टकामका बघत आणि अनुकरण करत ही चिमुरडी मुलं स्वतःचं स्वतः शिकत असतात. मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या मेंदूत असंख्य सुटे सुटे न्यूरॉन्स असतात. जसजसे नवे अनुभव त्याला मिळतात तसे न्यूरॉन्स जुळायला लागतात. त्यातून स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता विकसित व्हायला लागते.
गोष्टी, चित्रं, गप्पा, गाणी यांचे अनुभव चिकूपिकूच्या अंकातून मुलांना मिळतात. नवीन न्यूरॉन कनेक्शन्स तयार होतात. पुस्तकांमध्ये मुलं छान रमतात.
Unicef ने आणि इतर संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २ वर्षांपर्यंत मुलांना अजिबात स्क्रीन दाखवू नये असं सांगितलं आहे. कार्टून्स मुलांना आवडतात कारण सेकंदा-सेकंदाला बदलणारी चित्रं त्यात असतात. सतत स्क्रीन बघितल्याने मेंदू फक्त माहिती घेत राहतो. विचार करायचा थांबतो. थकून जातो. त्याच्या कार्यक्षमतेला मर्यादा येते. स्क्रीनटाईम कमी करून त्याऐवजी घरगुती खेळ, पुस्तकं, गप्पा, बागेत किंवा बाहेरचा फेरफटका यात मुलांना रमवण्याची सवय प्रत्येक घराने लावून घ्यायला हवी.
१ – ३ वर्षांमध्ये मुलांची वेगाने वाढ होते. मेंदू, पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असते. हेच योग्य वय आहे अन्न, चवी, रंग, texture या सगळ्यांशी एक छान नातं तयार होण्याचं. काही टिप्स….
१ ते ३ मधल्या मुलांना दिवसभरात साधारण १२ तासांची झोप आवश्यक असते. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्स झोपेतच तयार होतात. मुलं दिवसभरात दोनदा डुलकी घेऊ शकतात आणि रात्री सलग झोपतात.