मुलं आणि आई-बाबा या जोडीसाठी कार्यशाळा. कागदाच्या, मातीच्या वस्तू, चित्रकला, विज्ञान खेळणी असे वेगवेगळे विषय या कार्यशाळांमध्ये घेतले जातात. मुलं आणि आई-बाबा मिळून हातांनी वस्तू बनवतात. भरपूर मजा तर येतेच पण स्वतःच्या हातांनी आपण काय काय करू शकतो याची गंमत लक्षात येते.
रंगीबेरंगी फरशीच्या तुकड्यांपासून तयार केलेली सुंदर चित्र तुम्ही पाहिली असतील. तशी चित्र तयार करायला आपणही शिकू या. आर्टिस्ट प्रीता नागनाथ आपल्याला हे टाईलचे चित्र म्हणजेच मोझेक बनवायला शिकवणार आहे. मुलांनी स्वतःच्या हातांनी केलेलं मोझेक म्हणजे तुमच्या घरातला एकदम युनिक, वेगळाच कलाप्रकार असणार हे नक्की.
वैज्ञानिक संकल्पना जर खेळण्यांच्या माध्यमातून दाखवल्या, शिकवल्या तर नक्कीच जास्त पटकन कळतात, लक्षातसुद्धा राहतात. वैज्ञानिक खेळण्यांच्या वर्कशॉपमध्ये शिवाजी माने सरांबरोबर काही खेळणी आपण स्वतः तयार करणार आहोत आणि काही प्रात्यक्षिके सुद्धा बघणार आहोत. विज्ञान म्हणजे गंमत आणि जादूच वाटू शकते पण त्यातल्या कल्पना लक्षात आल्यावर त्यांचा किती छान उपयोग करून घेता येतो हे अनुभवण्यासाठी या भन्नाट कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा.
दीप्तीताईकडून मातीच्या छान छान वस्तू तयार करायला शिकू या. बोटांनी मातीला आकार देत देत एक वस्तू स्वतःच्या हातांनी आपण करणार आहोत. आणि गरगर चाकावर फिरणाऱ्या मातीच्या गोळ्यापासून दिवा, मडकं किंवा पॉट कसा तयार होतो हे बघून त्यानंतर छोटासा पॉट आपण स्वतःसुद्धा करणार आहोत.