“हांहह.. येइइइइ.. इइइइ”

हे न कळणारे शब्द म्हणजे टायपिंगची चूक नाही, तर आपल्या घरातल्या बाळाचे हुंकार आहेत. आपल्याला वाटतं या हुंकारांना काहीच अर्थ नाही. पण या हुंकारांना अर्थ असतो. आपल्यासाठी नाही; पण त्याच्यासाठी असतोच. आसपासची माणसं काहीतरी बोलतात. तसंच आपणही करावं, आपल्याला जे हवं ते दुस-यांना ऐकवावं या हेतूने त्यांचे हुंकार चालू असतात. कधीकधी तर बाळं खेळण्यांशी, पंख्यांशी, स्वत:च्या सावलीशी अणि स्वत:च्याच हातापायांशीसुद्धा बोलत असतात. ‘मला उचला’ असं सांगायचं असेल तर आवाज काढतात. समोरच्याने उचललं नाही तर ‘हूं..’ असा जास्त जोरात, सरळ आदेश सोडतात.

हे हुंकार त्यांचे शब्दच असतात. या सुमाराला – खरं तर जन्मल्यापासूनच मुलांच्या जे कानावर पडतं, ते कानातून आकलनाच्या केंद्रात जातं त्याचप्रमाणे स्मरणकेंद्रातही जातं. सगळे शब्द अशा प्रकारे साठवून ठेवले जातात. त्याचा अर्थ कळत नसतोच, तरी ही प्रक्रिया सततच चालू असते. त्यामुळेच तर मूल नुसतं ऐकून ऐकून , आपण न शिकवताही बोलू शकतं. हुंकार म्हणजे तोंडातून वेगवेगळे नुसतेच स्वर. त्यानंतर एखादं अस्पष्ट- स्पष्ट अक्षर उच्चारतं. हळूहळू स्पष्ट अक्षर उच्चारतं. एखादा पूर्ण शब्द बोलून बघतं. कधी बाबा कधी पापा, मंमं असे हे शब्द असतात. बहुतेक मुलं सोपेसोपे ओष्ठ्य शब्दच सुरुवातीच्या काळात उच्चारतं. या पहिल्या वहिल्या शब्दांचं सगळ्यांकडून कौतुक होतं. मूल खुश होतं. इतर अनेक शब्द उच्चारायला बाळाला हुरूप येतो. ब्रोका नावाचं मेंदूतलं केंद्र बाळांना बोलायला लावतं. या एका शब्दातून केव्हातरी वाक्यं सुरू होतात. यातूनच हळूहळू बोली आकाराला येते.

ही बोली कुठून येते? तर आसपासची माणसं बाळांशी जे बोलतात , ज्या भाषेत बोलतात तेच बाळ बोलतं. याचमुळे त्याला काय ऐकवावं, ही जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. आपण त्याच्या- तिच्या समोर जे बोलू, ते ऐकलं जाणार आहे आणि बोललं जाणार आहे, हे लक्षात घेऊनच त्यांच्याशी बोलायला लागतं. आपण चांगले शब्द, चांगली गाणी, विविध भाषा ऐकवल्या तर बाळ तेच बोलेल. म्हणून घरातलं वातावरण खूपच महत्त्वाचं.

इथे एक महत्त्वाचं सांगायचंय, आपल्या घरातलं वातावरण आणि भाषा खूपच चांगली असेल तरी घरात जर लाडका गुरू टीव्ही चालू असेल तर तेही बाळं ऐकतात. लक्षात ठेवतात. आणि उच्चारून दाखवतात. या काळात ते ऐकून ऐकून टी.व्ही.वरच्या जाहिरातीही म्हणायला लागतं. घरातल्या माणसांकडून वारंवार उच्चारले जाणारे शब्द मूल उचलतं. चांगल्या शब्दांबरोबर वाईट शब्द, अगदी शिव्या,भांडणात उच्चारले जाणारे नको ते शब्दही मुलं ऐकतात. लक्षात ठेवतात. आणि नको त्यावेळी उच्चारूनही दाखवतात. त्यामुळे वाईट शब्द, अपशब्द, नको त्या जाहिराती मुलांच्या कानावर पडल्या नाहीत तरच चांगलं! या वयात मुलं जे ऐकू ये ईल ते बोलतात, त्याचा अर्थ त्यांना कळलेला असेल असं काही सांगता येत नाही.

घराच्या खिडकीवर बसलेला पक्षी, खालून जोरात आवाज काढत जाणारे विक्रेते, दरवाज्याचा कर्र आवाज, स्वयंपाकघरातला किसण्या-कुटण्याचा आवाज, कुकरच्या शिट्टीचा आवाज हे सगळे आवाज काढण्याचा प्रयत्न मूल करत असतं. याचा अर्थ जे जे ऐकूयेतं ते सर्व आवाज काढण्या चा प्रयत्न मूल करतं.

कान हे महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे. इतर भाषातली गाणी, इतर भाषातले शब्द मुद्दाम ऐकवावेत. आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलणारे शेजारी, नातेवाईक असतील तर त्यांना मुलांशी त्यांच्या भाषेतच बोलायला सांगावं. एकच भाषा येण्यापेक्षा अनेक भाषा येणं हे केव्हाही चांगलंच. मुलांना पुढे गरजेनुसार अनेक भाषा शिकाव्या लागणार आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना विविध भाषा फक्त ऐकवाव्यात. गंमत म्हणून.

मुलांशी बोलणारी भरपूर माणसं आसपास असतील तर त्याच्या भाषाविकासासाठी ते चांगलंच. म्हणूनच मुलांना सारखं घरात ठेवू नये. दिवसातला थोडा वेळ बागेत, किंवा इतरांकडे खेळायला घेऊन जावं. वेगवेगळी माणसं भेटली की मुलं आनंदी होतात. घशातून आनंदाचे हुंकार काढतात. त्यातूनच आपण किती आनंदी आहोत हे आपल्याला कळतं. म्हणून हे हुंकार ऐकूया.

 

– रेणू गावस्कर
लेखिका

Read More blogs on Parenting Here