लेखक :  वृषाली गटणे


आज सकाळी सावि उठली तीच जरा कुरकुर करत. शू करून झाल्यावर ब्रश करायलाच येईना. मेघना तिच्या मागे मागे धावली, तिला पकडून आणलं, तेव्हा कुठे दात घासून चकचकीत झाले. मग दूध प्यायला समीर तिला गच्चीत घेऊन बसला. तर सावि गच्चीत गोल गोल फिरत, उड्या मारत राहिली. समीर म्हणाला, “साऊ sssss, ये दूध पिऊ sssss!”. नेहमी तो असं म्हणाला की सावि त्याच्याकडे पाहून खुद्कन हसायची आणि गटकन दूध पिऊन टाकायची. पण आज काही तिने असं केलं नाही. बराच दादापुता केल्यावर जेमतेम अर्धा कप दूध तिच्या पोटात गेलं.

मग तिचा चित्रं काढायचा मूड होता. तिनी कपाटातून बरेच कागद, खडू, पेन्सिली घेतल्या आणि हॉलच्या मधोमध सगळं मांडून बसली. या कार्यक्रमात ती बराच वेळ रंगली. मेघना जेव्हा तिला अंघोळीसाठी बोलवायला गेली, तेव्हा साविसमोरचे सगळे कागद झकास रंगीबेरंगी झाले होते. उभ्या आडव्या रेघा, नागमोडी रेघा, तिरक्या रेघा, गट्टू गट्टू गोल, छोटे मोठे गोल अश्या वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या रंगांत गर्दी झाली होती. मेघना तिच्या शेजारी बसून चित्रं पहायला लागली. एक एक चित्र पाहताना तिच्या डोळ्यासमोर रंगीत पक्षी शीळ घालायला आणि नाचायला लागले. हिरवा पोपट, काळी मैना, निळा खंड्या, लालबुड्या, आणि मोरसुद्धा!

“आजी कुठे गेली?” साविच्या प्रश्नाने तिची तंद्री तुटली.

“अं… आजी?”

“उमा आजी कुठे गेली?”

“अगं ती पुण्याच्या घरी नाही का!”

साविने मेघनाच्या हातातले कागद घेतले आणि वर खाली करायला लागली. एक कागद ज्यावर एक मोठ्ठा लाल गोल आणि दोन तीन काळ्या आडव्या रेघा होत्या तो वर धरून ती म्हणाली “ही आहे उमा आजी. ती मैदानात चक्कर मारतीये. हे तिचं आवडतं निळ्या फुलांचं झाड.”

मग एक निळा चौकोन, त्याच्या समोर जरा लहान पिवळा चौकोन होता तो कागद वर धरून म्हणाली, “ही आहे मी आणि उमा आजी. आम्ही दोघी बागेत बॉल खेळतोय.” अरेच्चा! खरंच की! मधला नारिंगी गोळा मेघनाने आधी पहिलाच नव्हता.

मग अजून एक कागद साविने वर धरला. “हे ओळख पाहू!”. त्या कागदावर बरेच गोल आणि उभ्या आडव्या रेघा होत्या. त्या पण वेगवेगळ्या रंगात. मेघनाने विचार केला. गाडी कुठल्या दिशेने चालली होती याचा जरा अंदाज तिला आला होता. पक्षी तर उडून गेले होते. मग डोळे बारीक करत, हात कागदावर जरासा हवेत हलवत म्हणाली, “हं…. ही इकडे सावि आहे का?” सावि गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, “होsssssss आणि इथे उमा आजी, आज्जो, अंजोर, सृजन, ठाण्याचे आजी-आजोबा, काका, नवी काकू, आणि पणजी आज्जी!” एका एका गोलाला तिनी नावं दिली. “आम्ही सगळे आईस्क्रीम खातोय.”

मेघनाने चित्रात प्रत्येक गोलासमोर ते ते नाव लिहलं, त्या चित्राचा एक झकास फोटो काढला आणि व्हाट्सअँप गटावर पाठवून दिला. काही वेळातच साविसाठी खूप साऱ्या पप्प्या आणि हसरे चेहरे उडत उडत आले आणि तिच्या अंगा-खांद्यावर विसावले. साविने त्याची फुलपाखरं केली आणि गच्चीतल्या रंगीत फुलझाडांवर सोडली.

तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की सावि आणि तिचे आई बाबा त्यांच्या कुटुंबापासून दूरच्या गावात राहतात. दूरच्या म्हणजे अनेक किलोमीटर दूर बरं का. फक्त विमानानेच जाता येईल अश्या ठिकाणी. काही महिन्यांपूर्वीच ते इथे राहायला आले होते. त्यानंतर एक दिड महिन्यातच कोरोना नावाच्या एका राक्षसाने अख्ख्या जगात धुमाकूळ घातला होता. साविच्या पणजीने तिला सांगितलेल्या गोष्टीतल्या राक्षसासारखाच! त्यामुळे सावि आणि आई बाबा तर घरात अडकले होतेच, पण तिच्या उमा आजीचा त्यांच्याकडे जाण्याचा प्लॅनही रद्द झाला होता. छोट्या साविला खूप खूप वाईट वाटलं होता. व्हिडिओ कॉल करून तिचं पोटचं भरायचं नाही. सगळ्यांची आठवण यायची.

आई बाबा स्वयंपाक करत असताना साविने तिचा आवडता खेळ सुरु केला. एका टोपलीत सगळे बटाटे भरून घेतले. आणि ते परातीत नीट मांडले. परात गोल गोल फिरवली. मग ते सगळे बटाटे पातेल्यात ठेवले. “उमा आजी आज बटाटेवडे करणार आहे. आज्जोला आवडतात म्हणून.” ती स्वतःशीच म्हणाली.

आणि मग मेघनाकडे बघून म्हणाली, “आई, आपणपण बटाटे वडे खाउयात! आणि आईस्क्रीम सुद्धा!”

दुपारचं जेवण करताना परत साविबाईंचं बिनसलं. भाजीत मिरची दिसली म्हणून तिने जोरात भोकाड पसरलं आणि हाताने पाणी भरलेला पेला ढकलून दिला. सगळीकडे पाणीच पाणी झालं. समीरने ते पुसून घेतलं. तोपर्यंत मेघनाने साविला शांत करून भरवायला सुरवात केली. तेवढयात तिला बाहुलीची आठवण आली. मग ती बाहुली स्वतः जाऊन आणेपर्यंत आणि तिला आपल्या मांडीवर बसवून जेवेपर्यंत काही साविला धीर निघेना. अखेर सगळ्यांचं जेवण झालं. तेवढयात फोन वाजला. फोनवरचा फोटो पाहून साविला हसू आलं. “उमा आजी!”

“हाय साऊ माऊ! काय करतीयेस? जेवण झालं का?”

साविची उमा आजी रोज दुपारी एक वाजता त्यांना व्हिडिओ कॉल करायची आणि ती सुरवातीला हेच प्रश्न विचारायची. मग सावि, मेघना, आणि आजी खूप मस्त गप्पा मारायच्या. सावि आजीला एखादं तिच्या भाषेतलं गाणं म्हणून दाखवायची. ते आजीला बरोब्बर कळायचं. आजी तिला पुण्यातल्या गंमती जंमती सांगायची. पण साविला काही अजून घड्याळ, वेळ हे माहित नाहीये ना! ती तर सकाळी उठल्यापासून आजीच्या फोनची वाट पाहत होती. आणि आता आजीचा फोन आला होता. आजी फोनच्या चौकटीतून साविकडे पाहून गोड हसत होती.

साविला काय करू आणि काय नाही असं झालं. ते ठरेपर्यंत ती थोडा वेळ लाजली. मेघना आजीला कालच्या बाजारहाटीबद्दल सांगायला लागली तसं साविला आठवलं,

“आजी आजी, आम्ही केळ्याचा केक केला. खूप मस्त! खूप गोड!”

“आणि हे बघ काय्ये…. मी खूप सारी चित्रं काढली! तू पाहिलीस ना!” .

“आज्जोने वडे खाल्ले का?”

“ए बाबा, मी कुठे???? मला शोधून तर दाखव! आजी, तू बाबाला सांगू नकोस हा!”

हा लपाछपीचा खेळ बराच वेळ रंगला. थोड्या वेळाने आज्जोही आला आणि लपून बसला. पण सावि खूप हुषार! तिला माहितीये की आज्जो नेहमी दारामागेच लपतो. तिने आजीला बेडरूमच्या दारामागे दाखवायला सांगितलं आणि खरंच आज्जो तिथे सापडला. सावि स्वतःवरच खूश झाली.

मग साविने सगळ्यांसाठी सरबत बनवलं. प्रत्येकाला एकेक पेला दिला. आजी आजोचे पेले तिने बरोब्बर फोनसमोर ठेवले. मेघना चुकून त्यातला एक पेला उचलायला लागली तेव्हा साविने तिच्याकडे पाहून डोळेच मोठे केले. “अगं हा तुझा नाहीय्ये, हा तुझाय!”

सरबत कार्यक्रम झाल्यावर आजी म्हणाली, “साऊ, आता झोपायची वेळ झाली ना!”

जोरजोरात मान हलवत सावि म्हणाली, “आजी, माझ्या किल्ल्यात येतेस का?”. अरे हो, किल्ला दाखवायचा राहिलाच होता. काल मेघनाने एक पुस्तकांचा खोका काढून पुस्तकं बुकशेल्फमध्ये लावली. मग काय, सावि लग्गेच रीकाम्या खोक्यात जाऊन बसली आणि तिने त्याचं विमान केलं होतं. “मी निघाले भुर्रर्र ….”. थोड्या वेळाने त्या खोक्याचा एक पक्षी झाला होता आणि तो साविला तिच्या मावशीच्या घरी नेणार होता. तिथे सावि, अंजोर, आणि सृजन स्पायडरमॅन होऊन खेळणार होते. तोच हा खोका. आता या खोक्याचा किल्ला झाला होता वाटतं.

सावि आणि मेघना खोक्याच्या किल्ल्याकडे आल्या. सावि खोक्यात जाऊन बसली. “आजी, हा बघ आपला किल्ला! तू, मी, आणि आई इथे राहत असणार… एक दिवस या किल्ल्यावर एक ड्रॅगन अटॅक करणार…. पण आपण त्याला छान छान खाऊ… बेसनाचे लाडू… देणार, आणि तो आपला मित्र होणार! हो की नाही!” आजीने आणि आईने तिच्या गोष्टीला हसत हसत दुजोरा दिल्यावर साविला एकदम छान वाटलं

“आजी, आता तुला झोप आली असेल ना? मी तुला झोपवते.” असं म्हणत सावि खोक्यातच लवंडली. तिनी आईला फोन तिच्या कुशीत ठेवायला सांगितला. त्यावर तिचा छोटा फुलांचा रुमाल ठेवला आणि म्हणाली, “आजी, मी तुला चादर घातली आहे, म्हणजे तुला थंडी वाजणार नाही. आणि आता मी तुला थोपटते. तू मला गाणं म्हण.”

साविच्या कुशीत आजी आणि आजीच्या कुशीत सावि, दोघी मस्त झोपी गेल्या.

मेघना लहान असताना उमा आजी तिला मांडीत झोपवायची. तिचा बाबा, म्हणजे साविचा आज्जो तिला कडेवर घेऊन झोपवायचा. त्याची तिला एकदम आठवण आली. समीर त्यांना बोलवायला आला तेव्हा तिने तोंडावर बोट ठेवून त्याला शांत राहायची खूण केली. साविकडे हात करून “ही झॊपलीये” असं सांगितलं.

मग ते दोघं जण बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि स्वप्नातही एकमेकींशी खेळणाऱ्या सावि व उमाआजीकडे पाहत राहिले.

Read More blogs on Parenting Here