लहानग्यांना रामाची ओळख कशी करुन द्याल?
लेखक : श्रावणी उभे
प्रभू राम हा देव म्हणून आपल्याला माहित असतो, राम म्हटले की आपल्या डोळ्यासमोर रामायण, धनुष्यधारी राम, आयोध्या या गोष्टी येतात. पण रामनवमीच्या दिवशी म्हणजेच रामचंद्रांच्या जन्माच्या दिवशी रामाची किर्ती, महती मुलांपर्यंत कशी पोहोचवायची हे पालक म्हणून आपल्याला समजतेच असे नाही. चिमुकल्यांना रामाची ओळख सोप्या पद्धतीने कशी करुन देता येईल ते पाहू या…
रामनवमी का साजरी केली जाते ?
चैत्र महिन्यात नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. श्रीरामाचा जन्म दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माने अधर्मावर मात करण्यासाठी झाला होता. म्हणून आपण प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करून रामनवमी हा दिवस साजरा करतो.
मुलांसोबत रामनवमी कशी साजरी करू शकतो?
- श्रीरामाच्या बालपणीच्या, वनवासातील किंवा रावण वधाच्या गोष्टी सांगता येतील.
- मुलांसोबत ग.दि. माडगूळकर लिखित, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीतरामायण ऐकता येईल.
- खास चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांसाठी चिकूपिकूच्या ऑडिओ अॅपमध्ये छोट्यांसाठी रामायण ही प्लेलिस्ट आहे. त्यात गीतरामायणातील गाणीही आहेत ती नक्की ऐका.
- मुलांना गोष्ट सांगून त्यांच्यासोबत रामायणाचं नाटक (Role- play) करता येईल. जसे की राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावणाच्या भूमिकेत खेळणे.
- मुलांसोबत जवळच्या राम मंदिरात जाऊन रामरक्षा म्हणता येईल.
- रामाच्या मंदिरात या दिवशी खास राम जन्माचा सोहळा केला जातो. याठिकाणी पाळणा, भजन, किर्तन यामध्ये मुलं छान रमू शकतात, वातावरणाचा आनंद घेऊ शकतात. शक्य असल्यास मुलांना अशाठिकाणी आवर्जून न्यायला हवे.
- रामाच्या अंगी असलेले गुण, कौशल्ये यांबाबत सोप्या शब्दांत मुलांना गोष्टीरुपात सांगता येईल. यामुळे रामाची देवासोबतच व्यक्ती म्हणूनही मुलांना चांगली ओळख होईल. उदा. मैलोन मैल चालून वनात कसा राहिला, लंकेचा सेतू कसा बांधला, वानरसेनेला कसे एकजूट ठेवले इ.
- रामाचे चित्र काढणे, रंगवणे, रांगोळी काढणे, छापील चित्रावर कोलाजकाम असेही काही करायला देऊ शकतो.
राम नवमीच्या निमित्ताने छोट्या रामाच्या या गोष्टी मुलांना नक्की वाचून दाखवा.
१. राम जन्मला
अयोध्येचा राजा दशरथ याला चार मुलगे झाले. कौसल्येला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न. रामाचा जन्म चैत्र महिन्यात झाला. भर दुपारी १२ वाजता सूर्य माथ्यावर म्हणजे डोक्यावर असताना तान्हुला गोंडस असा बाळ राम जन्माला आला. सगळीकडे आनंदी-आनंद पसरला. सगळे आनंदाने गाऊ लागले, नाचू लागले.
याचवेळी एक गंमत झाली. जेव्हा राम जन्माला आला तेव्हा सगळेच राम दिसतो तरी कसा? हे बघण्यासाठी गोळा झाले. सूर्यालादेखील छोट्या-तान्ह्या बाळाचं दर्शन घ्यायचं होतं. सावळा सुंदर बालरुपातला राम बघण्यात तो इतका गुंगून गेला की सूर्य पुढेच सरकेना. तो आकाशात तिथेच थांबून राहिला. रामाकडे बघत राहिला. चंद्रालासुद्धा बालरामाचं दर्शन घ्यायचं होतं. "अरे सूर्या पुढे सरक. तू जोपर्यंत जात नाहीस तोपर्यंत मला येता येणार नाही. मलासुद्धा तान्हुल्या चिमण्या रामाचं दर्शन घ्यायचंय." तो म्हणत होता.
पण सूर्य काही ऐकेना तो तिथेच थांबून राहिला. चंद्र खट्टू झाला. बऱ्याच वेळाने सूर्य मावळला आणि मग चंद्र आला. पण तो अजूनही खट्टूच होता. "हे रामा, तू का नाही सांगितलंस सूर्याला पुढे सरकायला?" तेव्हा राम म्हणाला, "अरे, मी तर बालरुपात आहे, माझ्याकडे धनुष्यसुद्धा नाही. मी काय करू शकणार होतो बरं! पण तू रागावू नकोस. तुला एक गंमत सांगू यापुढे लोक माझ्या नावापुढे तुझं नाव जोडतील. तेव्हापासून रामाला रामचंद्र या नावाने लोक हाक मारू लागले. चंद्र खुद्कन हसला, त्याचा रुसवा गेला. आता समजलं मित्रांनो रामाला ‘रामचंद्र’ हे नाव कसं मिळालं.
२. मला चंद्र हवा
छोटा रामचंद्र आता रांगू लागला, दुडूदुडू धावू लागला. बोबडे बोल बोलू लागला. सगळ्यांनाच त्याचं कौतुक होतं. कौसल्या राणी तर सारखी त्याच्याकडे बघत राहायची.
एके रात्री लहानगा राम राजवाड्याच्या गच्चीत खेळत होता. तितक्यात त्याला आकाशात चमकणारा गोल गरगरीत चांदोबा दिसला. त्याला बघून राम म्हणाला “ आई…. मला चांदोबा हवाय.” "अरे, चंद्र नाही आणून देता येणार. तो आकाशातच असतो. तू या खुळखुळ्याशी खेळ!" कौसल्या म्हणाली. पण राम काही ऐकेचना. रामाचे डोळे पाण्याने भरून आले. गाल फुगवत तो म्हणाला “ मला खेळायला चांदोबाच हवा.”
कोणालाच कळेना आता काय करावं ? चांदोबा कसा आणून द्यावा? तेवढ्यात कौसल्येला एक युक्ती सुचली. तिने एक मोठी थाळी घेतली, त्यात पाणी घातलं. पाण्याने भरलेली ही थाळी तिने गच्चीत ठेवली. त्यात चंद्राचं प्रतिबिंब पडलं. हे प्रतिबिंब दाखवत ती रामाला म्हणाली “ रामचंद्रा, हा बघ चांदोबा, या थाळीत आहे.” ते बघून राम खुद्कन हसला आणि त्या प्रतिबिंबाशी खेळायला लागला.
Read More blogs on Parenting Here