शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 9 : समाज पालकत्व मागत असतो.
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे

लक्ष्मण उकिडवा बसून कपाळाला हात लावून रडत होता. ते दृश्य अजून मला तसंच्या तसं आठवतं. आठवड्यापूर्वीच त्याची पाच वर्षाची मुलगी अपघातात वारली होती. लक्ष्मण तिला बाजारात घेऊन गेला होता. परत येताना रस्त्याच्या डावीकडून दोघं चालत होते. कडेला लक्ष्मण आणि वाहनाच्या बाजूला मुलगी असे चालले होते. मागून ट्र्क आला भरधाव आणि लक्ष्मणच्या हाताला हिसका बसला. ट्रकच्या मागच्या चाकात अडकून मुलगी फरफटत पुढे गेली. ट्र्क थांबला तेव्हा त्याखाली ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती ! ती बेशुद्ध झाली नव्हती. पाणी मागत होती. पोटातली आतडी बाहेर आली होती. ते तिला दिसत नव्हतं. पोट दुखतंय म्हणत होती. थोड्या वेळानं बिचारी गेली !

या घटनेला दोन वर्ष झाली तरी लक्ष्मण आणि त्याची बायको लक्ष्मीबाई खंतावलेलीच आहेत. अशा अपघातात कोणाला दोष द्यायचा ? बेजबाबदार ड्रायव्हरला ? अरुंद रस्त्यांना ? रस्त्याला फूटपाथ नसण्याला ? आपल्या लहानग्या मुलाला रस्त्यातून कसं चालवावं ते ठाऊक नसलेल्या पालकाला ? की वाढत्या रहदारीला ?

इतर गोष्टींना आपण आवर घालणं कठीण आहे; पण आपल्या मुलांना जपता तर येईल ? रस्त्यानं कुणी आई-बाप लहान मुलाला हाताला धरून नेत असतात. मूल वाहनांच्या बाजूला असलं तर मनात धस्स होतं ! आगाऊपणाबद्दल त्या आई-वडलांचा राग पत्करूनही मी मुलाला रस्त्याकडेनं चालवण्याबद्दल सांगते. मनात भीती असते की, आता हा उड्या मारत बागडत चालणारा जीव पुढच्या क्षणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसेल !

रहदारीच्या ठिकाणी किती तरी वेळा हे दृश्य दिसतं. मुलाकडे पालकांचं लक्षच नसतं आणि ते कुठे तरी स्कूटरपुढं, गाडीपुढं येतं. मग पालक दचकतात आणि दणकन धपाटा बसतो पोराच्या पाठीत. हा धपाटा खरं तर पालकांच्या पाठीत बसायला हवा. पण घालणार कोण?

मृत्यू असा आ वासून समोर आला तरच आपल्याला जाग येते इतकी आपली संवेदना जागृत ! एरवी मुलं बिचारी अनेक शारीरिक-मानसिक ताप सोसत असतातच घरीदारी.

लहान-सहान कारणावरून मुलांना बडवणारे आई-बाप आपल्याला शेजारीपाजारी दिसतात. एवढ्याशा मुलाला उचलून आदळणारे पालक असतात. मूल त्यांचं असतं, त्याला जन्माला घालण्याचं शौर्य त्यांचं असतं, ते त्याला पोसत असतात. तुम्ही आम्ही कोण असतो त्याचे ? कुणीच का नसतो ? जगातले अन्याय निवारण करण्याची ताकद आपल्याला नसेल; पण निदान आपल्या डोळ्यांसमोर घडणारे हे अन्याय तरी थांबवता येतील ? मोठं माणूस मुलाला मारतं तेव्हा त्याचा सामाजिक अर्थ हाच असतो की, ‘बळी तो कान पिळी ’ हा न्याय मला मान्य आहे. मूल लहान म्हणून मी त्याला मारीन; तसंच बाहेर कुणी मोठा मला मारू लागला तर मी मार खाईन.

अलीकडे लांबून शाळेत येणारी मुलं रिक्षातून येतात. रिक्षात कोंबून कोंबून येतात. अशाच एका खच्चून भरलेल्या रिक्षात मुलं काही गडबड करत होती तर रिक्षावाला त्यांना एकेकाला पट्टीनं फटके देऊन ‘करशील का आवाज ? करशील ?’ अस विचारत होता. आपण ज्यांच्या हाती मुलांना सोपवतो ती माणसं कशी वागतात मुलांशी ? मुलं सांभाळायला ठेवलेल्या मोलकरणीचे अनेक क्रूरपणे आपण ऐकतो, पाळणाघरांचे किस्से ऐकतो, शिक्षक मुलांना कसं वागवतात ते ऐकतो आणि प्रश्न पडतो खरंच आपल्या समाजाला मूल कळलेलंच नाही का ? पालकत्वाची गरज काय घरापुरतीच असते ? घराबाहेर पडलेल्या आपल्या मुलांना समाजात पालकत्व भेटतं ?

आपली मुलं म्हणताना जाणवलं की आपल्या मुलांना स्वतःची घरं तरी असतात, पण स्वतःचं घर नसलेली अनाथ मुलं, स्वतःचं घर पारखं झालेली कामगार-मुलं, शिकण्यासाठी वसतिगृहात ठेवलेली मुलं या सगळ्यांना पालक हवे असतात. वाईट वागवणारे पालक, व्यसनी पालक असलेली मुलं आईवडील असूनही पोरकीच असतात !

असं म्हणतात की, शिस्त लावली नाही म्हणून मूल क्वचितच बिघडतं. प्रेम मिळालं नाही म्हणून बिघडणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त असतं आणि आपण तर मुलं म्हटली की, गप्प बसा, हाताची घडी तोंडावर बोट, देवासारखे शांत बसा, जागेवर बसा, ओळीत उभे राहा, असं करा, तसं करू नका. शक्य त्या सर्व प्रकारची शिस्त लावायला कंबर कसून असतो.

अलीकडे मुलांना दिवसभर कुठे ना कुठे ‘अडकवून ’ टाकण्याचं पालकांनी मनावर घेतलेलं दिसतं. सकाळी कुठला तरी क्लास, मग शाळा, घरी येऊन संध्याकाळी पुन्हा क्लास, मग अभ्यास असं ते मूल अडकवून टाकायचं. सुट्टी लागली की, पुन्हा कुठल्या तरी खास क्लासला घालायचं. जशा मुलांना अनेक गोष्टी आल्या पाहिजेत तसा थोडा रिकामा वेळही असला पाहिजे. तो असला तर त्यांची कल्पनाशक्ती बहरते, निर्माणशक्ती फुलते, शुन्यातून मुलं वाट्टेल ते निर्माण करू शकतात. ती शक्ती आपण हिरावून तर घेत नाही ना, त्यांना ठरवलेले अभ्यासक्रम नेमून देऊन ? कुठे तरी अडकवून टाकून ?

एकदा कॉलेजमध्ये भाषणासाठी आम्ही दोघं गेलो होतो. मुलं पण बरोबर होती. भाषण होईपर्यंत दोन तास ती बाहेर खेळत होती आणि सगळा कार्यक्रम झाल्यावर त्यांना विचारलं, ‘तुम्ही काय करत होतात ?’ तर त्यांनी वाळूत केलेलं गाव दाखवलं. त्यात वाळूत बोगदा केला होता, नदी केली होती. नदीवर दोन लाकडाचे तुकडे लावून पूल केले होते. विटांच्या इमारती होत्या. एक मोठा पाइप खोचून विहीर केली होती. पाइप लावून कारंजी केली होती. बाजूचं गवत लावून बाग केली होती. थोडे मोठे दगड ठेवून टेकडी केली होती. टेकडीवर देऊळ होतं. भोवताली लोखंडाचे तुकडे लावून सीमा केली होती. गवताच्या लांबलचक पात्याची दोन्ही टोकं खोचून कमान केली होती वेशीवरची. आसपास मिळालेल्या तुकड्याताकड्यांतून त्यांनी गाव उभारलं होतं. कचऱ्यातून कलेचा कोणताही क्लास न करता !

मोकळा वेळ अंगावर न येणं, त्यातूनही काही सृजन करता येणं ही केवढी मोठी शक्ती आहे ! स्वतःचा सहवास आवडणं ही मोठेपणी खूप जणांना न जमणारी कला आहे. मुलांमधली ही शक्ती कशी जपायची ?

आपण मुलांना सतत कुठे तरी अडकवून टाकायला का बरं उत्सुक असतो ? मूल मोकळं राहिलं तर बिघडेल असं वाटतं की, आपल्या कामासाठी, शांतपणासाठी आपल्याला वेळ हवा असतो ? मुलाला काही शिकवण्याची, घडवण्याची किंबहुना त्याच्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची कुवत आपल्यात नाही असं आपल्याला वाटत असतं का ? मुलाला अनेक गोष्टी जशा आल्या पाहिजेत तसं आईवडिलाचं प्रेम, सहवासही मिळाला पाहिजे. त्यांच्या अंगाखांद्यावर बागडायला मिळालं पाहिजे. मोठेपणी जवळ बसता आलं पाहिजे. बोलता आलं पाहिजे. मोकळेपणानं आपल्या चिंता, सुख-दुःख, विचार बोलता आले पाहिजेत. यासाठी वेळ ठेवतो आपण ? मुलाला कुठे तरी अडकवून टाकण्यापेक्षा स्वतःला रोज तास-दोन तास मुलांबरोबर ‘अडकवून ’ घ्यायला हवं. ही संवादाची पद्धत मुलाच्या लहानपणी आपण बेजबाबदारपणे नाकारतो आणि मग मुलं मोठी झाली की, ती आमच्याशी बोलत नाही. आम्हाला काही सांगत नाहीत म्हणून तक्रारी करतो.

कधी मोकळेपणानं न बोललेल्या वडलांना मुलगी तरुणपणी कसं सांगणार की, “बाबा, मला अमुक मुलगा आवडलाय. आम्हाला लग्न करायचं आहे. तो असा असा आहे. तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय ?” तिनं जर विचार केला की, आजवर वडील कुठे काय मोकळेपणानं बोललेत आपल्याशी ? आपण कशाला काय सांगा ? आपण पळून जाऊनच लग्न करू. बाबा विरोधच करतील. हे आपलं संचित त्या वडलांनीच घडवलेलं असतं अनेकदा.

मुलांना मोकळेपणानं बोलण्याची संधी जशी आपण नाकारतो तसे त्यांचे स्वतःचे प्रश्न मांडण्याची संधीही नाकारतो. एकदा असं झालं की, माझ्या एका मैत्रिणीनं अचानक फोन केला. रात्री तुम्ही चौघं आमच्याकडे जेवायला यायचं म्हणाली. मी हो म्हणून टाकलं. पंचाईत झाली शोनीलची. त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी वर्गात चाचणी-परीक्षा होती छोटीशी. त्याला सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा होता. शिवाय त्याला रात्री लवकर झोप येते. कुणाकडे जेवायला गेलं की उशीर होतो. तो कंटाळतो. तो यायला तयार नव्हता. त्याला घरात ठेवून जाणंही शक्य नव्हतं. सोबत नव्हती. मैत्रिणीला नाही म्हणणंही शक्य नव्हतं. शेवटी तो अभ्यासाची पुस्तकं घेऊन जेवायला आला आणि पहाटे लवकर उठवण्याचं वचन मी त्याला दिलं. शिवाय जेवून लवकरच आम्ही घरी यायला निघालो, गप्पा मारत बसलो नाही.

एरवी ह्या प्रसंगात शोनीलचं अकांडतांडव, रडणं, माझं रागावणं, सर्वांचाच मूड जाणं असं घडू शकलं असतं; पण शांतपणे विचार केल्यावर जाणवलं की, आता मुलं मोठी झाल्यावर अशी अचानक आमंत्रणं टाळायला हवीत. हा प्रश्न सांगून टाळायला हवीत. मुलांशी बोलून ठरवायला हवीत. मुलं नाही सुद्धा म्हणतील. जायचं ठरवलं तर मुलांची कुठे तरी राहायची सोय करायला हवी. यासाठीही पुरेसा अवधी हवा. शोनील मोठा झाला आहे, स्वतःचं काही मत मांडतो आहे, याचा अर्थ त्याला शिंगं फुटली, तो ऐकेनासा झाला असं नाही. तो आपले प्रश्न शब्दात मांडायला शिकतो आहे ते आम्ही समजून घ्यायला हवेत.

आपले प्रश्न शब्दात मांडता येत नाहीत म्हणून मोठेपणी किती पंचाईत करून घेतो आपण स्वतःची ? मला हे आवडत नाही, मला असं वागणं जमणार नाही, मी असं करणार नाही, माझ्या मनात महत्व या गोष्टीला आहे, मी अमुक एक ठरवलेलं आहे ते मला केलंच पाहिजे असं कधी बोलू शकतो आपण ?

हे घरातही शिकवलं जात नाही आणि शाळेत तर नाहीच नाही. शिक्षण संपल्यावर आपल्या पायावर उभे राहून आपण जगात वावरू लागलो की जाणवतं माणसांशी बोलावं कसं हे कधी आपल्या अभ्यासक्रमात का नव्हतं ? माणसं कशी ओळखावीत ? आपण दुसऱ्यासाठी किती काम करावं ? दुसऱ्याकडून कोणत्या अपेक्षा कराव्यात ? आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागावं ? कामं कशी करून घ्यावीत ? रागवावं कसं ? समजून कसं सांगावं ? माणसाला माणूस म्हणून वागवावं म्हणजे काय ? अनेक प्रश्न जाणवत राहतात. त्याचबरोबर आपण इतिहासातल्या सनावळ्या पाठ केल्या त्या कुठे केल्या ? भूगोलात हजारो गावांची नावं, तिथे काय काय तयार होतं त्याचं काय झालं ? शास्त्रातील सूत्रं शिकलो होतो त्याचा काय काय उपयोग झाला ? भूमितीतली प्रमेय सोडवली त्यातलं एकही आज आठवत नाही. असे किती तरी विषय. मान्य आहे या विषयांनी माणसाच्या बुद्धीचे अनेक पैलू लक्षात आणून दिले. कार्य कारणभाव समजावला; पण त्यासाठी शाळेची अकरा अधिक कॉलेजची सहा वर्ष घालवायलाच हवी होती का ? अनेक विषय शिकवणं महत्वाचं का शिकण्याची कला शिकवणं महत्वाचं ? मुलांच्या अभ्यासक्रमात अनेक नवनवे विषय कोंबले जात आहेत. दप्तरं फुगत आहेत. मुलं ओझ्यानं वाकून जात आहेत, पालक हे ओझं कमी करायच्या प्रयत्नात मुलांवरचा भार आणखीन वाढवत आहेत. वर्षांनुवर्ष शिक्षणतज्ज्ञ विचार करतायत, संशोधन करतायत, परदेशी जाऊन अभ्यास करून येताहेत, तरीही काहीही बदलत नाहीये. बिघडतच चाललं आहे.

शिक्षणात, राजकारणात समाजात मुलांना कुणी पालक नाहीत हेच खरं, मुलांची काळजी घ्यायला हवी असं यांच्यातल्या कुणाला वाटत नाही का ?

कधीकधी वाटतं जबाबदार पालकाच्या भूमिकेची अपेक्षा कुणाकडून करायची ? इथे मोठी माणसंच मुळात मोठी होत नाही आहेत. माना हलू लागल्या तरी पैशाची, सत्तेची, प्रतिष्ठेची, मानमरातबाची, नावाची हाव सुटत नाही. ह्या माणसांनी कुणाचं पालन करावं ? कुणाचं पालक व्हावं ?

जबाबदार पालक व्हायचं म्हणजे स्वतः झिजून दुसऱ्याच्या भल्यासाठी झटावं लागतं. समाजाला असं पालकत्व हवं असतं. आजची मोठी माणसं आपल्यामागून येणाऱ्या तरुणांना आपली कामं पुढं चालवण्यासाठी तयार करत असतील, त्यात मन घालत असतील, प्रसंगी स्वतः दोन पावलं मागं राहत असतील तर समाज पुढे जातो. चांगली कामं पुढं जात राहतात. चांगल्या परंपरा निर्माण होतात. हे जितकं घरात खरं आहे तितकंच समाजातही खरं आहे.

आपल्या तरुण मुलीला मागं ठेवून, स्वतः सुंदर साड्या नेसून, नटून-थटून, पाहुण्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या आईला काय म्हणू आपण ? नावं ठेवू, नाही का ? आपापल्या कामांच्या ठिकाणी याहून वेगळं काय चालतं ? मोठ्या माणसांना लहानांची माया नाही. ठरावीक वयानंतर पिढी तयार करणं हा आपल्या कामाचाच एक भाग आहे हे कुणाला सांगायचं ?

‘खरंच तुझा काही दोष नाही त्यामुळं त्याची शिक्षा तुला नाही मिळता कामा.’

समाजातलं पालकत्व असं दिवसेंदिवस मरताना दिसतं आहे. यातूनच तरुणांपुढं आदर्श नाहीत, तरुण माणसं मोठ्यांचा मान राखत नाहीत अशी खणाखणी सुरु होते.

तरुण माणसं वृद्धांना मान देत नाहीत. मुलं आईवडिलांचं करायला तयार नसतात. हे तरुणांमधलं पालकत्व संपल्याचं लक्षण आहे. पालकत्व ही काही मोठ्यांमध्येच असावी अशी भावना नव्हे. ती लहानांच्या मनातही मोठ्यांसाठी असायला हवी. आपले आईवडील वयस्कर झाले की, त्यांच्या शारीरिक-मानसिक शक्ती कमी होतात. आधार हवा असतो तेव्हा आपल्याला त्यांचं पालक बनावंच लागतं हेही सहजपणे घडायला हवं. निरोगी समाजात ते घडतं. मातृ-पितृऋण मानायचं म्हणजे भूतकाळाविषयी कृतज्ञता मनात ठेवायची. लहान मुलांचं पालकत्व स्वीकारणं म्हणजे भविष्याची काळजी घेणं. यातून पालकत्वाची एक साखळी आपण निर्माण करत असतो. दोन पिढ्यांमधला मायेचा दुवा बनत असतो. ही साखळी कायम, अखंड राहायला हवी. ती तुटून चालणार नाही. ती तुटली तर समाजातलं बालपण एकाकी बनतं आणि म्हातारपण, एकाकी बनतं आणि तरुणपणाला ओढून धरणारे हे दोन दुवे तुटले की तरुणपण स्वैर बनतं.

केवळ स्वतःच्या विकासाबद्दल-स्वातंत्र्याबद्दल जागरूक असणाऱ्या स्वयंकेंद्रित व्यक्तिमत्वांबद्दल म्हणूनच मला भीती वाटते. ही वृत्ती फोफावली, माणसं भूतकाळ-भविष्यकाळाचं ऋण मानेनाशी झाली तर आज आपण आपल्या ज्येष्ठांना देता आहोत तीच वागणूक उद्या आपल्या वाट्याला येणार आहे, हे दिसू लागतं आणि मुलांकडे होणारं दुर्लक्ष पुढच्या पिढ्यांकडे केलेलं दुर्लक्ष बनणार आहे. हे दुष्ट चक्रच नव्हे तर वाढत राहणारी दुष्ट साखळी आपण निर्माण करत आहोत.

मान्य आहे सर्वांवरचेच ताण वाढले आहेत. वाढत आहेत. जगणं सोपं झालं तर माणसा माणसांच्या नात्यातलॆ ताणही कमी होतील ही आशा. माणसांना वापरून घेण्याची वृत्ती कमी होईल; पण समृद्ध देशांमध्ये तरी मुलांची काळजी घेणारा, त्यांना जपणारा समाज असतो का ? शेवटी काही मूल्यं ही कितीही ताणात जगावं लागलं तरी पळायचीच असतात. मुलांची काळजी हे असं मूल्य आहे.

आपलं ज्ञान आणि आपलं जीवन यात सगळीकडे इतकी तफावत दिसते की, मुलांचे प्रश्न त्याला अपवाद कसे होतील ? मुलाला सहा महिने अंगावर पाजलंच पाहिजे, हे पोस्टर्स लावून जाहिराती करून सांगायचं आणि नोकरी करणाऱ्या बाईला, प्रसूतीची रजा तीनच महिने, चॉकलेट खाऊ नका दात किडतात म्हणायचं आणि टी. व्ही. वर सिनेमात, रंगीत जाहिराती पाहायच्या चोक्लेट्सच्याच. कुणाला पर्वा आहे आमच्या आरोग्याची ?

गरजू मुलांना आपापल्यापरीनं साहाय्य देण्याचं काम संस्था करतायत, व्यक्ती करतायत, सरकारही करतं आहे. आपणंही त्याला हातभार लावावा; पण समाजात पालकत्व निर्माण कसं होईल हा प्रश्न राहतोच.

एका लहान मुलानं लिहिलेला लेख आहे. मोठी माणसं लहान मुलांना कसा त्रास देतात ते त्यानं लिहिलंय. त्यात दुकानात वस्तू आणायला गेलं की किती वेळ पैसे पुढे धरून उभं राहिलं तरी दुकानदार लक्षच देत नाही, बसमध्ये चढताना मोठी माणसं आपल्याला ढकलून स्वतः पुढे चढतात. रस्त्यावर क्रिकेट खेळताना चेंडू कुणाच्या घरात गेला तर परत देत नाहीत, वाचनालयात शिपाई कार्ड नेलं तर बघतही नाही आणि एखाद्या दिवशी नाही नेलं तर घर लांब असलं तरी परत पाठवतो, अशा अनेक गोष्टी लिहिल्यात. त्यात शेवटी एक लिहिलं आहे. तो रस्त्यातून जात असताना कुणाचा तरी पाय लागला. तेवढ्यात डोक्यात टप्पल बसली. त्यानं वळून पाहिलं तर टप्पल मारणारा त्यालाच म्हणत होता. ‘काय रे पोरा ’,तंगड्या लांब झाल्या का तुझ्या ? लाथा कशाला, मारतोस ?’ त्याला वाटलं आपण पण या माणसाला मरावं; पण त्यानं लिहिलं आहे-

“पण मारणार कसा ? तो मोठा होता आणि मारलं तरी सगळे त्याच्याच बाजूला जाणार ! माझ्या बाजूला कोण येणार ?”

आठ वर्षाच्या मुलाला सुशिक्षित शहरातल्या भर रस्त्यावरच्या गर्दीत आपल्या बाजूला कोणीही येणार नाही हा विश्वास आज आपला समाज, आपण देतो आहोत !

धन्य आपण पालक आणि धन्य ती मुलं-आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ !

Read More blogs on Parenting Here