निसर्गाबद्दल लहान मुलांना नैसर्गिक कुतूहल असतं, उत्सुकता असते. फार पूर्वीच्या काळापासून मुलं आणि निसर्ग यांत असलेलं घनिष्ट नातं मुलांच्या वाढीत आणि विकासामध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडायचं. पण सध्या शहरी राहणीमान आणि शिक्षणव्यवस्था यांमुळे हे नातं पार कोलमडलं आहे. मुलांचा निसर्गातला वेळ कमी होत चालला आहे. निसर्गात जाण्याची संधीसुद्धा त्यांना क्वचितच मिळते. याचे दुष्परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतात. हे नातं परत एकदा घट्ट होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या भोवताली दिसणाऱ्या निसर्गाशी ओळख होणं, निसर्गातले घटक आपलेच आहेत, त्यांना मी ओळखतो अशी मुलांच्या मनात भावना निर्माण होणं. मुलांमधे निसर्ग-निरीक्षणाची आवड आणि दृष्टी विकसित होणं. अगदी ह्याच उद्देशाने चिकूपिकू आणि Earth शास्त्र यांनी ‘Nature Discovery Walks’ ची ही सिरीज आयोजित केली आहे. यामध्ये पुण्यातल्या biodiversity rich म्हणजे जैववैविध्य असलेल्या ठिकाणी जाऊन तिथे प्रत्यक्ष दिसणाऱ्या वनस्पती, पक्षी, किडे-कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या वेगवेगळ्या जाती-प्रजाती यांची ओळख आपण करून घेणार आहोत, त्या ओळखायच्या कशा हे शिकणार आहोत.