लेखक :  डॉ. आर्या जोशी


यंदा, दीपोत्सव साजरा करताना आपल्या मराठी दिवाळी सणाची माहिती जाणून घेऊया आणि मुलांनाही सांगूया!

दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास ! हे आपण दरवर्षी करतोच. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बरेचदा या सणाचा आनंद आपण एखाद्या पर्यटनस्थळी जाऊनही घेतो आणि नवा उत्साह मनात साठवून परत येतो. पण दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. या वर्षी जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची माहिती.

शुभसूचक रांगोळी, वाईट प्रवृत्तीना दूर पाठवून देणारा आकाशदीप, अंधार दूर करून आयुष्यात प्रकाश पसरवून आपल्याला आनंद देत असलेल्या पणत्या ही दिवाळीची अगदी खास वैशिष्ट्ये.

दिवाळी या मराठी नावाच्या जोडीने या सणाला संस्कृत नावेही आहेत. ही नावे दिवाळीचा अर्थ आणि प्राचीनता दोन्ही आपल्याला सांगतात. दीपालिका, यक्षरात्री, सुखरात्री अशी तिची काही नावे.

दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. याच रात्री देवीची पूजा केली जाते, तिला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवसाला “नवान्न पौर्णिमा” असेही म्हणतात कारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता त्याकाळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना दिसते.

वसुबारसेचा आदला दिवस म्हणजे रमा एकादशी. या दिवशी अंगणात दारातल्या तुळशीपुढे पहिली पणती लावली जाते. शहरात नसले तरी ग्रामीण भागात हे चित्र दिसते. शहरात बरेचदा वसुबारसेला दिवाळी सुरु होते.

शेतीसाठी बैल आणि दूध-दुभत्यासाठी गाय यांची खूप आवश्यकता असते. त्यामुळे गोवत्स द्वादशीला सवत्स म्हणजे आपल्या वासरासह असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धती आहे कारण त्यांच्या पावलांनी शेतात समृद्धी वाढते. त्या दिवशी गाय, बैल यांचा विशेष मान असतो. गळ्यात माळा घालून त्यांची पूजा केली जाते. तीन सांजेला त्यांना ओवाळले जाते. पुरणपोळीचा घास भरविला जातो.

धनत्रयोदशी हा दिवस व्यापारी वर्गाचा आणि आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासकांचा. अमृताचा कुंभ घेऊन समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता प्रकटली तो हाच दिवस असे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. आयुर्वेदाचे वैद्य या दिवशी धन्वंतरी पूजन करतात.

व्यापारी वर्गासाठी हा दिवस धनाच्या पूजेचा असतो. हिशेबाच्या नव्या चोपड्यांची, वह्यांची पूजा या दिवशी केली जाते. धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो. मुले फटाके उडवून आपल्या मराठी दिवाळी सणाचा आनंद साजरा करतात.

चांगल्या वृत्तीने आसुरी किंवा वाईट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजे नरक चतुर्दशीची पहाट. अशी आख्यायिका प्रचलित आहे की या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला. त्याच्या आनंदानिमित्त आपण पहाटे उठून अभ्यंगस्नान करतो. या दिवसात हळूहळू थंडी पडायला लागलेली असते आणि आपली त्वचाही कोरडी व्हायला लागलेली असते. अशावेळी उटणे दुधात कालवून त्याच्या सुगंधित लेपाने अंग स्वच्छ करणे म्हणजे त्वचेची काळजी घेणेच आहे.

महाराष्ट्रात आपण अमावस्या अशुभ मानतो. दक्षिण भारतात मात्र ती शुभ मानली जाते. अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी आश्विन अमावास्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. आपल्या घरात आलेली , सचोटीने आणि प्रामाणिकपणे मिळविलेली संपत्ती पूजनीयच आहे. ती वाढती राहो यासाठी धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करतो.

 

बलिप्रतिपदा म्हणजे भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचे सर्व साम्राज्य मागून घेतले तो दिवस. यज्ञ करण्यात मग्न असलेल्या बळीराजाकडे वामन अवतारात भगवान विष्णू पोहोचले. त्यांनी त्याच्या तीन पावलात सामावले एवढी भूमी बळीराजाकडे मागितली . दोन पावलातच सर्व विश्व व्यापल्यावर तिसरा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्याने बळीच्या मस्तकारवच आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिले अशी ही कथा आहे.

ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात बळीचे मातीचे राज्य तयार करतात आणि इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात. पाडव्याच्या या दिवशी विक्रम संवत सुरु होते. व्यापारी वर्गाचे नवे आर्थिक वर्ष सुरु होते. पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढविणारा हा पाडवा सर्वानाच आनंद देतो.

उत्तर प्रदेशात पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धती आहे. त्यादिवशी विविध प्रकारची मिठाई तयार करतात आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करतात. कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवितात.

यमव्दितीया म्हणजे भाऊबीज. ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथात यम आणि यमी ही दोन भावंडे आहेत. भावाबहिणीचे नाते पवित्र आहे असे यांच्या संवादातून सूचित केले आहे त्यामुळे भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील पावित्र्य, आस्था जपणारा हा दिवस आहे.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राज्यात स्थानिक परंपरेनुसार दिवाळी साजरी होते. आनंद, उत्साह घेऊन येणारी दिवाळी संपते ती मात्र हुरहुर मनात घेऊनच. मुलांनी केलेले दिवाळीचे किल्ले किंवा आपली वाचनाची आवड जपणारे दिवाळी अंक, दिवाळीनंतर ही तुळशी विवाहापर्यंत आपल्या दारात झुलणारा आकाशकंदील दिवाळीच्या आठवणी आपल्या मनात साठवत राहतोच.

मुलांनो, आता जर कोणी तुम्हाला दिवाळी सणाची माहिती सांगा असे म्हंटले तर तुम्हाला नक्की सांगता येईल नाही का?(The Story of Diwali Festival and Diwali Information in Marathi 2021)

यावर्षीच्या दिवाळीमध्ये एक गंमत करून पाहता येईल बरं का ! भारताच्या विविध राज्यात दिवाळी कशी साजरी होते हे तुम्ही मुलांसह बसून नक्की शोधून काढा. तो आनंदही वेगळाच ठरेल.

Read More blogs on Parenting Here