महापुरुषांबदद्दल मुलांशी बोलताना...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi
नमस्कार पालक मित्रांनो,
ब्लॉगच्या नावावरूनच समजले असेल की आजचा विषय काय आहे.
आत्ता आपण सगळेच गुगल, माहिती तंत्रज्ञान, या सगळ्या जंजाळात ‘पालकत्वाची’ नाव वलव्हतो आहोत. हे पालकत्व अधिकाधिक on point आणि बिनचूक कसे असेल यासाठी आपण आई-बाबा अगदी जीवाचे रान करतो आहोत. मात्र, जेव्हा विषय ‘राजकारण’, ‘समाजकारण’ आणि ‘इतिहासाचा’ असतो तेव्हा मात्र आपला आग्रह गळून पडतो. मुलांशी आपण याबद्दल बोलणे टाळतो. त्याबाबत चर्चा करत नाही. अनेकदा काय बोलावे आणि कसे बोलावे, किंवा इतके गंभीर विषय बोलायचे हे वयच नाही असा विचार करून आपण थांबतो.
मात्र, या विषयावर बोलले जायला हवे. येत्या १४ तारखेला बाबासाहेबांची जयंती आहे. भारतात सततच कोणत्या न कोणत्या महापुरुषाची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी होत असतेच. राज्यशास्त्राची अभ्यासक म्हणून मला पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी वाटते. मुलांशी करता येईल अशा छोट्या संवादाची सुरुवात करण्याची ही योग्य संधी आहे. बाबासाहेबांचे योगदान हे प्रत्येक भारतीयाने अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे. मात्र, आंबेडकर जयंतीच्या दिवशी होणाऱ्या मिरवणूका, कार्यक्रम, त्यामुळे होणारा कचरा, आवाज आणि गर्दी या सगळ्यात बाबासाहेब हरवून जातात. मुलांना दिसतो आपला त्रागा, गर्दी आणि आवाजामुळे होणारी चिडचिड आणि त्यातून व्यक्त होणारा राग..प्रसंगी थट्टा.
मुलांसाठी आपल्या या भावनांचे प्रदर्शन त्यांचे मत बनण्यासाठी पुरेसे ठरते. आपल्या घरात होणाऱ्या चर्चा, आपले हावभाव यातून अनेक गोष्टी मुले टिपतात आणि महापुरुषाचे मोठेपण हरवून बसण्याची सुरुवात घरातूनच होते. ही संधी आणि ही वेळ वाया जायला नको.
बाबासाहेबांची जयंती या निमित्ताने आपल्याला बाबासाहेबांबद्दल मुलांना खूप काय काय सांगता येईल.
- जागोजागी दिसणाऱ्या गांधी, टिळक, आंबेडकर यांच्या फ्रेम, रस्त्यावर दिसणाऱ्या बाबासाहेबांच्या सहीबद्दल बोलण्याने सुरुवात होऊ शकते. बाबासाहेब कोण होते, दलित असूनही त्यांनी कसे शिक्षण घेतले या विषयाला छेडू शकता. मूल ‘दलित’ म्हणजे काय हा प्रश्न नक्की विचारेल. अशावेळी ‘जात’ याबदल बोलू शकतो. यासाठी मित्र आणि गट याचे रूपक वापरून मुलांना त्यांच्या पातळीवर जाऊन या क्लिष्ट विषयावर बोलण्याचा प्रयत्न नक्की करू शकता.
- मुले थोडी मोठी असतील तर मुलांना त्यांचे शिक्षण याविषयी बोलता येईल. खूप मेहेनत घेऊन, अभ्यास करून ते शिकले. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी.ए. पदवी प्राप्त केली. पुढे बडोदा राज्याचे तत्कालीन महाराजा (राजा) सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एमए आणि पीएच.डी. पदवी मिळवली.
- नाशिकमधील काळाराम मंदिरात शोषितांना प्रवेश नव्हता. बाबासाहेबांनी नाशिक शहरातील या लोकांना काळा राम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला.
- बाबासाहेबांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी शोषितांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला.
- भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वांना त्यांनी महत्त्व दिले.
- बाबासाहेबांचे प्राण्यांवर, विशेषतः कुत्र्यांवर अतिशय प्रेम होते.
- वयाच्या साठाव्या वर्षी ते व्हायोलिन शिकले.
अशा कितीतरी गोष्टी मुलांना सांगू शकतो. आपल्या शहरात असल्यास बाबासाहेबांचे प्रदर्शन दाखवायला नेऊ शकतो, संध्याकाळी भीमगीतांचा जलसा ऐकवायला नेऊ शकतो, का बरे इतक्या मिरवणूका निघाल्या आहेत याबाबत बोलणे करू शकतो. मूल थोडे मोठे असेल तर संविधान म्हणजे काय आणि त्याचा बाबासाहेबांशी असलेला संबंध उलगडून दाखवू शकतो. हे नक्की करून पाहू या..
मुलांशी कोणत्या वयात राजकीय, सामाजिक विषयांवर बोलावे या विषयावर जगभरात अनेक संशोधने झाली. यातून एक बाब ठळकपणेसमोर आली आहे. ती म्हणजे: मुलांच्या नागरिक म्हणूनच्या वर्तनावर पालकांचा खूप मोठा प्रभाव असतो. जे पालक लहान वयातच या विषयांवर मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधतात ती मुले राजकीय दृष्ट्या सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून तयार होतात असे दिसून आले आहे. अभ्यास असे दाखवतो की मुलांना ज्या वेळी राजकीय सामाजिक जाणीवा निर्माण होतात, जेव्हा त्यांना प्रश्न पडायला लागतात तेव्हा मुले सर्वात पहिले त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या पालकांकडेच येतात. त्यामुळे लहान वयातच मुलांशी याबाबत बोलायला लागलो तर भविष्यात अनेक क्लिष्ट विषयांवरदेखील आपण मुलांशी मोकळेपणाने बोलू शकतो.
अर्थात हे करणे सोपे नाही. सध्या जगात चालू असलेल्या घडामोडी, अस्थिरता, आर्थिक मंदीचे सावट, जगात चालू असलेली दोन युद्ध याबाबत मुलांशी बोलायचे म्हणजे काय आणि कसे ? हा प्रश्न पडूच शकतो. आणि या सर्व परिस्थितीत स्वतःच्या धारणा, राजकीय मते याचे काय करावे? एक लक्षात घ्यायला हवे. आपण कितीही टोकाच्या विचारसरणीचे असलो तरी जेव्हा प्रश्न मुलांशी बोलण्याचा अथवा वागण्याचा असतो तेव्हा बहुतांश वेळा आपण त्यांना दया, क्षमा, शांती, प्रेम याचे महत्त्व सांगतो. लहान वयात राजकीय घडामोडी कोणत्याही असल्या तरी आपण या तत्वांना धरून मुलांशी त्यांच्या भावविश्वातल्या उदाहरणांच्या दृष्टीने छोटासा का होईना संवाद नक्कीच साधू शकतो.
आजूबाजूला येऊन आदळणाऱ्या माहितीच्या जगात अधिक जागरूकपणे काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्यासाठी मुलांशी असलेला संवाद सर्वात महत्त्वाचा आहे. २०२१ मध्ये ब्रिटिश जर्नल ऑफ डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, वयाच्या १४ व्या वर्षापासून मुले अनेकदा कपोकल्पित बातम्या, माहिती यावर सहज विश्वास ठेऊ लागतात. मात्र आपण जर त्यांना अपेक्षित मानसिक सुरक्षा आणि सजग राजकीय सामाजिक जाणीव लहान वयातच देऊ शकलो तर मुलांसाठी त्यांचा पुढचा प्रवास सोपा नक्की होईल.
तेव्हा महापुरुषांबद्दल आपल्या आजूबाजूच्या वास्तवाबद्दल मुलांशी बोलायलाच हवे !!
नेहा महाजन
लेखिका पालक, संशोधक आणि राज्यशास्त्र अभ्यासक आहेत.
Read More blogs on Parenting Here