पालकांच्या Daily Struggles चं काय करायचं?
शब्दांकन : प्राजक्ता देशपांडे
रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पालकांचं मुलांसोबत एक ना एक ‘युद्ध’ चालूच असतं, नाही का? "दात घासून घे" "चला, आता झोपा" "हे कपडे नको, ते घाल" "भाजी खाऊन घे"... या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारी रागवा रागवी कधीकधी खूप जास्त वाटते. मुलं का बरं या गोष्टी करत नाहीत, का ऐकत नाहीत असं वाटतं. त्यावर काही उपाय वापरूनही बघितलेले असतात पण रोजचा स्ट्रगल तसाच राहतो.
पण तुम्ही एकटे नाही, अनेक पालक अशाच गोष्टी अनुभवत असतात. आज आपण मुलांच्या या रोजच्या संघर्षांवर (daily struggles) काही सोपे, मजेशीर आणि लगेच वापरता येतील असे उपाय पाहणार आहोत.
सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा "Golden Rule" - मुलांना आनंद द्या!
ज्या गोष्टींमध्ये मुलांना आनंद मिळतो, त्या गोष्टी ते आवडीने करतात आणि जिथे त्रास होतो, ते टाळतात म्हणून कुठलीही गोष्ट सांगताना ओरडून, रागावून नाही तर मजेदार करून सांगा. मागून ढकलत त्यांना गोष्टी करायला लावण्या ऐवजी पुढे असं काहीतरी मजा येईल असं दाखवा ज्याकडे ती आपणहून येतील. मग मुलांना कशात आनंद वाटतो, मजा वाटते …? तर खेळात, गोष्टीत, कम्फर्टमध्ये. याच्या विरुद्धच काही असेल तर ते मुलं टाळायला बघणारच.
आता असे काही रोजचे प्रश्न बघू या.
१. माझं मूल सकाळी दात घासायला किंवा आवरायला खूप त्रास देतं. काय करू?
त्या कामाला एका खेळात बदला, स्पर्धा लावा.
एका आईने तिच्या मुलाला सकाळी अंथरुणातून बेडशीटसकट उचलून वॉशरूमपर्यंत नेलं. ‘सुपरमॅन’ उडत चाललाय, असं म्हणत तिथे न्यायला सुरुवात केली. मग ‘सुपरमॅन’ दात घासायचा आणि पुढची तयारी करायचा. मुलाला ही आयडिया इतकी आवडली की त्याचा सकाळी उठण्याचा आणि दात घासण्याचा त्रास पूर्णपणे थांबला! हे उदाहरण झालं, असंच तुमच्या मुलाला काय आवडेल तो उपाय तुम्हालाही सुचेल.
२. रात्री वेळेवर झोपतच नाही! कितीही सांगितलं तरी ऐकत नाही.
उपाय : झोपेचं कंडिशनिंग’! - झोपेसाठी विशिष्ट वातावरण तयार करणं.
आजूबाजूला काहीतरी इंटरेस्टिंग चालू असताना मुलांचा मेंदू त्यांना सांगतो की झोपायचं कशाला? यावर उपाय म्हणजे सवय लावणं. जेव्हा मुलांना खरोखरच झोप आलेली असते अशा वेळी एक ठराविक वातावरण तयार करून त्यांना झोपायचं. जसं की -
झोपायच्या खोलीतले दिवे बंद करा, शांत वातावरण तयार करा.
हळुवार (soothing music) लावा किंवा गोष्ट सांगा, ऑडिओ गोष्ट ऐकवा.
असं झोप आलेली असताना केल्यामुळे झोप लागतेच आणि या वातावरणात झोपायचं अशी मुलांच्या मेंदूला सवय लागते आणि मग त्यानुसार रोज केल्याने ती पक्की होते. मग रोज झोपेची एक वेळ ठरवा आणि हे न चुकता करा.
३. आंघोळ करायला किंवा डोक्यावरून पाणी घ्यायला खूप रडतो/रडते.
लहान मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळत नाही; उलट डोळ्यात किंवा नाकात पाणी गेल्यामुळे, पाण्याचं तापमान त्यांच्या कम्फर्टपेक्षा जास्त किंवा कमी असल्याने त्यांना त्रास होतो आणि त्यामुळे अंघोळ टाळतात. म्हणून आधी आंघोळीची भीती घालवली पाहिजे.
बादलीत किंवा टबमध्ये पाण्यावर तरंगणारी आणि बुडणारी खेळणी ठेवा. बेबी सोप वापरा, जे डोळ्यात गेल्यास जळजळ होत नाही. तुम्हाला पाणी फार कोमट वाटत असेल पण मुलांना ते बरं वाटत असेल तर तसं घ्या, जबरदस्ती करू नका.
४. जेवताना नवीन पदार्थ खाऊनच बघत नाही किंवा सारखं सॉस/जॅम मागतो.
नवीन चवीची मुलांना भीती वाटते. "जर मला हे नाही आवडलं, तरी आई जबरदस्तीने खायला लावेल" या भीतीने ते नवीन पदार्थ टाळतात.
शिस्त लावा (आधी स्वतःला!) : सॉस किंवा जॅम देण्याचे नियम तुमच्या सोयीनुसार बदलू नका. तुमच्या वागण्यात सातत्य असेल, तर मुलं तुमचे नियम पाळायला शिकतात.
टेस्टी फूड’ म्हणा : ‘जंक फूड’ हा शब्द वापरण्याऐवजी त्याला ‘टेस्टी फूड’ म्हणा. मुलांना सांगा की हेल्दी फूडसुद्धा टेस्टी असू शकतं
आधी थोडंसं खायला द्या : नवीन पदार्थाची ओळख करून देताना अगदी एक घास द्या, नाही आवडल्यास जबरदस्ती करू नका. पुन्हा काही दिवसांनी ट्राय करायला सांगा.
५. काही मनासारखं नाही झालं की खूप चिडचिड करतो, ओरडतो किंवा वस्तू फेकतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या अशा वागण्याला खतपाणी घालू नका, सरेंडर होऊ नका. जेव्हा मूल हट्ट करतं, ओरडतं तेव्हा आपण अनेकदा लोकांच्या भीतीने किंवा त्रासाला कंटाळून त्याची मागणी पूर्ण करतो. जास्त ओरडलं/रडलं की मिळतं हेच मुलं शिकतात.
शांत राहा : तुम्ही अजिबात प्रतिक्रिया देऊ नका.
भावना ओळखा : त्याला जवळ घेऊन म्हणा, "मला कळतंय की तुला राग आला आहे. तू शांत झाल्यावर आपण बोलू या."
ठाम राहा : कितीही आरडाओरडा झाला तरी मागणी पूर्ण करू नका.
थोड्या वेळाने मुलाला कळेल की अशा वागण्याने काही होत नाही तेव्हा शांत होईल.
पालकांसाठी ४ महत्त्वाचे विचार
इतकं सगळं करताना पालकांनी मात्र काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
- मुलं अजून घडत आहेत: त्यांना वेळ द्या आणि आधार द्या. त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्ट जमणार नाहीत आणि त्या शिकण्यासाठी, चुकण्यासाठी त्यांना थोडा अवकाश आणि अवधी द्या.
- त्यांची बाजू समजून घ्या: त्यांच्या प्रत्येक वागण्यामागे एक कारण असतं. ‘शिस्त लावायची आहे’ या विचारापेक्षा ‘त्याला काय अडचण येतेय’ हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
- प्रोत्साहन द्या : शिक्षेच्या भीतीने किंवा रागावून काम करून घेण्याऐवजी, त्या कामात काहीतरी आकर्षण निर्माण करा, जेणेकरून ते स्वतःहून ते करायला तयार होतील.
- तुमचं मूल वेगळं आहे: दुसऱ्यांच्या मुलांवर यशस्वी झालेले उपाय तुमच्या मुलासाठीही काम करतीलच असं नाही. तुमच्या मुलाला कशात आनंद मिळतो, हे फक्त तुम्हीच ओळखू शकता.
या विषयावरचा चिकूपिकूचा मूल दात घासत नाही! वेळेत काहीच करत नाही! अशा भरपूर daily struggles चं काय करायचं?(वयोगट:०ते ८वर्षे) हा डॉ. दिनेश नेहेते यांच्याशी साधलेला संवाद नक्की पहा.
डॉ. दिनेश नेहेते हे Parenting Coach असून ते En-Reach Foundation आणि En-Reach Learning चे संस्थापक आहेत. नेहेते सर या संस्थांच्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत. ते गेली दहा वर्षे या संस्थांमार्फत पालकांना मार्गदर्शन करत आहेत. पालकांच्या upliftment साठी सरांनी काही courses तयार केले आहेत. त्या कोर्सेसविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा आणि website ला भेट द्या.
8446066770 । https://enreach.org
Read More blogs on Parenting Here