शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 8 : काही वेगळी मुलं
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे

पुणे-मुंबई प्रवासात भेटलेली ती आठ वर्षाची मुलगी आणि तिची आई यांची मला अनेकदा आठवण येते. मुलगी नीटनेटकी, गोड चेहऱ्याची, उत्साही, चपळ होती. पण तिचं बोलणं स्पष्ट नव्हतं. ती काय बोलते आहे ते लक्षपूर्वक ऐकलं तरच कळत होत. थँक्यूला ती ऑंऊँ म्हणत होती. झोपडीला ओंई. तिची आई मात्र तिच्याशी अगदी शांतपणे बोलत होती. याच वयाच्या एखाद्या व्यवस्थित बोलणाऱ्या मुलीशी बोलावं तितक्याच हळू आवाजात बोलत होती. ती बोलत असताना मुलगी लक्षपूर्वक तिच्या ओठांच्या हालचाली न्याहाळत होती. मुलगी फार मोठ्यानं बोलते आहे असं वाटलं तर आई तिला हळू बोलायला सुचवत होती !

मुलीचा अभ्यास चालू होता. कारण मुंबईला तिची परीक्षा होती. बंदर म्हणजे काय असं आईनं विचारल्यावर मोठ्या बोटी थांबण्यासाठी जिथे सोय केलेली असते ती जागा असं ती आपल्या उच्चारात सांगत होती. आई ज्या सुधारणा सुचवेल त्या लक्षात घेऊन पुन्हा उत्तर देत होती.

हे सगळं पाहून मी त्या मुलीच्या शेजारी जाऊन बसले. तिच्याकडे आणि तिच्या आईकडे पाहून हसले. मी काही डोळ्यात दयाभाव आणून पाहत नाही, अरेरे काय बिचारीचं नशीब असं म्हणत नाही. शांतपणे कुतूहलानं आणि कौतुकानं त्यांचा अभ्यास ऐकते आहे हे पाहून मायलेकींना दोघींनाही विश्वास वाटला. मुलगी माझ्याकडे पाहून हसू लागली. आईशी गप्पा सुरु झाल्या.

गप्पांमधून कळलं, की मूकबधिर मुलांना कसं शिकवायचं याचं प्रशिक्षण आईनं मुद्दाम आपल्या मुलीसाठी घेतलं होतं. त्याचा उपयोग करून ती मुलीला शिकवत होती. तिला आणखी एक मोठा मुलगा होता, मुलीचे वडील होते. या मुलीला योग्य प्रकारे वाढवण्याचं, शिकवण्याचं आव्हान त्या घरानं पेललं होतं. आई सांगत होती मला हिच्या शाळेत जावं लागतं. शाळा लांब आहे. कित्येकदा स्वयंपाकाला वेळही मिळत नाही, पण माझे मिस्टर आणि मुलगा म्हणतात, ‘तू काही काळजी करू नकोस. आम्ही करून घेऊ; पण तिच्याकडे आपलं दुर्लक्ष व्हायला नको. ’

पालकांच्या ह्या समंजसपणाचा अतिशय चांगला परिणाम त्या मुलीवर दिसत होता. एरवी असा दोष असलेली मुलं वेगळी दिसतात, पण ही मुलगी अगदी स्मार्ट दिसत होती.

त्या आईबद्दल अतिशय आदर वाटला मला. इतर सर्वसाधारण मुलांचं पालक होणं आणि अशा वेगळ्या मुलांचं पालक होणं. यात केवढा फरक आहे हे जाणवलं.

मुलाचं हे वेगळेपण कधी शारीरिक अपंगत्वाचं रूप घेऊन येतं. जन्मतःच हात, पाय लुळा असणं, पोलिओनं हातापायांची वाढ खुंटणं, शारीरिक वाढ न होणं, कुबड असणं, चेहऱ्यावर काळे डाग असणं, कोड येणं, नाक, कान, ओठ यात काही व्यंग असणं, डोळ्यात दोष असणं. या वेगळेपणाचा बैद्धिक वाढीवर बहुतेक परिणाम होत नाही.

अशा मुलांबद्दल पालकांची पहिली प्रतिक्रिया. ‘हे आमच्याच वाट्याला का यावं?’ अशी दुःखाची असते. ‘आम्ही काय वाईट वागलो म्हणून आम्हाला ही शिक्षा ?’ असाही प्रश्न मनात येतो. नातेवाईक किंवा परिचित मंडळी अनेकदा क्रूरपणे याचा उल्लेख करतात आणि पालकांच्या जखमेवर मीठ चोळतात. काही मंडळी यावर अनेक वैद्यकीय, दैवी, धार्मिक उपाय सुचवत राहतात आणि पालकांना चांगुलपणापायी वैताग देतात.

‘सतत नव्या नव्या उपचारात पालक इतके गुंतून जातात की, मुलाकडे रोगी म्हणूनच पाहिलं जातं आणि त्याच्या इतर गुणांकडे दुर्लक्ष होत. एक बारीकसा प्रश्न असलेलं पण एरवी अगदी इतरांसारखं असलेलं स्वतंत्र निरोगी वक्तिमत्व म्हणून अशा मुलांकडे पाहायला, त्यांना वागवायला आपण सर्वांनीच शिकलं पाहिजे.’

कधीकधी हे वेगळेपण केवळ शारीरिक नसतं. मानसिक, बैद्धिक वाढ नीट न होण्यातून हे वेगळेपण येतं. मतिमंदत्वामुळे ही मुलं इतरांपेक्षा वेगळी दिसतात. कधी काही रोगांमुळे चेहऱ्याच्या स्नायूंच्या, मानेच्या हालचालींवर ताबा राहत नाही. काही मुलं जन्मतःच डाउन्स सिन्ड्रोम घेऊन जन्माला येतात. त्यांना मंगोल बेबी असंही म्हणतात. या मुलांची शारीरिक वाढ पूर्ण होत नाही. बैद्धिक वाढीचा वेग कमी असतो; पण काही मुलांत तो चांगलाही असू शकतो. अशा प्रकारची बरीच मुलं गोड स्वभावाची असतात असं म्हणतात.

मुलातलं वेगळेपण गंभीर असो किंवा आधी उल्लेख केल्याप्रमाणे केवळ शारीरिक असो, त्याला उपचारांची जेवढी गरज असते त्याहीपेक्षा इतर मुलांप्रमाणेच त्याला वागणूक मिळण्याची गरज असते. अनेकदा असं दिसतं की, अशा मुलांच्या भावंडांना त्याच्या व्यंगाबद्दल फारसं काही वाटत नाही. ती सहजपणे त्याच्याशी खेळू लागतात; पण पालकांना मुलाची लाज वाटते. त्यापायी अशा मुलांना इतरात मिसळू न देणं, शक्य तोवर घरातच ठेवणं, इतरांपासून लपवून ठेवणं अशी वागणूक या मुलांना मिळते. कधी या मुलाबद्दल पालक फारस हळवे बनतात आणि त्याला अतिशय जपतात.

या सगळ्याचा अशा मुलांवर वाईटच परिणाम होतो. या मुलाला जर पालकांनी, सहजपणे आपल्यात सामावून घेतलं, त्याच्या दुबळेपणाचा बाऊ केला नाही, त्याच्यावर टीका केली नाही, जरूर तेवढ्या सवलती देऊनही योग्य ती शिस्तही त्याला वेळेवर लावली, त्याला तू आम्हा सर्वांना आवडतोस अशी भावना दिली तर ही मुलंही मोकळी, खेळकर, आनंदी होतात.

नाही तर मुलाच्या व्यंगालाच जास्त महत्व दिलं, त्याचा बाऊ केला आणि त्याच्या इतर व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष झालं तर मुलं खुरटतात, दुःखी, उदास, केविलवाणी बनतात. कधी इतरांना आवरेनाशीही बनतात.

अशा वेगळेपणामध्ये सामाजिक भागही फार मोठा आहे. एखाद्याचे डोळे नीट काम करत नसले आणि तो चष्मा लावत असेल तर ती आपण विकृती मानत नाही. उलट ती फ्रेम चांगली दिसते का, काचा किंचित रंगीत बऱ्या दिसतील का अशी चर्चाही मोकळेपणाने करतो; पण तेच कान नीट काम करत नाहीत म्हणून यंत्र लावलेलं असतं तर आपली दृष्टी बदलते. आपल्या मते ते गंभीर व्यंग ठरतं. पायाला आधार देण्यासाठी खास बनवलेला बूट वापरणारी व्यक्ती दिसली तर लगेच, आपल्या भावना बदलतात. खरं तर निसर्गानं शरीर घडवत असताना काही चुका केलेल्या असतात. कधी शरीर वापरत असताना अपघातानं काही गोष्टी घडतात त्यांना एवढं महत्व देऊन त्या व्यक्तीवर अपंगत्वाचा शिक्का मारणं एवढंच नव्हे तर त्याला सामान्य माणसांप्रमाणे जगणं अशक्य करणं ही माणुसकी नव्हे.

पालकांच्या दृष्टीनं विचार केला तर आपल्या वेगळ्या मुलाला, मुलीला पाहून लोकांची होणारी कुजबुज, मुलांवर रोखणाऱ्या चमत्कारिक नजरा याचा त्यांना मनस्ताप होतोच; पण लहानपणापासून मुलाला माणसात वावरण्याची सवय लागली तर या नजरांची सवय होते. कुजबुजण्याकडे दुर्लक्ष करता येतं. कधी शांतपणे उत्तरंही देता येतात. लोकांच्या नजरा टाळण्यासाठी मुलाला बंदिवास देणं हा यावरच मार्ग नव्हे.

वेगळ्या मुलाला वाढवणारे आपण एकटेच नाही तर असे हजारो पालक आहेत ही भावना पालकांना दिलासा देते. काही ठिकाणी या पालकांच्या संघटना आहेत. आठवड्यातून एकदा एकत्र येणं, काही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, नवीन माहिती मिळवणं, या मुलांना समाजात सहजपणे वावरता यावं म्हणून खास सोयी करून घेणं, याबाबतच्या संशोधनासाठी, उपचारासाठी काही निधी गोळा करणं अशी कामं या संघटना करतात.

एकूणच या मुलांना वाढवताना जो जादा ताण पालकांवर पडतो त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. फक्त वैद्यकीय मार्गदर्शनाची नव्हे तर घरातल्या इतर माणसांवर होणारा परिणाम, इतर मुलांकडे होणारे दुर्लक्ष, येणारं वैफल्य या सगळ्यात वारंवार आधार लागतो, योग्य ते मार्गदर्शन लागतं. नशिबाला दोष न देता हे मूल हा आपल्या जीवनाचा, इतर कामांबरोबरचा एक भाग मानणं गरजेचं असतं. त्याबरोबर त्यानंच आपलं सारं जीवन व्यापून टाकलं असं होऊ न देण्याचीही काळजी घ्यावी लागते.

यासाठी काही संस्था खास प्रशिक्षणं आयोजित करतात. मूकबधिर विद्यालयांतर्फे अशा मुलांना शिकवावं कसं याचे अभ्यासक्रम असतात. या मुलांना केवळ खुणांच्या भाषेतून बोलावं लागू नये, त्यांनी आपलं स्वरयंत्र विकसित करावं, दुसऱ्याचं म्हणणं समजून घेण्यासाठी ओठांच्या हालचाली लक्षपूर्वक पाहाव्यात यासाठी पालकांना-शिक्षकांना शिकवलं जातं.

मतिमंद मुलांसाठी पुण्यात ‘कामायनी’ ही संस्था कार्य करते आहे. मतिमंद मुलांना शिकवण्याचं शिक्षण देणारे त्यांचे चार-चार महिन्याचं अभ्यासक्रम आहेत. माता-शिक्षणवर्ग आहेत. या मुलांना काही उद्योग शिकवून स्वावलंबी करण्याचेही प्रयत्न चालू आहेत.

अंध मुलांच्या बाबतीत आजवर सर्वात अधिक काम झालेलं दिसतं. त्यांच्या स्वतंत्र शाळा आहेत. त्याचप्रमाणे त्यांना प्रवासासाठी खास सवलतीही उपलब्ध आहे. त्यांना येण्याजोगी अनेक कामं त्यांना शिकवली जातात. अंध माणसांशी-मुलांशी बोलताना असंही आढळतं, की पंचेंद्रियांपैकी एक इंद्रिय निकामी झालं तरी त्यांची इतर इंद्रिय सामान्यांपेक्षाही जास्त तल्लख असतात. एवढंच नव्हे तर अंध मुली असंही सांगतात, की एखाद्याच्या स्पर्शावरून त्या त्या माणसाच्या मनातला हेतू ओळखू शकतात, सावध होतात.

मुलांमधलं हे वेगळेपण मुळात फार गंभीर नसतं; पण सतत वेगळी वागणूक मिळाल्यानं, इतरांनी फार दया दाखविल्यानं, मठ्ठ ठरवल्यानं चेहऱ्यावर बावळटपणा येतो. ज्या घरात अशा मुलांना सामावून घेतलं जातं, प्रेम मिळतं ती मुलं जास्त सहजपणे आपल्या व्यंगावर मात करतात.

असंही म्हणतात की, उच्चशिक्षित हुशार कुटुंबांमध्ये राहण्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबात राहून या मुलांची वाढ जास्त चांगली होते, याचं कारण म्हणजे हुशार पालकांचं मूल बुद्धीनं मंद निघालं तर त्याला ते फार बोचत राहतं. मग शाळेत मागं पडणाऱ्या मुलाचा जास्त अभ्यास घेतला जातो. त्याला सतत पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो. त्याला काही जमत नाही, म्हणून स्वतः अस्वस्थ होणं वाढतं. हा ताण त्या मुलावर घालणं घातक ठरतं.

मुलाच्या बुद्धीच्या वाढीचा वेग कमी असला तर त्याला योग्य झेपेल असं, त्याच्या गतीनं शिक्षण मिळणं हा त्याचा हक्क आहे. त्याचं वय आणि त्या वयाच्या बरोबरची मुलं यांच्याशी त्याची तुलना होऊ नये. त्याला कोणत्या वयाची समज आहे ते पाहून शिक्षण त्याला मिळायला हवं.

आपण इतरांसारखेच आहोत ही भावना या मुलांमध्ये वाढीला लागली आणि बरोबरच्या इतर मुलांनी त्यांना आपल्यात सामावून घेतलं तर त्यांच्या वाढीचा वेग वाढतो.

यासाठी शक्यतो नेहमीच्या शाळेत या मुलांनी जाणं योग्य असं मानतात, पण ते किती प्रमाणात अपंगत्व आहे यावर अवलंबून राहतं. पालक, शिक्षण आणि बरोबरची मुलं यांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीनं त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.

अशा वेगळ्या मुलांचं शिक्षण हे काही देशात ते आरोग्यखात्याचं काम मानतात. काही देशात ते शिक्षणखात्याचं मानतात. आपल्याकडे ते समाज-कल्याण खात्याचं काम मानलं जातं. खरं तर या तीनही क्षेत्रांच्या मदतीची या कार्याला गरज आहे.

शहरी भागात पालकांना निदान वेगळ्या मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थापर्यंत पोहोचता तरी येतं; पण ग्रामीण भागात या साऱ्या वेगळेपणाबद्दलची माहितीही पुरेशा प्रमाणात पोचत नाही. त्यामुळे वेळेवर त्यावर उपाय करणंही कठीण जातं.

अलीकडे म्हणजे गेल्या पाच-सहा वर्षांत याबद्दल प्रयत्न होताना दिसतात. मूक-बधिरांसाठी काही नाक-कान-घसा शिबिरं होतात. अंध मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबिरं होतात; पण इतर प्रश्नासंबंधी खास प्रयत्न होत नाहीत. मतिमंद मुलांना खुळी पोरं म्हणून बाजूला टाकलं जातं.

मुलामधलं शारीरिक, मानसिक, बैद्धिक वेगळेपण वेळेवर लक्षात येणं, त्यावर योग्य ते उपाय करणं यासाठी खास मुलांसाठी असलेले डॉक्टर्स मदत करतात. मार्गदर्शन करतात. प्रसूती होण्यापूर्वी एक महिनाभर गर्भामधली विकृती ओळखता येते. याचा आधार घेऊन काही पालक मुलाच्या जन्मापूर्वीच काही गंभीर विकृती असेल तर हे मूल आम्हाला नको असंही सांगतात. ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे.

पण एवढ्यानं प्रश्न सुटत नाही. मूल जन्मताना निकोप असलं पण नंतर काही आजारानं त्यात व्यंग आलं तर ते मूल नको म्हणून चालत नाही. आपण तोवर मुलात गुंतलेले असतो.

असं मूल स्वीकारणं किंवा नाकारणं या दोन्ही बाबतीत शास्त्रीय दृष्टीकोनाची गरज आहे. तो भावनेचा किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवता येत नाही.

वेगळ्या मुलांना वाढविण्याचं आव्हान जिद्दीनं पेलणारे अनेक पालक आपल्या आसपास भेटतात. त्यांचं आणि वेगळ्या मुलांचं जगणं सुसह्य करणं इतरांना शक्य आहे. काही गोष्टी करून आणि काही न करून.

Read More blogs on Parenting Here