शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 5 : कुठे मिळेल पालकत्वाचे शिक्षण ?
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
तो प्रसंग मला अनेकदा जसाच्या तसा आठवतो. चाळीतल्या दोन खोल्या. आत स्वयंपाकघर. बाहेरच्या खोलीत बाळंतिणीची बाज, बाळाचा पाळणा. बाळ पाळण्यात झोपलेलं. थंडीचे दिवस. बाळाची आई म्हणजे त्या घरातली मोठी मुलगी बाळाच्या अंगावर पांघरूण घालत होती. पाळणा सगळीकडून झाकून टाकत होती. त्या मुलीचे वडील म्हणजे बाळाचे आजोबा सांगत होते-
‘अग, त्याच्या अंगावर पांघरूण घालू नको. त्यापेक्षा खोली कशी उबदार राहील ते बघ.’
खोली उबदार ठेवणं जरा कठीण काम होतं. जास्त कौशल्यचं होतं; पण त्याचीच खरी गरज होती. अंगावर पांघरूण घालणं हा सोईचा शॉर्टकट होता.
मुलं वाढवताना त्या आजोबांच्या शब्दांची मला वारंवार आठवण होते आणि वाटतं एका थंडीच्या निमित्तानं आजोबांनी केवढा मोलाचा सल्ला सगळ्या पालकांना दिलाय ! पालक शिक्षणाचं सारच या सल्ल्यात आहे.
मुलांना चांगलं वाढवण्यासाठी त्यांच्या भोवती चांगलं वातावरण असण्याची गरज असते. प्रेम, डोळसपणा, स्वातंत्र, मुक्तसंधी, कौतुक, जिव्हाळा, काळजी, सन्मान, संवाद, जबाबदारीची जाणीव असे या वातावरणातले अनेक प्रवाह आहेत. हे वातावरण निर्माण करायला आपण कमी पडलो की उपदेशाच्या शॉर्टकटवर आपण निभावून न्यायला बघतो.
‘ऐकलं नाहीस तर मरेस्तोवर मरीन !’ हा झाला शॉर्टकट; पण जे ऐकायचंय ते आपण का सांगतो आहोत, कशासाठी, त्यांचं महत्व, ते ऐकलं नाही तर होणारं नुकसान, जाणारा वेळ, मनस्ताप याची काहीही कल्पना मुलांना दिलेली नसते आणि ती अशा ऐनवेळी एक छोटं भाषण ठोकून देता येत नाही. ते संवादाचं वातावरण घरात कायम ठेवावं लागतं. पालकांना हे जमत नाही. मारण्याची वेळ येते. मुलांना कधीही मारू नये हे स्वतःला बजावलं पाहिजे ते वेगळंच !
‘कारट्या, खोटं बोलतोस ? थांब चांगली शिक्षा करतो !’ हा झाला शॉर्टकट, पण मुल खोटं का बोलत आहे याची समज, मुलाच्या मनातले विचार, त्याला खोटं बोलायला भाग पडणारी परिस्थिती, क्वचित पालकांच्या खोटेपणाचं समोर असणारं उदाहरण या वातावरणाचं काय करतो आपण ?
‘मला तू एस. एस. सी. ला ९० टक्के मार्क मिळवलेले दिसायला पाहिजेत, बाकी काही सांगू नको. काय वाट्टेल ते कर तू !’ हा आणखी एक शॉर्टकट. मुलाची आवड, एस. एस. सी. च्या वयातले त्याचे मानसिक प्रश्न, शारीरिक वाढीसाठी निर्माण होणारे प्रश्न, घरातलं वातावरण, लहानपणापासूनच्या सवयी, शाळा, मित्र, मनावरची दडपणं या साऱ्यासाठी काय करतो आपण ? याबद्दल कधी गप्पा मारतो ? बोलतो ? मुलांशी मैत्री करतो आपण ?
असे अनेक शॉर्टकटस आपण शोधत असतो. अंगावर भाराभर पांघरूणं घातलेलं मुल जसं गुदमरतं, तसं आपलं मूल या शॉर्टकटमुळे गुदमरत असतं. खोली उबदार असली तर पांघरूणाची गरजच भासत नाही.
खोली उबदार ठेवण्याचं, मुलाभोवती त्याच्या वाढीला योग्य वातावरण ठेवण्याचं शिक्षण कुठे मिळतं ?
आपण एकूणच आपल्या जीवनात ज्या ज्या काही गोष्टी शिकतो त्या कशा शिकतो ? लहानपणापासून पाहून, ऐकून काही सहजपणे आपल्यात मुरतात, काही गोष्टीचं पद्धतशीर शिक्षण शाळा- कॉलेज, इतर अभ्यासक्रम यातून आपण घेतो आणि या पलीकडचा मोठा भाग आपण स्वतःच्या प्रयत्नांनी शिकत असतो. अनेक प्रकारच्या संधी आपल्या दारावर टकटक करत असतात. त्यांचं स्वागत केलं तर आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात. या संधी म्हणजे एखादी घटना असू शकते, एखादं पुस्तक असू शकतं, एखादं माणूसही असतं. आपण वर्तमानपत्र वाचतो, नियतकालिकं वाचतो, पुस्तकं वाचतो, रेडिओ ऐकतो, टी. व्ही. बघतो, चित्रपट बघतो- यातूनही खूप काही शिकत असतो. आपल्या आसपासच्या माणसांच्या जीवनातले प्रसंग, त्यांच्या वृत्ती यातूनही शिकतो. म्हणजे हे सगळं आपल्या भोवती असतं. शिकण्यासाठी त्याचा उपयोग करायचा म्हटला तर होऊ शकतो. नाही तर आपण कोरडेही राहू शकतो.
पालकत्वाच्या शिक्षणाचंही असचं आहे. लहानपणी मुलांशी पर्यायनं आपल्याशी बरंवाईट वागणारी अनेक मोठी माणसं आपण पाहत असतो. आपल्या आईवडीलांपेक्षा अमक्याची आई चांगली आहे, तमक्याचे वडील चांगले आहेत किंवा एखाद्या मैत्रिणीचे आईवडील बरे नाहीत ही तुलना मुलांच्या मनात असते. मुलांशी कसं वागावं, कसं वागू नये हे मनात कुठे तरी रुजत असतं. ते मोठेपणी उगवून येतं.
पण हे एवढंच पालक-शिक्षण पुरेसं नसतं. कारण लहानपणी जीवनाची अनेक अंगं माहीत नसतात. अनेकदा घाईनं काढलेले निष्कर्ष असतात. या मुळच्या पालक-शिक्षणात भर घालणं, चांगलं वाईट ठरवत राहणं यासाठी आपल्याला डोळसपाणाची गरज असते आणि ते काही फार कठीण काम नाही.
आपल्यावर आपल्या आई-वडिलांच्या वागण्याचा परिणाम मात्र सर्वात जास्त होत असतो. असं म्हणतात की, आई-वडील, मामा, मामी, काका, काकी इ. लोक मुलांशी जसे वागतात, तशी बरीच मुलं मोठेपणी वागतात. असं वागणं सोपं असतं. कारण यात फारसा विचार करावा लागत नाही. आपण असे कोणासारखे वागतो हा विचार करून पाहावा. आपली परिस्थिती वेगळी असते, प्रश्न वेगळे असतात. त्याला उत्तरं आपणच काढतो; पण मुळचं वागणं, या सगळ्याचा आधार कुठे तरी वडील माणसात असतो.
माझे पालकपण घडवणारे असे काही प्रसंग मला माझ्या आई-वडिलांच्या संदर्भात आठवतात. माझ्या वडीलांना लहान मुलांची अतिशय आवड होती. माझ्यावर त्यांची विशेष माया होती. मी थोडी मोठी झाल्यावर ते म्हणायचे, किती ग लवकर मोठी झालीस आता ! ही एवढीशी होतीस, मांडीवर बसलीस तर डोकं तुझं माझ्या छातीला लागायचं.
लहानपणी उन्हाच्या दिवसात ते आम्हा मुलांना दुपारी बाहेर खेळू द्यायचे नाहीत. मला तर कुशीत घेऊन थोपटत गाणं म्हणायचे. वारा घालायचे. ‘नीज नीज माझ्या बाळा’ गाणं म्हणायचे. ते करूण गाणं ऐकून मी मुसमुसून रडू लागले तेव्हा त्यांनी ते गाणं बंद केलं होतं.
आज मुलगी जेव्हा रात्री झोपताना कुशीत शिरते तेव्हा ‘तुला माझी उशी मला तुझी कुशी ’ म्हणते तेव्हा त्याचं मूळ मला माझ्या त्या लहानपणात दिसत असतं.
हे नातं अगदी कुशीला कुशीइतकं मर्यादित मात्र नसतं; पण हे खोलवरचे संस्कार पुसत नाहीत; मला लहानपणी फुलं खूप आवडायची. माझे वडील मला जवळजवळ रोज फुलं, वेण्या, गजरे आणायचे. एकदा तर एका शेपट्यावर एक वेणी, दुसऱ्या शेपट्यावर दुसरी वेणी आणि दोन्हीच्या मध्ये झोपाळ्यासारखी टांगलेली तिसरी वेणी अशी घातलेली मला आठवते. हे फुलांचं वेड आणि लोण माझ्या पुढच्या पिढीतही पोहोचलेलं आहे.
लहानपणातलं हे कौतुक खूप जणांच्या वाट्याला येतं; पण वाढत्या वयात हे कौतुक जर विश्वासाचं रूप घेऊ शकलं नाही तर मुलं-पालक संबंध दुरावतात.
कॉलेजमध्ये असताना माझी एका मुलीशी मैत्री झाली. त्या मुलीबद्दल खूप लोकापवाद होते. माझ्या आईच्या मैत्रिणी तिला सांगायच्या, ‘ तुमच्या मुलीला सांभाळा, तिची मैत्री सोडायला सांगा. ती बिघडेल !’ माझी आई त्यांना म्हणाली होती, ‘मला माझ्या मुलीची खात्री आहे. ती मैत्रिणीला सुधारेल. ती बिघडणार नाही !’ हे मला विश्वासानं सांगून आईनं माझ्यावर नकळत जबाबदारीच सोपवली होती.
माझे आई-वडील कुठे गेले होते हे सगळं शिकायला ? त्यांनी पालक शिक्षणाचा कुठलाही कोर्स केला नव्हता. त्यावरची पुस्तकंही वाचली नव्हती, पण मुलांवरच्या प्रेमाने आणि स्वतःच्या विचारशक्तीनं त्यांनी आपले मार्ग शोधले होते.
त्यांचं प्रेम फक्त स्वतःच्या मुलांपुरतंच मर्यादित नव्हतं. आम्ही मुलं मोठी झाल्यावर ते म्हणायचे, ‘घरात लहान मूल नसलं की बरं वाटतं नाही.’ मग शेजारच्या लहान मुलांना आमचं घर म्हणजे त्यांचंच घर वाटायचं. नात्यातल्या, मैत्रीतल्या कुणा कुणा वाहिन्यांना माझे वडील म्हणायचे, “अग, बाजारात जाताना त्या पोराला कशाला नेतेस ? इथे सोडत जा. काही काळजी करू नको !” अशा प्रकारे एखादं छोटं मूल आमच्या घरात कायम खेळत असायचं. शेजारी कुणाच्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला, आईला मूल ऐकत नाही असं वाटलं, वडील मुलाला मारणार असं वाटलं की माझे आई-वडील हळूच जाऊन त्या पोराला शांत करायचे.
हे असं तुमच्या घरातही घडत असेल. त्याचा चांगला परिणाम तुमच्या मुलांवरही होत असेल.
खूप पालकांचे अनुभव यापेक्षा वेगळेही असतात. ते म्हणतात लहानपणी आम्हाला नाही काही स्वतंत्र मिळालं. आम्ही धाकात वाढलो आणि वाईट परिणाम आमच्यावर झाले. आता आमच्या मुलांशी आम्ही तसे वागणार नाही. असे पालक विचारी असतात. स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊन त्यांचं मूल्यमापन करण्याची, बरं-वाईट ठरवण्याची ताकद त्यांच्यात असते. असेही पालक आपल्याला होता येतं. मागच्या पिढीकडून मिळालेलं चांगलं पुढच्या पिढीपर्यंत पोचवता येतं. वाईट आपल्यापर्यंत थांबवता येतं.
पालक शिक्षणासाठी काही अभ्यासक्रम, छोटे कोर्सेस असतात. पुण्यात पालक-शिक्षक संघातर्फे असे कोर्सेस होत असतात त्यांनी आयोजित केलेल्या पहिल्या जबाबदार पालकत्वाच्या वर्गाला मी गेले होते, तो मुंबईच्या निर्मला सरदेसाईनी घेतला होता. त्या कोर्सनं पालकत्वाकडे पहायची वेगळी दृष्टी मिळाली.
डॉ. थोमस गॉर्डन या अमेरिकन पालक-शिक्षक-शिक्षण-तज्ज्ञांचा उल्लेख अनेकदा होतो. त्याचे parents Effectiveness training म्हणजे PET कोर्सेस अमेरिकेत फार लोकप्रिय आहेत. त्याचे teachers Effectiveness training म्हणजे TET कोर्सेसही चालू आहेत.
या अभ्यासक्रमात मुलांशी संवाद साधण्याची अनेक प्रकारची कौशल्य पालक-शिक्षकांना मिळतात. ती रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतात. बालमानसशास्त्र, बालकांचा विकास, बालकांचं आरोग्य बालकांचा आहार बालसंगोपन यासंबंधात अनेक पुस्तकं मराठीतही उपलब्ध आहेत.
मुलांशी वागण्याबद्दल प्रत्यक्ष उदाहरणं देऊन सोप्या मराठीत लिहिलेली सहज वाचण्याजोगी काही छोटी पुस्तकं आहेत. त्यात कोसबाडच्या ताराबाई मोडकांचं ‘बालकांचा हट्ट’ हे पुस्तकं आहे. मुलांचा हट्ट हा मुलांच्या मनात आलेला ताप आहे, हे समजून घेऊन मुलाशी कसं वागावं, याबद्दल सुरेख लिहिलं आहे. या पुस्तकात ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी मिळून लिहिलेलं ‘कुरणशाळा’ हे पुस्तकही छान आहे. अपरिचित मुलांशी शिक्षणाच्या निमित्तानं संवाद साधताना, या शिक्षकांनी केलेला विचार, पालक, शिक्षक सर्वांनाच दिशा दाखवतो.
कृष्णाबाई मोटे यांनी लिहिलेली कोसबाडला प्रकाशित केलेली अशीच चार पुस्तकं आहे. मूल व शिस्त, न ऐकणारी मुले, अपत्यजन्माचा आनंद, लहरी मुले अशी या छोट्या पुस्तकांची नावं आहेत. कृष्णाबाईंनी अतिशय सहजपणे या पुस्तकात मुलांचं मानसशास्त्र समजावून दिलं आहे.
मध्यंतरी डॉ. ह. वि. सरदेसाईंचं ‘घरोघर ज्ञानेश्वर जन्मती’ हे पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. पालकांसाठी ते उपयोगी आहे.
मुलासंबंधीच्या पुस्तकांमध्ये अलीकडे प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकांचा उल्लेख करायला हवा. एक शांता किलोस्करांचं ‘लालन पालन’ आणि देवीदास बागुल यांचं ‘नवे बालसंगोपन’ तरूण पालकांनी वाचलीच पाहिजेत, अशी ही पुस्तकं आहेत.
अनेक मराठी नियकालीकांमधून बालसंगोपनाबद्दल लेख येत असतात. दोन खास अंकांचा उल्लेख करते. शतायुषीचा दिवाळी ७९ चा बालक विशेषांक आणि आरोग्य दक्षता मंडळाचा १९८१ चा दिवाळी अंक यात पालकांना वाचण्यासारखं खूप आहे.
मागे मला अचानक रस्त्यावरच्या जुन्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक मिळालं होतं त्याचं नाव आज माहित नाही. कारण त्याची वरची शेवटची काही पानं नाहीत; पण हे पुस्तक अंतोन मकारेन्को या सोविएत शिक्षणतज्ज्ञाचं आहे. या पुस्तकात
- कुठल्याही परिस्थितीत मुलाच्या मनावर वाजवीपेक्षा जास्त ताण पडू न देणे, मानसिक खळबळ माजू न देणे महत्वाचे आहे.
- झोप आणि जाग, काम आणि विश्रांती, अभ्यास आणि फुरसत यांच्यातील पद्धतशीर विभागणी नसेल, घराबाहेर पुरेसा वेळ घालवता येत नसेल, घरात जिव्हाळ्याचा अभाव असेल, तर मानसिक दौर्बल्य मुलात येते.
- आज नियम बनवला व उद्या तो मोडला, आज एक गोष्ट करू नको म्हटले व दुसऱ्या दिवशी ती करू दिली तर शिशुमध्ये चांगल्या सवयी बाणत नाहीत.
- मुलाला सांगायचे ते काम मनोरंजक पाहोजे, ते फार कठीण असता कामा नये, त्यात मुलाच्या सृजनशक्तीला वाव मिळाला पाहिजे, ते निव्वळ तांत्रिक असता कामा नये.
अशा अनेक गोष्टींबद्दल अनुभवांसह पद्धतशीर मार्गदर्शन आहे. जुनी पुस्तकं शोधताना असा खजिना कधी तरी हाती लागतो.
इंग्रजी वाचणाऱ्या पालकांसाठी तर या विषयांवरची खूप पुस्तकं आहेत. बालसंगोपनासंबंधी सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे अमेरिकेतल्या डॉ. बेंजामिन स्पॉकचं ‘बेबी अँड चाइल्ड केअर.’ या पुस्तकात बाळाच्या जन्माआधी पालकांच्या मनाची तयारी व्हावी म्हणून मार्गदर्शन आहे.
बाळाचे कपडे, साहित्य, दुध, अंगावर पाजणं, आहार, स्वच्छता, आजारपण, बाळाच्या सवयी, जन्मल्यापासून किशोर-वयापर्यंतची शारीरिक, मानसिक, सामाजिक वाढ या साऱ्याबद्दल अतिशय तपशीलवार मार्गदर्शक आहे. डॉ. स्पॉक यांनी अमेरिकेतल्या तीन पिढ्यांना बालसंगोपनाचं शिक्षणं दिलं आहे. इतकं हे पुस्तक लोकप्रिय आहे. ,
त्यातला काही भाग आपल्याकडे थेट उपयोगी पडणार नसला, तरी मुलांना वाढवण्यासंबंधीच्या अनेक अंगांचा किती तपशीलवार अभ्यास करता येतो, हे समजण्यासाठी तरी ते वाचावं.
पुस्तकांची यादी काढू लागलं तर या विषयांवरच प्रत्येक पुस्तकं वाचलं पाहिजेत असं वाटायला लागलं; पण ते शक्य नसतं आणि जरुरीचंही नाही. ‘Time’, १५ ऑगस्ट ८३ च्या अंकात What Do Babies Know हा लेख आहे. पाळण्यातल्या बाळांना जन्मापासून किती आणि काय काय कळत असतं, याविषयीच्या संशोधनाची माहिती देणारा हा लेख आहे. त्यात लेखकानं म्हटलंय, ‘बाजारात बालसंगोपनासंबंधीच्या पुस्तकांचा पूर लोटतो आहे. काय करावं, काय करू नये याविषयी सतत लेख लिहिले जात आहेत आणि वर हे सगळे वाचून पालकांनी घाबरून जाऊ नये, हे सगळं सोपं आहे असा दिलासाही मिळतो आहे.’ तरीही पालक घाबरून जात आहेत.
सुदैवानं आपल्याकडे मराठीत असा पूर अद्याप आलेला नाही; पण नियतकालिकांमधले लेख, आकाशवाणीवरचे कार्यक्रम, टी. व्ही. वरचे कार्यक्रम खूप महत्वाची माहिती देतात. मुलांच्या दृष्टीनं महत्वाचे अनेक कार्यक्रम भोवताली घडत असतात, याकडे सुजाण पालकांचं लक्ष पाहिजे. मुलांना वाढवण्याबद्दलचे विचार, अनुभव, सूचना, सल्ले, नवी माहिती यांचा अभ्यास निवृत्त मंडळींनी, महिला मंडळींनी केला आणि तरूण पालकांपर्यंत तो पोहोचवला तर मोठं समाजकार्य होईल.
मुलांची खेळणी, मुलांसाठी होणाऱ्या स्पर्धा, मुलांची पुस्तकं, मासिकं, मुलांसाठी चालवले जाणारे छंदवर्ग, व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग, मुलांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणाऱ्या संस्था, या सर्व क्षेत्रात काय काय चालतं, याच्याशी आपला संपर्क पाहिजे, आपलं पालकत्व यामुळं समृद्ध होत असतं.
रामजन्म, कृष्णजन्म, देवळात साजऱ्या करणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या माणसांना, आजच्या बालसंगोपनाबद्दलही कीर्तनकार, प्रवचनकारांनी सांगायला हवं. कृष्णाच्या बाललीला, रामाच्या चंद्र हवा हट्टाची गोष्ट, अश्वत्थामानं दुधाचा हट्ट केला ती गोष्ट, अभिमन्यूनं पोटात असताना ‘चाक्रव्यूह्भेद कसा करायचा ते ऐकलं ’ ती या सगळ्या गोष्टी काही महत्वाचे संदेश देतायत असं नाही का आपल्याला वाटत ?
अशा ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीचा, पाहिलेल्या अनुभवाचा आपल्या वागण्याशी, जगण्याशी संदर्भ जोडायला शिकलं पाहिजे. आपलं पालकपण समृद्ध करत राहिलं पाहिजे.
अलीकडे पुष्कळ पालक आपल्या मुलांबद्दल सुजाणपणे विचार करायला लागलेले आहेत. मुलांची वाढ, त्यांचा अभ्यास, त्यांचं व्यक्तिमत्व याबद्दल जागरूक राहू लागले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय याचाही जरा सामान्य माणसाच्या दृष्टिनं विचार करायला हवा. मुलाला केवळ अनेक गोष्टी येणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास नव्हे. असामान्यपणाच्या मागे लागून सामान्यपणाचा तळही निसटतो आणि असामान्यत्व दूरच राहतं. माणूस अधांतरी राहतो. अशी अधांतरी वावरणारी किती तरी माणसं पाहतो. आपण सामान्यांशी त्यांचं नातं जुळू शकत नाही. असामान्य होण्याची अभिलाषा हे स्वप्नच राहतं. मग ही माणसं सतत असमाधान पसरवत राहतात. भोवतालच्या माणसांना जगणं कठीण करून सोडतात. यापेक्षा माणसाला माणूसपणाचा विकास करायला मदत केली पाहिजे.
चांगला पालक हा चांगला माणूस असतो. बायकोशी वाईट वागणारा माणूस मुलांशी चांगलं वागेल हे शक्य नाही. नवऱ्याला ताप देणारी बाई मुलांवर प्रेम करेल हे शक्य नाही. ऑफिसमध्ये बेजबाबदारपणे काम करणारा माणूस मुलं जबाबदारीनं वाढवेल हे शक्य नाही. पालकत्व ही एक वृत्ती आहे. ती संवाद साधण्याची कला आहे. खऱ्या अर्थानं समृद्ध जीवन जगण्याची कला आहे.
या अर्थानं आपण कुणीच सहजपणे उत्तम पालक नसतो. उत्तम पालक होऊ शकत नाही.
प्रयत्न करणं मात्रं आपल्या हातात असतं. आजवर आपण मुलांना घडवतो असं आपण म्हटलं, पण मुलंही आपल्याला घडवत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुलांच्या निमित्तानं स्वतःला घडवत राहिलं पाहिजे. पालक शिक्षणात याचं फार महत्व आहे.
Read More blogs on आपली मुलं