लेखक : जुई चितळे
मुलांचा दंगा – आपली परीक्षा
‘मी उगाच एवढी रागावले.. आता सगळे म्हणत असतील की ही कशी आई आहे? पण इतकी वेड्यासारखी वागत होती मुलं आणि किती धाकधूक वाटत होती मला की तिथले लोक काय विचार करत असतील? मुलांचं वागणं ही माझ्या पॅरेंटिंगची परीक्षाच नाही का?’ आपण मुलांना बाहेर घेऊन जातो तेंव्हा किती वेळा असे विचार आपल्या मनात येतात? मुलांच्या वागण्यावरून आपल्याला लोक judge करत असतात, पारखत असतात असं सारखं वाटत असतं आणि त्यामुळे मुलांना घेऊन बाहेर जायचं म्हणजे कठीण प्रसंग, कपाळावर आठ्या!!
एकदा मी घरी आल्यावर शांतपणे खरंच विचार केला अशा प्रसंगांचा. नक्की काय काय घडतं अशा वेळी? मूल दंगा करत असतं, वेड्यासारखं वागत असतं, चारचौघात दिवे लावत असतं, म्हणजे खरं तर मूल आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नसतं एवढंच. अपेक्षाभंग हा याच काय कित्येक भांडणांचा मूळ मुद्दा असतो हे मोठेपणीही आपल्या लक्षात आलेलं नसतं!
बाहेर कोणाच्या घरी गेल्यावर मुलांकडून काय असतात साधारण अपेक्षा?
– खूप जोरात आरडाओरडा करू नये
– धावपळ करू नये
– कशाचं वाईट वाटलं तरी जोराने रडू नये
– खरं म्हणजे रडूच नये
– इतर मुलं असतील तर त्यांच्याशी भांडू नये
– मोठे काहीही म्हणाले, मोठ्यांनी कितीही प्रश्न विचारले तरी त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने बोलावे
– पण मोठे बोलत असताना त्यांच्या मध्ये मध्ये बोलू नये
– त्या ठिकाणच्या किंमती वस्तूंना हात लावू नये
– खायला प्यायला दिलेल्या गोष्टी सांडू नये
– त्या आवडत्या असल्या तरी जास्त मागू नये पण नावडत्या असल्या तरी वाढलेल्या संपवाव्या
– कुठल्याही गोष्टीचा हट्ट करू नये
– शक्यतो एका ठिकाणी बसून काय ते खेळावं किंवा शांत राहावं
पुन्हा एकदा वाचून बघताना माझ्याच पोटात गोळा आला. हे सगळं लहान मुलांच्या नजरेतून बघितलं तर ‘मुळात घेऊन तरी कशाला जाता आम्हाला?’ असं विचारत कसं नाहीत हा प्रश्न पडायला पाहिजे.
दुसरं म्हणजे इतरांना आपल्याविषयी काय वाटेल याचा आपण विनाकारण खूप धसका घेतो. आपल्या मुलांनी दंगा केला, ऐकलं नाही की पालक म्हणून आपण कमी पडलो हा विचार टोचायला लागतो. खरं तर थोड्या फार फरकाने सगळयाच पालकांनी हा अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या मुलाच्या दृष्टीने योग्य वाटेल तसं वागून इतरांचा ताण घेणं कमी करायला पाहिजे.
आपलं घर सोडून बाहेर मुलांना आपण घेऊन जाणारच. ती त्यांची आणि आपलीही गरज आहे. मुलांनी बाहेरचं जग बघावं, घर सोडून इतर ठिकाणी कसं वागायचं हे शिकावं.. असं आपल्याला मनापासून वाटत असतं. मुलांना लहानपणापासून शक्य तिथे बरोबर घेऊन जाण्याने त्यांचं अनुभवविश्व, व्यक्तिमत्त्व समृद्ध होणार आहे .. मग नातेवाईक, मित्रमंडळींची घरं, समारंभ, सहली, ट्रेक काहीही असो. पण प्रत्येकच घर किंवा ठिकाण आणि तिथली माणसं समजूतदार असतात असं नाही, मुलांच्या मुलांसारखं वागण्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. त्यातून रागवा-रागवी, रडारड सुरु होते. काय करू शकतो मग यावर?
जेंव्हा सलग काही दिवस बाहेर जाण्याचे प्रसंग आले आणि त्यावेळी मी जेवढी मुलीला रागावले ते आठवून माझी मलाच फार टोचणी लागली. बाहेर जाणे हा आनंदी प्रसंग नसून सगळ्यांसाठीच स्ट्रेस आहे असं वाटायला लागलं आणि मग जाणीवपूर्वक काहीतरी बदल करायचे ठरवले.
– आता आम्ही बाहेर जाताना सगळ्यात आधी त्याविषयी गप्पा मारतो. कुठे जायचं आहे, कशासाठी? तिथे कोण कोण असणार आहेत? तिथे जाऊन काय करायचं आहे आणि कसं वागलेलं तिथे चालणार नाही याबद्दल मनाची तयारी यातून होते.
– एक छोटी चेकलिस्ट नजरेखालून घालतो. त्यानुसार बेसिक खाऊचा डबा, पाण्याची बाटली, रुमाल, एखादा टी-शर्ट, आवडीची २ पुस्तकं, एखादं छोटं खेळणं घेऊन जातो. या सामग्रीवर ठराविक वेळ मुलगी आनंदात काढू शकते.
– घरी थोडा थोडा वेळ आपापलं खेळण्याची सवय लावली, तसे खेळ शोधून ठेवले जे बाहेरसुद्धा उपयोगी पडतात. पिस्ता शेलचे किंवा रंगीत कागदी तुकडयांचे आकार बनवणे, न्यूज पेपरच्या बोटी, पंखे बनवणे, छोटा सॉफ्टबॉल, एकात एक जाणारे कप्स वगैरे न्यायला सुटसुटीत खेळणी नेतो.
– ज्यांच्याकडे जाणार त्यांना पूर्वकल्पना द्यायला फोन करून सांगतो की ठराविक काळजी आधीच घेऊया
– फुटणाऱ्या, किंमती वस्तू सहज हाती लागतील अशा ठेवायला नको, खेळण्यासाठी घराचा एखादा कोपरा हेरून ठेवू वगैरे.
– बाहेर जाण्याच्या एकंदर प्लॅनमुळे मुलांच्या खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या रुटीनमध्ये बदल होतो आणि त्याचा अदृश्य ताण कधी दंगा तर कधी रडारड यातून व्यक्त होतो. याचं भान ठेवून प्लॅन केला तर बरेच प्रश्न कमी होतात.
– प्रत्यक्ष भेटीत मुलांनाही भाग घेता येईल अशा विषयांवर थोडा वेळ आवर्जून एकत्र गप्पा मारतो. बरेच वेळा “माझ्याकडे लक्ष दे, अजून कोणाशी बोलू नको.” असा हट्ट होतो तेंव्हा सगळे मिळून तिच्याशीच बोलतो थोडा वेळ! छोटे, तिथल्या तिथे खेळता येतील असे खेळ खेळतो – या घराला किती खिडक्या आहेत बघ, पावलांनी मोजून खोली किती मोठी आहे सांग, मी सांगेन त्या रंगाची वस्तू इथे आहे का शोध इत्यादी.
एवढं करून समजा झाला आरडाओरडा, दंगा, धावपळ, रडारड, सांडलवंड .. तरीही ती भेट यशस्वी झाली असं म्हणता येईल का? आपण संयम न सोडता शांतपणे हे प्रसंग हाताळले, अगदी मनमोकळेपणाने यजमानांशी बोललो आणि कमी-जास्त झालेल्या गोष्टींविषयी दिलगिरी व्यक्त केली, मुलांनी थोडाफार संवाद साधला आणि तिथल्या कोणाशी नातं जुळवलं, मुलांना नवीन अनुभव मिळाला आणि आपल्यालाही भेटी-गाठी घेता आल्या की झालं तर मग! प्रत्येक अशा भेटीतून आपण आणि मुलंही शिकत जातील, अनुभवातून आणखी युक्त्या लक्षात येतील आणि आपण मुलांबरोबर बाहेर जाण्याचे प्रसंग आनंदाने पार पाडू शकू.
तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही मुलांना सगळीकडे बाहेर घेऊन जाता का? तुमच्याकडे कोणत्या वेगळ्या युक्त्या आहेत हे आम्हाला नक्की कळवा.
– जुई चितळे
Read More blogs on Parenting Here