लेखक :  देवयानी खरे

दसरा या सणाला अनेक कथा आणि प्रथांनी नटलेल्या विविधरंगी छटा आहेत. पौराणिक कथांमधील विजय ते पेरणीच्या उत्सवापर्यंत विविध पैलूंनी तो साजरा केला जातो. तरीही या दिवसाचे खास महत्त्व म्हणजे ‘वाईटावर चांगल्याचा विजय आणि पुढे नव्या ऊर्जेने करण्यात आलेली सुरुवात’.

कथेनुसार दसऱ्याच्या दिवशी रामाने सीतेला वाचवण्यासाठी रावणाचा वध केला होता. त्यामुळेच एखाद्या मैदानात किंवा विशिष्ट जागी ‘रावण’ हे वाईट गोष्टींचे प्रतीक समजून त्याचं दहन करण्यात येतं. मग सगळी मंडळी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. यानिमित्ताने जुने भांडण-तंटे विसरून नवीन चांगली सुरुवात करण्याच्या भावनेने आपट्याची पानं, ज्यांना सोन्याची पानंही म्हणतात, ती एकमेकांना भेट देतात. झेंडूची तोरणं घराला लावतात आणि श्रीखंड, बासुंदी-पुरीचं गोडाधोडाचं जेवण करतात. महाराष्ट्रात तरी अशा पद्धतीने दसरा साजरा करण्यात येतो.

नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर येणारा दसरा म्हणजेच ‘दश-हरा’ हा देवीच्या विविध रूपांनी दहा (दश) दिशांवर विजय मिळवला याचे प्रतिकसुद्धा आहे.

दुसऱ्या एका कथेनुसार महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्म-विष्णू-महेश या देवांनी एकत्रितपणे आपल्या शक्तीने देवी दुर्गेला उत्पन्न केले. देवी दुर्गेने विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महिषासूर राक्षसावर विजय मिळवून त्याचा वध केला.

विजयाची अजून एक कथा या दिवसाला जोडली आहे. कौरवांशी द्यूत खेळताना हरल्यानंतर पांडवांना १२ वर्षांसाठी वनवास आणि १ वर्षासाठी अज्ञातवासात जावे लागणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपली सगळी शस्त्रं शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी त्याच शस्त्रांनी कौरवांचा युद्धात पराभव केला. म्हणूनच शस्त्रपूजन किंवा आयुध-पूजन अजूनही केले जाते.

काळानुसार आपली रोज वापरण्याची आयुधं किंवा उपकरणं बदलली आहेत त्यामुळे अनेक घरी दसऱ्याच्या दिवशी वाहनं, मोबाईल, मशीन्स, पेन, स्वयंपाकघरातल्या काही गोष्टींची पूजा करण्यात येते. या आयुध-पूजनातून आपल्या वस्तूंविषयी आपण आदरभाव व्यक्त करतो.

दसऱ्याच्या दिवशी कुठल्या नवीन कामाची सुरुवात केली तर ते काम यशस्वी होते ही प्रचलित भावना आहे. लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रारंभ या शुभ दिवशी व्हावा म्हणून पाटीवर सरस्वतीचं चित्र काढून पाटी, पेन्सिल, वही, पुस्तक, वाद्य, रंगकामाचा ब्रश या गोष्टी मांडून, त्यावर झेंडूची फुलं वाहून सरस्वतीपूजन करतात.

केवळ महाराष्ट्रात आणखी एका वेगळ्या प्रकारे म्हणजे ‘सीमोल्लंघन’ करून हा दिवस साजरा करतात. आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे. ही शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरा आहे. पावसाळा संपत आला की नवीन मोहिमेची सुरुवात या दिवशी केली जात असे. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला तसेच बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत नक्की करत असत.

आपल्या शेतकरी बंधुंसाठी हा दिवस म्हणजे पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक घरात येण्याचा दिवस! नवरात्रीच्या सुरुवातीला म्हणजे घटस्थापनेला घरोघरी गहू पेरून घट उभारायची जी प्रथा आहे त्याचं मूळ कारण हेच आहे. घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करून मग दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे अंकुर देवाला वाहिले जातात.

अशा या मंगलमयी दसऱ्याच्या दिवशी आपल्या मनातील सत्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा भाव जपला, वाढवला पाहिजे याची आठवण करणाऱ्या शुभेच्छा देऊ या. पर्यावरणपूरक दृष्टीने सण साजरा करत वाईट मागे टाकून चांगल्या गोष्टींची सुरुवात करायला एकमेकांना प्रेरित करू या.

Read More blogs on Parenting Here