लेखक :  शोभा भागवत


घरात आई मुलांना अतिपरिचित असते. त्यामुळे तिची भीती वाटण्याचा प्रश्न येत नाही. आईला वाटलं की, मुलांना कुणाचा तरी धाक हवा. मग वडिलांकडे आपोआपच बागुलबुवाची भूमिका येते, अनेक वडिलांना ती आवडतेही. अनेकदा ही भूमिका रहातच नाही. वडिलांचा खरंच बागुलबुवा होतो. मुलांशी प्रेमाचं नातं निर्माण होत नाही आणि अनेक पित्यांना पुढे मुलांच्या मोठेपणी याचं वाईटही वाटतं. पद्मजा फाटकांच्या ‘बापलेकी ’ सारख्या किंवा दीपा गोवारीकरांच्या पुस्तकातून वडिलांची अनेक रूप बघायला मिळतात. त्यात छान, प्रेमळ, संवेदनशील बापही भेटतात.

नुकतंच ‘ कोटेबल डॅड ’ नावाचं एक फारच गोड पुस्तक वाचण्यात आलं. त्यात अनेक नामांकित मंडळींनी वडिलांबद्दल लिहिलेल्या छोट्या वाक्याचा संग्रह आहे. एका मुलीनं त्यात लिहिलं आहे, ’माझे वडील प्रेमाचंच दुसरं रूप वाटायचे.’ दुसरीनं लिहिलं आहे ‘माझे वडील कोण होते यापेक्षा ते माझ्या ठायी कोण म्हणून वसले आहेत हे मला जास्त महत्वाचं वाटतं.’ एका वडिलांनी मुलीबद्दल लिहिलंय, ‘आज मी माझ्या मुली आनंदात असतात हे पाहतो, तेव्हा मला खात्री वाटते की, मी माझं काम चांगलं केलं आहे.

‘ एक स्पॅनिश म्हण सांगते – नशिबवान माणसालाच पहिली मुलगी होते. थिओडोर रूझवेल्टचं एक छान वाक्य आहे -एक तर मी माझ्या मुलीला सांभाळीन किंवा देशाचा कारभार चालवीन. दोन्ही गोष्टी एका वेळी करणं मला जमणार नाही.’

मुलींवर मनापासून प्रेम करणाऱ्यां या मंडळींचं लेखन वाचून फार छान वाटलं. एका वाक्यानं लक्ष खिळवून ठेवल – वडिलांना मुलांसाठी एक महत्वाची गोष्ट करता येईल, ती म्हणजे त्यांच्या आईवर प्रेम करणं. समंजस, दृष्ट्या वडिलांची मुलांकडून काय अपेक्षा असावी? ‘परमेश्वरा, मला असा मुलगा दे, जो आपली ताकद केव्हा कमी पडते हे लक्षात येण्याइतका शक्तीवान असेल आणि घाबरून गेल्या नंतरही स्वतःला तोंड देण्याइतका तो शूर असेल; पराभव होईल तेव्हा त्यानं खचून जाऊ नये आणि यश लाभेल तेव्हा त्यानं नम्र रहावं.’

मुलानं यश मिळवलं की, वडील यशाकडे कोणत्या नजरेनं बघतात? जॅक एल वे नावाचा गृहस्थानं लिहिलं आहे, जॉन एल वे मोठा फुटबॉल खेळाडू आहे. एके काळी तो माझा मुलगा होता; पण आता मी त्याचा बाप आहे ! मुलाचं एक अडनिडं वय असतं, १४-१५ वर्षाचं त्या काळाबद्दल मार्क ट्वेननं मार्मिक लिहिलं आहे. तो म्हणतो, ‘ मी १४ वर्षाचा होता तेव्हा माझे वडील इतके अडाणी होते की , त्यांच्या वाऱ्याला उभा राहायचो नाही. पण जेव्हा मी २१ वर्षाचा झालो तेव्हा मला बरंच आश्चर्य वाटलं; कारण गेल्या सात वर्षात माझे वडील किती शिकले होते, मोठे झाले होते, ‘ या अडनिड्या वयात सगळं जग शहाणं वाटतं; पण आपले आई-वडील बुद्धु वाटतात.’

वडिलांशी न पटण्याचा काळ बरेचदा लांबत जातो. एकानं लिहिलं आहे, ‘वडील म्हणत होते ते बरोबर होते असं एखाद्या माणसाला हळूहळू जाणवू लागतं, तेव्हाच त्याचा मुलगा त्याला म्हणत असतो, तुम्ही म्हणता ते सगळं चूक आहे.’

एक वडील मुलाला काय शिकवावं याबद्दल म्हणतात, ‘ मी त्याला खरं बोलायला शिकवीन. कारण खरं बोलणं हा जबाबदार नागरिकत्वाचा पाया आहे. मी माझ्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत जे हजारो गुन्हेगार पहिले ते सगळे खोटं बोलणारे होते.’

वडिलांचा मुलांवर विश्वास असला की मुलांवर खोटं बोलायची वेळ येत नाही, हा अनुभव एका मुलानं असा लिहिला आहे – एका माणसानं दुसऱ्याला द्यावी अशी सर्वांना सुंदर भेट माझ्या वडिलांनी मला दिली. ती म्हणजे त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला.

मुलांना चांगल्या गोष्टी शिकवता-शिकवता स्वतःचा अहं कसा मध्ये येतो याचं सुंदर निरीक्षण एका मुलीनं लिहिलं आहे, ‘ माझ्या वडिलांनी मला कायम स्वतंत्र व्हायला आणि मोकळेपणानं स्वतःचा विचार करायला शिकवलं; पण मी त्यांच्याशी असहमती दर्शवली की त्यांना खपायचं नाही.’

मुलं वाढवणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं सोपं नाहीच. एकानं त्याची तुलना बागेशी केली आहे. तो म्हणाला, ‘ एखाद्या माणसाची बाग आणि त्याची मुलं पहिली की त्यानं वाढीच्या मोसमात किती तण काढून टाकलं आहे याची कल्पना येते.’

वडील असं काही वळण लावतात तेव्हा त्या वळणाचे अनेक छोटे छोटे टप्पे असतात. एका वडिलांनी मुलाला शिकवलेली ही सोपी गोष्ट लक्ष वेधून घेते- तू तुझे कपडे जमिनीवर टाकून न देता उचलून ठेवलेस तर तुला त्यांना वेळोवेळी इस्त्री करावी लागणार नाही.

‘ कोटेबल डॅड ’ हे पुस्तक असं सांगत की, मुलांना टीकाकार, परीक्षक नको असतात. ज्यांचं अनुकरण करावंसं वाटेल असे वडील हवे असतात. मुलांच्या जीवनात वडील का असतात? एक सोपं उत्तर असं आहे- मुलांचा जन्म होतो तेव्हा त्यांनी आयुष्यभर कसं वागावं याची माहिती पुस्तिका त्यांच्याबरोबर येत नाही. त्यासाठी वडील असतात. वडील हळूहळू मोठे होतात आणि आजोबा होण्याची वेळ येते.

‘ जगातलं सर्वात सोपं खेळणं म्हणजे आजोबा. अगदी तान्हं मुलही ते सहज चालवू शकतं. आजोबांच्या लक्षात यायला लागतं की, माणसाच्या आयुष्यात तीन टप्पे असतात. एक म्हणजे त्याचा सांताक्लॉजवर विश्वास असतो. दुसरा म्हणजे त्याचा सांताक्लॉजवर विश्वास नसतो आणि तिसरा म्हणजे तो स्वतःच सांताक्लॉज असतो. त्यांना असंही दिसतं की, प्रत्येक पिढी वडिलांविरुद्ध बंड करते, पण आजोबांशी मात्र दोस्ती करते. नातवंडं गळ्यात हात टाकून म्हणतात, ‘आजोबा, तुम्ही जगात सर्वात देखणे आजोबा आहात आणि जगात तुमच्याइतकी चांगली गोष्ट कोणालाच सांगत येत नाही.’

आजोबांच्या असंही लक्षात येतं की, ही जीवनातली मोठी गूढ गोष्ट आहे. जो मुलगा आपल्या मुलीशी लग्न करण्याच्या लायकीचा नव्हता तोच आज जगातल्या सर्वात हुशार मुलाचा बाप आहे. युद्धाचा अनुभव घेतलेले वडील म्हणतात- शांतीच्या काळात मुलगा वडिलांचे अंत्यसंस्कार करतो; पण युद्धाच्या काळात वडिलांना मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागतात. कधी चिमटे काढत, कधी हसवत, कधी रडवत, वडील आणि मुलं यांचं अनेक रंगी नातं मुलाकडून दाखवणारं हे छोटंसं पुस्तक अनेक होणाऱ्या, असलेल्या आणि नसलेल्या वडिलांना खूप शिकवणारं आहे.

Read More blogs on Parenting Here