शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
आवृत्ती पहिली: १५ मे १९८४

प्रस्तावना:
प्रत्येक पुस्तकाची एक कथा असते. ते कसं झालं ते समजून घ्यायला वाचकांना आवडतं. या पुस्तकाबद्दल सांगायचं तर – मी लहान असल्यापासून मला लहान मुलं आवडतात. आजूबाजूच्या, ओळखीच्या लहान मुलांना खेळवणं, फिरायला नेणं, शिकवणं, त्यांचे लाड करणं, त्यांच्याशी भांडणं हे करत करतच मी मोठी झाले. तान्ही मुलं मांडीवर घेण्याची तर मला इतकी हौस होती!

एकदा सहावी-सातवीत असताना मे महिन्याच्या सुटीत गावाला जाताना आगगाडीच्या प्रवासात भर गर्दीत शेजारणीचं तान्हं मूल मी हौसेनं मांडीवर घेऊन बसले होते. ते मूल खूप तापलं होतं आणि माझ्या मांडीवरच ते गेलं. त्या मुलाच्या जाण्याचा मी इतका धसका घेतला की गावाला पोहोचल्यावर दोन दिवस मी अंथरूण धरलं होतं. थोडी मोठी झाल्यावर, मुलांबद्दलच्या या आवडीला नकळत काही फांद्या फुटल्या. मुलांचं निरीक्षण, त्यांच्या गमतीशीर बोलण्याचं आकर्षण वाढलं. 

पण या आवडीला डोळे फुटले ते मला मुलं झाल्यावर. पहिल्या बाळंतपणानंतर प्रथमच जेव्हा बाहेर पडले तेव्हा एक विलक्षण अनुभव आला. शेजारच्या झोपडपट्टीतलं एक मूल रस्त्यावर खेळत होतं. वाहनं जवळून जात होती आणि तिथे मला माझंच मूल दिसायला लागलं. मुलांबद्दलच्या जिव्हाळ्याला वेगळीच जाग आली आहे असं वाटलं.

मुलं वाढवताना लक्षात यायला लागलं की हा फार छान पण तितकाच गोंधळवून टाकणारा, विचारात पाडणारा, खूप काही शिकवणारा अनुभव आहे. हा अनुभव आपल्याकडून जी संवेदना, जो संयम, जे शहाणपण, जो धीर मागतो आहे तेवढं सगळं आपल्याकडे आहे का? अशी शंका यायला लागली. पुस्तकं वाचून बालमानसशास्त्र समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मी ते जास्त चांगलं शिकले. काही पुस्तकांनी काही नव्या दिशा मात्र दाखवल्या. या पुस्तकातले लेख प्रत्यक्ष लिहून होईपर्यंत मला खरं तर कल्पनाच नव्हती की, या विषयावर आपण एवढा विचार केलाय. एवढं काही आपल्या मनात साठलंय.

मागे मी ‘स्त्री’ मध्ये आणि ‘सकाळ’ (दैनिक) मध्ये मुलांबद्दल लेख लिहिले होते. ते मेधा राजहंस आणि दिलीप माजगावकरांना आवडले. ते दोघं माझ्या ऑफिसमध्ये आले आणि या विषयावर आणखी लिहा असं सांगून गेले. मी हो म्हटलं आणि नंतर माणूसमध्ये ही लेखमाला सुरु केली. मेधा नावाचा वाघ मागे लागल्यामुळे लेख लिहून झाले. आता हा विषय मला आणखी जवळचा वाटायला लागलाय. त्यावर खूप काही वाचावं, संशोधन करावं, मुलाचं मन समजून घ्यावं आणि पालकांना ते समजून घ्यायला शिकवावं हे आता मी माझं काम समजते आहे.

या पुस्तकामागे खूप मोठा अभ्यास नाही हे प्रामाणिकपणे सांगते पण समोर आलेल्या अनुभवाला सर्वार्थांने भेटण्याची हौस आहे. सतत शोध घेत राहण्याची नैसर्गिक प्रेरणा आहे. कुठलंही ज्ञान, कुठलंही शिक्षण, संशोधन हा शेवटी अनुभवच असतो. खूप वेळा होतं असं की जड भाषा, क्लिष्ट रचना, विचारांच्या कोलांट्या उड्या, अवजड पारिभाषिक शब्द यांच्या कसरतीत ह्या अनुभवाचा ताजेपणा, आनंद, त्याचा स्वाद, त्यातली माधुरी, त्याचा जिवंतपणा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मुलांना समजून घ्यायचा अनुभव त्यातील सगळी गोडी कायम ठेवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.

मुलांशी संबंध येणाऱ्या सर्वांसाठी हे लिहिलं आहे आणि मुलांशी संबंध कुणाचा येत नाही? अगदी बाहेरच्या नसला तरी आपल्या स्वतःमध्ये एक मूल दडलेलं असतं, त्याच्याशी तरी आपला संबंध येतोच की. ते मूल सांभाळून ठेवलं, त्याच्याशी संवाद केला की जगणं सोपं होतं. कारण त्याच्या प्रेरणा नैसर्गिक प्रेरणा असतात. हा मनातला निसर्गच आपण हरवून बसतो आहोत. तो आपल्यापासून हिरावला जातोय. तो जपायला हवा.

या लेखनाच्या निमित्तानं मी माझ्या लहानपणात पुन्हा एकदा रमले. जाणवलं की आमच्या आई-वडिलांनी आम्हा भावंडांना त्यांच्या साध्या, सरळ, प्रेमळ वागण्यातून नकळत बरंच शिकवलं. बापूंना हे लेख वाचायला फार आवडलं असतं. ते म्हणायचे, “आम्हाला कळेल असं साधं लिही.” हे लेख लिहायला अनिल आणि शोनिल, आभाने मला खूपच मदत केली. लेखनाबद्दल माझ्याशी गप्पा मारल्या. या लेखनामुळे आम्ही सगळे वेगळ्याच पातळीवर जवळ आलो.

श्री भाऊ माजगावकरांनी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हे सगळं वाचून तुम्हाला काय वाटलं ते कळवण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे.

बरंय मग. पुन्हा भेटूच

– शोभा भागवत

Buy your book here - आपली मुलं