लेखक : डॉ. विभुषा जांभेकर
आपली मुलं सक्षम, निरोगी, आनंदी मनोवृत्तीची व्हावी असं सगळ्याच पालकांना वाटतं. नुकत्याच केलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की भारतात चाइल्ड ओबेसिटी, लहान वयात डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर यासारख्या आजारांचं प्रमाण बरंच वाढलं आहे. शाळेत असल्यापासूनच स्पर्धा, अनिश्चितता, जंक फूडचं आकर्षण यामुळे लहान मुलांमध्ये behavioural प्रॉब्लेम्स (हायपर ऍक्टिव्हिटी, anxiety, ADHD इत्यादी ) हेसुद्धा बरेच वाढले आहेत. आपल्या देशाची पुढची पिढी सक्षम व्हावी यासाठी लहानपणीच त्यांच्या आरोग्याचा पाया मजबूत करणं ही जबाबदारी पालकांची!
पण लहान मुलं म्हंटलं की आवडी-निवडी, वयानुसार पोषणाच्या वेगळ्या गरजा हे तर आलंच. या लेखामध्ये आपण १ – ८ वयोगटातील मुलांचा आहार कसा असावा याची माहिती घेऊया.
मुलांच्या वयाच्या आणि वाढीच्या टप्प्याप्रमाणे त्यांच्या पोषक द्रव्यांच्या गरजा बदलतात. पण मुळात पोषण म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला हवं. आपल्या शरीरात जैवरासायनिक क्रिया सतत चालू असतात. आपण खाल्लेल्या अन्नापासून ऊर्जानिर्मिती होते, मेंदूची वाढ होते, शरीराची झीज भरून काढली जाते, स्नायूंची ताकद वाढते, हाडे मजबूत होतात, रोग प्रतिकरक यंत्रणा सक्षम होते. या क्रिया नियमित होणे म्हणजे पोषण. यातील कोणतीही क्रिया नीट झाली नाही तर आरोग्य बिघडते. आईवडिलांचे आरोग्य, त्यांच्या खाण्याच्या सवयी याचा मुलांच्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो. आई-बाबा हे मुलांचे ‘role model’ असतात. मुलं नेहमी त्यांचं अनुकरण करतात. आईवडिलांच्या खाण्याच्या सवयी जर चांगल्या असतील, आहार संतुलित असेल तर मुलंही नंतर तक्रारी करत नाहीत. पण घरी सतत जंक फूड आणले तर मुलं जेवण सोडून ते खाण्याचा हट्ट करणारच. मला मुलगी झाल्यावर अमच्याकडे बिस्किट्स, चॉकलेट्स आणणं जवळ-जवळ बंद झालं. ती १ वर्षाची होईपर्यन्त तिने बिस्किटांची चवही बघितलेली नव्हती. ‘गोड’ चवीची ओळख फक्त फळांमधूनच झालेली होती आणि क्वचित गूळ. ती २ वर्षांची झाल्यानंतर तिला आम्ही साखरेची चव दिली. त्यामुळे २ वर्षे ती सगळी फळं, भाज्या काहीही तक्रार न करता खायची. पण एकदा साखरेची चव कळल्यानंतर गोड सोडून दुसरे काहीही खायचे नाही, हट्ट हे सगळे ‘tantrums’ चालू झाले. थोडक्यात काय तर जंक फूड्स इतकी addictive असतात की एकदा त्यांची चव कळली की सारखी तीच खावीशी वाटतात आणि घरचं खाणं कमी होतं. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात ते वेगळच. म्हणून लहानपणापासून जेवढी मुलांना सकस अन्न खाण्याची सवय लागेल तेवढं पालकांचं काम सोपं होतं.
१ – ३ वर्षांच्या मुलांचा आहार:
१ – ३ वर्षांमध्ये मुलांची वेगाने वाढ होते. दात यायला लागतात, मेंदूची वाढ होत असते, पचनसंस्था विकसित होत असते, रोगप्रतिकरक यंत्रणा विकसित होत असते. या वयात मुलांना जेवढ्या वेगवेगळ्या चवी, रंग (अर्थातच नैसर्गिक), texture च्या अन्नाची ओळख होईल तेवढे त्यांचे कुतूहल वाढते. वेगवेगळ्या चवींमुळे पाचक रस तयार होतात आणि अन्नाचे पचन चांगले होते आणि ते अंगी लागते. स्वयंपाक करताना मुलांना बरोबर घेणं, भाज्या, फळं निवडताना, सोलताना त्यांना सहभागी करणं इतक्या सोप्या मार्गांनीसुद्धा ते होऊ शकतं. मेंदूच्या वाढीसाठी जवस, अक्रोड, तीळ यांसारख्या तेलबिया नियमित आहारात असाव्या. शक्यतो साखरेचा वापर कमीतकमी करावा. वरचं दूध द्यायला सुरुवात करताना साखरेशिवाय द्यावं म्हणजे मुलांना त्याच्या मूळ चवीची ओळख होते. ती आवडली नाही तरच काहीतरी गोड (खजूर, खारीक) घालून द्यावे.
Youtube link : https://youtu.be/TOpEHwsWjHk
४ – ८ वर्षांच्या मुलांचा आहार:
४ ते ८ वर्षांमध्ये वजन, उंची वाढते, ताकद वाढते. या वयात प्रोटिन्स आणि मिनरल्स यांना खास महत्त्व असतं. डाळी, कडधान्य, अंड, दूध हे नियमित मुलांच्या आहारात असायला हवे. जेवताना फोन, टीव्ही हे सगळं बंद ठेवलं तर सगळं लक्ष अन्न खाण्याकडे केंद्रित होतं. त्यामुळे अन्नपचन चांगलं होतं आणि जेवणाचा वेळही कमी होतो.
Youtube link : https://youtu.be/bJG7s7z-n9o
आहार आणि आरोग्य या विषयावर जगभर चाललेल्या संशोधनात असे लक्षात आले आहे की मुलं ३ वर्षांची होईपर्यन्त त्यांचा आहार कसा आहे त्यावर त्यांचं आरोग्य अवलंबून असतं. या काळातल्या चांगल्या, समतोल, सकस आहाराचे पुढची १० – २० वर्ष चांगले परिणाम दिसतात. या उलट इतक्या लहान वयापासून जर मुलांना जंक फूड खायची सवय लागली तर वयाच्या २० व्या वर्षापासूनच स्थूलपणा, hormonal imbalance, डायबेटीस यासारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळे निरोगी आयुष्याचा भक्कम पाया रचण्यासाठी १ – ८ वर्षं हा फार महत्त्वाचा काळ आहे.
Read More blogs on Parenting Here