पाऊस, पाणी, मोर, ढग हे नेहमीचेच विषय आहेत पण या शब्दांबरोबर प्रत्येकाच्या मनात उमटणारं चित्र अगदी वेगळं असतं. अंकातल्या प्रत्येक गोष्टीत गाण्यात, चित्रात तुम्हाला ते वेगळेपण दिसेल. झाडं, डोंगर, पक्षी, प्राणी या प्रत्येकाचं पावसाशी असणारं वेगळं नातं या अंकातल्या गोष्टीतून वाचायला मिळेल.
पावसाचं निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी वेगळं नातं आहे. ढग जमायला लागले, पावसाची रिमझिम सुरु झाली की मोराची थुईथुई सुरु होते तो पिसारा फुलवून नाचायला लागतो. सगळे डोंगर दऱ्या हिरव्या व्हायला लागतात. धबधब्यात पाणी वाहू लागत आणि आपण माणसं शेतीची काम सुरु करतो. निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी असणारं पावसाचं नातं या अंकातून सांगितलं आहे. आपल्या आजूबाजूच्या निसर्गात पावसाआधी आणि पाऊस पडल्यानंतर होणारे बदल मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या अंकातून केला आहे. जमिनीवरचं पाणी, ढग आणि पाऊस यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि त्याचा समतोल राखणं आपल्या हातात आहे याची माहिती या अंकांतून दिली आहे.
लहान मुलांना मोराचं फार आकर्षण असत. मोर जसा दिसायला सुंदर आहे तसा वागायला सुद्धा किती हुशार आहे हे सुद्धा लक्षात येईल. मुलांच्या कल्पनेचे जसे वेगवेगळे रंग असतात तेच रंग मोराच्या पिसाऱ्यात भरायला या अंकात दिले आहेत. या अंकात बऱ्याच ठिकाणी मोराची पिसं पडली आहेत ती शोधायला मुलांना मजा येईल.
यासोबतच "प" या अक्षराची भन्नाट गोष्ट वाचायला मिळेल. पाऊस आणि प्राण्याच्या गोष्टी सोबतच ढगातून पडणारं पाणी पिणारे पक्षी प्राणी या अंकात ठिकठिकाणी आहेत ते शोधायला मुलांना मजा येईल. फिशिराची झालेली गंमत, चिकूपिकचा नवीन मित्र यांच्या गोष्टीही या अंकात वाचायला मिळतील. म्हण म्हण म्हणीमध्ये - "थेंबे थेंबे तळे साचे" ह्या म्हणीची गोष्ट दिली आहे. सोबतच मुलांना म्हणता येतील अशी सोपी बालगीतंसुद्धा दिली आहेत. अंकातली चित्रं बघत, कोडी सोडवता सोडवता मुलांशी भरपूर गप्पा मारा आणि अंक कसा वाटला आम्हाला जरूर कळवा