लेखक :  शोभा भागवत


(आकाशवाणीवरील स्नेहबंध कार्यक्रमातील ‘मुलं, पालक आणि घरातून होणारी जडण घडण’ या मालिकेअंतर्गत घेतलेल्या मुलाखतीवरून केलेलं लिखाण.)

लेखन व मुलाखत – शोभा भागवत; प्रश्न व मुलाखतकार – ऋचा देव

संकलन – आभा भागवत; संकल्पना – प्रसाद मणेरीकर

पालकांनी मुलांशी खूप खेळावं. मुलं मुलं खेळत असतातच, चांगला खेळ झाला तर त्यातून त्यांचं चांगलं नातंही निर्माण होतं. खेळातून तयार होणारं पालकांचं आणि मुलांचं नातंही खूप महत्वाचं आहे. पालकांना जर मुलांशी काय खेळावं हे कळलं तर ते नातं अधिक चांगलं होईल. पालकांना खेळ म्हटलं की असं वाटू शकतं की मैदानावर जाऊन खेळायचे खेळ. पण घरात सुद्धा पुष्कळ खेळ खेळता येतात. आणि ते लहान वयात आवश्यकही आहेत. एरवी बोलताना पालक-मुलांचे संवाद असे असतात, “बघ हं, आंघोळ केली नाहीस तर दाराबाहेर ठेवीन. पाच मिनिटांत जेवण संपलं नाही तर बक्षिस रद्द. नाही दात घासालेस तर रात्री झोपू देणार नाही, लक्षात ठेव.” हे ताणतणावाचे, शिस्तीचे संवाद कमी व्हायला खेळ मदत करतात.

आई वडील आणि मुलं जेव्हा खेळतात तेव्हा वेगळ्याच दुनियेत जातात. तिथे काही नेहमीची संभाषणं नसतात. त्या खेळातून मुलं विचार करायला शिकतात. घरात खेळायचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे खेळ यात अपेक्षित आहेत. समजा आई आपल्या मुलांना विचारतेय ‘काय खेळूया?’ मुलं म्हणतात ‘जंगल-जंगल’. एक मूल लीडर होतं, त्याच्यामागे दुसरं मूल, त्याच्यामागे आई. लीडर झालेलं मूल ठरवतं की जंगलाच्या या भागात जावं की त्या भागात? इकडे गेलं तर शत्रू असतील का तिकडे गेलं तर शत्रू असतील? त्याप्रमाणे ते निर्णय घेतं आणि जबाबदारीने इतरांना सूचना देतं. पुढे गेल्यावर त्याला शत्रू लपलेले दिसतात. मग ते आपल्या आईला आणि भावाला लगेच सूचना देतं, “आता हल्ला करायचा बरं का. चला, हर हर महादेव.” आणि मग काल्पनिक लढाई जुंपते. मग तिघंही लढाई करतात, शत्रू सगळे पळून जातात. मग हे हुश्श करून निवांत होतात. आई मुलांना म्हणते की आपण दुसरा खेळ खेळूया. आता धावपळीचा नको. तुमच्यापैकी एकानी दगड व्हायचं आणि एकानी माणूस व्हायचं. माणसानी दगडाला काय करायचं ते ठरवायचं. माझी मुलगी दगड झाली होती आणि मुलगा माणूस झाला होता. तव्हा त्याने दगड झालेल्या मुलीला उचललं, ढकललं, इकडून तिकडे नेऊन ठेवलं. आणि तिला ते अजिबात आवडलं नाही. मग तो दगड झाला आणि ही माणूस झाली. हिनी त्याला हात सुद्धा लावला नाही. तिनी लांबून त्याला फुलं वाहिली, आरती ओवाळली, नमस्कार केला. मग दोघांना म्हटलं की आता शांत बसा आणि आठवा की तुम्ही काय केलंत. आणि तुम्हाला कसं वाटलं? मुलगी म्हणाली, “मला अजिबात आवडलं नाही त्यानी मला उचललं आणि ढकललं ते. दगड झाला म्हणून काय असं वागवायचं का?” मुलगा म्हणाला, “मला पण नाही आवडलं तिने मला देव केलेलं. मी काय देव आहे का? मला दगड म्हणून वागवलं असतं तर जास्ती बरं वाटलं असतं.” दोघांची विचार करण्याची पद्धत कशी वेगळी होती ते त्यातून कळलं. असे मानसिक खेळ खेळत राहिलो आपण तर कल्पकता खूप वाढते. हे खेळ विचार करायला शिकवतात. तुम्हाला मोकळं करतात, कारण दर वेळी काहीतरी नवीनच समोर येतं. असा हा मुलांशी होणारा संवाद नेहमीपेक्षा वेगळा असतो. तो आवडणार नाही असे कोणी पालक असणार नाहीत. अशा खेळामुळे सगळं कुटुंब जवळ येतं. असं म्हणतात की ‘The family that plays together, stays together.’ मुलांच्या काही विशिष्ट वयात असे खेळ मुलांना इतके आवडतात की तेच तेच पुन्हा खेळावेसे वाटतात.

पालक हल्ली त्यांच्या दिनाक्रमानीच एवढे दमून जातात की मुलांच्यासाठी काहीही करू म्हटलं की त्यांना ते वाढीव काम वाटतं. आणि त्यामुळे जास्तीचं काहीही नको वाटतं. खेळ खेळून जर मूल प्रसन्न झालं, खूष झालं तर खेळात खूप हसणारी आई, खूष होणारे बाबा, असं वातावरणच सगळं बदलेल. कुटुंबाची सगळीच कामं हलकी होतील. मूल कदाचित न कुरकुरता अभ्यास करेल, आनंदाने जेवेल. आईबाबा आपली कामं उत्साहाने उरकतील. मग अशा कुटुंबाचं काम वाढलं का कमी झालं म्हणायचं? उलट कामं सोपी होतील.

नाही तर कित्येक घरांत होतं असं की बाबा सकाळी कामाला जाताना म्हणतात, “चाललो आता पाट्या टाकायला”. त्यामुळे मुलांची ही समजूत होते की काम करणं म्हणजे पाट्या टाकणं. प्रत्यक्षात मुलांना हे समजलं पाहिजे की काम ही चांगली गोष्ट आहे. काम म्हणजे बोअरिंग असं जर पालकांचं समीकरण असेल तर त्यांना कोण सुधारणार? कोण सिद्ध करणार की काय छान असतं? काम किती छान असतं? सध्या झालंय असं की माणसं पैसे मिळवण्यासाठी नको इतका वेळ घालवतात. त्यात शारीरिक कष्ट नसतात, ते एका जागी बसून काम असतं, खूप वेळेचं काम असतं. त्यांचंही शरीर अगदी आंबून जातं, मन थकून जातं, पावलं जडावतात. अशा अवस्थेत ते घरी येतात. हा जो नोकरीत जास्तीचा वेळ जातो तो त्यांच्या कंपनीने माणसाच्या कुटुंबाकडून चोरलेला वेळ असतो. खरं तर ऑफिसमधून लवकर निघून, घरी येऊन, चहा पिऊन ताजं तवानं होऊन, मुलांना फिरायला नेलं पाहिजे. बायकोलाही स्वतःचा वेळ मिळेल. ती कदाचित मनापासून स्वैपाक करेल. असं व्हायला हवं, पण ते होत नाही.

खेळामधल्या हार-जीतीमुळे वातावरणच बदलतं. वातावरण निवांत करण्याची शक्ती खेळामध्ये आहे. तिचा अनुभव तर घ्या! मुलांबरोबर कॅरम खेळा, पत्ते खेळा, बुद्धिबळ खेळा, सापशिडी – ल्यूडो खेळा आणि परिणाम बघा काय होतो. घरातच खेळलं पाहिजे असंही नाही. घराजवळ टेकडी असेल तर मुलांना टेकडीवर फिरायला घेऊन जा. त्यांना झाडं, पक्षी दाखवा. पावसाळ्यात बिया गोळा करा, त्या पेरा आणि काय होतं ते बघा तरी. आयुष्यात मोठा बदल होतो. आपले खेळ आपणच शोधून काढूया आणि प्रसन्नता निर्माण करूया असं प्रत्येक कुटुंबाने ठरवायला पाहिजे.

आई वडलांनी मुलांशी हे बोललं पाहिजे की मी जे काम करते ते मला खूप आवडतं. आणि त्याचा खूप लोकांना उपयोग आहे, त्यामुळे मला उत्साह येतो काम करायला. मला कधी कंटाळा येतच नाही. हे मुलांनी लहानपणी ऐकलं पाहिजे. तर त्यांचं work culture छान होईल.

परवा एकदा गंमत झाली. एक नवीन खेळ श्रुती पानासेंच्या पुस्तकात वाचून खेळून बघितला. माझ्या नातवंडांसाठी प्रश्नावली काढली. त्याचा हेतू असा होता की १२ वर्षाचा मोठा नातू हल्ली खूप रागारागाने बोलतो, त्याच्या लक्षात यावं की आपण जास्तच रागावतो आहोत. प्रश्नावलीत असे प्रश्न होते की –

चारचाकी गाडी कोण चालवतं? तर बाबा.

स्कूटर कोण चालवतं? – तर आई.

घरातली साफसफाई कोण करतो? – बाबा.

स्वैपाक आणि इतर आवराआवरी कोण करतं? – आई.

घरात रागावतं कोण? – तर आई आणि बाबा.

या मुलांची नावं तिथे होती, पण त्यांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.

पैसे कोण मिळवतं? – तर आई, बाबा आणि दोन्ही मुलं अशा खुणा केल्या. मी म्हटलं, “ तुम्ही कुठले पैसे मिळवता रे?” तर म्हणे, “ नाही का आम्ही छोटी छोटी खेळणी करून तुला विकत आणि तू पैसे देत?” मी त्यांचं एकमेव गिऱ्हाईक असते, तो आमचा मोठ्ठा खेळ चालतो. मला जे त्यांच्याबद्दल लक्षात आणून द्यायचं होतं ते त्यांनी पार खोडून टाकलं.

यानिमित्ताने बालभवन बद्दल मला सांगायला आवडेल की – शाळेत शाळेची शिस्त असते. तिथे अभ्यासक्रम पुरा होणं ही गरजेची गोष्ट असते. त्यात मुलांचं स्वातंत्र्य, त्यांचा आनंद या महत्वाच्या गोष्टी नसतात. घरची शिस्त वेगळी असते, त्या दिनक्रमात मुलांनी बसणं याची जरुर असते. त्यांनी जे जे करायला हवंय ते करणं आवश्यक असतं. बालभवनमध्ये अशी कुठलीही शिस्त मुलांवर लादली जात नाही. त्यांना जे हवं ते शोधून काढता येतं. तशी आमच्याकडे काही हिंडणारी मुलं असतात, त्यांना बालभवन समजून घ्यायचं असतं. ही मोकळीक त्यांना अतिशय आवडते. घरी जाऊन मुलं आई वडलांना सांगतात की, “तुम्ही का आम्हाला ओरडता? बालभवनमध्ये आम्हाला कोणी ओरडत नाही.” मुलांना त्या संस्थेबद्दल तो विश्वास वाटणं हे फार महत्वाचं आहे. संस्थेत काम करणाऱ्या सगळ्यांनी हे लक्षात ठेवून वागावं लागतं.

खेळ कशाला म्हणायचं हे बघितलं तर पुष्कळ खेळ घरातल्या घरातच खेळता येऊ शकतात हे लक्षात येईल. मूल वाढवताना पालकांना अनेक ताणांना सामोरं जावं लागतं. लहान मुलाला उठवा, त्याला शू करायला न्या, त्याला दात घासायला सांगा, त्याचा चेहरा स्वच्छ करा, हात धुवून घ्या, नाश्ता द्या, कपडे बदला, शाळेचं दप्तर भरा, व्हॅनपर्यंत पोहोचवा. हा सगळा सकाळचा पहिला अंक असतो नाटकाचा. आणि त्यात अनेक surprises असणारच.

“बाबा, बाईंनी भूगोलाची नवी वही आणायला सांगितलीय.”

मग बाबाचं एकदम डोकं फिरतं, “मग काल का नाही सांगितलंस? कोणी सांगितलं होतं टीव्ही बघत बसायला? रोज कार्टून बघत बसतोस आणि वेळ घालवतोस. आता सकाळी कुठलं दुकान उघडं असणार? मी ऑफिसला जाताना तुला आणून देईन वही.”

“नाही नाही नाही, नाही चालणार. ताई मला ओरडतील, शिक्षा करतील.

या प्रकारचं संभाषण सकाळच्या वेळात अजिबातच परवडत नाही. कारण कामांमध्ये एजून एक भर पडते. या सगळ्या वातवरणापासून आपल्याला दूर ठेवतो आणि तिसऱ्याच जगात नेतो तो खेळ म्हणायचा. माझ्या मते कशाचाही खेळ होऊ शकतो. दोन हातात – एका मुठीत नाणं आणि एका मुठीत कागदाची पुडी ठेवली आणि मुलाला विचारलं – “ओळख कुठल्या हातात काय आहे?” मूल एका हाताला हात लावून काहीतरी म्हणेल, बरोबर का चूक ते मूठ उघडल्यावर कळेलच. कधी शिताफिनी दोन्ही वस्तू एकाच हातात आणि दुसरा हात मोकळाच असं करता येईल. मग मुलाच्या हातात त्या वस्तू देऊन – “आता मला ओळखायला सांग” असं सांगता येईल. यात गंमत अशी आहे की दर वेळी आपण मुलाचा खेळ घेतला पाहिजे असं नाही, त्यानी पण आपला घ्यावा कधीतरी. जसं अभ्यासाचंही करता येईल. नेहमी तुम्ही त्याला कशाला प्रश्न विचारायला पाहिजेत? त्याला विचारू दे ना तुम्हाला प्रश्न. आणि तुम्हाला येत नाही असं होऊ दे. त्याला फार आनंद वाटतो त्यात. कित्येक वेळा असं लक्षात येतं की मुलांना कळलेलं असतं. एखाद्या कवितेवरचे प्रश्न आपण विचारतोय तर असं वाटतं की याला कळलीय की नाही कविता? पण प्रश्न विचारायला लागलं की तो बरोबर उत्तरं देतो त्याची. आपल्याला वाटतं त्याचं लक्ष नाहिये पण असतं.

कधी मुलाला म्हणता येईल की, “हा रुमाल घे. पण तो जादूचा आहे बरं का. मी तुझ्याकडे टाकला की त्याचा बॉल होईल. आणि तू माझ्याकडे टाकशील तेव्हा त्याचा पक्षी होईल. आता सुरु करूया आपण खेळ.” खेळता खेळता प्रत्येक वेळी त्या रुमालाचं रूप पालटेल. कधी त्याची छोटीशी मुलगी होईल, तर कधी त्याचं छोटंसं मांजर होईल. कधी त्याचं अंडं होईल. तर कधी चन्या मन्या बोरं खायला पानांचा द्रोण होईल. कधी त्या रुमालाचं फुलपाखरू होईल आणि उडून जाईल. किंवा पक्षी होऊन खेळत राहील. असा हा खेळ काही वेळ चालेल.

कधी वर्तमानपत्राचं पान घेऊन बसायचं आणि मुलीला सांगायचं, “याच्यामध्ये गोंधळ हा शब्द कुठे आहे सांग.” ती शोधेल शोधेल शोधेल आणि अचानक तिला सापडेल. मग ती आपल्याला एखादा शब्द सांगेल आणि आपण तो शोधायचा. कधी त्या शब्दावर आपल्याला चर्चा करता येईल. कधी थेट तो शब्द न सांगता त्याचं वर्णन सांगायचं. काहीवेळा तो शब्द लगेच सापडेल तर कधीकधी पत्ता पण लागणार नाही. एखादी कृती दुसऱ्याच्या भागीदारीने केली आणि ती खूप आनंद देऊन गेली, असं होतं की नाही? तो म्हणजे खेळ.

बाजारातून आणलेल्या खेळण्यांनी मात्र मुलांना एवढी मजा येत नाही. एक पालक पूर्वी आले होते ते म्हणत होते, “मी रोज आरामखुर्चीत बसून पेपर वाचतो. माझा छोटा मुलगा ते बघतो आणि आराम खुर्चीत बसायचा प्रयत्न करतो. पण त्याला काही बसता येत नाही. म्हणून बाजारातून मी त्याच्यासाठी एक छोटी आरामखुर्ची आणली. तो त्यात दोन तीन दिवस बसला आणि पेपर उलटा धरून वगैरे वाचला. पण आता काय करू? आता तो बसतच नाही त्यात.” मला इतकं हसू आलं आणि मी गंमतीत त्यांना म्हटलं की, “दोन तीन दिवसांत मूल मोठं झालं पण आपण तिथेच राहिलो ना? आपण नाही मोठे झालो.” तीन दिवस आरामखुर्चीत बसून त्या मुलाचा नव्या गोष्टीतला रस संपला. त्याला काही पुन्हा त्यात बसायचं नव्हतं. पण वडलांना ते बघायचं होतं की कसा आपल्यासारखा तो बसतो. तसं काही काही खेळांचं होतं – आणला – खेळला आणि मूल त्याच्यातून बाहेर पडलं. पण आई बाबांना वाटतं की इतके पैसे देऊन आपण आणला आणि खेळत का नाही तो पुन्हा पुन्हा? पण तो त्याचा निर्णय आहे ना?

अजून एक वाईट गोष्ट म्हणजे महागातले खेळ आणायचे आणि ते कपाटात ठेवायचे. आमच्या एक बाई सांगायच्या हा प्रसंग. त्यांना आईनी चांदीची भातुकली केली आणि ती सेफमध्ये ठेवून दिली. एकदा आई झोपली होती दुपारी तर त्यांच्या मैत्रिणी आल्या. तर भातुकली काढून त्या खेळत होत्या. आई उठल्यावर एवढी रागावली, “मला विचारल्याशिवाय का काढलीस भातुकली?” मग मुलगी म्हणाली, “तुला विचारून जे खेळावे लागतील ते खेळच नकोत मला.” पालकांची यातली भूमिका काय आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. पालक नेहमी पालकत्वाच्या सिंहासनावर बसलेलेच असतात. खेळातून दोघांनाही केवळ आनंदच मिळावा, अशी भूमिका असावी. ज्या खेळातून स्पर्धा निर्माण होते, मी जिंकलो, तू हरलीस, त्यावरून चिडवणं असं पालकांनी वागू नये. कारण तो खेळ मुलाच्या मनोरंजनासाठी आहे. त्याला स्पर्धेत गुंतवण्यासाठी नाही. त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे, हे कधीही विसरता कामा नये पण तेच पालक विसरतात. मुलांना पालाकांच्याशी खेळायला खरं तर आवडतं. पण पालकांना खेळच कळत नसला तर मुलं कंटाळतात. तिथेच पालकांचं सिंहासन आड येतं. खेळात मुलांना त्यांची तुलना कोणाशी केलेली आवडत नाही. दुसऱ्याचं कौतुक केलं तर राग येतो. मीच जिंकायला हवं असं वाटत असताना पालक जर म्हणत असतील, “ तू कसला जिंकतोस, तो मल्हाराच जिंकणार बघ. पैज लावतो मी.” असं चेष्टेत बोललेलं सुद्धा मुलांना अजिबात आवडत नाही. अशा वेळी पालकांनी मुलांना इतरांची उदाहरणं मुळीच देऊ नयेत. मुलं त्यानी चिडतात हे लक्षात ठेवावं. लहानपणी मूल जिंकलं किंवा हरलं तरी त्याला बक्षिस द्यावं. बक्षिस प्रयत्न केल्याबद्दल आहे हे त्याला सांगावं. यश आपल्या हातात नाही, पण प्रामाणिक प्रयत्न करणं आपल्या हातात आहे हे मुलावर खेळाच्या माध्यमातनं फार छान बिंबवता येतं.

पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं कुठलं वागणं मुलाला आवडत नाहिये. ते समजून घेऊन तसं वागणं टाळायला पाहिजे. बोलायचं ते प्रोत्साहन देणारंच बोलायला पाहिजे. खच्चीकरण करणारं नको. अशा प्रकारे पालकांना स्वतःला कळलं की काय करायला हवं आणि काय नको तर मुलांच्या मनाची काळजी आपोआपच घेतली जाईल. आणि तरी मुलाला मोकळेपणानी सांगावं की, “तुला काय वाटतंय ते मला कळत नव्हतं रे. आता मला कळलंय त्यामुळे मी बदललोय. तुला वाईट वाटेल असं मी नाही वागणार आता.” अशा प्रकारे कबुली देण्याचा अजिबात संकोच करू नये.

पालाकसभांमध्ये मी हे नेहमी सांगते की “मुलांना मारू नका आणि रागावू नका.” कारण गिजुभाई बधेकांनी हेच सांगितलं आहे, “तुम्हाला मुलांसाठी काही करावंसं वाटतं का? तर त्यांना मारू नका आणि रागावू नका. एवढ्या दोन गोष्टी करा.” तर पालक म्हणतात की, “आत्तापर्यंत आम्ही मुलांना खूप मारलंय मग आता काय करू?” मी त्यांना सांगते की मुलांना जवळ घ्या तुम्ही आणि सांगा की, “माझं खूप चुकलंय, त्याची मला कबुली द्यायचीय. मला कळत नव्हतं की तुझ्याशी कसं वागावं. त्यामुळे मी इतके दिवस तुला मारलं. पण आता मी अजिबात मारणार नाही.” याचा फार चांगला उपयोग होतो. कारण मुलं फार उदार असतात. मुलं ते विसरून जातात. त्यांच्यात ती खिलाडू वृत्ती असते.

खेळाच्या माध्यमातून बौद्धिक विकास सोप्या पद्धतीने व्हायला पाहिजे कारण खेळातून नकळत अनेक गोष्टी घडत असतात. आपल्याला सुचाणारही नाहीत इतके नवीन नवीन खेळ मुलं शोधून काढतात. मुलं घरातल्या सगळ्या जागा खेळायला शोधून काढतात. टेबलाखालची, कपाटावरची, कपाटाच्या आतली, ओट्यावरची अशी कुठलीही जागा. मुलं सतत नव्या जागा शोधत असतात. ती काय शोधून काढतात आणि त्यातून नवे नवे खेळही शोधून काढतात ते आपल्याला कळतही नाही. मग त्यातून आजीची कवळी आणि आजोबांचा चष्मा सुद्धा सुटत नाही. सगळं त्यांना खेळायला लागतं. ही विविधताच सांगून जाते की मूल किती प्रकारे विचार करतं. हातांनी मूल जितक्या प्रकारच्या कृती करेल तेवढी त्याची समज वाढते. मेंदूच्या अभ्यासातून हे सिद्ध झालेलं आहे की विविध न्युरॉन्सची जोडणी मेंदूमध्ये होते आणि त्यामुळे बुद्धीमत्तांचे वेगवेगळे प्रकार वाढीस लागतात. अनेक प्रकारची कामं मूल करू शकतं.

पालकांनी जर मुलांच्या खेळांकडे लक्षपूर्वक पाहिलं तर पालकही नवे खेळ शोधू लागतील. एक असा खेळ आहे ज्यात पालकांनी मुलांना सांगायचं आहे, “दोघांनी असे उभे राहून रचना करा की दोघांची डोकी एकमेकांना चिकटलेली असतील, दोन्ही हात एकमेकांच्या हातांना चिकटतील आणि एक पाय हवेत आणि एक पाय जमिनीवर असेल.” ती रचना जमली की मुलांना ती खूप सोपी वाटते, मग ते अजून कठीण रचना विचारतात. एक पाय या बाजूला, एक त्या बाजूला, हात तिसरीकडेच अशा रचना त्यांना अतिशय आवडतात. मुलांना त्याच्यात मजाच वाटते. कधी उभ्याने खेळून कंटाळलेली मुलं म्हणतील – आता वेगळा खेळ बसून खेळूया. मग कल्पनाशक्तीचा खेळ खेळता येईल. समजा हवा हा विषय घेतला तर ज्याला जे सुचेल ते हवेबद्दलचं वाक्य त्यानी म्हणायचं. कोणी म्हणेल – हवा सगळीकडे असते. कोणी म्हणेल – हवा थंड असते. कोणी म्हणेल – कधी ती गरम पण असते. थंड हवेची ठिकाणं असतात पण उष्ण हवेची का नसतात? कधी कधी आपली हवा टाईट असते. हवा झाडाची पानं हलवते. हवा कपडे वाळवते. थंड हवेनी तेल गोठतं, पाण्याचं बर्फ होतं. हवा नसली तर आपण जगू शकणार नाही. – असं जे जे प्रत्येकाला सुचत जाईल ते बोलत गेलं तर हवेबद्दलची इतकी माहिती जमा होते. या खेळांना तेवढीच गंमतही येते. खेळ सर्वांचीच परीक्षा बघतात कारण ते तेव्हा सुचणं तेव्हा खूप महत्वाचं आहे. खेळात जे आहे ते करणं महत्वाचं आहे. यालाच बौद्धिक विकास म्हणतात. बौद्धिक विकास म्हणजे फक्त परीक्षेत पडणारे मार्क नव्हेत.

स्वैपाकघरात असलेले सारखे पेले लहान मूल ओळीनी मांडेल, तिरके एकमेकांवर ठेवेल, त्यांच्या वेगवेगळ्या जोड्या करेल, एकात एक घालेल, एकावर एक रचना करेल. फक्त एका प्रकारच्या भांड्यांशी मुलं इतक्या विविध प्रकारे खेळू शकतात. असं म्हणतात की घरातल्या घरात मुलांना गणित आणि भाषा शिकवण्यासाठी अशा खेळांचा उपयोग करता येतो. बटणं, चिंचोके असं काहीतरी वापरून दोन चा पाढा करायला शिकतात. दोन चिंचोके, चार चिंचोके, सहा चिंचोके असे प्रत्यक्ष बघायला मिळतं, त्यामुळे पाढ्याची संकल्पना स्पष्ट होते. नाहीतर पाढे हे अमूर्तच असतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढं तरी मुलांना वस्तूंच्यातून शिकवावं म्हणजे गणिताचा पाया पक्का होईल. भाषेच्या बाबतील त्यांच्याशी खूप गप्पा मारणं, अनेक अनुभव सांगणं, आपल्या लहानपणी केलेलं वेडेपणे सांगणं अशा पुष्कळ गप्पा मारता येतात. तोही एक खेळाचा भागच होतो. तसंच कणिक भिजवली की त्यातला एक छोटा गोळा मुलाला दिला की त्यातून ते काय काय करून बघतं. ताटल्या, वाट्या, गणपती आणि असंख्य काय काय. मुलांच्या कल्पनाशक्तीला आपण कुठेच पुरे पडू शकणार नाही. कधी काचेचे बाऊल्स घेऊन त्यात कमी जास्त पाणी घालून जलतरंग करता येईल. काड्यांनी किंवा चमच्यानी ते हळूच वाजवलं तर त्यातून निर्माण होणाऱ्या नादामुळे मुलं इतकी खूष होतात. बालभवनच्या वाळूमध्ये मुलं रस्ते करतात आणि इकडून नो एन्ट्री असं सांगतात, काड्या वाळूत खुपसून त्याला गुलबाक्षीची फुलं लावतात, म्हणजे रस्त्यावरचे दिवे वाटतात. ओळीनी लावलेले ते दिवे खूप सुंदर दिसतात. कुठल्याही बाहेरच्या साहित्यानी मजा येणार नाही इतकी मजा त्यांना भाजीची पानं, देठं खेळताना येते. भिंग घेऊन सगळ्या गोष्टींच्या रचना बघतानाही मुलांना मजा येते. फळांच्यातली छिद्र, मातीतले किडे अशा सूक्ष्म गोष्टी सुंदर दिसतात.

बालभवनमध्ये इतक्या प्रकारचे उपक्रम चालतात त्यावरून श्रुती पानसे म्हणाल्या, “आपण त्याचं मूल्यमापन करूया की अमुक उपक्रमातून काय प्रकारची बुद्धिमत्ता वाढते?” मी म्हटलं की आपण हे करूया पण पालकांना नको सांगायला. कारण मग पालक मेंदूच्या भाषेतच बोलायला लागतील. पूर्वी एक बाई आल्या होत्या आणि त्या अतिशय गंभीरपणे विचारात होत्या, “काल तुम्ही कुठले संस्कार केलेत? कारण काल आम्ही आलो नव्हतो. तुम्ही सांगितलंत तर मी ते घरी जाऊन करून घेईन.” तेव्हा त्यांना सांगावं लागलं की, “असं काही नसतं हो की रोज वेगळे संस्कार आणि ते रोज लिहून काढायचे.” पण पालकांची अशी समजूत असते.

खेळांमध्ये विविधता आहे, विविध प्रकारे डोकं चालवण्याची मागणी आहे, त्यातली प्रसन्नता आहे, त्यात काही केल्याचं समाधान मिळणं, बौद्धिक समाधान मिळणं, भावनिक स्वास्थ्य आहे, यातून बौद्धिक विकासच होतो. खेळानी वातावरण बदलतं, मानसिकता बदलते आणि रोजची कामंही आपण जास्त उत्साहाने करायला लागतो, याचा संबंध थेट भावनिक बुद्धिमत्तेशी आहे. या खेळांसाठी कुठे वाचनालायात, दुकानात जायला पाहिजे असं अजिबात नाही, साधे खेळ स्वैपाकघरात सुद्धा खेळता येतील.

७-८ वर्षांचं असल्यापासून जर मूल दरवर्षी एक मैदानावरचा खेळ खेळायला शिकलं तर साधारण १५ व्या वर्षी आपला खेळ कुठला हे मूल स्वतः ओळखू शकतं. डॉ. शारंगपाणी म्हणतात तसं- मुलाला खेळ निवडावा लागत नाही, खेळच मुलाला निवडतो. मूल तोपर्यंत बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, नेटबॉल हे खेळलेलं असेल किंवा बुद्धिबळ खेळलेलं असेल. शहरात आपल्या घराजवळ जो खेळणं शक्य असतं तो आपला खेळ. कारण एवढ्या रहदारीतून, प्रदूषणातून मुलाला लांब खेळ शिकायला पाठवणंही नको वाटतं. खेळाडू मूल प्रत्येक खेळातून बऱ्याच गोष्टी शिकत असतं. शिस्त शिकतं, नियम शिकतं, नियमित वेळेवर उठणं, वेळेच्या आधी पोहोचणं हे घडतं. खाण्यावराचा ताबाही मुलं सहज शिकतात कारण तिथले शिक्षक सांगत असतात काय टाळा, काय खा, अमुक इतकं खाल्लंच पाहिजे, नाही म्हणायचं नाही. रोज एवढा व्यायाम झालाच पाहिजे, घाम गळलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी मुलाच्या वयात येण्याच्या काळात १५-१६ व्या वर्षाच्या आसपास जे हार्मोनल बदल होतात ते पेलायला त्याला मदत करतात. १० वी चं वर्ष आलं म्हणून मुलांचा खेळ अजिबात बंद करू नये असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं कारण त्या खेळाचा त्यांना अभ्यासासाठी सुद्धा उपयोग होतो. रोज सकाळी एकच तास खेळासाठी दिला त री पुरे, पण खेळ चालू रहायला हवा. मुलींच्या सुद्धा दर महिन्याच्या पोटदुखी, पाठदुखी, डोकेदुखीच्या तक्रारी असतात नं, त्यांना निश्चित आळा बसतो कारण त्यांचं शरीर तेवढं चिवट बनतं, ताकदवान बनतं. निरोगी शरीरात निरोगी मन राहतं आणि ते हार्मोनल बदलांना चांगलं तोंड देऊ शकतं. त्यामुळे खेळाबरोबचा व्यायाम, त्यातलं मनोरंजन, निरोगीपणा, प्रसन्न मन, सहकार्याची भावना, निरामय स्पर्धेत येणारा उमदेपणा, प्रतिस्पर्धीचं कौतुक करण्याची मानसिकता या सगळ्यानी मुलं खूप मोकळी होतात. या सगळ्याचा उपयोग त्यांना अनेक प्रश्न सोडवण्यासाठी होतो.

खेळातली भांडणंही फार गमतीशीर असतात. क्रिकेट खेळताना आमच्या मुलाला लहान असताना आऊट झालेलं चालायचं नाही. तो आऊट झाला की खूप गोंधळ करायचा की मी नाहीच आऊट. त्यातून मुलांची आग्रही वृत्ती दिसते. आणि भांडणं म्हणजे मुलं इतके खोटेपणे करतात की आपण रागवायला लागतो की आता खोटेपणा करायचा नाही हं! पण ती त्यांची गंमत चालू असते. कारण खोटेपणा हा जिंकण्यासाठी असतो. कॅरम खेळताना आपल्या सोंगट्या काढून घेणं, जिथून सोंगटी नीट घेता येईल अशा दुसऱ्या जागेवर बसून खेळणं असंही मुलं करतात. पण या भागाकडे गंमत म्हणूनच बघायला पाहिजे. खरोखर बाहेर खेळायला गेली मुलं की असलं काही करून चालणार नाहिये. पण घरातल्या भांडणात ते चालतं. घरी आऊट झाल्यावर रडणारा मुलगा मित्रांच्यात नाही रडत.

(आकाशवाणीवरील स्नेहबंध कार्यक्रमातील ‘मुलं, पालक आणि घरातून होणारी जडण घडण’ या मालिकेअंतर्गत घेतलेल्या मुलाखतीवरून केलेलं लिखाण.)

लेखन व मुलाखत – शोभा भागवत; प्रश्न व मुलाखतकार – ऋचा देव

संकलन – आभा भागवत;
संकल्पना – प्रसाद मणेरीकर

Read More blogs on Parenting Here