लेखक :  शिवानी पेठे-काणे


मला शाळेत नेहमी असं वाटायचं की, ‘विज्ञानाचा अभ्यास कशाला करायचा? इतके वैज्ञानिक होऊन गेलेत, त्यांनी बरेच शोध लावले आहेत मग आता तेच परत शिकून काय उपयोग? मी नवं काय शोधणार?’. पण हळूहळू मला जे अनुभव मिळाले त्यातून मी विज्ञान विषयाकडे ओढले गेले. विज्ञानाचा अभ्यास हा फक्त पाठयापुस्तकांपर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या गोष्टींमधून विज्ञान कळलं तर ते नीट लक्षात राहतं .

विज्ञानात फक्त laws आणि numericals एवढंच नसतं, तर अगदी सोप्या सोप्या सहज गोष्टींमधून आपल्याला विज्ञान कळू शकतं.

कदाचित हे असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. जसं की अगदी आपण श्वास कसा घेतो?, पाने हिरवी का असतात? सूर्य रोज पूर्वेलाच का उगवतो? पासून ते अगदी आपण म्हातारे होतो म्हणजे काय होते? आपल्याला आनंद होतो, दुख: होतं म्हणजे काय? माणूस मेल्यावर काय होत असेल? या संपूर्ण सृष्टीची निर्मिती कशी झाली असेल? इथपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजेच विज्ञानाचा अभ्यास. हा विज्ञानाचा अभ्यास पुढे जाऊन तंत्रज्ञान विकासित करण्यास उपयोगी ठरतो. आज तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आपण अनेक किलोमीटर दूर असलेल्या मित्रांना व्हिडीओ कॉल करू शकतो, विमानातून प्रवास करू शकतो. उकडायला लागलं की पंखा किंवा ए. सी. लाऊन मस्त टीव्ही बघू शकतो.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आकाशातले तारे बघायला आवडतं. आकाश म्हणजे दूरवर दिसणारं पण आतल्या गोष्टींना स्पर्श न करता येणाऱ्या टीव्ही स्क्रीनप्रमाणे दिसत असतं. अवकाशातील गोष्टींचा अभ्यास म्हणजे खगोलशास्त्र. हा विषय तसा अलीकडच्या काळातला असल्याने या विषयातील अनुभव मुलांच्या अभ्यासक्रमात फारसे आढळत नाहीत. खरं तर ग्रह, तारे, चंद्र, चांदण्या या सगळ्यांबद्दल लहानपणापासूनच मुलांना आकर्षण असतं. हेच लहानपणापासून असणारं आकर्षण किंवा कुतूहल याला खत-पाणी पालकांनी द्यायला हवं. मुलांच्या वयानुसार आकाशदर्शन, निरीक्षण यांसारख्या कार्यक्रमांमधून, गप्पांमधून किंवा सोप्या प्रयोगांमधून मुलांबरोबर या विषयातल्या गमती-जमती आपण अनुभवू शकतो.

अनेक वर्षांपासून माणूस उत्सुकतेपोटी जन्माला आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा नेहेमीच प्रयत्न करत आलाय. पृथ्वी सपाट आहे की गोल? आपण सूर्याभोवती फिरतो की सर्व अवकाशातील ग्रह आपल्या भोवती फिरतात? ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली? ब्रह्मांडमध्ये इतर जीव आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी खगोलशासत्राचा अभ्यास केला जातो. याविषयी मुलांशी मस्त गप्पा होऊ शकतील.

हा विषय समजून घ्यायला मुलांनाच काय मोठ्यांनाही मजा येईल. छोटंसं उदाहरण द्यायच झाल तर, वेल्क्रोचा शोध अंतराळ यानात वस्तू एका जागी कशा ठेवता येतील या विचारातून लागला होता.

खगोलशास्त्र हे येत्या काही वर्षातले प्रगतशील क्षेत्र आहे. माणूस आता अंतराळातील उपग्रहांशी संवाद साधू शकतो, दूर असलेले तारे, तारका समूह बघू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी बनवून खगोलशास्त्राचा अभ्यास करायला आपण सुरुवात केलेली आहे. जे. डब्ल्यू टेलिस्कोप मधून आपण इतकी सुंदर चित्रं बघू शकतो. अवकाशात डार्क मॅटर, डार्क एनर्जी अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा अभ्यास सुरूच आहे. खगोलशास्त्र हा विषय अफाट आहे. अनेक क्षेत्रांशी त्याचा संबंध आहे.

प्रसिद्ध अंतराळवीर कल्पना चावला हिला लहान वयातच या विषयातले अनुभव मिळाले. तिचे वडील जे. आर. डी टाटांचे चांगले मित्र होते. त्यांच्या अनेक फ्लाईंग सेशन्सला तिचे वडील कल्पनाला आणि तिच्या भावाला घेऊन जायचे. त्यामुळे लहानपणापासूनच कल्पनाला या विषयाचं पोषक वातावरण मिळालं आणि खगोलशास्त्राबद्दलची आवड हळूहळू वाढत गेली. पालकांनी लहानपणापासूनच मुलांना वेगवेगळ्या विषयांचे अनुभव द्यायचा प्रयत्न केला तर मुलांच्या आवडी-निवडी कळायला नक्की मदत होईल.यातूनच नवे प्रश्न मुलांना पडतील, त्यांची उत्तरं ते स्वतः शोधून काढतील.

मुलांना खगोलशास्त्राची आवड निर्माण होण्यासाठी काय काय करता येईल?
आपल्या डोळ्यांनी आपण आकाशातले बुध, गुरु, शनी, मंगळ, शुक्र हे ग्रह सहज बघू शकतो. फक्त युरेनस आणि नेपच्यून हे दोन ग्रह बघायला टेलिस्कोपची गरज असते. आज आपल्याकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामध्ये ‘Stellarium App’ द्वारे आकाशातले ग्रह तारे सहज बघता येतात.

घरात एखाद्या खिडकीतून रोज दिसणाऱ्या चंद्राचे निरीक्षण आपण करू शकतो. एक वेळ ठरवून रोज त्यावेळी चंद्र नक्की कुठे दिसतोय (स्थान), त्याचा आकार कसा आहे हे बघता येईल. खिडकीला सळया असतील तर ही निरीक्षणं करणं अजून सोपं होईल. प्रत्यक्ष कृतीतून आपण मुलांसह काही ऍक्टिव्हिटीज करून पहिल्या तर मुलांमधली विज्ञानाबद्दलची आवड वाढेल. मुलांना प्रश्न पडतील, ते वाचू लागतील, माहिती घेऊ लागतील. मुलांमध्ये एखाद्या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी पालकांनीही त्यात सहभाग घेतला तर विज्ञान, खगोलशास्त्र असे विषय मुलांच्या नक्कीच आवडीचे होतील.

– Shivani Pethe,
Science Education Associate, IUCAA

Read More blogs on Parenting Here