या अंकातून आजीआजोबा हा गोड विषय घेऊन येत आहोत. गोष्टी आणि गाण्यांमधून या दोन स्पेशल माणसांच्या आठवणी, ऊब, प्रेम आणि मजा मुलांना समजू शकेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आजीआजोबा, आपल्या मुलांचे आजीआजोबा, एकत्र राहणारे, लांब असणारे, कधीच न भेटू शकणारे, गावातले, शहरातले, कितीतरी वेगवेगळे आजीआजोबा! पण त्यांची दुधावरची साय असलेली नातवंडं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा ठेवा अगदी सारखाच.
बदललेली कुटुंबरचना, शाळा-काम-ताण या सगळ्यात आजीआजोबांचं मुलांशी नातं जुळणं, टिकून राहणं किती महत्त्वाचं आहे ना? अंकाच्या निमित्ताने आपणही आपल्या आजीआजोबांच्या आठवणी मुलांना सांगू या. मुलंसुद्धा त्यांच्या आजीआजोबांशी बोलतील, त्यांच्या आवडी-निवडी, जुन्या गोष्टी, खेळ, गमती-जमती अशा गप्पा मस्त रंगतील. अंक कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या काही खास आठवणीसुद्धा पाठवा.