"वारी म्हणजे काय गं आजी?"
लेखक : प्राजक्ता देशपांडे
आज काव्या शाळेतून घरी आली आणि बघते तर काय, आजी चक्क बॅग भरत होती! छोट्याश्या काव्याला प्रश्न पडला, एरवी कुठेही न जाणारी आजी बॅग भरून कुठे निघालीये?
"आजी गं, हे काय? तू बॅग भरून कुठे निघालीस?!" आजीच्या कमरेला मिठी मारून काव्या विचारू लागली.
"काव्या राणी, अगं परवा वारी नाही का? मी वारीला निघालीये."
"वारी?? म्हणजे?? मला सोडून नाही जायचं हं… मी पण येणार… "
आजीनी काव्याला जवळ घेतलं आणि म्हणाली "आधी तू जेवून घे बघू. जेवता, जेवता मी तुला वारीची गंमत सांगते."
एक घास खाते न खाते, काव्याने लगेच विचारलं -
"हं, आता सांग, वारी म्हणजे काय ते? आणि तू का जाणारेस तिकडे?"
"अगं वारी म्हणजे प्रवास. तुम्ही नाही का तुमच्या सुट्टीमध्ये फिरायला जात, तसाच. पण हा प्रवास पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी केलेला असतो. विठ्ठलाचं दर्शन घ्यायला लोक पायी चालत जातात. या प्रवासाची गंमतच वेगळी असते. सगळे लोक एकत्र जमतात आणि एकत्र चालायला सुरुवात करतात. सगळ्यांनी आळंदीला जमायचं आणि तिथून पंढरपूरला पायी चालत जायचं. या प्रवासात निघालेल्या लोकांना ‘वारकरी’ म्हणतात."
"Oh.. wow! किती भारी! हे असं कधीपासून करतायत लोक? "
"खूप खूप वर्षांपूर्वीपासून म्हणजे साधारण ८००-१००० वर्षांपासून वारी सुरु आहे. खूप पूर्वीपासून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आणि देहूगावाहून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन लोक पंढरपूरला चालत जातात. काही वर्षांनी त्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांच्या पादुका, पंढरपूरला जाण्यासाठी सामील झाल्या. आज एकूण १०-१२ लाख लोक एकत्र येऊन वारी करतात."
"बापरे!!! इतके लोक? पण तू राहणार कुठे, खाणार काय?" काव्याला आजीची काळजी वाटायला लागली.
आजीला हसू आलं. तुम्ही ट्रिपला जाताना जसं ट्रॅव्हल कंपनी तुमची काळजी घेते तसंच इथे पण असतं! तिला आम्ही दिंडी म्हणतो. वारीमध्ये सगळे लोक वेगवेगळ्या दिंडीमध्ये विभागलेले असतात आणि त्या दिंडीसॊबत ते शेवटपर्यंत चालतात. या दिंडीमध्येच सगळ्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली जाते. वारीत चालताना पाऊस लागतो, ऊन लागतं त्यामुळे पटकन वाळतील, जास्त घाम येणार नाही असे साधे कपडेच सगळेजण घालतात. जसं की साडी, ड्रेस, पायजमा, धोतर आणि सदरा, असं. आणि काही वारकरी डोक्यावर विठोबा रखुमाईच्या मूर्ती किंवा तुळशी वृंदावन घेऊन चालतात. का माहितीये? कारण तुळस विठ्ठलाला खूप आवडते, तुळशीची माळसुद्धा बरेच जण गळ्यात घालतात."
"किती दिवस आहे ही वारी? तू परत कधी येणार?"
"मी येणार, आषाढी एकादशी झाल्यावर. आळंदीपासून निघाल्यावर १७-१८ दिवस लागतात पंढरपूरला पोहचायला!!"
"बापरे तू इतके दिवस चालत राहणार?! किती अवघड आहे, तुला काही झालं तर?" काव्या अजूनच काळजीत पडली.
"अगं वेडे!! वारीची हीच तर खरी गंमत आहे, की तिथे सगळ्यांबरोबर चालताना त्रास होतच नाही आणि जरी कोणाला त्रास झालाच तर दिंडीमध्ये डॉक्टरांची व्यवस्था असतेच. शिवाय तुळशीवृंदावनातली तुळस ही औषधीसुद्धा असते. पावसाळ्यात कोणाला खोकला झाला, सर्दी झाली की तुळशीचा काढा घ्यायचा, त्याने लगेच बरं वाटतं. बरेच दिवस बाहेर खाऊन कोणाचं पोट बिघडलं तरी तुळशीच्या काढ्याने बरं वाटतं. "
“आजी हे तर खूपच वेगळं आणि thrilling वाटतंय मला! ” 
"खरंच! आणि वारीत अजून एक भन्नाट प्रकार असतो, तो म्हणजे "रिंगण". रिंगण म्हणजे वारीच्या वाटेत एका मोकळ्या जागेवर - शेतात किंवा मैदानात, वारकरी थोडा वेळ थांबतात आणि मोठा गोल / Circle करतात. त्या गोलामध्ये दोन घोडे जोरात धावतात. ते घोडे धावत असताना सगळे वारकरी आजूबाजूला उभे राहतात, टाळ-मृदुंग वाजवतात, गाणी म्हणतात. आणि जेव्हा घोडे पळतात, तेव्हा जोरदार जयघोष होतो – ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’.
वारीत सगळे जण विठुरायाचं नाव घेत, भजन गात, नाचत, मजा करत चालतात आणि मग पंढरपूर कधी येतं ते कळंतच नाही.
“मग पंढरपूरला पोहचल्यावर तू काय करणार?"
“पंढरपूरला पोहचल्यावर तिथे नदी आहे, ‘चंद्रभागा’. चंद्रकोरीच्या आकाराची आहे ना म्हणून. त्या नदीत स्नान करणार, विठ्ठलाचं दर्शन घेणार!! आणि हो विठ्ठलाचं दर्शन नाही जरी झालं तरी काही जण देवळाच्या कळसाचं दर्शन घेतात. असं म्हणतात कळसाचं दर्शन म्हणजे साक्षात विठ्ठलाचं दर्शन.”
"पण इतक्या लांब जाऊन देवाला नाही भेटायचं म्हणजे… "
“अगं वेडे!! विठ्ठल काही पंढरपूरला गेल्यावरच भेटतो असं नाही. तो प्रत्येक वारकऱ्यातच असतो. वारीत चालत असताना तुम्हाला अनेक लोक मदत करतात. कोणी जेवायची व्यवस्था करतं, राहायला जागा देतं, काही लोक पाणी वाटतात, डॉक्टर मोफत उपचार करतात, पोलिसमामा गर्दी सांभाळतात ह्या सगळ्यांमध्ये विठ्ठल असतो. कारण खरोखरच इतके लाखो लोक एका दिवसात विठ्ठलाचं दर्शन कसं घेऊ शकतील?”
“आजी गं!! खूपच exciting आहे हे सगळं!!” काव्या अगदी भारावून गेली होती.
“मग आहेच आमची वारी खूप भारी!! म्हण मग जोरात माझ्या मागे -
पुंडलीक वरदे हरी विठ्ठल,  
श्री ज्ञानदेव तुकाराम, 
पंढरीनाथ महाराज की जय
विठ्ठल, विठ्ठल!”
      
      Print + Audio
    
      
      Only Audio
    
      
      Only Magazines
    
      
      Magazines
    
      
      Our Combo Packs
    
      
      Books By Quests
    
      
      Curated
Books
    
      
      Parenting Courses
    
      
      Expert Talks
    
      
      Books on Parenting
    
      
      Parenting
Blogs