Screen-Free Meal Time | स्क्रीनशिवाय जेवण - एका आईचा अनुभव
लेखक : डॉ. रसिका ठोसर वाघोलीकर
आजकालच्या डिजिटल युगात पालकांपुढे एक मोठ्ठा चॅलेंज उभा राहतोय. तो म्हणजे मुलं TV किंवा मोबाईलशिवाय नीट जेवत नाहीत असे जाणवते. समोर स्क्रीनवर कुठला तरी व्हिडिओ चालू, आणि मूल अगदी यांत्रिकपणे तोंडाजवळ घास आला की आपोआप 'आ' करतंय, असं चित्र सर्रास दिसतं.
मुलांच्या वाढत्या वयात खूप जास्त स्क्रीन exposure चे किती तोटे आहेत हे आपण जाणतोच.
नुकताच चिकूपिकूने एक "Screen-free मीलटाईम चॅलेंज" असा नवीन आणि वेगळा उपक्रम चालवला. मुलांचे जेवण हे स्क्रीनच्या सोबत नसावे यासाठी प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता.
Screen-free जेवणामुळे मुलं आनंदी राहतात आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. स्क्रीन न पाहता जेवताना मुलं विविध प्रकारचे पदार्थ चवीने खातात, अन्नाची आवड निर्माण होते. जेवण करताना कुटुंबासोबत गप्पा मारल्याने मुलांचं संवाद कौशल्य वाढतं.
जवळ जवळ १०० पालकांनी ह्या स्क्रीन-free मीलटाइम चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता.
या ग्रुपमधील एका आईने, डॉ. रासिका ठोसर-वाघोलीकर, यांनी आमच्यासोबत त्यांचा आजवरचा अनुभव शेअर केला. त्यांनी अगदी काटेकोरपणे आपल्या दोन्ही मुलांना वाढवताना निदान जेवताना स्क्रीनचा आधार घेऊ नये यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केला.
त्यांचा अनुभव या ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यांच्या टिप्स नक्कीच तुम्हालाही प्रोत्साहन देतील आणि स्क्रीनमुक्त जेवण तुम्हीही अनुभवू शकाल अशी आम्ही आशा करतो.
वाचू या त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात.
मी कार्यरत डॉक्टर आहे. मी बराच वेळ हॉस्पिटलला असते. त्यामुळे घरी आल्यावर मुलांसोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं. माझे पती आणि सासूबाईदेखील मुलांसाठी टीव्ही/मोबाईल/स्क्रीनचा वापर न करण्याच्या मतावर आहेत, ज्यामुळे खूप मदत झाली.
या ब्लॉग पोस्टमध्ये मी माझ्या दोन मुली स्वरा आणि श्रुता यांच्यासाठी स्क्रीन-फ्री जेवणाच्या माझ्या वैयक्तिक प्रवासाबद्दल सांगणार आहे. मी वापरलेल्या योजना, आलेल्या अडचणी, आणि आम्ही अनुभवलेल्या सकारात्मक परिणामांची चर्चा करणार आहे.
माझी मोठी मुलगी स्वरा आता 7 वर्षांची आहे. अगदी बाळ ते आत्तापर्यंत तिने जेमतेम 4 ते 5 वेळा स्क्रीन बघत खाल्लं असेल. तेही फक्त १० मिनिटे, कदाचित.
प्रारंभिक काळ (६ महिने ते २ वर्षे) :
- आईच्या ताटात ते बाळाच्या ताटात
आम्ही एका फ्लॅट सिस्टममध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहिलो, जिथे सर्व शेजाऱ्यांमध्ये छान मैत्री होती. कधी बाल्कनी, कधी गच्ची, कधी शेजारी, कधी चक्क खाली रोडवर गप्पा मारत, गाणी म्हणत, चिऊ-काऊ-माकड दाखवत, गाड्या दाखवत, घास खाल्ला की टाळ्या वाजवत, कधी ‘मी डोळे बंद करते तू पटकन खाऊन घे’ असं सांगत गेले. एक वर्षापासून आईच्या ताटात ते बाळाच्यासुद्धा ताटात हे चालू केलं होतं. त्यामुळे ती हाताने खायला लागली शिवाय वेगवेगळे पदार्थ, भाज्या यांची चव घ्यायला लागली. 'एक मूल वाढवायचे तर सारे गाव पाठीशी असावे लागते' हा अनुभव तेथे आला.
बाल्यावस्था (२ ते ३ वर्षे) :
- लहान मुलांनासुद्धा पोट भरलं आहे हे समजू लागतं
ह्या काळात आम्ही एका छोट्याशा गावी शिफ्ट झालो. इथे घर मोठ्ठ, बाहेर खूप झाडं, फुलं, फुलपाखरे, मुंग्या, लॉन, बाग, चित्र, पुस्तक ह्यात जेवण होऊन जायचं. कधी कमी खायची कधी पोटभर. खेळण्यात आवड जास्त. लहान मुलांनासुद्धा पोट भरलं आहे हे समजू लागतं. त्यामुळे सतत कमी खाल्लं, कमी खाल्लं, खा-खा असं मागे लागत राहणं मला फारसं पटत नाही.
पूर्व प्राथमिक शाळेचा काळ (३ ते ५ वर्षे) :
- गोष्टी वाचत जेवण
ती साधारण ३ वर्षांची झाली तेव्हा Chikupiku बद्दल एका मित्राने सांगितले. मग काय एक वेगळीच फेज चालू झाली, जी मी अजूनही वापरते. गोष्टी वाचत जेवण!! चित्रांची आधीच असलेली आवड चिकूपिकूमुळे कित्येक पटींनी वाढली. ती इतकं जास्त वाचायला लावायची, आम्ही एकाच वेळी जेवत असू तर अवकाश पण नाही घेऊ द्यायची. वाच-वाच असं मोठ्यांदा ओरडायची. तेंव्हाच चिकूपिकूच्या ऑडियो गोष्टींचा(Audio Stories) जबरदस्त उपयोग झाला. त्या खरोखरच ऐकण्याची क्षमता, लक्षात ठेवण्याची क्षमता आणि कल्पकता वाढवतात. ह्याच काळात लॉकडाउन चालू झाला. शाळा ऑनलाइन झाली. पण आधीपासून सवय नसल्यामुळे तिने कधीही दुसऱ्या स्क्रीनटाइमची मागणी केली नाही.
Download ChikuPiku Jammat Audio Stories App Here!
प्राथमिक शाळेचा काळ (५ ते ७ वर्षे) :
- गप्पा मारत, गोष्टी सांगत, आवडीनिवडी बाजूला ठेवून जेवण
तिची छोटी बहीण श्रुता जन्मली. रोजची धावपळ, बाळ, शाळा सगळ्यात जर वेळ मिळाला नाही तर ऑडियो कथा ( Audio Stories), ऑडियो गाणी ह्यांचा वापर केला. मित्र/ चुलतभाऊ/ बहीण बरोबर असताना जेवण हेही खूप सोपं वाटलं. मुलं एकमेकांच्या नादाने पटापट जेवतात. शाळेमुळे हाताने खाणे, ताटातले सर्व संपवणे, भूक जास्त लागणे ह्या गोष्टी आपोआपच होतात. आणि तिला आवड म्हणून संध्याकाळी स्केटिंग क्लास लावला जिथे अर्धा तास धावणे, उडी मारणे, व्यायाम आणि त्यानंतर स्केटिंग हे चांगला व्यायाम होऊ लागला. त्या क्लासनंतर ती ज्या स्पीडने आणि आवडीनिवडी बाजूला ठेवून खाऊ लागली त्याला तोड नाही. आताही गप्पा मारत, गोष्टी सांगत जेवण हे दोघींसाठी चालू आहे.
एकूण अनुभव, अडचणी आणि उपाय
कधी कधी जेवणाचा कंटाळा, राग, कमी खाणे हे होतेच. एखाद-दोन दिवस कमी खाल्ले तरी मुले नंतर जास्त खाऊन भरून काढतात. म्हणून मी जेवणासाठी कधी मागे नाही लागले.
कोणालाही उपाशी राहायला आवडत नाही, अगदी मुलांनाही नाही!!! जितके आपण त्यांना खायला भाग पाडतो, तितकेच ते खाणे टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणून घरात आरामात जेवण घेतले जाते, कमी सूचना देऊन. (जे अनेक वेळा अयशस्वीसुद्धा होते.)
आता कधीकधी आम्ही दिवसभरात एखादी डॉक्युमेंटरी, थोडाफार चित्रपटाचा भाग, एखादा एपिसोड पेप्पा पिगचा असं लावतो. पण तरीही, जेवणाच्या वेळा नेहमीच स्क्रीनशिवाय असतात. आणि दोन्ही स्क्रीनची मागणी करत नाहीत, कारण त्यांना सुरुवातीपासून याची सवय नाही.
स्क्रीन-मुक्त जेवणासाठी काही सोप्या टिप्स!
स्क्रीन-मुक्त जेवण म्हणजे मुलांसाठी एकदम छान अनुभव! चला, काही सोप्या टिप्स पाहू या:- जेवणाची वेळ भुकेनुसार ठरवा: मुलांच्या भुकेनुसार जेवणाची वेळ ठरवा. जेव्हा त्यांना भूक लागते, तेव्हा त्यांना जेवणासाठी तयार असतील, त्यामुळे जेवण अधिक मजेदार आणि आनंददायक होईल!
- अन्नाची विविधता: मुलांना विविध प्रकारचे पदार्थ चाखायला द्या. चवदार भाज्या, फळं... सगळं चांगलं!
- आनंददायक वातावरण: जेवणाच्या टेबलावर आनंदाचा माहौल तयार करा. गप्पा मारा, हसून खेळून जेवा, त्यामुळे सर्वांना मजा येईल!
- उदाहरण द्या: पालकांनी स्क्रीन न पाहता मुलांना जेवण करून दाखवावं, म्हणजे त्यांनाही ते आवडेल, आणि तेही तुम्हाला फॉलो करतील!
-
प्रोत्साहन द्या: जेवण पूर्ण केल्यावर त्यांची प्रशंसा करा. “तू खूप छान जेवलास!” असं म्हणाल्यावर त्यांना आनंद होईल.
Check - स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी 12 टिप्स
स्क्रीन-मुक्त जेवणाचे फायदे खूप आहेत. हे फक्त मुलांच्या वाढीसाठीच नाही, तर त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठीही महत्त्वाचे आहे. पालकांनी यामध्ये मदत केली तर मुलं आनंदाने आरोग्यदायी जीवन जगू शकतील! चला, एकत्रितपणे या छान प्रवासाला सुरुवात करू या!
Read More blogs on Parenting Here