लेखक :  आभा भागवत


लॉक डाऊनची सुट्टी मोठंच आव्हान घेऊन आली खरी, ते म्हणजे मुलं शाळेत गेली नाहीत तर घरी रमतील का? अनेक लहान मुलांना शाळा नसल्यामुळे काही गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल चर्चाही झाली, मार्ग काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी उपाय सुचवले. आपण सगळेही खूप हळहळलो. महासाथीच्या काळात निर्माण झालेले लहान मुलांचे प्रश्न सोडवायला येती काही वर्ष वेगवेगळ्या स्तरांवर काम करावं लागेल हे खरंच आहे. तरीही अनेक मुलं आजूबाजूला अशीही आहेत की ज्यांना शाळा नसल्यामुळे मिळालेली उसंत वेगळ्या कुठल्यातरी कौशल्यात सुंदर पद्धतीने वापरता आली. माझ्या घरीही हे उदाहरण मी बघितलं आणि काही मित्र-मैत्रिणींनीही असाच अनुभव सांगितला.

लहान मुलांना ऑनलाईन शिकण्यात अजिबात मजा येत नाही. खेळ खेळणं, हातानी काहीतरी करून बघणं, प्रत्यक्ष अनुभव घेणं या संवेदनाधिष्ठित शिक्षणाकडे मुलांचा नैसर्गिक कल असतो. शाळेत भेटणारे मित्र मैत्रिणी एकमेकांना खूप शिकवत असतात, त्याचं मूल्य कधी मोजताच येणार नाही. ज्या अनुभवात त्यांना आनंद मिळत नाही आणि डोक्याला चालना मिळत नाही, त्यातून मुलं स्वतःचा सहभाग काढून घेतात, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अगदी हेच या मुलांनी ऑनलाईन शिकताना केलं. त्यामुळे त्यांचा औपचारिक शिक्षणाचा वेग चांगलाच मंदावला आहे. शाळांनी दिलेल्या ऑनलाईन शिक्षणापेक्षा काही मुलांना इंटरनेटचा वापर वेगळ्या पद्धतीने करून बघायला जास्त आवडलं, त्यातून मुलं नव्या गोष्टी सहज शिकली. त्याचं व्यसनात रुपांतर होऊ नये यासाठी काहीजण अजून धडपडताहेत.

पण यातून मुलांना जो स्वतः विचार आणि प्रयोग करायला वेळ मिळाला तो जादूई होता. काहीही ठोस कृती न करता मिळणारा मोकळा वेळ हाही खूप गरजेचा असतो. मुलांना तसा तरंगत वेळ घालवायला खूप आवडतं. याकडे अत्यंत सकारात्मकतेने बघत शाळा, शिक्षक आणि पालकांनी शिक्षण(Education) कसं असावं याच्या व्याख्येत आणि शिक्षण पद्धतीत काही बदल करायला हवेत, असं तीव्रतेने वाटत आहे. हे तात्पुरतं आहे आणि मुलांचं काहीही नुकसान होणार नाही, झालेलं नुकसान भरून काढता येईल अशा पोकळ आशावादी विचारापेक्षा मिळालेल्या मोकळ्या वेळाचं मुलांनी कुठल्या सोन्यात रुपांतर केलं, हे लक्षात घेत नव्या उमेदीने या मिळालेल्या वेळाकडे बघता आलं पाहिजे. मुलांना गुंतवून ठेवणं आणि पालकांना मोकळा वेळ मिळणं ही शिक्षणाची उद्दिष्ट नाहीत. अजूनही काही काळ असाच मोकळा वेळ मिळाला तर त्याबद्दलच्या तक्रारी बाजूला ठेवून त्यातून काय काय उगवतंय हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल.

ज्यांना मोकळ्या जागेत खेळायला आवडतं अशी मुलं खूप हुंदडली, खेळली. या मुलांनी त्यांची सगळी ऊर्जा हवी तशी, हवी तेवढा वेळ फक्त खेळात वापरली. याला वेळ वाया घालवणं म्हणून अजिबातच चालणार नाही. एरवीच्या बांधलेल्या दिवसात एवढा वेळ खेळायला मुलांना मिळतोच कुठे? त्यामुळे त्याचं महत्त्व आणि फायदे हेही खूप वेगळे आहेत, हे सांगायला नकोच.

संगीत विषयात काम करणाऱ्या आई बाबांच्या एका चिमुकल्या तिसरीतल्या मुलीला, या मिळालेल्या मोकळ्या वेळात पाच, सात आणि नऊ मात्रांच्या कठीण तालांत वादन करता येऊ लागलं. ज्या मुलीला संगीत कलेत इतकी सुंदर गती आहे, तिला गणितातून अपूर्णांक शिकायला कदाचित काही वर्ष लागतील, पण एखाद्या वाद्यावर ती 16 मात्रांचा त्रिताल आणि खंड जातीच्या पाच मात्रांचा मिलाफ लीलया करू शकते. ताल हा तिच्या अंगातच आहे आणि त्या तालाला अभिव्यक्त व्हायला लॉकडाऊनसारख्या मोकळ्या वेळाचीच गरज होती.

एका पाचवीतल्या मुलाला वायर्स वापरून दिवे, छोटे पंखे जोडणं आणि बॅटरीवर विविध गोष्टी चालवून बघून नवनवीन मशीन्स, खेळणी तयार करण्यात गती आहे. त्याने असंख्य प्रयोग करून उजेड पाडणारी जादूची कांडी; पंखा आणि दिवा असलेलं भातुकलीतलं घर; विमान उडावं म्हणून इंजिन्स असे अनेक प्रयोग केले. हे करता करता काही सफल झाले आणि जे असफल झाले त्यातून तो आपणहून विज्ञान शिकला. त्याला हजारो प्रश्नांची उत्तरं स्वतःहून सापडली. कच-यातला एक पाईप वापरून त्याने बंदूक बनवली, त्यात काडेपेटीचा गुल खरवडून भरला, त्यात एक बोळा घातला. एका भोकातून उदबत्तीने गुल पेटवला की गोळी भर्रकन लांब फेकली जाते आणि पाईप गरम होतो. एक गोळी पेटवून फेकायची तर अर्धा दिवस 10-12 काडेपेट्यांमधल्या सर्व काड्या खरवडून काढाव्या लागतात. एकेक गोष्ट निगुतीने करायची तर किमान 4 ते 5 तास सलग त्याच विषयावर काम करावं लागतं. ध्यान लागावं तशी मुलं एकाच प्रयोगावर मेहनत घेऊ शकतात. वेळेचा असा वापर शाळेच्या वातावरणात कुठे अनुभवायला मिळतो? शाळेत दर 35 मिनिटांनी वेगळा विषय शिकायला लावून मुलांची अशी समाधी आपण लागूच देत नाही.

एक 8 वीतला मुलगा आणि त्याचे तीन मित्र आलटून पालटून एकमेकांकडे 15-15 दिवस रहायला गेले, खूप गप्पा मारल्या, खेळले, पदार्थ तयार करून खाल्ले-खाऊ घातले, चहा-कॉफी करायला शिकले, जागरणं करून गप्पा मारल्या. मित्राच्याच कुटुंबाचा भाग असल्यासारखा राहिल्यावर या मुलाला आईबाबांची आठवणसुद्धा आली नाही. स्वतंत्र होण्याची ही केवढी मोठी झेप आहे. या गरजा आपण रोजच्या शाळेच्या धबडग्यात ठरवूनही पूर्ण करू शकणार नाही. मग या मिळालेल्या वेळाला जबरदस्ती समजून त्याची सगळी मजा, त्या वेळाचा डौलच का घालवून टाकायचा?

मिळणाऱ्या मोकळ्या वेळातून सुंदर काहीतरी मुलंच शोधू शकतात, आपण त्यात प्रेक्षक, मदतनीस आणि मनापासून कौतुक करणाऱ्याची भूमिका घेऊ शकतो. हेच खरं शिक्षण आहे.

Read More blogs on Parenting Here