या अंकातून जंगल हा विषय घेऊन येत आहोत. जंगल, प्राणी, पक्षी यांचं आकर्षण मुलांना अगदी लहानपणापासूनच असतं. पाळीव प्राण्यांशी मुलांची ओळख आणि मैत्रीसुद्धा होते पण त्यापलीकडचा निसर्ग बरेचदा अनोळखीच राहतो. म्हणूनच थोडं पुढे जाऊन जंगल म्हणजे नक्की काय? त्याचं आपल्याशी नातं आहे तरी कसं? हे अंकातून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. झाडं, पशुपक्ष्यांबरोबरच जंगलावर प्रेम करणाऱ्या, प्राण्या-पक्ष्यांसाठी मनापासून काम करणाऱ्या काही खास व्यक्ती अंकातून मुलांना भेटतील. एक वेगळं जग दिसेल.
जंगल, झाडं, पशुपक्षी आणि माणूस हे एकाच पृथ्वीचे रहिवासी आहेत. एकमेकांना जपलं नाही तर निसर्गाचा तोल सांभाळला जाणार नाही. ज्यांच्याशी नीट ओळख नाही त्या झाडं, प्राणी, पक्षी आणि जंगलाविषयी मुलांना आणि आपल्यालासुद्धा नव्याने नातं तयार करायला हवं याची जाणीव या अंकातून होईल अशी आशा आहे.
या अंकातून मुलांना प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबातले वन्य प्राणी यांची भन्नाट गोष्ट वाचायला मिळेल. अंकातल्या गोष्टींमधून वेगवेगळ्या प्रकारचं जंगल दिसेल, त्यात लपलेले प्राणी, पक्षी, किडे शोधायला मुलांना मजा येईल, चिंपांझींची मैत्रीण जेनसुद्धा एका गोष्टीत भेटेल. म्हण म्हण म्हणीमध्ये - "चोराच्या मनात चांदणं" ह्या म्हणीची गोष्ट दिली आहे. सोबतच मुलांना म्हणता येतील अशी सोपी बालगीतंसुद्धा दिली आहेत. अंकातली चित्रं बघत मुलांशी भरपूर गप्पा मारा आणि अंक कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.