लेखक :  रेणू गावस्कर


गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं बालपण खूपच वेगळं आणि सुंदर होतं. इतकं सुंदर बालपण क्वचितच एखाद्याला लाभतं. रवींद्रनाथांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ म्हणजे एक ऋषीच होते.

सर्वांच्याच मनात त्यांच्याविषयी अतिशय प्रेम आणि आदर असायचा. त्यातली खास बाब अशी की देवेंद्रनाथ यांना मुलांना शिक्षा करणाऱ्यांविषयी , त्यातही माराची शिक्षा करणाऱ्यांविषयी खूप चीड होती. त्यामुळे सगळ्याच मुलांच्या शिकण्याकडे, त्यांच्या शाळांकडे महर्षी देवेंद्रनाथ यांचं अगदी बारीक लक्ष असे. रवींद्रनाथ शाळेत जायला लागले पण शाळा काही त्यांना आवडेना. शाळेत शिकवली जाणारी गाणी आणि त्या गाण्यांचा अर्थ छोट्या रोबीला समजत नसे. गुरुजींना विचारलं की ते त्याच्यावर रागावत. म्हणत, जे शिकवलंय ते म्हणायचं. सारखे प्रश्न विचारत बसायचं नाही.

महर्षी देवेंद्रनाथ घरी परतले (कितीदातरी त्यांचा मुक्काम हिमालयातच असे) की रवींद्रनाथ आपली ही तक्रार वडिलांपुढे मांडायचे. देवेंद्रनाथांना आपल्या मुलाचं म्हणणं पटायचं. ज्याचा अर्थ समजत नाही ती कविता मुलांनी का म्हणायची असं त्यांना वाटायचं. कितीकदा त्या कवितेला चालही लावलेली नसायची.

मात्र हे तर काहीच नाही अशा गोष्टी शाळेत घडल्या तेव्हा वडिलांनी याबाबतीत लक्ष घालायचं ठरवलं. झालं असं की एकदा रोबीनं ऐकलं नाही म्हणून गुरुजी रागावले व त्यांनी रोबीच्या हातावर पाट्यांची चळत ठेवली. शिक्षा म्हणून. मुलाला चांगला धडा मिळावा म्हणून. बरं ही शिक्षा एकट्या रोबीला होत होती असं नव्हतं. वर्गातल्या मुलांनी ऐकलं नाही, गडबड केली तर पाट्यांची चळत कोवळ्या हातांवर ठेवण्याची शिक्षा सर्रास होत असे. आणखी एकदा असं झालं की रोबीचे एक गुरुजी मुलांवर खूप संतापले. त्याभरात ते मुलांना वेडंवाकडं बोलू लागले. त्यात काही शिव्या देखील होत्या. अर्थ न कळणारी गाणी, दिल्या जाणाऱ्या शिक्षा, गुरुजींची भाषा, त्यातले शब्द हे सगळं रोबीला आवडत नसे.

शाळेबद्दल त्याला प्रेम वाटेना. वडिलांची भेट झाल्यावर या मुलानं साऱ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या. ऐकताना महर्षी देवेंद्रनाथांना फार वाईट वाटलं. शिक्षेच्या ते अगदी विरुद्ध होते. मुलांनी ऐकू नयेत असे शब्द इतक्या लहान वयात त्यांच्या कानावर पडावेत याचं त्यांना दुःख झालं. त्यांनी ठरवलं की रोबीला आपणच शिकवायचं. त्याला घेऊन हिमालयात जायचं. अशाप्रकारे रवींद्रनाथ यांची ती नेहमीची शाळा सुटली. अगदी कायमची सुटली. वडिलांसोबतची ही शाळा एकदम वेगळी आणि सुंदर होती. ही शाळा आकाशाच्या खाली होती. बर्फाच्छादित शिखरांच्या जवळ होती. इथं पूर्ण शांतता होती. तिथे शिक्षक होते ते महर्षी देवेंद्रनाथ आणि विद्यार्थी होता त्यांचा लाडका मुलगा रवींद्रनाथ.

पिता- पुत्रांची ही जोडगोळी खरोखर अनोखी होती. वडिलांच्या सहवासात हिमालयाच्या कुशीत रवींद्रनाथ शिकत होते. त्यांचे वडील त्यांचे गुरु तर होतेच पण ते त्यांचे मित्र ही होते. ते आगळं वेगळं नातं म्हणजे जणू आपल्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न असंच रवींद्रनाथांनी म्हटलं आहे. गुरु शिष्यांच्या या अनोख्या शाळेतल्या गमती जमतींची एक छोटी गोष्ट चिकूपिकू दिवाळी विशेषांक २०२३ या अंकातून दिली आहे. ही गोष्ट तुम्ही जरूर वाचा आणि मुलांनाही आवर्जून सांगा. प्रेम, शिस्त आणि आदर पिता-पुत्राच्या नात्यात कसा असू शकतो, हे या गोष्टीतून लक्षात येईल.

– रेणू गावस्कर
लेखिका

Read More blogs on Parenting Here