी त्यांना कुठे ना कुठे, कधी ना कधी असा अनुभव आल्याचे सांगितले होते. (मुलांचे वयोगट वेगवेगळे असल्यामुळे इथे टक्क्यांचे प्रमाण अशा फरकाने दिसत आहे).

या मुलां-मुलींशी अधिक संवाद साधला असता त्यांनी सांगितले की असा अनुभव जो ज्यांना कोणी ना कोणी दिला आहे जो त्यांना अस्वस्थ करतो, म्हणूनच आपला पुढचा मुद्दा येतो तो, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श.

चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श अर्थात Good Touch & Bad Touch

नकोसा वाटणारा, अस्वस्थ करणारा, किळसवाणा, न आवडणारा, तो स्पर्श वाईट असं मुलांना सांगायला हवे.

कोणताही आरोपी सर्वप्रथम मुलाचा विश्वास संपादन करेल, मुलाशी गोड-गोड बोलेल, कदाचित गोळी, चॉकलेट, आईस्क्रिम याचे आमिष दाखवेल, भेटवस्तू देईल. आणि वेळ आली की संधी साधेल, त्यामुळे वरती सांगितलेले ओरडा, पळा, सांगा हे महत्त्वाचे.

बाललैंगिक अत्याचार आणि कायदा–:– निर्भया केसनंतर आरोपीला कडक शासन होण्याबाबत कायद्यात बरेच सकारात्मक बदल झालेले आहेत.

आज पालकांसमोर मुलांना वाढविताना वेगळी आव्हाने आहेत. काळाची गरज ओळखून लैंगिक सुरक्षिततेच्या गोष्टी मुलांना आवर्जून सांगायला हव्यात. केवळ काळजी करत रहाण्यापेक्षा आता आपण आपल्या लहानग्यांना धीट, निर्भय बनवायला हवे. जग बदलते आहे, आधुनिक काळात पालकांच्या जबाबदा-या बदलत आहेत, त्या ओळखून आपण आपल्या मुला-मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सामर्थवान बनवायला हवे.

Read More blogs on Parenting Here