अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र | Abraham Lincoln Letter in Marathi
लेखक : चिकूपिकू
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
मला माहीत आहे, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत….. तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं!
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव, मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मानभरारी… सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर….. आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डुलणारी चिमुकली फुलं.
शाळेत त्याला हा धडा मिळू दे – फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं, बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी.
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा- जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला की ऐकावं जनांचं, अगदी सर्वांचं… पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपटे टाकून नितळ सत्त्व तेवढं स्वीकारावं.
त्याला हे पुरेपूर समजावं की करावी कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून …. पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा ! धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर – जे सत्य आणि न्याय्य वाटतं त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा.
त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका. आगीत तावूनसुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, अन् धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत राहा त्याला- आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर.
माफ करा गुरुजी!
मी फार बोलतो आहे,
खूप काही मागतो आहे…
पण पहा, जमेल तेवढं अवश्य कराच.
माझा मुलगा -भलताच गोड छोकरा आहे हो तो!
– अब्राहम लिंकन
रूपांतर : वसंत बापट, साधना प्रकाशन, पुणे ४११०३०.
Read More blogs on Parenting Here
Print + Audio
Only Audio
Only Magazines
Magazines
Our Combo Packs
Books By Quests
Curated
Books
Parenting Courses
Expert Talks
Books on Parenting
Parenting
Blogs