लेखक :  जुई चितळे


आपण म्हणतो की घरात सगळ्या गोष्टी मुलांच्या तालावर नाचत असतात. पण मुलांना असं वाटतं का की माझ्या मनासारखं चालू आहे? त्यांच्या कल्पना उंच उडत असतात आणि बरेचदा वेळ, जागा यांच्या कमतरतेमुळे, आपल्याला होणाऱ्या गैरसोयीमुळे आणि इतर दैनंदिन अडचणींमुळे आपल्याला त्या कल्पनांची भरारी जमिनीवर आणावी लागते. त्यामुळे खूपदा साहजिकच नाही म्हणावं लागतं. पण असे काही छोटे छोटे बदल करता येतील का ज्यामुळे मुलांना मोकळेपणा मिळेल, स्वतंत्रपणे काही गोष्टी करता येतील, काही बाबतीत त्यांचे त्यांना निर्णय घेता येतील? या सगळ्यामुळे एकंदरीतच घरातलं वातावरण निवांत होईल, आईबाबा आणि मुलं यांच्यात होणारे वाद, हट्ट, रागावणं थोडं कमी होईल आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून मुलं वावरू लागली की होणारे चांगले परिणाम तर दिसतीलच. मुलांच्या प्रत्येक मिनिटाची जबाबदारी आणि त्यांचे सगळे निर्णय घेण्याचा पालकांवरचा ताण कमी होऊ शकेल. फक्त तो सोडण्याची त्यांचीच मनाची तयारी हवी. 
 

१. मुलांना भिंतीवर चित्र काढायची खूप हौस असते आणि अनेक घरांमध्ये काही कारणांनी ते शक्य नसतं. अशा वेळी भिंतींवर मुलाच्या उंचीपर्यंत येईल एवढ्या भागावर कागद लावून टाकायचे. यासाठी घरातली एखादी खोली निवडून तिथे आर्टपेपर, ड्रॉईंगपेपर टेपने चिकटवून टाकता येतील. भिंतीला डाग न पाडणाऱ्या  ब्लुटॅक सारख्या गोष्टीही चिकटवण्यासाठी उपयोगी पडू शकतील. भिंतीवर चित्र काढायला मिळाल्याचा आनंद मुलांना घेता येईल. इथे हवं तसं चित्र काढू शकतोस त्यामुळे बाकीच्या भिंती मात्र मोकळ्या ठेवायच्या असं सांगायला लागेलच पण लहान मुलांना आवश्यक ती मोकळीक अशा प्रकारे नक्कीच देता येईल. . 

२. घरातल्या वस्तू घेऊन त्याचे काहीतरी उद्योग, कला-कसरत करायला मुलांना आवडतं. घरातल्या सगळ्यांनी एखादा बॉक्स निवडून त्यात अशा वस्तू गोळा करून ठेवून द्यायच्या. ज्या मुलांनी घेऊन त्याचं काहीही केलं, तोडलं-मोडलं तरी चालेल, नवीन काही केलं तरी चालेल अशा वस्तूंचा खजिना! जुना रिमोट, दोरी, बंद पडलेलं घड्याळ, शो-पिसेस शिवाय डिंक, टेप, इत्यादी. 

असाच दुसरा बॉक्स घेऊन त्यात वापरून झालेले रंगीत रॅपिंग पेपर, पाठकोरे कागद, कापडाचे तुकडे, कापूस, स्ट्रॉ, फुलं, पानं, रिबन्स, प्लॅस्टिकचे किंवा लाकडी चमचे असं सामान ठेवता येईल. हाताला कापणार नाही अशा छोट्या मुलांच्या कात्र्यासुद्धा जरूर ठेवा. थोड्याशा प्रॅक्टिसने मुलं सफाईदारपणे कात्री वापरू शकतात. हे सामान वापरून कधी कोलाज, कधी एखादी छोटी बाहुली असं काहीतरी करण्याची आयडिया त्यांच्या सुपीक डोक्यातून निघते. दर वेळी ते सुबक सुंदर असेल असं नाही पण त्यांनी स्वतःच्या मनाने  स्वतःच्या हाताने केलेली कलाकृती नक्कीच खास असेल.

3. चित्र प्रदर्शन : मुलांनी काढलेलं चित्र, केलेली एखादी वस्तू किंवा क्राफ्ट कुठेतरी खास मांडून ठेवता येईल अशी एखादी जागा तयार करा. माझी निर्मिती पण छान आहे, सगळ्यांना खास दाखवावी अशी आहे, घरातल्यांना त्याचं कौतुक आहे अशा भावनांचं मुलांना फार अप्रूप वाटतं आणि यातून नवीन काहीतरी करत राहण्याचं प्रोत्साहन पण मिळतं..

४. पुस्तक खिडकी: मुलांच्या डोळ्यासमोर असलेल्या गोष्टी बरेचदा जास्त वापरल्या जातात. कपाटात बंद करून ठेवलेल्या वस्तू, पुस्तकं विसरली जातात असा अनुभव सगळ्यांनाच आला असेल. या अनुषंगाने पुस्तक खिडकी म्हणजे कुठेही लटकवून ठेवता येईल अशी कापडी बुकशेल्फ आपण घरात ठेवू शकतो. मुलांच्या नजरेसमोर राहील, त्यांचा हात पोचेल अशा उंचीवर असेल तर त्यांना स्वतःला हवी तेव्हा त्यातून पुस्तकं काढून वाचता येतील. दर आठवड्याला त्यातली पुस्तकं बदलून नवीन पुस्तकं ठेवता येतील. त्यात निवडीतही मुलांना सहभागी करून घेता येईल. मुलांना यातून वाचनाची आवड आपोआपच लागेल..

Buy Here :  Pustak khidki

५.  खेळकप्पा : पुस्तकांसारखे खेळांसाठी पण २-३ खोके, कप्पे, शेल्फ मुलांना सहज स्वतःचे स्वतः घेता येतील असे ठेवता येतील.

६. कपड्यांचा कप्पा : बऱ्याच मुलांच्या अशा फेजेस येतात ज्यात त्यांना त्यांच्याच मनाचे कपडे घालायचे असतात. समजावण्यात, रागावण्यात बराच वेळ जातो आणि कोणाच्याच पूर्ण मनासारखं होत नाही. कपाटातले खालचे कप्पे मुलांच्या कपड्यांना देऊन त्यात आपण वेगवेगळे गट्ठे करून ठेवू शकतो. बाहेर किंवा सण-समारंभाला घालायचे कपडे, खेळायला जाताना घालायचे कपडे, घरातले किंवा झोपताना घालायचे कपडे. आत्ता कोणत्या गठ्ठयातले कपडे घालायचे एवढं फक्त आपण सांगायचं आणि पुढची निवड मुलांना करू द्यायची असा उपाय इथे करता येईल. मग मूल जे निवडेल ते मात्र आपण मान्य करायला हवं. 

७. खेळाचा वेळ आणि जागा : शोभाताईंच्या लेखांमध्ये आपण बरेचदा खेळांविषयी वाचतो. वातावरण बदलून जातं खेळांमुळे. हार-जीत, चुरस, पटापट विचार करून निर्णय घेणे या सगळ्यातून मजा येते आणि बौद्धिक, भावनिक विकाससुद्धा होतो. आईबाबांना मुलांबरोबर खेळाचा वेळ ठरवून घेता येईल. वीस-पंचवीस मिनिटं जरी दिली तरी तो सुंदर क्वालिटी टाईम होऊ शकतो. घरगुती बैठे खेळ किंवा घराजवळ जागा असेल तर पळापळीचे खेळ खेळताना आईबाबासुद्धा आपला ताण विसरून जाऊ शकतात. खेळांची एक लिस्ट तयार करून अक्षरशः भिंतीवर, कपाटावर लावून ठेवता येईल. भेंड्या, पत्ते, बोर्डगेम पासून लपाछपी, पकडापकडी, बॉलचे वेगवेगळे खेळ असलेली प्रत्येक घरातली लिस्ट त्या त्या घराची खास असेल.
खेळाशी निगडित दुसरी गोष्ट म्हणजे जागा. बाहेरचे खेळ खेळण्याची जागा जी उपलब्ध असेल त्यावर मर्यादा असू शकतात. पण घरात आपण नक्की अशी जागा देऊ शकतो. एखादा कोपरा किंवा एखादी खोली ही मनसोक्त पसारा करण्यासाठी सगळ्यांनी मिळून ठरवायची. घर जेवढं आपलं आहे तेवढं मुलांचं पण आहे. त्यांना हवे ते प्रयोग करण्यासाठी, खेळण्यासाठी, त्यांच्या वस्तू, खेळ मांडण्यासाठी जागा हवीच. 'आपलं घर आपण छान स्वच्छ ठेवायचं असतं त्यामुळे तुझी जागा आवरण्याची जबाबदारी तुझी, मी हवी ती मदत नक्की करेन.' असं म्हणून आवरा-आवरीमध्ये सुद्धा मुलांना नक्कीच सामील करून घेऊ या. 

Watch an example of child-centric home here - CLICK HERE 

८. घरातली कामं : घरातल्या एखाद्या छोट्या कामाची जबाबदारी मुलांवर सोपवली की नकळत त्यातून बऱ्याच गोष्टी मुलं शिकतात. घराचा भाग असण्यात जबाबदारीचा घटकसुद्धा असतो हे न सांगता त्यातून कळतं. वयानुसार हे काम ठरवता येईल. वापरात नसताना दिवे, पंखे बंद करणे, आपापली पुस्तकं, खेळ एका जागी ठेवणे, जेवणाच्या तयारीसाठी ताटं, वाट्या घ्यायला मदत करणे, चपला-बूट रॅकमध्ये ठेवणे, एखादा सोपा पदार्थ करणे, घड्या केलेले कपडे कपाटात ठेवणे अशी कोणतीही सोपी कामं असू शकतात आणि ती दर महिन्याला बदलतासुद्धा येतील. छोट्या मोठ्या कामांची सवय आयुष्यभर उपयोगीच पडते मग ते घरात हातभार लावण्यासाठी असो किंवा पुढे शिक्षण किंवा कामासाठी बाहेरगावी आपापलं राहताना असो.

तुम्ही पण अशा बऱ्याच गोष्टी केल्या असतील. कमेंटमध्ये नक्की शेअर करा. 

Read More Blogs On: Parenting