"मुलांची संगीताशी मैत्री कशी करावी आणि का? "
लेखक : विभावरी नीलम
असं म्हणतात की ६४ कलांमध्ये सर्वश्रेष्ठ कला म्हणजे संगीत. रडणारं तान्हुलं बाळसुद्धा अंगाई गीत ऐकून शांत होतं. ही शक्ती आहे संगीतात. बडबडगीतं, अभिनयगीतं म्हणत तर आपण लहानाचे मोठे होतो. ठेक्यातली वेगवेगळ्या भाषेतली गाणीसुद्धा मुलांना अगदी पटकन पाठ होतात. गणितातले पाढेसुद्धा त्याच्या ठेक्यामुळे आजन्म आपल्या लक्षात राहतात. संगीत वातावरण निर्मिती करतं. आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जायची क्षमता संगीतात आहे.
स्वतःला शांत ठेवणं, आनंदी राहणं, इतरांशी जुळवून घेणं, नम्रपणा, विचारशीलता हे सगळं संगीत शिकवतं. संगीत जर इतकं काही शिकवतं तर मुलांना संगीताविषयी ओढ वाटावी म्हणून आपण काय करू शकतो?
मुलांना संगीताची ओळख कशी करून देता येईल?
मुलांना एकदम गाण्याचे क्लासेस न लावता संगीताची आधी गोडी लावली पाहिजे.
वेगवेगळ्या प्रसंगातून गाण्याची ओळख झाली पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण खूप सणवार साजरे करतो. सणांच्या दिवशी सकाळी एखादे भजन किंवा एखादा अभंग आपण लावून मुलांना ऐकवू या. त्यातील एखादं गाणं मुलांचे खूप लाडकं होतं आणि ते गाणं मुलांना परत परत ऐकावंसं वाटतं. दिवाळीच्या पहाटे सनई लावली की त्या सुरांमुळे घरातील वातावरण कसं छान होतं ह्याचा अनुभव मुलांना देऊ या.
शेजारचा दादा, ताई गाणं शिकत असतील तर मुलांना सहज ऐकण्यासाठी त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतो. मुलांना ताई-दादा खूप जवळचे वाटतात आणि म्हणूनच त्यांना त्यांची गाणी ऐकावीशी वाटतात. आजीआजोबा यांचं भजनी मंडळ असेल तर एखाद्या वेळी नातवंडांना घेऊन जाऊ शकतात. यामुळे संगीताशी सहज ओळख होते.
माझी नात तान्ही असताना “रखुमाई रखुमाई” ह्या गाण्यावर डोळे मोठे करून गोड डोलायची. मुलांना अगदी लहानपणापासूनच ताल, स्वर खूप भावतात. जितक्या लवकर तुम्ही त्यांना संगीत ऐकवाल तितके चांगले बदल मुलांच्यात दिसून येतात.
चिकूपिकूच्या संगीत विशेषांक मध्ये संगीताची जादू आम्ही पुस्तक रूपात मुलांसाठी आणली आहे. फुलवारी गितोंकी हे पुस्तक लहान मुलांना गीतांमधून सूर ताल थाट अश्या गोष्टींची ओळख सोपी करून देते.
मुलांमध्ये संगीताबद्दलची रुची कशी कायम ठेवता येईल?
एकदा मुलांना गाण्यात रुची निर्माण झाली की मग त्यांच्याशी खेळताना, जेवताना संवाद साधू या. गाण्याचा class कसा असतो? तिथे कसं शिकवलं जातं? ह्याबद्दल मुलांशी गप्पा मारू या. “तुला आवडेल का जायला?” असं विचारून पाहू या. मुलांचं मत विचारूनच क्लासची निवड करावी.
मुलांना क्लासला पाठवल्यावर पालकांची जबाबदारी संपते असं नाही कारण कोणतीही गोष्ट सातत्याने करण्यासाठी आपल्या प्रोत्साहनाची मुलांना खूप आवश्यकता असते.
आमच्याकडे माझ्या मुलीला गाणं शिकवायला सुर्वेगुरुजी यायचे. सोसायटीतील ४-५ मुलं एकत्र शिकायची. गुरुजी नेहेमी मुलांच्या आवडीचा विचार करायचे. हसत खेळत मुलं गाणी शिकायची. क्लासच्या नंतर पण मुलांना गाणं गुणगुणायला आणि रियाज करायला आवडायचं. मुलांना कधीच त्यांची आणि गाण्यांची भीती वाटली नाही. आमच्या घरात गाण्याचे स्वर सतत घुमतच असत. मुलांना सहज शास्त्रीय संगीताची गोडी लागली. आजही सगळी मुलं संगीताशी जोडलेली आहेत.
मुलं जसजशी मोठी होतात त्यांना संगीताची अनेक दालने खुली होतात. शाळेत मित्रमैत्रिणींबरोबर गाणी म्हणू लागतात. अशा वेळी आपण स्पर्धा किंवा परीक्षेसाठीचा अट्टाहस न करता आपण कसं छान गाऊ शकतो, संगीतातून किती आनंद मिळतो ह्यावर लक्ष देऊ या.
संगीतामुळे मुलांवर होणारे संस्कार आणि परिणाम
आपल्या मुलांचे संगीताशी नाते जोडले की त्यांच्यात अनेक प्रकारचे बदल होतात.
-
गाण्यामुळे मुलांच्या मनाला स्थिरता येते.
- मुलांची एकाग्रता वाढते.
- गाण्याचा रियाझ करताना मुलांना हळूहळू ही शिकवण मिळते की परत परत प्रयत्न करूनच आपण चांगले गाणे शिकू शकतो. ह्या सवयीचा मुलांना अभ्यास करताना खूप फायदा होतो.
- गुरूच्या सहवासामुळे मुले मोठ्यांचा मान-सन्मान ठेवायला सहज शिकतात.
- संगीताबरोबर प्रवास करताना मुलांना निखळ आनंद घेण्याची छान सवय लागते.
विसाव्या शतकातील मुलांना वेगवेगळ्या संगीताचे अनुभव सहज मिळू शकतात फक्त त्यात आपल्यासारख्या सुजाण पालकांची साथ मिळाली पाहिजे. वेळ काढून त्यांना अनेक उत्कृष्ठ कार्यक्रमांना घेऊन गेले पाहिजे. चांगल्या संगीतासाठी त्यांचा कान तयार झाला पाहिजे. निसर्गातील संगीत ओळखायला यायला पाहिजे. सुरांशी असलेली त्यांची घट्ट मैत्री आपल्याला अजून दृढ करता यायला हवी.
चिकूपिकू नेमहीच मुलांना वेगवेगळे समृद्ध करणारे अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असतो.