चित्रकलेच्या ४० वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असलेलं हे एक हटके पुस्तक आहे. मुलांना केवळ कलरिंगची पुस्तकं देण्यापेक्षा, त्यांच्यातली कल्पकता खुलवणारं हे पुस्तक चित्रकार आभा भागवत यांनी बालचित्रकलेसाठी अभ्यासपूर्वक तयार केलं आहे.
बालवयात मुलांचा चित्रांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. यातील सर्व चित्रकृती खास मुलांसाठी नव्याने निर्माण केलेल्या आहेत. चिकूपिकू मासिकातून गेली चार वर्षे या चित्रकृती मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांचा आनंद मुलांनी घेतला आहे. बोटांची पकड तयार होऊ लागलेल्या कोवळ्या वयाच्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना या चित्रकृती नव्या वाटतील. मुलं त्यात रमून जातील याची खात्री आहे. एवढंच काय, या चित्रकृती पालकांनी, आजी-आजोबांनीसुद्धा करून बघाव्यात इतक्या नावीन्यपूर्ण आहेत.