शोभा भागवत लिखित ‘आपली मुलं’ या पुस्तकातील लेख
लेख क्र. 6 : मुलं आपल्याला घडवतात
लेखन: शोभा भागवत
प्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे
एक आजीबाई एकदा स्वेटर विणत बसल्या होत्या. जवळच त्यांची छोटी नात खेळत होती. ती सारखी लोकरीच्या गुंड्याजवळ यायची आणि लोकरीचा गुंता करायची. शेवटी वैतागून आजीबाईंनी नातीला कुठे तरी अडकवून टाकायचं ठरवलं. चारी बाजूला कठडे असलेली एक छोटी कॉट नातीसाठी केली होती. त्यात तिला ठेवलं आणि शांतपणे आजीबाई विणू लागल्या. नातीला हा अपमान खपला नाही. तिनं रडून-ओरडून घर डोक्यावर घेतलं. आजीबाईंचं लक्ष लागेना. शेवटी आजीबाईंनी तिला उचललं, खाली काढलं आणि आपण त्या कठडे असलेल्या कॉटमध्ये जाऊन बसल्या.
आता नात खूष होती. तिला घरभर हिंडायला मिळत होतं. कठडयांमधून डोकावून आजीपण बघत होती. नातीचं खेळणं झालं, आजीबाईंचं वीणणं झालं !
कुठेशी वाचलेली ही गोष्ट मला फार आवडली. आपल्या प्रश्नांना उत्तरं अनेक असतात. पण आपण स्वतःभोवती एक चौकट आखून घेतलेली असते. त्या चौकटीतच प्रश्न सोडवायची आपली धडपड असते आणि ते सुटत नाहीत. उत्तरं त्या चौकटीबाहेर असतात.
गोष्टीतल्या आजीबाईंनी चौकट मोडली. नातीसाठी केलेल्या कठडयांच्या कॉटमध्ये आजींनी बसायचं नसतं, ही चौकट होती. नातीच्या अन् आपल्या भल्यासाठी त्यांनी ती चौकट मोडली !
मुलं होण्यापूर्वी आपल्याही स्वभावात, विचारात अशा अनेक चौकटी तयार असतात. मुलांच्या वागण्याकडे, मागण्यांकडे, प्रतिक्रियांकडे डोळसपणे पाहिलं तर आपल्याला जाणवतं, आपण बदलायला हवं. त्यात कमीपणा वाटून न घेता आपण या जाणीवेला प्रतिसाद दिला तर जाणवतं की, मुलं आपल्याला घडवतात. आपल्या चौकटी मोडून टाकतात.
अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या अडीच तीन वर्षाच्या मुलानं काही हट्ट केला, म्हणून वडलांनी त्याला पायावर जोरदार फटके दिले. थोड्या वेळानं डोळे पुसत हुंदके आवरत मुलगा वडलांजवळ आला. पायावरचे वळ दाखवत म्हणाला, “पुन्हा नाही मी हट्ट करणार. मला मारू नको !” वडलांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या रात्री त्यांना झोप येईना. आपण मुलाला मारलं हे चुकलं. त्या कोवळ्या पायावरचे वळ सारखे डोळ्यांसमोर यायला लागले. त्यांनी पक्कं ठरवून टाकलं की पुन्हा मुलाला मारायचं नाही आणि हा निश्चय कायमचा पाळला ! या वडलांना मी फार जवळून ओळखते. ते माझ्या मुलांचे वडील आहेत !
सगळेच आईबाप पोरांना प्रथम मारतात, तेव्हा त्यांना ते कुठे तरी टोचत असतं, वाईट वाटत असतं. या वाईट वाटण्याला प्रतिसाद दिला नाही की सवय होऊन जाते.
खरं तर राग ही काही भावना नव्हे, ती प्रतिक्रिया असते. पावडरचा डबा सांडल्याबद्दल पोरगं आईचा मार खातं; पण तोच डबा वडलांनी सांडला तर आई मुकाट्यानं पावडर भरून ठेवते. तेव्हा तिचा राग कुठे जातो ? राग आवरता येतो; पण ते चूक करणाऱ्या माणसांवर अवलंबून असतं. रागामागची भावना ओळखायला शिकलं पाहिजे.
मुलं त्यांच्या गोडव्यातून, निरागसपणातून आपल्याला राग आवरायला शिकवत असतात.
अर्थात राग आवरण्याचीही काही मर्यादा असते. शेवटी आपणसुद्धा माणसंच असतो. कधी कधी मुलं आपली सहनशक्ती ताणून पाहत असतात. एकापाठोपाठ एक खोड्या करतात, किरकिर करत राहतात. अशा वेळी मुलांवर रागवायला हवंच; पण रागवायचं कसं ? एकदम खेकसून ? अंगावर ओरडून ?
मुलाचं वागणं आपल्याला त्रास देत आहे हे प्रथम शांतपणे सांगायला हवं, समजावून द्यायला हवं. तरीही नाही ऐकलं तर रागावून सांगणं ही दुसरी पायरी, तरी ऐकलं नाही तर एखादा फटका मिळेल ही सूचना आणि नंतर मुलाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणं. दुर्लक्ष करणं ही मारापेक्षा भयंकर शिक्षा असते. कारण मारात स्पर्शाचं तरी समाधान मिळत असतं. दुर्लक्ष केलं तर तेही मिळत नाही.
या कुठल्याही पर्यायांचा विचार न करता संतापून थेट पोरांना बडवून काढण्याची पद्धत असते. माराला मुलं सरावतात. त्याचा पुढे उपयोग होईनासा होतो आणि मुलं मोठी झाली की, उलट मारू शकतात. शिवाय मारानं मुलं कोडगी बनली की ती कशाचा विचारही करत नाहीत आणि माराची भीतीही बाळगत नाहीत. त्यांना स्वतःच्या चुकांतून शिकण्याची संधीच आपण नाकारतो.
कित्येकदा तर आपलं काही चुकलं हे कळण्याच्या आतच पोराच्या पाठीत धपाटा बसलेला असतो ! अशा वेळी मुलं फार दुखावतात. हा राग मनात ठेवतात. एकूण मारानं काहीही साध्य होत नाही. मारानंच मुलं ताब्यात राहतात, ही अगदी चुकीची समजूत आहे.
एखादं वागणं चुकीचं कसं आहे, हे आधी समजावून सांगितलेलं असलं तरच आई-वडलांना मुलांना रागवायचा हक्क आहे; पण केवळ लहान मूल आपल्याला उलट मारू शकत नाही, म्हणून त्याच्या आकाराचा फायदा घेऊन त्याला बडवणं हा अधिकार आईबापांना आणि कुणाही मोठ्या माणसांना नाही !
केवळ मुलांशी बरं वागून ही चौकट मोडत नाही. घरातल्या नोकर-चाकरांशी वागतानाही हे तत्व पाळावं लागतं. मुलांशी गोड वागणारे पालक जर नोकरांवर खेकसत असतील तर मुलं हे वागणंही चटकन उचलतात. बरं केव्हा रागवायचं केव्हा नाही हे तारतम्य मुलांना कळत नसतं. तेव्हा समोरचा माणूस कुणी का असेना, माणुसकी सोडून कधी वागायचं नाही, दुसऱ्याचा कचरा करून त्याला बोलायचं नाही, हे सगळ्या पालकांना आपल्या मुलांसाठी शिकावंच लागतं !
पूर्वी एका जोडप्याला जेव्हा दहा-बारा मुलं असायची, तेव्हाचे अनुभव भावंडं सांगतात. सर्वात मोठ्या मुलाच्या किंवा मुलीच्या वेळी आईवडील फार कडक असायचे. अनेक बंधनं लादली जायची. शिस्त कडक अन् शिक्षाही कडक; पण हळूहळू आईवडील निवळायचे. शेवटच्या मुलाला त्या मनानं अधिक प्रेम, अधिक सवलती, अधिक मोकळीक मिळायची.
कदाचित शेवटच्या मुलाला रागावण्याइतकी शक्तीच आई-वडिलांच्यात उरत नसेल किंवा विचार करून कडक शिस्तीचे तोटेही कळत असतील. आज जेव्हा दोनच मुलं घरात असतात तेव्हा ते शहाणपण आपलं आपल्यालाच शिकावं लागतं. शिस्तीची मर्यादा ओळखावी लागते तशी लाडाची मर्यादाही ओळखावी लागते !
मुलांच्या लाडाला, मुलांसाठी कामं करण्याला काही मर्यादा असतात हे मुलचं आपल्याला शिकवतात.
स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन, स्वतःच्या कपड्यांकडे दुर्लक्ष करून, मुलांना छान छान कपडे घेणारे पालक असतात. मुलांचे हट्ट ते पुरवत असतात आणि पालकत्वाचं कर्तव्य पुरं केल्याचं समाधान मिळवत असतात; पण हळूहळू या मुलांच्या मागण्या वाढतात, आईवडिलांची पर्वा न करता तो स्वतः ऐटीत राहतो अशा वेळी लाड फार झाले हे समजायला हवं. वेळीच त्याला ती समज द्यायला हवी.
आपण मुलं जन्माला घालतो ती काही स्वतःचं सगळं जीवन त्यांच्यासाठी उधळून टाकायला नाही. मुलं वाढवणं हा आपल्या जीवनातला एक भाग असतो. महत्वाचा भाग असतो. पण मुलं झालीं की स्वतःचे सगळे छंद, सगळ्या आवडीनिवडी, सगळी करमणूक विसरून मूल एके मूल करायची जरूर नसते. आपण आपल जीवन असं गोठवून टाकणं योग्य नसतं. मुलंसुध्दा मोठी झाली की आपल्याला त्याबद्दल दोष देतात. साधारणपणे बाळाच्या आईवडलांना, विशेषतः आईला असं म्हणायची पद्धत असते ‘आता कसली तू सिनेमा पाहतेस वर्षभर ? आता सगळं विसरा !’ हे फार दुष्टपणाचं विधान आहे. ते बाळाच्या आईवडिलांनी कधीही मान्य करू नये. मूल तान्हं असल्यापासून दिवसाकाठी एखादा तास आईला मोकळा मिळायला हवा. सारखी तीच तीच कामं करून कंटाळा येतो. तो कंटाळा घालवायची संधी हवीच.
मी पण माणूस आहे. मलाही इतर गोष्टी कराव्याशा वाटतात. त्यासाठी काही वेळ हवा असतो हे साऱ्या घराला आईनं पटवायला हवं. म्हणजे घरानं पटवून घ्यायला हवं. नाही तर वर्षानुवर्ष मुलांसाठी खस्ता खाणारी आई आजारी पडली, तर मुलं ढुंकूनही पाहत नाहीत. कारण आई फक्त आपलं करण्यासाठी असते. तिच्या काही गरजा असतात हे तिनं कधी सांगितलेलंच नसतं. त्यामुळे ती आजारी पडली की आपली होणारी गैरसोय फक्त मुलांना दिसते. कित्येकदा वडीलही या भावनेशी सहमत असतात.
आपल्या ‘करण्याचं’ हे ‘फळ’ असेल तर प्रत्येक आईनं वेळेवर विचार करायला हवा.
मुलांना घेण्याची सवय लावायची तशी देण्याचीही सवय लावायला हवी. ज्या मुलाला लहानपणी आईनं कधी डोकं चेपायला सांगितलं नाही, पाय चेपायला सांगितलं नाही त्याला मोठेपणी बायको आजारी पडली की, तिच्यासाठी काही करावं लागतं हे सुचणारच नाही.
मुलांना आणि मुलींना वेगळी वागणूक देण्याच्या आपल्या पद्धतीचे अफाट तोटे घराघरात दिसत असतात. मुलींनी केर काढला पाहिजे, मुलींना स्वयंपाक आला पाहिजे, कलाकौशल्याची कामं आली पाहिजेत, आदरातिथ्य करता आलं पाहिजे, याबद्दल आईवडील फार जागृत असतात; पण हे सगळं मुलांनाही यायला हवं, असा आग्रह धरणारे फार कमी असतात. लहानपणच्या या अपुऱ्या शिक्षणाचे तोटे पुढे पुढल्या पिढीच्या संसारातही नुकसान करत राहतात. ज्या घरात वडील काहीही घरकाम करत नाहीत, त्या घरातल्या मुलाला हे शिक्षण देणं कठीण जातं. त्यासाठी तरूण पालकांनी आवर्जून या गोष्टी कराव्यात. वडील कितीही ‘बिझी’ असले तरी त्यांनी अंघोळीचं पाणी स्वतःचं स्वतः काढून घेणं, सुटीच्या दिवशी तरी स्वतः बटणं वगैरे शिवणं, एखाद्या वेळी निदान चहा करणं, सरबत करणं, ही न जमणारी कामं असतात का ? ही आणि अशा घरकामं यायला हवीतच. रोज ती सगळी केली पाहिजेत असं नाही; पण पुरुष ही कामं करत नाहीत असं मुलांच्या मनावर कधीही ठसू देऊ नये.
रोजच्या दिनक्रमात एखाद्या तरी कामाची जबाबदारी अशी वडलांनी घेतलेली असली की, मुलांवर त्याचा कायमचा परिणाम होतो. आमच्याकडे मुलांना पहाटे अभ्यासाला उठवायचं, त्यांना कॉफी करून द्यायची, अभ्यासासाठी बसायला तयारी करून द्यायची हे काम वडील करायचे. अजूनही मला त्या कामातली त्यांची हौस, तळमळ आठवते. माझे भाऊ वडलांच्या पुठे जाऊन मुलांना अंघोळी घालणं, भरवणं, झोपवणं हेही सगळं करतात. तेव्हा वडलांनी पेरलेलं बी उगवताना मला दिसतं.
अनेक तरूण पुरुष पालक आपल्या मुलांमध्ये असा रस दाखवू लागले आहेत. आपल्या चौकटी मोडत आहेत हे पाहून बरं वाटतं. त्यांना हसून किंवा कुत्सितपणे काही बोलून, उपहास करून हा गुण मारण्याचं पुण्यकर्म मात्र आसपासच्या माणसांनी करू नये.
मुलांचं सगळ्या गीष्टींकडे फार बारकाईनं लक्ष असतं. प्रत्येक गोष्टीचे संदर्भ ती आपल्या चिमुकल्या अनुभवविश्वाशी, भावविश्वाशी जोडत असतात. आपण त्यांना जे शिकवलेलं असतं ते तपासून पाहत असतात.
एकदा कुणाकडे तरी जेवायला गेले असताना घरातल्या तरूण मुलीनं चायनीज सूप केलं होतं. ते काही फार बरं झालं नव्हतं; पण तिनं विचारल्यावर आम्ही छान झालंय म्हटलं. घरी आल्याबरोबर मुलांकडून प्रश्न आला-‘ते इतकं बेकार सूप होतं त्याला तुम्ही छान छान काय म्हणत होता ?’ मग समजावून सांगणं आलं- तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. सूप खरंच बरं नव्हतं झालं; पण त्या मुलीनं ते प्रथमच केलं होतं, तिला वाईट वाटलं असतं म्हणून हे छान झालंय असं सांगितलं. हे खोटं बोलणं आहे; पण इथे खऱ्या-खोट्यापेक्षा त्या मुलीला प्रोत्साहन देण्याची जास्त गरज होती. असं आम्हाला वाटलं. इथे खोटं बोलणं माफ आहे असं आम्ही ठरवलं.
खोटं बोलू नये असं मुलांना शिकवलं की, काम भागत नाही. त्यातल्या असंख्य छटा अशा वेळोवेळी समजावून घ्याव्या लागतात हे लक्षात आलं. मुलांच्या देखत कुणाशीही वागायचं, बोलायचं झालं की, या दुर्बिणी आपल्यावर रोकलेल्या असतात याची जाणीव ठेवायला हवी हा धडा मिळाला.
एरवी मुलांकडे साफ दुर्लक्ष करून वागत राहण्याची आपली पद्धत असते. रस्त्यात भेटलेली माझी एक मैत्रीण लवंगी फटाक्यांची लांबलचक माळ लावावी तसं फटफट फटफट बोलत होती. थांबायचं नावच नाही ! कडेवरची माझी दोन वर्षांची मुलगीही कंटाळली होती. मलाही निघायला हवं होतं; पण ते तिला कळेना. शेवटी मुलीनं चक्क तिच्या तोंडावर आपला हात धरला आणि ‘चला आता घरी जाऊ या !’ असं म्हणाली. मुलांचं अस्तित्व आपण त्यांना सिद्ध करायला भाग पडतो आणि वर ‘ही म्हणजे न कुणाशी एक मिनिट बोलू देत नाही !’ म्हणतो.
हे जसं एक उदाहरण झालं तसं दुसऱ्या टोकाचंही एक उदाहरण देते. आईवडलांची मित्रमंडळी आली असताना मुलांकडे दुर्लक्ष होतं हे मुलांना जाणवतं. मग ती सारखी मधेमधे काही तरी विचारून नको करतात. लक्ष वेधून घेण्यासाठी कधी ओरडतात, रडतात, भांडतात. अशा वेळी जसं आपल्या बोलण्याला आवर घातला पाहिजे तसचं मुलालाही हे समजावून द्यायला हवं की, ‘तुझे मित्र आले की तू आमच्याशी बोलतोस का ? या पाहुण्यांशी मला कामाचं बोलायचं आहे. तू दहा मिनिटं इतर काही कर, मग मी तुझ्याशी बोलेन !’ ही शिस्त मुलांना लागणं जरुरीचं असतं. इतरांच्या गरजांचा विचार करायला मुलं त्यातून शिकतात.
याबरोबरच घरातल्या मुलांना दरवेळी चॉकलेट, खाऊ घेऊन येणाऱ्या पण नंतर त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या मित्रमंडळींना पण सांगितलं पाहिजे- आता मुलं मोठी झालीत. त्यांना तुम्ही अभ्यासाबद्दल, त्यांच्या खेळांबद्दल काही विचारा, गप्पा मारा, विनोद सांगा, कोडी घाला, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
आमचे एक डॉक्टर मित्र मुलांना औषधांच्या जहिरातीतली प्राण्यांची रंगीत चित्र कापून आणून देतात. मुलांना ती फार आवडतात. गोळ्या-चॉकलेटांपेक्षा ही भेट मलाही आवडते.
सगळ्या भेटीची किंमत पैशात मोजण्याच्या वृतीपासून मुलं अलिप्त असतात हे किती छान आहे ! आपण हे मुलांपासून शिकायला हवं.
आमच्या नात्यातल्या दोन जावांची गंमत आहे. भाऊबीजेला या घरून त्या घरी भाऊबीजेच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. जावेनं आपल्या मुलीला किती रुपयांचं काय दिलं याचा अंदाज घेऊन तिच्या मुलीला भाऊबीज पाठवली दर दिवाळीतल्या या चर्चा ऐकून एकीची मुलगी तिला म्हणाली, “आई, यापेक्षा काकू आणि तू एकमेकींना नुसते पैशाचे आकडे का कळवत नाही ?”
यावर ‘काय आगाऊपणे बोलतेस ग ! मार खाशील पुन्हा असं काही बोललीस तर !’ हा दम मुलीला मिळाला आणि आईनं स्वतःला घडवायची संधी घालवली.
असे अनेक प्रसंग आपल्या घरात घडत असतात. मुलं नावाचे परीक्षक आपल्या वागण्याचं मूल्यमापन करत असतात. मुलं नावाचे शिक्षक आपल्याला अनेक धडे शिकवू पाहत असतात. मुलं नावाचे पालक कित्येकदा आपल्याला सांभाळतही असतात. आपण या सगळ्यांकडे उघड्या डोळ्यांनी पाहत नाही.
कधीकधी असं स्वतःला घडवणं गैरसोयीचं असतं. स्वार्थाला आळा घालावा लागतो. स्वच्छंदीपणे वागता येत नाही. दुटप्पीपणा उघडा पडतो. खरं तर शिकण्याची इच्छा असली तर काही गोष्टी सोडण्याची पण तयारी ठेवावी लागते. नाही तर कुटुंबात प्रत्येकाला हवं ते मिळायला हवं असेल तर प्रत्येकानं हवं ते थोडं सोडायचीही तयारी ठेवावी लागते. नाही तर ज्याला जबरदस्तीनं कायम त्यागच करावा लागतो तो आणि त्याग करायला लावणारा दुसरा दोघंही अपूर्णच राहतात. पालक आणि मुलं या नात्यात ही जबरदस्ती असू नये. नवराबायकोच्या नात्यातही असू नये. मुलांसाठी बळी जाण्याची भूमिकाही पालकांनी घेऊ नये.
जिथे मुलांचं मुलपणचं बळी जात असतं, अशा समाजाची ओळख झाली की आपण कशा कशाचे किती प्रकारचे बाऊ करत जगत असतो ते जाणवतं आणि आपली आपल्यालाच लाज वाटते. आपल्या पालकपणाला निराळीच जाग येते. त्याबद्दल बोलू या पुढच्या लेखात….
Read More blogs on Parenting Here