कृष्ण आपल्या छोट्या दोस्तांशी काय गप्पा मारेल बरं?
लेखक : प्राजक्ता देशपांडे
नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो,
मी तुमचा मित्र – गोपाळ, माखनचोर, मुरलीधर कृष्ण!
आज मी तुम्हाला माझ्या बालपणीच्या काही गोष्टी सांगणार आहे. जशा मी माझ्या गोकुळातल्या मित्रांना सांगायचो, अगदी तशाच !!
- लोणी चोरायची धमाल
एकदा काय झालं, "हा कृष्ण सगळं लोणी संपवतो" असं म्हणत यशोदाआईनी लोण्याचं भांडं उंच छताला टांगून ठेवलं. पण मी आणि माझे मित्र – सगळे हुशार. आम्ही एकावर एक चढलो, उंच भांडं खाली आणलं, आणि लोणी वाटून खाल्लं. ओठांवर लोणी लागलं, नाकावर लोणी लागलं, आणि हसता हसता पोट दुखायला लागलं! आज तुम्हीसुद्धा अशी दहीहंडी फोडता आणि त्यातलं लोणी आणि खाऊ खाता ना !!
कुठलीही गोष्ट एकट्याने खाल्ली तर फक्त पोट भरतं, पण मित्रांसोबत वाटून खाल्ली तर मनही भरतं. म्हणतात ना Sharing is Caring !!
- माझे सवंगडी !!
मी आणि माझा बलरामदादा सकाळी थोडं फार खाऊन गुरांना घेऊन रानात चरायला जात असू. आमच्या सोबत आमचे मित्र पण रानात गुरं घेऊन येत असत. मग काय आम्ही सगळे मिळून सूरपारंब्या, विटी दांडू, लपाछपी असे भरपूर खेळ खेळायचो. माझा सगळ्यात जवळचा मित्र होता "पेंद्या"!
पेंद्या बोलताना थोडं बोबडं बोलायचा, त्यामुळे त्याला सगळे चिडवायचे. पण माझा मात्र तो सगळ्यात खास मित्र होता बरं का !!
एखाद्याशी मैत्री करताना तो कसा बोलतो, कसा दिसतो हे खरंच इतकं महत्त्वाचं असतं का मित्रांनॊ?
- कालिया नागाला लावलं पळवून !!
एकदा काय झालं, आम्ही सगळे यमुना नदीच्या किनाऱ्यावर चेंडू खेळत होतो. खेळताना आमचा चेंडू यमुना नदीत जाऊन पडला. सगळे घाबरले. आता चेंडू कसा आणायचा, नदीत कालिया नाग राहत होता. त्याच्यामुळे आधीच यमुना नदीचं पाणी घाण झालं होतं. मला त्याला धडा शिकवायचा होताच.
मग मी पाण्यात उडी मारली आणि कालिया नागाला पळवून लावलं.
मित्रांनो तुम्ही असं काही करायचं नाही बरं का !! पण एखादं संकट आलं तर मात्र घाबरून जायचं नाही. धैर्य दाखवायचं, मदत मागायची.
- गोवर्धन पर्वताची छत्री
गोकुळात एक दिवस खूप पाऊस पडला. वीजा चमकत होत्या, वारे सुटले होते, सगळ्यांच्या घरात पाणी शिरलं, काहींची तर घरंच वाहून गेली होती. मला सगळ्यांना वाचवायचं होतं. तेव्हा मी गोवर्धन पर्वताला हात जोडले, त्याची प्रार्थना केली आणि गोवर्धन पर्वताला उचलून धरलं, त्याची छत्री केली. त्या छत्रीखाली सगळे गोकुळवासी, गाई, वासरं, इतर प्राणी सगळ्यांना आश्रय मिळाला.
मित्रांनो मला माहित आहे, तुम्ही काही पर्वत उचलू नाही शकत पण, आपण आपल्या डोगरांचं, झाडांचं तर रक्षण करू शकतो. निसर्ग आपला मित्र आहे, आपण त्याची काळजी घेतली तर तो आपली काळजी घेतो.
- गायींवरचं प्रेम
माझ्या गायी म्हणजे माझं कुटुंबच. त्यांना मी नावं दिली होती, त्यांच्याशी गप्पा मारायचो, अंगावरून हात फिरवायचो. त्या माझी बासरी ऐकून धावत यायच्या. त्या मला प्रेम देत, आणि मी त्यांना. गोकुळातल्या इतर मित्रांसारखी गायींशीपण माझी दोस्ती झाली होती.
मित्रांनो, आपण प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे ना? तुम्हाला कुठला प्राणी आवडतो?
- मी आणि माझी बासरी
संध्याकाळ झाली की मी माझ्या बासरीवर गाणी वाजवत बसायचो. गोकुळातल्या सगळ्या गवळणी माझ्या मागे लागायच्या "कृष्णा, वाजव ना रे बासरी".
मला पण बासरी वाजवायला खूप आवडायची. मी बासरी वाजवायला लागलो की गोकुळातले माझे मित्र, गोपिका, अगदी गायी-वासरंसुद्धा माझ्या भोवती गोल करून बासरी ऐकत बसत.
मित्रांनो, तुम्हाला कुठलं वाद्य वाजवता येतं किंवा शिकायला आवडेल? आपल्या सगळ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी करायला आवडतं, कुणाला गायला, कुणाला नाचायला तर कुणीतरी कुठल्यातरी खेळात पारंगत असतं. जे आपल्याला आवडतं ते नक्कीच केलं पाहिजे.
- माझा आवडता खेळ - कुस्ती
मला ना लहानपणी खेळायला खूप आवडायचं आणि माझा आवडता खेळ होता कुस्ती. मी आणि माझा बलरामदादा नेहमी हा खेळ खेळायचो आणि कित्येकदा दादाच मला या खेळात हरवायचा. या खेळामुळे खूप छान व्यायाम व्हायचा.
मित्रांनो, तुम्ही पण असे खेळ खेळता ना !! खेळामुळे व्यायाम होतो, खिलाडू वृत्ती वाढते. रोज किमान एक तास तरी खेळलं पाहिजे बरं का !!
माझ्या छोट्या दोस्तांनो, मी आता निघतो हां!! अरे मला जायचंय ना, दहीहंडी फोडायला !! तुम्ही पण येणार ना !!
चिकूपिकूच्या जंमत गोष्टी ॲपवर "कृष्णाच्या गोष्टी" ही सिरीज नक्की ऐका!