स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी 12 टिप्स
- पूजा दामले
माेबाईल, विविध गॅजेट्स, टीव्ही या गाेष्टी घरात असतात. आजूबाजूला असणाऱ्या गाेष्टींचं लहान मुलांना कुतूहल असतं. माेठ्यांच्या हातात दिसणारी गॅझेट, माेबाईल म्हणजे काय? ते कशासाठी वापरतात ? हे मुलांना कळत नाही. पण, मुलांनाही या गाेष्टी हाताळून पाहायच्या असतात. यामुळे मुलांना माेबाईल, टीव्ही नाहीच पाहायला द्यायचा, स्क्रीन टाईम नकाेच द्यायला, हे आत्ताच्या काळात म्हणून चालणार नाही. कारण, मुलांना विराेध केला तर त्यांची उत्सुकता आणखी वाढणार. मुलं या गाेष्टी हाताळण्यासाठी वेगळा मार्ग शाेधू शकतात. यामुळे मुलांना विराेध करण्यापेक्षा पालकांनी स्वतः लक्ष ठेवून मुलांना स्क्रीन टाईम देणं हे उत्तम.
स्क्रीनपासून मुलांना लांब ठेवणे हे आत्ताच्या काळात प्रत्येक पालकासमाेरचं आव्हान आहे. पण, हे असंच आहे, म्हणून मुलांना हवा तितका स्क्रीन टाईम देणं हे मुलांच्या हिताचं नाही. पालकांनी मुलांना सवय लागणार नाही किंवा मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा हाेईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांचा स्क्रीन टाईम एका दिवसात कमी हाेणार नाही. यामुळे स्क्रीन टाईमची सवय बदलताना, स्क्रीन टाईमची शिस्त लावताना पालकांनी छाेट्या छाेट्या स्टेप्स टाकायला सुरूवात करायला हवी. काही दिवस, महिन्यांनी मुलांमध्ये हळू हळू बदल नक्कीच दिसून येतील.
स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी साेप्या टिप्स - Top 12 Tips to Reduce Screen Time
1. पालकांनी स्वतःमध्ये बदल करा - Change begins from parents
मुलं ही अनेक गाेष्टी बघून शिकत असतात. मुलं पालकांचं अनुकरण करतात. पालकांकडे पाहून तसंच करायचं असा लहान मुलांचा अट्टाहास असताे. यामुळे जर कामानिमित्ताने किंवा अन्य कारणांमुळे पालकांचा माेबाईलचा वापर जास्त असल्यास मुलंही माेबाईलसाठी हट्ट करू शकतात. यामुळे मुलांमध्ये बदल करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत ते आपण जाणून घेऊ या
- पालकांचा स्क्रीन टाईम किती ? - Screen-time limit for Parents
अनेकदा वर्क फ्राॅम हाेम, काॅल्स यामुळे पालकांना माेबाईल, लॅपटाॅपचा वापर घरीही करावा लागताे. किंवा अगदी मित्र, नातेवाईक यांच्याशी बाेलायचं असल्यास तेव्हाही माेबाईल लागताे. दिवसभरात मुलं घरी असताना पालक माेबाईल, लॅपटाॅप, टीव्ही याचा वापर किती करतात, आधी हे पाहिलं पाहिजे. याचबराेबर जेव्हा पालक लॅपटाॅप किंवा माेबाईल वापरत असतील, तेव्हा मुलांना ते कामासाठी आहे, किंवा महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून त्याचा वापर हाेत आहे, हे सांगायला हवं. या वेळात मुलांना आवडणारी अॅक्टिव्हीटी द्या. आॅडियाे गाेष्टी ऐकायला द्या, चित्र काढायला द्या, यामुळे मुलं स्क्रीन टाईमसाठी हट्ट करणार नाहीत. पालकांनी स्वतःसाठी स्क्रीनचं टाईम टेबल आखावं.
- पालकांनी पुस्तक वाचावं - Read books with Kids
मुलं अनुकरणातून शिकतात, यामुळे मुलांना पुस्तक वाच असं सांगण्यापेक्षा पालकांनी स्वतः पुस्तक वाचन सुरू करावं. यामुळे मुलं आपसुकच याचंदेखील अनुकरण करतील. नवीन लाेकांना भेटणं, नवीन ठिकाणी जाणं, नवीन अनुभव घेणं या गाेष्टी मुलांना पालकांकडून शिकायला मिळाल्या पाहिजेत.
2. रिअॅलिस्टीक, प्रॅक्टिकल विचार करा - Realistic & Practical Approach
पालक, आजी - आजाेबा यांनी मुलांच्या स्क्रीन टाईमविषयी प्रॅक्टिकल, रिअॅलिस्टीक विचार केला पाहिजे. एका दिवसात, एका आठवड्यात बदल हाेईल, अशी अपेक्षा ठेवू नये. मुलांचा स्वभाव कसा आहे, त्यांना स्क्रीनची किती सवय आहे, त्यांना काेणत्या गाेष्टी आवडतात या सगळ्या गाेष्टींचा विचार करून मुलांची स्क्रीनची सवय बदलायला हवी.
3. शाॅर्ट टर्म गाेल सेटिंग - Short term Goal Setting for Screen-Free kids
मुलांचा स्क्रीन टाईम कमी करताना, दिवसाला 10 ते 15 मिनिटं स्क्रीन टाईम कमी कराययचा, असं ठरवा. या वेळात मुलांनी काय करावं, याची लिस्ट तयार करा. मुलांना राेज तेच तेच करायचा कंटाळा येऊ शकताे, त्यामुळे त्यांना बरेच आॅप्शन द्या. दिवसांतला 10 ते 15 मिनिटांचा स्क्रीन टाईम कमी झाल्यावर शिस्तीसाठी काय करता येईल, हे गाेल ठरवा. याचबराेबर फ्री स्क्रीन टाईममध्ये मुलांना दुसरं काही नवीन शिकता, अनुभवता येईल असाही गाेल सेट करू शकता.
4. स्क्रीन फ्री टाईम ठरवा Establish Screen-Free Time for Kids
सगळेजण एकत्र घरात असताना 10 ते 15 मिनीटं हा वेळ स्क्रीन फ्री टाईम ठरवून घ्या. या वेळात घरातील काेणतीही व्यक्ती स्क्रीन पाहणार नाही. घरातील सगळ्यांचे माेबाईल एका जागी ठेवा. टीव्ही बंद, लॅपटाॅप बंद. मग या वेळेत एक कुटुंब म्हणून एकत्र येऊन एखादी गाेष्ट (उदा - घरातली कामं, स्वच्छता, स्ताेत्र म्हणणे इत्यादी) करायची, असं ठरवा. राेज असा वेळ घालवण्याची सवय मुलांना लहान वयापासून लावा. यामुळे मुलांना आणि पालकांनाही याचा नक्कीच फायदा हाेईल.
5. गप्पा मारा - Have a Chat with your Kids
आई - बाबांना आॅफीस घर, मुलांना शाळा, अभ्यास यातून निवांत वेळ मिळताेच असं नाही. पण, राेजच्या वेळेतच वेळ काढून मुलांशी गप्पा मारा. यामध्ये अवांतर विषयांवर चर्चा करा. नवीन अनुभव, गाेष्टी मुलांबराेबर शेअर करा. मुलांना एखादी गाेष्ट पाहिली असेल, तर त्यांचा अनुभव ऐका. मुलांना बोलतं करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. यामुळे मुलांचे आणि पालकांचे बाॅण्डिंग वाढेल, मुलं संवादकाैशल्य शिकतील.
6. फक्त टाईम पास करा - Just Pass the Time with your kids
प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी करत राहिलं पाहिजे, हे शक्य नाही. मुलांबराेबर फक्त टाईमपास करणेही चांगले असते. प्रत्येकवेळी मुलांना काहीतरी शिकवले पाहिजे, हा विचार करू नका. मुलांबराेबर गाणी म्हणा, नाचा, काहीच न करता नुसतं बसा. असा टाईम पास करणे देखील महत्त्वाचे आहे.
7. पालक असल्याचा फायदा घ्या - Take advantage of being a parent
मुलांना प्रत्येकवेळी प्रत्येक गाेष्टीचे स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांना पालक नाही म्हणाले म्हणजे नाही हे ऐकायची सवय लावा. मुलांना स्क्रीन टाईम जास्त का नकाे, हे आधी समजवून सांगा. पण, काहीवेळा अधिकाराने नाही असं सांगा. यावेळी मुलांनी पालकांचं ऐकलं पाहिजे. आवाज न वाढवता पण निश्चयाने सांगितलं तर मुलंही समजून घेतात की आता काही हट्ट चालणार नाही.
8. राेजच्या आयुष्यात काय बदल आणू शकताे - Bring change in daily routine
स्क्रीन टाईम ही राेजची सवय असल्याने, ही सवय कमी करण्यासाठी राेजच्या आयुष्यात छोटे छोटे बदल आणणं गरजेचं आहे. एकाच दिवसात माेठा बदल करण्याचा प्रयत्न करू नये. छाेटे बदल करून त्यांची सवय लावून घ्या आणि मग पुढचा बदल करा.
9. मुलांबराेबर घराबाहेर पडा - Get out of the house with Kids
मुलं घराच्या चार भिंतीत राहिली, तर त्यांना वेगळे अनुभव घेता येणार नाहीत. घरात राहून वेळ कसा घालवायचा हा प्रश्न मुलांना आणि पालकांनाही पडणार. यामुळे मुलांना घेऊन बाहेर जा. मुलांना घेऊन भाजी, फळं आणायला जा. दुकानामध्ये सामान खरेदीसाठी मुलांना बराेबर न्या. अशा ठिकाणीही मुलांना बराेबर नेल्यास, वेळ जाताे आणि मुलांना नवीन गाेष्टी शिकायला मिळतात.
10. सगळ्यांनी एकत्र जेवायला बसा - Have your meals together
दुपारच्या जेवणासाठी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसणं शक्य हाेत नाही. मग आवर्जून रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायला बसा. यावेळी टीव्ही पाहणे टाळा. दिवसभरात काय झालं, काेणी काय केलं याविषयी चर्चा करता येईल.
11. पुस्तक वाचण्यासाठी वेळ - Set time to read books
स्क्रीन टाईमसाठी जसा राखीव वेळ मुलांना देण्यात आला आहे. तसाच पुस्तक वाचण्यासाठी ठराविक वेळ दिवसभरात ठेवा. यावेळेत मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तक वाचण्यासाठी प्राेत्साहन द्या. खास लहान मुलांसाठी डिझाईन केलेली चिकूपिकू सारखी मासिकेही यासाठी खूप उपयोगी पडतील - click here
12. मुलांना स्वतःचा टॅब, माेबाईल देऊ नका - Avoid giving smartphone to kids
मुलांना त्यांच्या स्वतंत्र वापरासाठी माेबाईल, टॅब देऊ नका. पालकांचा किंवा आजी - आजाेबांचा माेबाईल काही वेळासाठी वापरायला द्या. पण, त्यावेळीही मुलांकडे लक्ष द्या. शक्य असल्यास त्यांच्याबराेबर बसा. मुलांना स्वतःचा माेबाईल दिल्यास, स्क्रीन टाईमची जास्त सवय लागू शकते.
मुलांचा स्क्रीन टाईम जास्त असल्यास त्यांच्या आराेग्यावर परिणाम हाेऊ शकताे. लठ्ठपणा वाढल्याने मुलं जास्त आळशी हाेतात. शारीरिक हालचाल करणे मुलांसाठी गरजेचं आहे. अभ्यास करताना मुलं लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. मुलांची कल्पनाशक्ती कमी हाेते, ते स्वतःहून विचार करत नाहीत. या गाेष्टी टाळण्यासाठी मुलांचा स्क्रीन टाईम कमीत कमी ठेवणे गरजेचे आहे. यासाठी या खास 12 टिप्स, याचा वापर करा, नक्कीच बदल दिसून येईल.
Read More blogs on Parenting Here