लेखक :  डॉ. श्रुती पानसे


घरात मूल जन्माला येतं. आसपास आनंदाचं वातावरण असतं. मात्र या छोट्याश्या बाळाच्या छोट्याश्या पण महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांनी आपापलं काम सुरू केलेलं असतं. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही सर्वच इंद्रियं त्याला आता नव्या नव्या गोष्टी शिकवणार आहेत. अगदी दुपट्यात बाळ असल्यापासूनच मुलांच्या जे कानावर पडतं, ते मूल साठवून ठेवत असतं. त्याचा अर्थ कळला नाही, तरी ही प्रक्रिया सततच चालू असते. त्यामुळेच तर मूल न शिकवताही बोलू शकतं. आधी हुंकार – मग तोंडातून वेगवेगळे नुसतेच स्वर – मग एखादे अस्पष्ट- स्पष्ट अक्षर उच्चारतं. यातूनच हळूहळू बोली आकाराला येत असते.

सुरुवातीला २० -२२ तास बाळ झोपतं. हा काळ अत्यंत महत्वाचा असतो. आत्ता त्याने झोपलंच पाहिजे. काही घरांमध्ये बाळाला बघायला पाहुणे येतात. पाहुणे आले की छान झोपलेल्या बाळाला उठवून जागं केलं जातं. बाळ काय नाहीतरी झोपलेलंच असतं. झोपेल परत ! असं वाटतं. पण असं अजिबात करू नये. बाळ झोपलेलं असलं तरी त्याचा मेंदू चालू असतो. आतमधल्या सिस्टीम्स चालू होण्याचा हा काळ असतो. म्हणून त्याला हवं तितक्या वेळ झोपू देतं.

हा झोपण्याचा काळ महिन्याभरात संपतो. तो संपला की बाळ आसपास काय काय दिसतंय ते बघायला लागतं. ज्या दिशेने आवाज आला असेल त्या दिशेने बघून ‘हा आवाज कसला होता..’ हे जाणून घेण्याचा प्रयत्न बाळ करतं, त्याला दिसलं नाही तर थोडा वेळ प्रयत्न करून ते नाद सोडून देतं किंवा रडायला तरी लागतं.

ओळखीचे चेहरे दिसले की त्यांना आनंद होतो. अनोळखी चेहरे दिसले तर ते कुतुहलाने त्या व्यक्तीच्या चेह-याकडे बघायला लागतं. पूर्वी बाळांच्या पाळण्यावर एक छानसं, रंगेबिरंगी चिमणाळं लावून ठेवण्याची पद्धत होती. या चिमणाळ्याशी बाळ खेळायचं. त्याच्याशी हुंकार भरून बोलायचं. पाळण्यातून उतरून जमिनीवर रांगण्या-खेळण्यापर्यंत हे पहिलं-वहिलं खेळणं त्यांना आवडायचं. कारण तोपर्यंत इतर आपल्या आसपास रंगीत वस्तू आहेत, आसपास बरीच माणसं आणि बरीच ‘खेळणी’ आहेत, हे त्यांना माहीत नसायचं. पण एकदा हे माहीत झालं आणि नीट लक्षात राहिलं की मग नवीन काहीतरी हवं असतं. बाळाची प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक घडत जाते.

  • मुला-मुलींशी खेळत असताना समजा लाल रंगाचा चेंडू मुलांना दाखवला असेल तर या वस्तूचा आकार त्यांच्या लक्षात राहतो. सारखा तो एकच चेंडू दाखवला तर त्यातलं नाविन्य संपतं. याचाच अर्थ असा की या चेंडूपासून नवी काही माहिती मिळण्यासारखी नसते, म्हणून त्याचा कंटाळा येतो. मुलांना वेगळ्या रंगांची खेळणी, नव्या वस्तू, नव्या जागा हव्या असतात, याचं कारण हेच आहे. मोकळ्यावर गेलं, घराच्या बाहेर पडलं की मुलांना एकदम आनंद होतो कारण नवीन अनुभव मिळतात. मेंदूला चालना मिळते. किती माहिती घेऊ आणि किती नको, असं होऊन जातं.म्हणून त्यांना हे सगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत.
  • मुलांशी बोलणारी भरपूर माणसं आसपास असतील तर त्याच्या भाषाविकासासाठी ते चांगलंच. म्हणूनच मुलांना सारखं घरात ठेवू नये. दिवसातला थोडा वेळ बागेत, किंवा इतरांकडे खेळायला घेऊन जावं. वेगवेगळी माणसं भेटली की मुलं आनंदी होतात.
  • घरात गोष्ट सांगणारी एक आजी आपल्याकडे हमखास असायची. आता ती जागा टी.व्ही. मालिकांमधल्या गोष्टींनी घेतली आहे. जादूच्या, पशु- पक्ष्यांच्या, त्यांच्यासारख्या लहान मुलांच्या गोष्टी ऐकायला मुलांना आवडतं. वेळात वेळ काढून त्यांना नक्कीच गोष्टी ऐकवाव्यात. बाळ कितीही लहान असलं तरी…
  • घराच्या खिडकीत, गच्चीत नेलं पाहिजे. दिवसा आणी रात्रीच्या वेळा दाखवल्या पाहिजेत. मुला-मुलींची नजर लांबच्या वस्तूंवर खिळायला लागली की, उडणारे पक्षी, झाडावर विसावलेले पक्षी, झाडांवरची फुलं अशा अनेक गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष वेधून घेणं म्हणजे त्यांना ‘डोळ्यां’मार्फत ज्ञान देणं.
  • अतिशय जाणीवपूर्वक त्यांना संगीत ऐकवावं. वाद्यसंगीत, एखादं मंद संगीत ऐकवावं. घुंगरांचा आवाज, प्राणी पक्ष्यांचे आवाज अशा आवाजाकडे लक्ष वेधून घ्यायला हवं. हल्ली मुलं जन्माला आल्यापासून मोबाईलचे रिंगटोन्स, टीव्ही वरच्या जाहिरातींमधले चित्रविचित्र आवाज यांच्याशीच त्यांचा जास्त परिचय झाला आहे.खरंतर साधेसुधे नैसर्गिक आवाज त्याच्या कानावर पडायला हवेत.हे प्रयत्न आता मुद्दाम करायला लागतील.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाळाचे भरपूर लाड करायचे. कौतुकं करायला हवं!

 

– रेणू गावस्कर
लेखिका

Read More blogs on Parenting Here