कधी एखाद्या व्यक्तीची ओळख तिने लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा, शिकवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा किंवा मिळवलेल्या पुरस्कारांपेक्षा मोठी असते. प्रा. यास्मिन शेख यांची कहाणी अशीच आहे.

२४ ऑगस्ट २०२६ रोजी, मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि शिक्षिका यास्मिनताई आपल्यातून निघून गेल्या. त्या १०१ वर्षांच्या होत्या. पण त्यांची कहाणी केवळ एका विदुषीच्या निधनाची बातमी नाही. ती आहे एका मुलीची, जिला पुस्तकांची सोबत मिळाली; मैत्रिणींच्या प्रेमाने जिने माणुसकी शिकली; आणि ज्या मुलीने पुढे आपलं संपूर्ण आयुष्य मराठी भाषेला समर्पित केलं.

आणि म्हणूनच, यास्मिनताईंची गोष्ट आपण मुलांच्या आणि पालकांच्या नजरेतून पुन्हा एकदा वाचायला हवी.

एका डब्याभोवती जमलेल्या मैत्रिणी

यास्मिनताईंचं मूळ नाव जेरुशा रुबेन. त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं. सात भावंडांचं मोठं कुटुंब आणि वडिलांची सरकारी नोकरी यामुळे कुटुंबाची सतत बदली होत असे. अशाच एका बदलीनंतर कुटुंब पंढरपूरला आलं.

घरात स्वयंपाकासाठी एक बाई होत्या. पण त्या मुलींना शाळेत जाताना डबा देत नसत. सकाळी शाळेची घाई, आणि त्यात डबा तयार नसल्यामुळे जेरुशा आणि त्यांच्या बहिणी अनेकदा उपाशीपोटीच शाळेत जात.

मधली सुट्टी झाली की बाकीची मुलं बागेत बसून आपापले डबे उघडायची. जेरुशा मात्र गुपचूप रिकाम्या वर्गात बसून राहायची. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रिणींच्या हे लक्षात आलं. एक दिवस विमल कुरलकर, मथुरा जोशी आणि विमल जोशी या मैत्रिणी वर्गात आल्या. “चल जेरुशा, डबा आणलास का?” जेरुशाने नेहमीप्रमाणे खोटं हसत सांगितलं, “नाही गं, मी घरूनच जेवून आले आहे.” पण मैत्रिणींना तिच्या शब्दांपेक्षा तिच्या डोळ्यांतलं सत्य दिसलं होतं. त्यांनी तिचा हात धरला आणि तिला बागेत घेऊन गेल्या. सगळ्यांनी गोल बसून आपापले डबे उघडले. जेरुशा अजूनही संकोचून बसली होती. तेव्हा एका मैत्रिणीने आपल्या डब्यातला घास तिच्या तोंडाशी नेला आणि गाणं म्हणत तिला भरवला. 

“घास घे रे तान्ह्या बाळा…”

तो फक्त एक घास नव्हता. तो होता मैत्रीचा घट्ट हात. “तू एकटी नाहीस” असं सांगणारा घास. यानंतर मैत्रिणी रोज जेरुशाला आपल्या डब्याच्या वर्तुळात घेऊन बसू लागल्या.

याच मैत्रिणींमधली विमल जोशी पुढे यास्मिन ताईंची आयुष्यभराची जिवलग मैत्रीण राहिली.

यास्मिनताईंच्या आयुष्यभर लक्षात राहिलेली ही मैत्रीची गोष्ट आपण मुलांनाही सांगू या. कधी कधी एखाद्याला मदत करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. आपला डबा थोडासा वाटून घेतला तरी पुरेसं असतं.

“मग आम्हीसुद्धा जाणार नाही!”

पंढरपूरच्या शाळेत शिकत असतानाचा आणखी एक प्रसंग त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. एकदा शनिवारी शाळा लवकर सुटल्यावर जेरुशा आणि त्यांच्या मैत्रिणींनी विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं ठरवलं. सगळ्या मुली आनंदात मंदिरात पोहोचल्या. पण मंदिराच्या प्रवेशद्वारावर जेरुशाला अडवलं गेलं.

“ही कोण आहे?”

मैत्रिणींनी सांगितलं, “ही आमची मैत्रीण, जेरुशा रुबेन.” तिचं नाव आणि तिचा धर्म कळल्यावर तिला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. नऊ-दहा वर्षांच्या त्या मुलींनी मात्र एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं, “जर आमच्या जेरुशाला मंदिरात प्रवेश नाही, तर आम्हीसुद्धा विठोबाच्या दर्शनाला जाणार नाही!” आणि त्या सगळ्या जेरुशासोबत परतल्या. लहान मुलांच्या या निर्णयात किती मोठा विचार होता! मैत्रीला धर्माची अट नसते. आपला मित्र एखाद्या वेगळ्या घरातून, वेगळ्या धर्मातून किंवा वेगळ्या संस्कृतीतून आला म्हणून त्याच्यावरचं प्रेम कमी होत नाही.

यास्मिनताई हा प्रसंगही आयुष्यभर विसरल्या नाहीत.

कदाचित याच महाराष्ट्राच्या मातीत, त्या छोट्याशा मैत्रीच्या वर्तुळात, त्यांच्या मनात माणुसकीचा पहिला धडा रुजला होता.

मग मराठी कुठून आली?

जेरुशा रुबेन पुढे यास्मिन शेख झाल्या. त्यांचा विवाह नाशिकच्या अहमद शेख यांच्याशी झाला. हा आंतरधर्मीय विवाह होता. त्यांनी नाव बदललं पण आपला धर्म बदलला नाही आणि त्यांच्या सासरच्या मंडळींनीही त्यांना प्रेमाने स्वीकारलं. त्यांच्या नावामुळे एकदा महाविद्यालयात शिकवायला गेल्यावर विद्यार्थ्यांना वाटलं की उर्दू शिकवणारी शिक्षिका आली आहे. पण वर्गात यास्मिनताई बोलायला लागल्या आणि विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचं मराठी स्वच्छ, सुंदर आणि ओघवतं होतं. त्या व्याकरण शिकवत आणि ज्ञानेश्वरांचे अभंगही तितक्याच प्रेमाने समजावून सांगत. यास्मिनताईंचं एक वाक्य त्यांच्या भाषाप्रेमाचं सार सांगून जातं, “भाषेला धर्म नसतो.”

महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि वाढलेल्या जेरुशासाठी मराठी ही केवळ एक विषयाची भाषा नव्हती. ती त्यांच्या जगण्याचा एक भाग होती. आणि म्हणूनच त्यांचं मराठीवरचं प्रेम हे इतर भाषांना दूर सारणारं नव्हतं. उलट, आपली भाषा मनापासून जपताना दुसऱ्याच्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करता येतो, हे त्यांच्या आयुष्याने दाखवून दिलं.

व्याकरण म्हणजे कंटाळवाणे नियम नव्हेत!

आज अनेक मुलांना “व्याकरण” म्हटलं की नियम, चुका आणि लाल पेन आठवतं. पण यास्मिनताईंसाठी व्याकरण म्हणजे भाषेचा आनंद होता. त्या म्हणायच्या, “गाणे सुरात गावे, आणि भाषासौंदर्य व्याकरणात जपावे!”

त्यांच्या भाषाप्रेमाची सुरुवातही शाळेतच झाली. चौथीत असताना त्यांनी निबंधाऐवजी एक लघुकथा लिहिली. ती त्यांच्या चळेकर सरांना इतकी आवडली की त्यांनी वर्गासमोर जेरुशाचं कौतुक केलं आणि तिला पुस्तकं भेट दिली. पुढे एस. पी. कॉलेजमध्ये शिकत असताना माटे मास्तरांनी त्यांच्या हातात व्याकरणाचं पुस्तक पाहिलं आणि त्यांना सांगितलं की त्या व्याकरणाच्या क्षेत्रात खूप नाव कमावतील. कदाचित त्या छोट्या छोट्या प्रोत्साहनांनीच पुढचा प्रवास घडवला.

यास्मिनताईंनी पुढे मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून ३४ वर्षे काम केलं. शेकडो विद्यार्थ्यांना आणि IAS अधिकाऱ्यांना मराठी लेखन आणि शुद्धलेखन शिकवलं. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखन कोष’ यांसारखी महत्त्वाची पुस्तकं लिहिली.

पण त्यांच्या या मोठ्या कामाची सुरुवात झाली होती एका छोट्या मुलीपासून, जिला शिक्षकाने एक पुस्तक भेट दिलं होतं.

घरात एक “गोष्टींचा पेटारा” असू द्या

यास्मिनताईंच्या बालपणी आजच्यासारखी पुस्तकांनी भरलेली पुस्तकांची कपाटं नव्हती. त्यांच्या वडिलांनी आणलेली पुस्तकं एका मोठ्या लाकडी पेटाऱ्यात ठेवली जात. आणि तो पेटारा जेरुशासाठी खजिनाच होता. त्या पेटाऱ्यातून पुस्तकं काढायची, वाचायची, पुन्हा ठेवायची… आणि पुन्हा कधीतरी दुसरं पुस्तक शोधायचं. आज आपल्या मुलांकडे पुस्तकांसाठी कपाटं आहेत. गोष्टींची पुस्तकं आहेत. चित्रांची पुस्तकं आहेत. ऑडिओ स्टोरीज आहेत. पण यास्मिनताईंच्या गोष्टीतून एक साधी आठवण आपण घेऊ शकतो, मुलाला वाचायला सांगण्यापेक्षा, त्याच्या समोर, त्याच्या जवळ पुस्तकं आणून ठेवणं अधिक महत्त्वाचं.

घरात एक छोटासा “गोष्टींचा पेटारा” असू द्या. कधी तो पेटारा पुस्तकांचा असेल, कधी आजीच्या गोष्टींचा, कधी मुलाने स्वतः लिहिलेल्या गोष्टींचा. कदाचित त्यातूनच एखाद्या मुलाचा आयुष्यभराचा भाषेचा प्रवास सुरू होईल.

आणि आपल्या घरातली मराठी?

यास्मिनताईंच्या मते इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवायला काहीच हरकत नाही. पण घरातल्या बोलण्यात मराठीला जागा असायला हवी. मुलाला इंग्रजी शिकू द्या. नवी भाषा शिकू द्या. जगभराची दारं त्याच्यासाठी उघडी ठेवा. पण त्याच वेळी त्याला आपल्या घरची भाषा ऐकू द्या. आई-बाबांच्या गप्पांमधली मराठी, आजीच्या गोष्टीतली मराठी, भावंडांच्या भांडणातली मराठी, अंगाईगीतांमधली मराठी… कारण भाषा फक्त पुस्तकातून शिकली जात नाही. भाषा जगताना शिकली जाते.मी ऑकवर्ड फील करतो' किंवा 'विंडो ओपन कर' अशी भाषेची मोडतोड करून इंग्रजी-मराठीची चुकीची खिचडी बनवणे टाळा. मुलांना भाषेचा स्वाभिमान शिकवा!" असं त्या नेहमी सांगायच्या. 

आणि कदाचित म्हणूनच यास्मिनताईंचा मराठीबद्दलचा आग्रह आपल्याला “मराठी शिकवा” एवढाच संदेश देत नाही. तो म्हणतो, मराठी जगा. मराठी ऐका. मराठीत गोष्टी सांगा. मराठीत हसा. आणि आपल्या मुलांना भाषेवर प्रेम करण्याची संधी द्या.

यास्मिनताईंचा खरा वारसा 

यास्मिनताईंनी आयुष्यभर मराठी शिकवली. व्याकरणाचा अभ्यास केला. पुस्तकं लिहिली. विद्यार्थ्यांना घडवलं. पण त्यांच्या आयुष्याकडे थोडं जवळून पाहिलं, तर त्यांचा वारसा त्याहून मोठा दिसतो.

तो आहे, एका उपाशी मैत्रिणीला डब्यातला घास देण्यात. मित्रासाठी मंदिराच्या दारातून मागे फिरण्यात. वेगळ्या धर्मात जन्मलेल्या व्यक्तीवर तितकंच प्रेम करण्यात. एका मुलाच्या हातात पुस्तक देण्यात. आणि आपली भाषा दुसऱ्यापेक्षा मोठी आहे असं न मानता, आपल्या भाषेवर मनापासून प्रेम करण्यात. यास्मिन ताईंचा प्रवास एका छोट्या मुलीपासून सुरू झाला होता, जेरुशापासून. तिने पुढची अनेक दशकं हे सगळं पुढच्या पिढीला वाटत राहण्याचं काम केलं.

आज त्या आपल्यात नाहीत. पण एखाद्या मुलाच्या हातात आपण एखादं मराठी पुस्तक देऊ, त्याच्यासोबत एक गोष्ट वाचू, त्याचा डबा एखाद्या मित्रासोबत वाटून घ्यायला शिकवू, तेव्हा कदाचित यास्मिनताईंच्या त्या मोठ्या, प्रेमळ वारशात आपलाही एक छोटासा वाटा असेल.

यास्मिनताईंना मनापासून आदरांजली.

आणि त्यांच्या आठवणीने आपण आपल्या घरातला पुस्तकांचा पेटारा आज पुन्हा उघडू या.